एकात वास्तववाद आणि अमूर्ताची सरमिसळ, दुसऱ्यात निखळ कॉमेडी
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मीना कर्णिक
  • ‘पिफ' उर्फ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चं आणि त्यातील दोन सिनेमांची पोस्टर्स
  • Mon , 29 January 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र पिफ PIFF पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल Pune International Film Festival

कोचावर पसरलेले कपडे, जमिनीवर पडलेले कागद, किचनच्या ओट्यावरची खरकटी भांडी, डायनिंग टेबलवर अन्नाचे कण... आणि या सगळ्या पसाऱ्यात खुर्चीवर बसलेली मिसेस जे. मध्यमवयीन. अजागळ. आपल्या भोवतालच्या जगापासून तुटलेली. नैराश्यानं ग्रासलेली.

तिचं असणं आणि त्या घराची अवस्था पाहून प्रेक्षक म्हणून आपल्या मनावरही मळभ दाटून येतं. या भिंतीच्या आत चांगलं काही होऊच शकत नाही असं वाटतं. शून्यात बघत बसलेल्या मिसेस जेच्या घरात तिची आईसुद्धा आहे. मधूनच ती आपल्या खोलीतून बाहेर येते. स्वैपाकघरातला फ्रिज उघडते. काहीतरी काढून पुन्हा आपल्या खोलीत जाते. पण मिसेस जेला त्याची जाणीवही होत नाही. शाळेतून घरी आलेल्या धाकट्या मुलीनं मारामारी केलीये. तिच्या तोंडी तिच्या वयाला न शोभणाऱ्या शिव्या आहेत. वाक्यागणिक ती ‘फक यू’ म्हणतेय. पण मिसेस जेला त्याची फिकीर नाही. तिची मोठी मुलगी अॅना आणि तिचा प्रियकर घरात आहेत. ही मुलगी घर सांभाळायचा आपल्या परीनं प्रयत्न करतेय. ‘तू कित्येक दिवस घराबाहेर पडलेली नाहीयेस,’ असं सांगताना आईला गदागदा हलवून माणसात आणू पाहतेय. पण मिसेस जेला त्याचं भान नाही.

याचं कारण या बाईनं आत्महत्या करायचा निर्णय घेतलाय. नवऱ्याला जाऊन वर्ष होत आलंय. पण अजून त्या धक्क्यातून ती पूर्णपणे सावरलेली नाहीये. त्याच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या दिवशीच आपलं आयुष्य आपण संपवून टाकायचं हे तिनं ठरवून टाकलंय. तिच्यापाशी जेमतेम एक आठवडा आहे आणि तेवढ्या वेळात तिला आपली अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत.

पिफमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत असलेला दिग्दर्शक बोआन वुलेतिक यांचा ‘रेक्‍वियम फॉर मिसेस जे’ हा सर्बियाचा सिनेमा. पहिल्या काही मिनिटांमध्येच या सिनेमाचा टोन प्रस्थापित होतो. पण सिनेमा पुढे सरकू लागतो आणि दिग्दर्शकाला केवळ एका एकटेपणा आलेल्या बाईची गोष्ट सांगायची नाहीये, तर त्या निमित्तानं बऱ्याच प्रश्नांवर टिपण्णी करायचीये हे लक्षात यायला लागतं.

सर्बिया हा देश युगोस्लाव्हियाचा भाग होता. आज या देशाच्या सीमा हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, मॅसिडोनिया, क्रोएशिआ, बोस्निया, हेरझेगोव्हिना, माँटेनेगरो या देशांना जोडलेल्या आहेत. शिवाय, कोसोवाच्या वादग्रस्त भागाद्वारे आल्बेनियासुद्धा सर्बियाच्या सीमेलगतचा देश आहे. या सगळ्या देशांचा इतिहास रंजक आणि गुंतागुंतीचा आहे. म्हणूनच त्या देशांमधल्या सिनेमांतले बारकावे आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत.

२००८मध्येच कोसोवोनं सर्बियापासून आपण स्वतंत्र असल्याचं घोषित केलेलं आहे. अमेरिका, युके आणि युरोपिअन युनियनमधल्या अनेक देशांनी कोसोवोचं स्वातंत्र्य मान्य केलं असलं, तरी रशिया, चीन, स्पेन आणि अर्थातच सर्बियासारख्या देशांना ते मान्य नाही. अशा अस्थिर परिस्थितीतला सर्बिया आपण ‘रेक्‍वियम फॉर मिसेस जे’च्या निमित्तानं पाहत असतो. वरवर पाहता या सिनेमामध्ये कोणतंही राजकीय भाष्य नाही. पण मिसेस जेने आयुष्यभर जिथं काम केलंय तो बंद पडलेला कारखाना, लाल फितीमध्ये अडकलेला सरकारी कारभार यातून तिथल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधता येतो. खुद्द दिग्दर्शकानंच आपल्या या सिनेमाचं वर्णन करताना म्हटलंय, ‘आधीच्या युगोस्लाव्हियापासून वेगळं होण्यातला कडवटपणा पचवल्यानंतर अजूनही सामाजिक आणि राजकीय बदलांशी झगडणारा आमचा देश अजूनही जखमी अवस्थेत आहे. त्या आजच्या सर्बियाची ही कहाणी आहे.’

ही कहाणी म्हणूनच गडद आहे, पण त्यालाही विनोदाची झालर आहे. आपल्या मृत्यूचा दिवस नक्की केल्यानंतर मिसेस जे नवऱ्याच्या थडग्यावरच आपलाही फोटो हवा असं ठरवते. ते काम करणाऱ्याकडे ती जाते तेव्हा दोघांचेही फोटो एकाच दिशेनं पाहत असल्याचं त्याला जाणवतं. ‘तुझ्या नवऱ्याचा फोटो उखडून उलट्या दिशेनं लावला तर तुम्ही दोघे कायमसाठी एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसाल. पण त्याला फार खर्च येईल.’ मिसेस जे याला नकार देते तेव्हा तो म्हणतो, ‘ठिकेय मग, तुम्ही दोघेही समोरच्या मॉलकडे पाहत शांतपणे आत विश्रांती घ्या.’

आत्महत्या करायची तर पिस्तुलीमध्ये गोळी हवी. ती विकत घ्यायला मिसेस जे जाते, तेव्हा ‘मुलीच्या लग्नात मला पिस्तुल झाडायची आहे,’ असं सांगते. ‘एकाच गोळीनं?’ समोरचा विचारतो. आणि मग म्हणतो, ‘आत्महत्या करण्याचा हा मार्ग अतिशय वाईट आहे. तुझ्या मुलाबाळांनी कायम तुला तसं आठवावं हे तुला पटतंय का? त्यापेक्षा तू झोपेच्या गोळ्या का नाही घेत? वेदनाही नाहीत आणि त्रासही नाही.’

मरण्यापूर्वी मिसेस जेला अनेक कामं पूर्ण करायची आहेत. तिच्या इन्शुअरन्सचे पैसे मिळवायचे आहेत, अॅना जिथं काम करते त्या जागेला भेट द्यायचीये, तिच्या प्रियकराला घरातल्या जबाबदाऱ्या सांगायच्या आहेत, बंद पडलेल्या आपल्या फॅक्टरीमधून अचानक काढून टाकल्यामुळे मिळणारं कॉम्पेन्सेशन आणायचंय आणि आपल्या जन्माच्या दाखल्यावर नावात झालेली चूकही सुधारायची आहे.

सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थित्यंतर होत असलेल्या देशात या सगळ्या गोष्टी इतक्या सहजासहजी होण्यासारख्या नाहीत हे मिसेस जेला कळतं. तीसुद्धा तर नवरा गेल्यापासून वर्षभर बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि ते किती कठीण आहे हे तिला पदोपदी लक्षात येत असतं. त्यातून अॅना गरोदर असल्याचं तिला कळतं आणि ती बावचळून जाते. भरल्या घरातलं एकटेपण हा सिनेमा अधोरेखित करतो. एकमेकांशी संवाद तुटला की मनातलं बोलायला कुणी उरत नाही आणि मग आयुष्य नको वाटायला लागतं याची जाणीव करून देतो.

या सिनेमाची ट्रिटमेंट खूप वेगळी आहे. प्रत्येक फ्रेम सतत मिसेस जेचं नैराश्य अधोरेखित करते. आजुबाजूचा प्रकाश, घरातला पसारा, दोन्ही मुलींचं एकमेकांशी सतत भांडणं, आईचं अवाक्षरही न बोलता जगणं, या सगळ्यातून मिसेस जेचं आयुष्य आपण जगू लागतो. मात्र, प्रत्येक वेळी ते वास्तववादीच असतं असंही नाही.

मिसेस जेच्या घराच्या बाहेर तिची जुनी गाडी पार्क करून ठेवलेली आहे. पहिल्या दिवशी मिसेस जे घराबाहेर पडते तेव्हा परत येताना तिला त्या गाडीच्या टायर्समधली हवा गेलेली दिसते. गाडीवर धूळ पडलीये. तिचीही रया गेलीये. पण त्यानंतर मात्र प्रत्येक वेळी घरी परतताना मिसेस जेला त्या गाडीचा एकेक भाग दुरुस्त झालेला दिसतो, ती चकचकीत होताना दिसते. हे कोण करतंय, का करतंय, कसं करतंय हे आपल्याला कळत नाही. रस्त्यावरून चालताना येणारा लाटांचा आवाज या सररिअल वातावरणाची पार्श्वभूमी बनून जातो. दिग्दर्शकानं वास्तववाद आणि अमूर्ताची केलेली सरमिसळ सिनेमाला एक वेगळी उंची देऊन जाते.

चित्रपट महोत्सवामधले सगळे सिनेमे नेहमीच काहीतरी सांगू पाहणारे असतात असं नाही. काही वेळा एखादी निखळ कॉमेडी बघायला मिळते आणि फ्रेश व्हायला होतं. नेदरलंडचा दिग्दर्शक योराम लरसन याचा ‘द लाँगिंग’ हा अशा प्रकारचा सिनेमा होता.

वडिलांचा पुस्तक प्रकाशन व्यवसाय चालवणारे दोघे भाऊ. मोठा गे आहे. धाकट्याचा घटस्फोट झालाय. आई-वडील शहराच्या बाहेर राहताहेत, पण वडिलांचं मुलांवर लक्ष आहे. आपण ज्या निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय केला, तसाच तो मुलांनी करावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

पण व्यवसाय चालत नाहीये हे वडिलांना कसं सांगायचं हे मुलांना कळत नाहीये. कोणतंही पुस्तक खपायचं तर त्याची टीव्हीवरून जाहिरात व्हायला हवी, त्यावर कार्यक्रम व्हायला हवेत, केवळ पुस्तकाच्या गुणवत्तेवर पुस्तक खपण्याचे दिवस आता जुने जुने झाले आहेत, हे वडिलांना कसं समजावून सांगणार? तशात एक दिवस धाकट्याकडे एक सुंदर आणि सेक्सी मुलगी आपलं लेखन घेऊन येते. बूटांच्या दुकानात काम करणारी ही मुलगी. फारसं वाचन नाही, फारशी हुशारी नाही. लिखाण रद्दड आहे असं सांगून धाकटा तिला घालवून देतो. दुसरीकडे मोठ्या भावाकडे एक वयस्क गृहस्थ आपल्या लिखाणाचं बाड घेऊन येतो. लिखाण उत्कृष्ट असतं. पण हा गृहस्थ बोलताना अडखळत असतो, त्याला लोकांसमोर येण्याची भीती असते. अशा वेळी टीव्हीवर त्याला कसं नेणार?

मोठ्याच्या मनात एक भन्नाट कल्पना येते. या वयस्क गृहस्थाचं पुस्तक त्या देखण्या मुलीच्या नावावर छापलं तर? तो गृहस्थ आणि त्या मुलीला दोघे भाऊ बोलावून घेतात. तिच्या नावावर त्याचं पुस्तक छापलं जातं. दोघे भाऊ तिला पुस्तकामध्ये काय आहे, पत्रकारांच्या प्रश्नांना काय आणि कशी उत्तरं द्यायची याचं प्रशिक्षण देतात. तिचं फोटो सेशन होतं. तिच्या देखणेपणामुळे टीव्हीचे कॅमेरे तिच्या मागेमागे करू लागतात. आणि पुस्तक तुफान खपू लागतं. युरोपभर त्याच्या भाषांतराचे हक्क मागितले जातात. मूळ लेखकही आपली कलाकृती प्रसिद्ध तर झाली म्हणून खुश असतो.

पण कितीही नाही म्हटलं, तरी जे आपलं आहे त्याचं श्रेय दुसऱ्याला मिळतंय हे पाहून कधीतरी खंत वाटणारच ना? त्यातून या लेखकाला आवडत असलेली एक बाई त्या पुस्तकाचं इतकं कौतुक करत राहते की, लेखकाला आपला हक्क आपल्याला मिळायला हवा असं वाटू लागतं आणि तसं तो प्रकाशक भावांना सांगतो. तू अॅग्रीमेंट केलंयस, तुला आम्ही अर्धी रॉयल्टी देतोय वगैरे सांगूनही त्याच्यावर काही परिणाम होत नाही.

या सगळ्यामधून निर्माण झालेला विनोद म्हणजे हा सिनेमा. त्याचा शेवट इथं सांगत नाही, पण दिग्दर्शकानं हा तिढा सोडवण्यासाठी जो मार्ग अवलंबला तो व्यक्तिश: मला पटला नाही. दिग्दर्शक योराम लरसन पुण्याला आले होते. त्यामुळे सिनेमा संपल्यानंतर त्यांना माझी प्रतिक्रिया मी सांगितली. ‘हा विनोद आहे, त्याकडे फार गंभीरपणे नको बघूस,’ असं त्यानं म्हटलं, पण माझं समाधान झालं नाही.

तेवढा शेवट सोडला तर हा सिनेमा धमाल होता. प्रत्येक माणसाला आयुष्यात काहीतरी हवं असतं, ते मिळवण्यासाठी कधीतरी तो चुकीची पावलं उचलतो आणि मग पस्तावतो, हे हलक्याफुलक्या पद्धतीनं दिग्दर्शकाने मांडलंय. महोत्सवामध्ये असा एखादा सिनेमा पहायला मिळाला की बरं वाटतं.

.............................................................................................................................................

लेखिका मीना कर्णिक चित्रपट समीक्षक आहेत.

meenakarnik@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......