दिवाळी अंक २०१७ : जमेल तशा-तितक्या वाचन नोंदी
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • दिवाळी अंक २०१७
  • Fri , 26 January 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो Vachanara Lihito दिवाळी अंक Diwali Ank २०१७ 2017

दिवाळीनंतरचा लांबलेला हा सुखद गारव्याचा काळ. उपजीविकेचं रहाटगाडगं पुन्हा सुरू झालंय, तरी अंगात या काळात मुरलेला आळस अजून काहीसा बाकी आहे. समोर दिवाळी अंकांचा ढीग पडलेला आहे. विकत घेतलेले, भेट-अभिप्रायार्थ आलेले, वाचनालयातून आणलेले. ‘साहित्य सूची’च्या डिसेंबर अंकात ‘रसिक साहित्य’कडे विक्रीसाठी आलेल्या २१८ अंकांची एका ओळीत ओळख असलेली यादी आहे. त्यात जवळपास निम्मे अंक ज्योतिष, वास्तू, गुढविद्या, पाककृती यावरचे आहेत. किमान बरा काही ललित-वैचारिक ऐवज असलेल्या अंकांची संख्याही पन्नासवर आहे. पुन्हा इथे उपलब्ध नसलेले पण कुठूनतरी कळलेले, फक्त ऑनलाईन उपलब्ध असलेले असेही अंक आहेतच. किती न् काय वाचावे? तरी जमेल तशा-तितक्या वाचनातल्या पोचवाव्यात अशा या नोंदी.

‘शब्दालय’ (संपा. सुमती लांडे) मध्ये राजन खान यांचा लेख आहे, ‘जुन्याकडे जायचंय परत’. शीर्षक पुरेसं स्पष्ट आहे. ऱ्हासाकडे अधिकाधिक कलत चाललेला काळ कादंबरीत पकडता येत नाहीये, लेखकाच्या शब्दात डोक्याचा पार गोयंदा व्हायला लागला विचार करकरून. मग तो नोंदी करत राहतो सर्व क्षेत्रातल्या ऱ्हासाच्या. शांत, संथ, निरपेक्ष चांगुलपणा शिल्लक असलेला काळ अनुभवातला असल्यानं नोंदीत सतत तुलना येते. हे सगळे तुम्हा-आम्हा सर्वांच्याच परिचयाचं आहे. तरी समकाल गंभीरपणे कवेत घेऊ पाहणारा लेखक काही एक हतबलतेनं ते नोंदवतोय म्हणून महत्त्वाचं. त्याचं सार त्याच्याच शब्दांत- “जगण्याच्या सर्वच पातळ्यांवर अपमानाचा काळ, उर्मटपणा वाढला, हळवेपण गरजेपुरते, धंदेवाईक. सगळीच नाती बेगडी आणि क्रूर, त्यातली माया संपली. सार्वजनिक व्यवहारात रगेली आणि दुसऱ्यांबद्दल तुच्छता. राजकारण गुंडांशी मैत्र पोसण्याचा बाजार. लैंगिक संबंधांचा खेळखंडोबा, निष्ठा दुर्लभ, व्यभिचारांचा सुकाळ, मानसिक व्यभिचार तर परिपूर्ण. जात-धर्म-देव म्हणजे दुसऱ्यावर उगारायचे अपमानाचे आसूड ...”

अनेक बाबी तपशीलानं नोंदवत राहतो लेखक. याला उत्तर म्हणून ऋण गोष्टी धन करून घ्याव्यात आणि आपापली उत्तरं शोधावीत, भांडवलशाही झापडं सोडून मागास माणूसपणाकडे परत जावं असं सुचवतो. पण म्हणजे नक्की काय? ते व्हावं कसं? मुळात याला काही व्यावहारिक पाया आहे का, या प्रश्नांनी अधिकच उदास व्हायला होतं.

‘लेखक असणे भन्नाट असते. इतर माणसे वर्तमानात जगून निघून जातात, लेखक वर्तमानावर स्वतःला आणि जगाला नोंदवतो, त्या नोंदी भविष्यातही टिकून राहतात’, असं म्हणणारा हा लेखक, त्याच्या या नोंदीचं काय होईल? ती टिकेल? टिकावी?

‘जमाने याद आए’ हा न्या. नरेन्द्र चपळगावकर यांचा लेख ‘अंतर्नाद’ (संपा. भानू काळे )मध्ये आहे. नव्वदीच्या उंबरठ्यावर, आजही वडीलकीच्या नात्यानं सक्रिय असलेले चपळगावकर बदलत गेलेल्या शतकभराचा दस्तऐवज आहेत. या लेखातला त्यांचा दुखरा सूर त्यामुळे अस्वस्थ करतो. जुन्या काळाची फार आतून तपशीलांसह येणारी आठवण बहुदा सद्यकालाच्या तुलनेतून, काहीशा हतबलतेतून येत असते. वडिलांची वकिली, त्यांचा स्वातंत्र्यचळवळीतला सहभाग, आपली वकिली, न्यायाधीशपदाचा कार्यकाळ यावर लिहिताना ते सद्यकालावरही भाष्य करतात.

“सगळी समाजव्यवस्थाच इतकी बिघडलेली आहे की, एखादा माणूस चांगला आहे असे म्हटले तर त्यावर इतरांचा विश्वासच बसत नाही. मात्र तो (चांगला असूनही) वाईट आहे म्हटले की ताबडतोब विश्वास बसतो… सगळी न्यायव्यवस्थाच सध्या कठीण काळातून जात आहे…(हे वाक्य तर भविष्य वाटावं इतक्या गतीनं खरं सिद्ध होऊ पाहतंय)… वाङमय हा समाजाच्या केंद्रस्थानी असलेला विषय राहिलेला नाही. पैसा आणि सत्ता यांच्या मापानेच श्रेष्ठत्व मोजले जाऊ लागले... जिवाभावाने बोलावे, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची चर्चा करावी, चिंता व्यक्त करत आशेच्या किरणांचा शोध घ्यावा असे मित्रांचे वर्तुळ आकसून गेले आहे. जगातले आणि जवळपासचे सगळीकडचे वातावरण कटुतेच्या आणि संघर्षाच्या ढगांनी झाकोळून गेले आहे.... विचारविश्व इतके खुरटलेले का आहे? सत्यशोधनासाठी व्यासंग, परिश्रम आणि त्यातुन प्रगटण्यासाठी पडेल ती किंमत देण्याची तयारी हे दुर्मीळ का झाले ?...”

वर्तमान अनेकांना वेगवेगळ्या अंगांनी अस्वस्थ करतो. त्यामुळे त्याची चिकित्साही प्रत्येकाची वेगवेगळी होते. असाच वर्तमानापासूनचं तुटलेपण व्यक्त करणारा आशा साठेंचा संवाद ‘संवादसेतू’ (संपा. वंदना बोकील-कुलकर्णी )मध्ये आहे, ‘तरीही वास येतो फुलांना’. शीर्षकाप्रमाणेच याकडे विधायक नजरेनं पाहणारा. माणसाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाशी, संवादाशी जोडलेलं शांत जगणं (कोलाहल कायम असतोच, तरी आपल्यापुरतं शांत जगण्याइतपत ‘स्पेस’ असणं) अनुभवलेल्या पिढीला जाणवणारं तुटलेपण या लेखात आहे. वेगवान, टेक्नोसॅव्ही, सतत स्वतःला अपडेट ठेवणाऱ्या पिढीशी तिला संवाद, सहवास गरजेचा वाटत नसल्यानं कनेक्ट होता येत नाही. माणसं सहन करण्याची त्यांची गरज संपलेली आहे, अशा मताच्या निर्णायक वळणावर बाईंना झुकेरबर्ग भेटतो, हॉवर्डनं कंटाळून शिक्षण सोडलेल्या मार्कला सन्माननीय पदवी दिली, त्या कार्यक्रमात तो त्यात प्रत्येकाला जगण्याचा उद्देश देणारं जग तयार करण्याच्या आव्हानाचा उल्लेख करतो. आता वयानुरूप आलेली नवी भूमिका शोधायला हवी, तरच हे जग माझंही होईल या समेवर साठेबाई येतात, तेव्हा टेबलावरचा स्मार्टफोन बारीकसा आवाज करत बोलावत असतो.

या पार्श्वभूमीवर ‘अक्षर’ (संपा. मीना कर्णिक / हेमंत कर्णिक) मधल्या मेधा कुळकर्णींच्या ‘चांगुलपणा शाबूत आहे’ या लेखाचाही उल्लेख करायला हवा. सोशल मीडियाला आपण आभासी म्हणतो खरं, पण इथल्या लोकांचा कौल वास्तव जगावर परिणाम घडवून आणू शकतो, हे आपलं मत त्या ज्या अनुभवान्ती मांडताहेत, त्या ‘नवी उमेद’ या फेसबुक पेजचा वर्षपूर्तीनंतर मांडलेला हा सुखद अनुभव. सकारात्मक, ज्यातून उमेद जागी व्हावी अशा घडलेल्या कहाण्या हुडकायच्या, त्यातून नॉनसेलेब्रिटींना केंद्रस्थानी आणायचं, कार्यक्षेत्र शक्यतो अविकसित जिल्हाकेंद्री ठेवायचं, इतक्या आपणच लादून घेतलेल्या अटींसह तरी व्यावसायिक सफाईनं (दृष्टिकोनानं नव्हे) चालवल्यावर पेजला मिळणारा सुखद प्रतिसाद सगळ्यांचीच उमेद जागी करणारा. ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ अशा समेवर यायच्या काळातला हा छान आश्वासक अनुभव.

‘शब्दालय’मध्ये मधुकर धर्मापुरीकरांचा लेख आहे, ‘शब्दांच्या संध्याकाळी’. सिनेमातल्या गाण्यांच्या सुरावटींनी संध्याकाळी कातर होत, अशा काळातल्या, तरी या नुसत्या आठवणी नव्हेत. हे असलं काही आठवणं बेजबाबदारपणाचं लक्षण ठरावं इतका ‘भूमिका’ घेण्याचा दबाव लेखकांवर येत असताना वाचनात आलेला, एरवी नुसता वाचून ठेवून दिला असता असा हा लेख …त्याची कदाचित यामुळंच मनात नोंद होते. नुसते सूर मनात रेंगाळायचे दिवस अर्थाच्या शोधात कासावीस होण्याचे होतात. त्याच्या आठवणी. अथक प्रयत्नातून अर्थाचा उलगडा करण्याचा आपल्यापुरता का होईना निर्भेळ, सात्त्विक आनंद… ‘साजना दिन बहुरे हमारे’मधल्या ‘बहुरे’चा अर्थ काय? भातात खडा लागावा तसा हा अर्थ न लागलेला शब्द पछाडतो… मग जाणकाराचा शोध… कळते, बहुरे म्हणजे बदलले...एकदम लख्ख प्रकाशानं उजळतंच काही वेळ मन…लेखात नादाच्या प्रवासातल्या अशा काही थांब्यांवर धर्मापुरीकर रेंगाळतात…मळभ दूर झाल्यासारखं वाटतं.

‘डिजिटल दिवाळी २०१७’ (संपा. सायली राजाध्यक्ष) मधला अंबरिश मिश्र यांचा हिंदी सिनेसंगीतातला ‘प्रवास’ मांडणारा ‘मुसाफिर जाएगा कहाँ’ हा लेखही असाच मनातल्या तरल हळव्या आठवणी जाग्या करणारा आहे.

विश्राम गुप्ते ‘अक्षर’मध्ये तस्लीमा नसरीन, सलमान रश्दी आणि मकबुल फिदा हुसेन यांना आलेल्या झुंडशाहीच्या अनुभवासंदर्भात आधुनिकतेचा अर्थ लावू पाहतात. धर्म कुठलाही असो अतिरेकी श्रद्धा कळपात सामील न होणाऱ्यांची कशी गळचेपी करते यावर तपशीलानं प्रकाश टाकतात. याचं एक महत्त्वाचं कारण ते शोधतात, ते कुठल्याही राजकीय विचारसरणीनं आधुनिकता कधी स्वीकारलीच नाही यांत. धर्माची चिकित्सा अनुभवातून होवो अथवा वैचारिक मंथनातून, ती पचत नाही कुठेच. ‘जोसेफ अंतोन‌’मधून रश्दीनं तर ‘एक्झाईल्स’मधून तस्लिमानं या दहशतीच्या दिवसांबद्दल लिहिताना आपली बाजूही मांडली आहे. त्याचे संदर्भ लेखात येतात. मुळात मुक्ती, शांती, समाधान यांच्या शोधार्थ स्थापन झालेले धर्म असे माणसांच्याच जीवावर का उठतात? काय आहे धर्मात? इस्लाम न स्वीकारणाऱ्याशी दोस्ती करू नका, अशी अश्रद्ध माणसं दिसतील तिथं त्यांना ठार मारा अशा अर्थाची कुराणातली सुरा गुप्ते उदधृत करतात. अलिकडेच ‘तिढा आजच्या इस्लामचा’ (अनु. रेखा देशपांडे, अक्षर प्रकाशन, २०११ ) हे इरशाद मंजी यांचं प्रक्षोभक म्हणावं असं पुस्तक वाचनात आलं. त्यात त्यांनी म्हटलंय, “खरा तिढा अर्थ लावण्याचाच आहे. कुराणाच्या दुसऱ्या सूरात म्हटलंय ‘धर्मात कोणतीही सक्ती नसावी’. १०९ व्या सूरात तर ‘तुमच्यापाशी तुमचा धर्म, माझ्यापाशी माझा’ असा समजुतीचा सूर येतो. काय खरं? खरंच प्रश्न कुणाचा आहे? धर्माला, पर्यायानं समाजालाच ताब्यात ठेवू पाहणाऱ्या मूठभर माथेफिरूंचा का मूळ धर्माचाच?”

नव्या नैतिकतेसाठी इतिहास आणि परंपरेचं ग्राऊंड झिरो निर्माण करणं भाग आहे, असं विश्राम गुप्तेंनी (अक्षर दिवाळी, २०११) म्हटलं होतं.. आता धर्म आणि आधुनिकता हा तिढा कसा सोडवायचा? सर्वच धर्मांत होत असलेल्या ‘स्त्री’च्या घुसमटीची चर्चा करणारी लेखमाला ‘एका घुसमटीची कहाणी’ ‘अक्षर’ (मालिका संपादन संयोगिता ढमढेरे ) मध्येच आहे. तीही या संदर्भात वाचनीय ठरावी.

देशातल्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या बदलांची स्पंदनं टिपणारे रिपोर्ताज हे ‘अक्षरलिपी’ च्या (संपा. महेन्द्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतिक पुरी) पहिल्याच दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य. यातला काशी अर्थात वाराणसी इथलं या वावटळीतही टिकून असणारं सनातनपण नोंदवणारा शर्मिष्ठा भोसले यांचा लेख ‘मोक्षभवन मृत्यू से नहीं जीवनसे जुडा है’ अवश्य वाचावा असा. शिवाच्या या नगरीत मरून मोक्ष मिळवायला येणारी माणसं, या मृत्युंवरच उपजीविका असणारी स्थानिक आणि आसपासची माणसं, या सगळ्याकडं निर्लेप कुतूहलानं पाहणारे विदेशी टुरिस्ट, विविध मठ आणि तिथं मोक्षाचा शोध- आयुष्याचा कंटाळा- आप्तांपासून दुरावल्यानं आलेलं एकाकी निराधारपण अशी सगळी गाठोडी बांधून आश्रयाला आलेली माणसं… या सगळ्याचा हा कोलाज. साधनांच्या रूपातली बाह्य आधुनिकता सहजच पचवली काशीनं पण गाभ्यात अनादी काळापासूनचं सनातनपण तसंच आहे.

‘पुणे पोस्ट’ (संपा. मनोहर सोनवणे, प्रदीप खेतमर) मध्येही प्रतिभा देशपांडे यांनी बनारसवर लिहिलं आहे. त्यात दोन व्यक्तिगत आठवणी आहेत. अस्सी घाट ते मनकर्णिका घाट या दरम्यान नावेतून अनुभवलेली पहाटेची नीरव शांतता आणि उ.बिस्मिल्ला खान यांच्या कुटुंबियांची भेट. बाई शेवटी लिहितात, ‘यात पहायची राहिली ती तिथली अस्वच्छता…’

दक्षिण टोकावरच्या केरळमध्ये शिक्षणाचं प्रमाण सुरुवातीपासूनच मोठं. साहजिकच कलास्वादाची पातळी अंमळ वरची. अशियातला सगळ्यात मोठा दृकश्राव्य कलांचा महोत्सव कोची बिएनाले भरतो तो इथंच. या पार्श्वभूमीवर फिल्म सोसायटीची चळवळ तिच्या अगदी सुरुवातीच्या काळातच इथं रुजली, बहरली. आज देशात सर्वाधिक फिल्म सोसायट्या इथं आहेत. त्यांनी केलेल्या प्रयत्नांतून चित्रपटांचा रसास्वाद इथं शालेय अभ्यासक्रमात शिकवला जातो. ‘पथेर पांचाली’, ‘बायसिकल थिफ’सारखे अभिजात चित्रपट तिथं अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दाखवले जातात, हे सुखद आश्चर्याचं वाटतं. फिल्म सोसायट्यांनी समाजाशी जोडून घेत धारण केलेलं चळवळीचं स्वरूप कसं वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होतं, याचा हा वेधक आलेख अभिषेक भोसले यांनी ‘मुक्ततेची चळवळ, मु.पो.केरळ’ या लेखात (अक्षरलिपी) मांडला आहे.

‘अक्षरलिपी’मधला एक महत्त्वाचा विभाग खाद्यसंस्कृतीवरचा आहे. त्यातले चार लेख ‘आडवळणाचा चविष्ट वारसा’ या बीजलेखात शाहू पाटोळे म्हणतात त्याप्रमाणे मुळातल्या ग्राममव्यवस्थेपासून, धार्मिक व्यवस्थेपासून दूर असलेल्या मानवी समूहांच्या खाद्यसंस्कृतीवर प्रकाश टाकणारे आहेत. (स्वतः पाटोळेंचे ‘अपूर्णब्रह्म’ हे असंच पुस्तक आपल्या परिचयाचं आहेच.‌) या चारही लेखातली वडार, बंजारा, पारधी या स्थैर्याच्या शोधात कायम भटकंती करणाऱ्या बहुतांशी अभावग्रस्त समाजांची खाद्यसंस्कृती हा बराचसा नाईलाजांचा, जगण्यातल्या अटीतटींचा वारसा आहे. त्यातल्या अनोख्या तपशीलांनी हे लेख श्रीमंत झाले आहेत, तसंच यावाचून एकून समाजाची खाद्यसंस्कृती अपुरी राहील इतके अस्सलही. लेखांची शीर्षकंही बोलकी आहेत... ‘एक बंजारा खाए…’, ‘पळण्याचा, पाठलागाचा, भुकेचा इतिहास…’

‘समदा’ (संपा. मनस्विनी प्रभुणे) या कवितेवर केंद्रीत अंकात ‘कवितेतून व्यक्त होताना’ हा आजच्या कविता महाजन, दासू वैद्य, आसावरी काकडे, रेणू पाचपोर आदी आघाडीच्या कवींचा विभाग आवर्जून वाचावा असा. “कविता मला एखाद्या खासगी डबीसारखी वाटते. तिच्यात काहीही ठेवता येतं, अगदी मरून गेलेल्या प्रियकराचं तुटलेलं नख ते वणवणीतल्या अपमान अवहेलनांनी चिरफळलेल्या पायांच्या भेगा, अक्षरशः असं काहीही. या डबीत माझा जीव आहे असं मी म्हणणार नाही, पण ती माझ्याजवळ असणं मला जिवंत राहण्यास मदत करतं’, असं कविता महाजन म्हणतात तेव्हा त्यांचा हेवा वाटतो.

पुस्तकांबद्दलचे काही लेख ऑनलाईन‌ दिवाळी अंकात आहेत. बौद्ध धर्म आणि पाली भाषेचे गाढे व्यासंगी धर्मांनंद दामोदर मोसंबी यांनी बौद्ध तत्त्वज्ञानाच्या आकर्षणातून ऐन तारुण्यात तो अभ्यासणं, त्यासाठी पाली भाषा लिपीसह शिकणं, त्यावर प्रभुत्व मिळवणं आणि शेवटी समजून घेत तो आचरणं यासाठी केलेल्या अफाट आणि अचाट परिश्रमांची, भटकंतीची गाथा म्हणजे त्यांचे ‘निवेदन’ हे साधं, विषयाला थेट भिडणारं आत्मचरित्र. त्यावरचा राहुल सरवटे यांचा लेख पुस्तक मुळातून वाचायची उत्सुकता जागी करणारा आहे.

‘माझा प्रवास’ हा विष्णूभट गोडसे गुरुजींचा प्रवासानुभव मराठीतला महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे. १८५७ च्या बंडाच्या काळात उपजिवीकेच्या शोधात राजे, संस्थानिक, सरदार यांच्या आश्रयानं केलेला हा उत्तर भारतातला प्रवास…काय काय पाहिलंय या माणसानं.. आणि प्रवासानंतर तीस वर्षांनी लिहिलंय, तेही किती चित्रदर्शी तपशीलांनिशी...शैलेन भंडारेंनी घेतलेला (डिजिटल दिवाळी २०१७, संपा. सायली राजाध्यक्ष ) त्याचा मागोवा वाचावा असाच.

नंदा खरेंच्या व्यासंगाची साक्ष देणारे त्यांचे पुस्तकांवरचे दोन लेख ‘ऐसी अक्षरे २०१७’ या ऑनलाईन अंकात आहेत. ‘दोन प्राचीन पुस्तकं’ या लेखात सिंक्लेअर लुईसचं ‘इट काण्ट हॅपन हिअर’ (१९३५) आणि स्टुअर्ट हूडचं ‘अ ग्राफिक गाईड टु फॅसिझम’ या

(१९९३) दोन पुस्तकांवर खरेंनी विस्तारानं लिहिलं आहे. दोन्हींची शीर्षकं स्वयंस्पष्ट आहेत तरी खरं मूळातून मागच्या पुढच्या पार्श्वभूमीसह, वेगवगळे समांतर संदर्भ देत लिहितात. शेवटी डब्ल्यू एच हेस्टीचे उदधृत दिलेय( १९६७ )- “लोकशाही ही प्रक्रिया आहे, स्थिती नाही. ती सहज गमावता येते पण पूर्ण कमावता कधीच येत नाही. सतत संघर्ष हाच तिचा गाभा आहे.” ही खरी सम.

‘ऐसी अक्षरे’मध्येच ज्येष्ठ इंग्रजी-मराठी लेखक किरण नगरकर यांची जडणघडण, मिथकं आणि समकालीन वास्तव आणि स्टोरीटेलर्स आर लायर्स अशा तीन भागातली दीर्घ मुलाखत हा मैफलीतल्या संथ आलापीसारखा दीर्घकाळ मनात रेंगाळणारा ऐवज आहे.

‘कथा’ हा दिवाळी अंकांचा एकेकाळचा युएसपी. काळ बदलल्यामुळे सामाजिक घटना- प्रश्नांवरील लेखन प्राधान्यक्रमात वर आलं तरी कथा आजही महत्त्वाचा भाग आहेच. वाचलेल्या पन्नासेक कथांमधला हा लक्षणीय ऐवज (एवढाच मात्र नव्हे). ‘मेरी नींद न सानी होय’ (अनुभव) हा जयंत पवारांचा झपाटून टाकणारा दीर्घ कथानुभव …परकोटीच्या हतबलतेतून उत्तर भारतातून जगण्यासाठी त्यापेक्षा मागे राहिलेल्या उर्वरितांना जगवण्यासाठी मुंबईत होणारी आवक, पोचेतो प्रत्येक टप्प्यावर होणारं उरलेल्या लक्तरांचंही शोषण या सरळ रेषेत पवार या सगळ्यातून सहज सुट्या होऊ पाहणाऱ्यांच्या सांस्कृतिक दांभिकतेचे, सहज क्रौर्याचे रंग भरत जातात.

बालाजी सुतार यांची कथा ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ (अक्षरलिपी). विसाव्या शतकाचा संधीकाल ते एकविसाव्या शतकातली ही सुरुवातीची दशकं… काळाच्या विशाल पटलावर हा म्हटलं तर चिमुटभर कालखंड. पण बदलांनी अंतर्बाह्य घुसळून निघालेला, मूल्यांच्या पडझडीचा आणि माणसांमधल्या वाढत्या दुराव्याचा हा काळ. खेड्यातून शहरात शिकायला आलेल्या तरुणानं आपल्या आणि आसपासच्या आयुष्यांच्या संवेदनशील मनानं या काळात केलेल्या या नोंदी. सगळीकडे होत असलेल्या बदलांच्या स्फोटांशी जोडून घेत केलेल्या या नोंदी हे एकाअर्थी या ऱ्हासपर्वाचं दस्तऐवजीकरणच आहे. सहज संवादी शैलीत तरी बोलीचा फार सोस न बाळगता हे वाचलं जाणार आहे, याचं भान ठेवत बालाजी सुतार यांनी केलेलं हे कथन दीर्घकाळ सोबत करणारं आहे.

‘आयो बसंत’' (मौज) हे शर्मिला फडकेंचं प्लीजंट सरप्राईज आहे. मागच्या वर्षी ‘ये शहर बडा पुराना है’मध्ये दिसलेले रंग इथं गडद झाले आहेत. ही कथा म्हटलं तर मिनिएचर पेंटिंगच्या आकलनाचा बारकाव्यांसह घेतलेला क्लास आहे, पण तो ज्या रूपात त्यांनी घेतलाय, त्या कथेचं लालित्यही समांतर स्वतंत्र अनुभवावं इतकं सूक्ष्म उतरलं आहे. ‘सुरभी’ला येणारं आयुष्यातल्या वास्तवाचं भान आणि वाचकांना मिनिएचर पेंटिंग्जमधल्या असंख्य कलात्म शक्यतांचं आकलन या दोन्हींचा तोल साधणं सोपं नव्हे. शर्मिला फडकेंच्या‌ यापुढच्या प्रवासाविषयी उत्सुकता आहे... शर्मिला फडकेंचे दोन कलानुभवही (अन्वर हुसेन (अनुभव) आणि अमृता शेरगील ‘दीपोत्सव’) आवर्जून वाचण्याजोगे.

संतोष वरधावेंच्या दोन लक्षणीय दीर्घकथा आहेत. ‘बुजगावणं’ (हंस) एक प्रतीकरूप, थरारक, धक्कातंत्रासह निश्चित शेवटाला पोचणारी मर्डर मिस्ट्री म्हणावी अशी, पण प्रत्यक्षात मानवी चेहऱ्याची, जिवंत, बदलत्या काळा-माणसांची-प्रेमाचीही कथा होते, ती घटना स्थळांइतक्याच मानवी संबंधांच्या सूक्ष्म हाताळणीमुळे.

चाचुमियाँ किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स हे जातधर्मापलीकडं आपलेपणाचा धागा जिवट असताना उभारलेलं ‘दुकान’ (मैत्र) . बदलत्या काळाशी स्पर्धा न झेपल्यानं संसारचितांनी आधीच गांजलेले मियाँ अविश्वासाच्या भिंती, पुढल्या पिढीचं धर्माकडं परतणं पाहताना खचतात, दुकानाचं अवशेषांत रूपांतर होताना विषण्ण, हतबल होत जातात… शेवटी ‘नुकत्याच उकरलेल्या कबरीतील मातीच्या ढिगाऱ्यावर ठेवलेल्या भगभगत्या पेट्रोमॅक्स बत्तीसारखा दुकानाच्या जुनाट पाटीवर टांगलेला दोनशे वॅटचा प्रखर बल्ब’ दिसत राहतो. हे ढासळणं कशाचं आहे?

मनोहर सोनवणेंची ‘एकोणीसशे सत्त्याऐंशी (पुणेपोस्ट) ही कथा की कथात्म ललित? हा वेगळा, मौलिक प्रयोग आहे. एका अर्थी काळाचं आत्मचरित्र. भवताल आणि त्याबरोबर चालण्यासाठी, हवं असो वा नसो, आपणही बदलत असतो. सोनवणे आपल्या जाणत्या काळातलं एक वर्ष निवडतात आणि त्यातून पुढचा मागचा काळ शिल्पकाराच्या नजाकतीनं काढून त्या वर्षाचं स्मृतीशिल्प सादर करतात. यावर्षी त्यांनी १९८७ साल सादर केलंय. चेहरा नसलेल्या या वर्षातही किती न् काय काय घडलंय! राजीव गांधींनी पेरलेलं आधुनिक भारताचं स्वप्न, सरकारी कार्यालयात कुरकुरत का होईना संगणकाचा झालेला प्रवेश, त्याला कर्मचाऱ्यांकडून होत असलेला विरोध, टीव्हीवरची रामानंद सागरांची ‘रामायण’ क्रांती, रामजन्मभूमी आंदोलनाची वाढत चाललेली धग, समाजात रुंदावत चाललेल्या भिंती... शेवटी पाळण्यात झोपलेल्या तान्ह्या छकुलीला ते म्हणतात, ‘बाई तुझी बंद मूठ तू नव्या शतकात उघड, ते तुम्हा निरागस बाळांचं असेल…’ खरंच तसं झालं असतं तर कितीबरं झालं असतं!

‘मी तुम्हाला अलंक्रिता म्हणून हाक मारली तर चालेल प्लीज’ (पुणे पोस्ट)‌ ही प्रणव सखदेवची कातर करणारी प्रेमकथा. कसल्याही साहित्यिक प्रयोगाचा ताण नसलेली निखळ आधुनिक प्रेमकथा. हिंदी सिनेमातला वा जुन्या मराठी नाटकांतला मेलोड्रामा होण्याच्या अनेक शक्यता असूनही तशी अजिबात न झालेली अलवार, तरल भाषेतली प्रेमकथा. गुरुनाथ धुरींच्या ‘‘ग्लोरिया’चा तारुण्यातलं या कवितेचं देणं देण्यासाठीच ही कथा लिहिली असावी असं वाटण्याइतका सुरेख वापर.

दोन छान पुनर्भेटी. ‘सुरवातीचे दिवस’ (मौज) ही सानियांची बऱ्याच दिवसांनी वाचनात आलेली कथा. मुळात अनूची आयुष्याशी गाठच उशीरा पडते. कसलीच अपेक्षा नसताना हेही वळण होईल पार म्हणताना तसं घडत मात्र नाही. नवा प्रदेश, नवी माणसं, नवे अनुभव यातून होणारा अनूचा आत्मभानाचा प्रवास.

‘ऋतू’ (संवादसेतू) हा आशा बगेंचा कथानुभव. ‘ऑर्गन’ या त्यांच्या अलिकडच्या संग्रहाच्या ब्लर्बवर हा त्यांचा शेवटचाच संग्रह असं काहीसं सूतोवाच आहे. त्यानंतर आलेल्या या कथेचा त्यामुळे वेगळाच आनंद झाला. प्रतिकूल परिस्थितीलाही सकारात्मक स्वीकारशीलता आणि अंगभूत पीळ यासह सामोरी जाणारी माणसं, विशेषतः स्त्रिया त्यांच्या कथेतून दीर्घकाळ भेटत आल्या आहेत. यातली लिनीही तशीच.

गणेश मतकरींची ‘ब्रिज’ ही काहीशी वेगळी कथा (कथाश्री). मानसिक पातळीवरची गुंतागुंत आणि काळाची सरमिसळ या कथेला काहीसं गूढ वळण देतात. काही वर्षांपूर्वी वाचलेली ‘ती गेली’ ही थोरल्या मतकरींची कथा (बहुदा ‘चारचौघी’ दिवाळी १२ मध्ये) आठवते. मानसिक गुंतागुंतीचा विलक्षण अनुभव त्यात होता. तपशील पूर्ण वेगळे , गुंतागुंतही वेगळी, पण ब्रिज वाचताना त्याची आठवण झाली खरी.

रत्नाकर मतकरींच्याच दोन कथांनी मात्र अपेक्षाभंग केला. ‘डोरोथीची गोष्ट’ (अनुभव) आणि रश्शीवाला (साहित्यसेतू) या दोन्ही कथांत समकालिन वास्तवाचे तपशील छुपेपणाने तरी बटबटीत होऊन येतात, कथा कलात्म भान हरवून अधिकाधिक ढोबळ होत जाते.

दोन वेगळ्या अंकांबद्दल स्वतंत्र लिहायला हवं.

‘वाघूर’ (संपा. नामदेव कोळी) हा यावर्षीचा सगळ्यात प्रयोगशील अंक आहे. चाळीस पानांत पसरलेलं उभ्या महाराष्ट्रातल्या लिहित्या कवींचं कोलाज म्हणता येईल अशा ८० कविता, शिवाय कवितासंग्रहांची परीक्षणं, कवींच्या-कवितांच्या आठवणी… बारा प्रयोगशील चित्रकारांची स्वतंत्र प्रतिभा जाणवेल अशी अंकभर पसरलेली रेखाटनं… वेगळ्या धाटणीच्या नऊ कथा (त्यातही किरण येले, अजित अभंग, जयंत पाटील यांच्या कथा वाचाव्यातच अशा)… विवेकवाद , तावडी बोली, आईनस्टाईन आणि सुरंगम सूत्रसारख्या लेखांसाठी समीक्षा, सिद्धान्त, निबंध, संस्मरण या शीर्षकाची स्वतंत्र पुरवणी… (त्यात रणधीर शिंदे यांनी जागवलेल्या गोविंद पानसरेंच्या आठवणी वाचाव्यात अशाच.) सआदत हसन मंटोवरही स्वतंत्र पुरवणी आहे, पण त्यात मंटोविषयी नवं, वेगळं असं काही वाचायला मिळत नाही.

एकुण अजिंठ्याच्या डोंगरात उगम पावणाऱ्या वाघूर नदीचं नाव धारण करणाऱ्या या अंकावर पुण्या-मुंबई बाहेर पसरलेल्या औरसचौरस महाराष्ट्राचा, जरी बरेच सहभागी लेखक-कवी पुण्या-मुंबईचेच असले तरी, स्पष्ट ठसा आहे.

‘शब्दस्पर्श’ (संपा. अस्मिता साठे) हा तसा रूढ अर्थानं दिवाळी अंक म्हणता येणार नाही. तरी या निमित्तानंच निघणारा, हा अंक गेली चार वर्षं ग्रंथनिर्मितीच्या वेगवेगळ्या अंगांबद्दल बोलतो आहे. संपादन, अक्षरजुळणी- मुद्रितशोधन, मुखपृष्ठ-मांडणी यावरचे याआधीचे अंक आल्यावर हा अंक आता पुस्तकांच्या निर्मितीनंतरच्या प्रवासावर तपशीलांनं संवाद करतो. पुस्तकाच्या प्रकाशकाच्या गोडाऊनपासून वाचकांच्या हातात पडेपर्यंतच्या प्रवासातल्या वेगवेगळ्या थांब्यांबद्दल अनुभवी जाणकारांनी इथं लिहिलं आहे.

पुस्तकांचे प्रकाशक, वितरक, दुकानदार, पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजक, पुस्तकांच्या निर्मितीबरोबरच वितरणातही रसिक घेणारे संजय जोशींसारखे कृतीशील लेखक, पुस्तकं पोचावीत म्हणून धडपडणारे पंकज क्षेमकल्याणींसारखे वाचन चळवळीतले कार्यकर्ते, जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांची वर्गवारी करून विक्री करणारे जाणकार विक्रेते, शासनाची पुस्तक खरेदी असा पुस्तकांच्या प्रचार-प्रसार-विक्रीचा पैस या अंकात उलगडलेला आहे. तो वाचनीय आहे. यात दुसऱ्या टोकाला पुस्तकं पोचतच नाहीत, अशा दुर्गम भागातल्या वाचकांची खंतही येते.

काळ बदलयोय, तसे यातही नवे ऑनलाईन विक्री, किंडल आवृती असे ट्रेंड्सही आले आहेत. तशा पायरेटेड पुस्तक विक्रीसारख्या समस्याही आहेत. त्याचीही चर्चा हा अंक करतो. साहित्य आणि निर्मिती दोन्हीही उत्तम असूनही पुस्तकं हवी तशी पोचत का नाहीत, या सनातन प्रश्नाचं काहीसं उत्तर शोधायचा प्रयत्न या अंकात आहे. त्याला दाद द्यायला हवी.

.............................................................................................................................................

‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4342

.............................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Shashank

Mon , 29 January 2018

akshar Diwali ank ha majha pahila ank...Diwali ankan baddhal utsukta hoti..Akshar Diwali ank ha saglya bajuncha vichar karayla lavnara ank ahe..."kutte ki maut" hi katha man sunna karte...!!! Ashyach itar Diwali ankan badhal mahiti dilyabadhal dhanyawad..sagla vachyancha prayatna karnar..vishesh mhanje "Vaghur" ank nakki vachnar..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......