परमेश्वराला नाकारायला माणसांना एवढा वेळ का लागतो?
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
प्रभाकर नानावटी
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 19 January 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो नास्तिकता Agnostic रॅशनॅलिटी Rationality

माणूस हा एक ‘रॅशनल’ प्राणी आहे असे आपण आपल्या लहानपणापासून घोकत असलो, तरी कित्येकाच्या आयुष्यात रॅशनॅलिटीचा मागमूसही नसतो, हा आपल्या नित्याचा अनुभव आहे. या रॅशनॅलिटीवर इतकी धूळ का साचली आहे, हेही एक न सुटणारे कोडे ठरत आहे. रॅशनॅलिझमचा मूळ गाभाच परमेश्वर या संकल्पनेची चिकित्सा करणे हा असतो. हीच चिकित्सा आपल्याला नास्तिकतेपर्यंत पोचवते.

गेली शेकडो वर्षे परमेश्वर या संकल्पनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्वितचर्वण झाले आहे. या चर्चेत परमेश्वर ही संकल्पना पूर्णपणे नाकारण्यात आली आहे. परंतु काही हितसंबंधीयांच्या दुराग्रहामुळे अजूनही ही संकल्पना आणि या संकल्पनेवर आधारलेली धर्मव्यवस्था जनसामान्यांच्या डोक्यातून गेलेली नाही. उलट धर्मव्यवस्था उर्जितावस्थेत पोचत आहे. कदाचित आपल्या देशातील लोकसभा व विधानसभांचे नावं धर्मसंसद म्हणून बदलण्यात येतील की काय, अशी आजची आपल्या देशाची स्थिती आहे. याचाच परिणाम म्हणजे नास्तिक अजूनही अल्पमतातच आहेत. परंतु सर्व जगभर मात्र या संबंधीच्या चर्चेमुळे व प्रबोधनामुळे परमेश्वर, ही संकल्पना बाद ठरत आहे.

माणसाने खोटे बोलल्यास भले मोठे घबाड मिळण्याची शक्यता असली तरी नेहमीच खरे बोलावे, कुणीही पकडण्याची शक्यता नसली तरी चोरी करू नये, सगळेच वापरतात म्हणून मीही भ्रष्टाचाराचा मार्ग वापरल्यास हरकत नसावी ही मानसिकता असू नये, इतराविषयी संवेदनशील असावे, भावनांचा उद्वेग नसावा, इत्यादी प्रकारच्या जीवनमूल्याप्रमाणेच नास्तिक असणे हेसुद्धा एक चिरंतन मूल्य आहे. आपण नास्तिक आहोत म्हणजे आपण कुणी तरी वेगळे आहोत अशी समजूत करून घेणे याला काही अर्थ नाही. माणूस म्हणून काही मूल्यांबद्दल आपली बांधीलकी असायला हवी. त्याच मूल्यांपैकी नास्तिकता हेसुद्धा एक मूल्य असून आपण काही तरी विशेष करत आहोत असे वाटून घेण्याचे काही कारण नाही. खरे बोलणे जितके स्वाभाविकच असले पाहिजे, तितकेच परमेश्वराला नाकारणे किंवा त्याचे अस्तित्व अमान्य करणे हेही नैसर्गिकरित्या घडले पाहिजे.

माणसाच्या उत्क्रांतीतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मेंदूची उत्क्रांती असू शकेल. आणि हाच मेंदू आपल्याला कल्पनाशक्ती, विचार करण्याची क्षमता, तार्किकता, बुद्धिनिष्ठता प्रदान करते आणि आपण इतर प्राण्याहून वेगळे आहोत याची जाणीव करून देते. माणूस जेव्हा रानटी अवस्थेत होता, तेव्हा त्यांनी आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार काही कल्पना लढवल्या, नैसर्गिक घटनांचा अर्थ शोधताना काही (चित्र – विचित्र) उत्तरं शोधली आणि त्या अनुषंगाने तो जीवन जगू लागला. जसजशी त्याची बुद्धी विकसित होत गेली, त्यानुसार त्यातील अनेक गोष्टी गळून पडल्या. त्याची बुद्धिनिष्ठ जीवनाकडे वाटचाल सुरू झाली. ही वाटचाल अजूनही संपलेली नाही. परंतु काही कारणामुळे त्या काळी कल्पिलेली परमेश्वर ही संकल्पना अजूनही टिकून आहे. तज्ज्ञांच्या मते  बुद्धिनिष्ठ जीवन पद्धतीला अडसर होत आहे. त्यामुळे काही सुज्ञ मंडळी परमेश्वर ही संकल्पना पूर्णपणे नाकारत नास्तिक जीवन जगण्यात आनंद, समाधान मानून घेत आहेत. मुळात परमेश्वरविरहित जीवन ही एक बुद्धिनिष्ठ जीवन पद्धती आहे, हे मान्य करायला हवे. 

खरे पाहता नास्तिकता ही एक मानसिकता असते किंवा अटिट्यूड\प्रवृत्ती असू शकते. त्याला आपण एक गुणविशेष (कॅरेक्टरिस्टिक्स) म्हणून दर्जा देता कामा नये. ही मानसिकता कशामुळे तयार होते, ती कशी वाढते, वाढलेल्या मानसिकतेला जपण्यासाठी नेमके काय काय करावे लागेल, हे प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न असू शकतील. आपापल्या क्षमतेप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरे सापडत असतील, मानसिकता वर्धिष्णू होत असेल.

नास्तिकांना केव्हा, कसे, कशामुळे नास्तिकतेकडे ओढला गेलात, हा प्रश्न विचारल्यास त्यातील प्रत्येक उत्तर अत्यंत वेगळ्या प्रकारचे, अनुभवसमृद्ध, असेल. नास्तिकतेला काय नाव देत आहात  - उदा – humanist, Secular Humanist, Agnostic, Nonbeliever, Non theist, Free thinker, Bright, skeptic, critic, anti-religious, anti superstitious, की आणखी काहीतरी हाही प्रश्न गौण आहे. त्यामुळे माझी नास्तिकता उच्च दर्जाची इतरांची वेगळ्या दर्जाची असे काहीही नसते. शेवटी नास्तिकता म्हणजे नास्तिकताच – परमेश्वराचे व परमेश्वर या संकल्पनेभोवती विणलेले धर्म, रूढी, परंपरा, कर्मकांड इत्यादी अमान्य करणे आणि मुक्त, स्वतंत्र मनोवृत्तीचे आनंद अनुभवणे.

त्यामुळे नास्तिकता म्हणजे काही तरी भयानक, प्रवाहाच्या विरोधात किंवा समाजाला न रुचणारी  काही तरी भयंकर आहे हे समजण्यात हशील नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती म्हणजे काहीतरी दहशतवादी, जनविरोधी असेही समजण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे यात काहीतरी थ्रिल आहे, काही तरी साहस आहे, असेही समजण्याचे कारण नाही.

नास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी आहे. पहिली अट आहे, पहिली शर्त आहे. काही कारणांमुळे आपल्या देशातील कौटुंबिक व समाजव्यवस्था व संस्कृती यांच्या दबावामुळे नास्तिकता अपरूप वाटत आहे. परंतु बुद्धिनिष्ठतेकडील वाटचाल करत असताना या सर्व दबावांना झुकारून पुढे जावे लागत आहे. आपल्या या समाजातील बहुतांश लोकांना बुद्धीनिष्ठतेच्या किमान पातळीवर आणण्यासाठी नास्तिकतेला पर्याय नाही. कारण आपल्यातील चिकित्सक वृत्ती विकसित होत आहे याचे दृश्य स्वरूपातील द्योतक नास्तिकता असते. आपल्यातील चिकित्सकवृत्ती विकसित झाल्यास आपल्या अनेक समस्यांना नक्कीच उत्तरे सापडत जातील.

परंतु माणूस फक्त रॅशनल नव्हे तर सोशल\सामाजिक प्राणी म्हणूनही ओळखला जातो, हेही लक्षात ठेवायला हवे. फक्त आपल्या कोशात राहून स्वतःचे कसे भले करून घेणे आणि आपल्यापुरते पाहत राहणे, हे काही मानवीयतेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. त्यामुळे मानवीयतेला पूरक अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, याची जाणही आपल्याला हवी. हा समाज सशक्त व्हावा, समाजातील प्रत्येक व्यक्ती सबल व सक्षम असावी, त्यात कुठल्याही प्रकारचे शोषणाचा लवलेश नसावा असे वाटत असल्यास न्याय, करुणा, प्रेम, सहिष्णुता, इत्यादी मूल्ये रुजवण्याची गरज आहे. याच मूल्यांच्या जोडीला ही पृथ्वी दीर्घकाळ टिकावी, आपल्या पुढच्या पिढ्या सुखाने नांदावेत यासाठी पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्त वातावरण, चंगळवादामुळे येऊ घातलेल्या गोष्टीबद्दल सावध पवित्रा यांचाही विचार करणे आवश्यक आहे. ही मूल्ये रुजवण्यासाठी कुठल्याही ईश्वरी संकल्पनेची गरज नाही. ईश्वराला शरण जाणारे तर न्याय, करुणा, प्रेम, सहिष्णुता, जणू काही त्यांचेच पेटंट्स आहेत, असे मानतात. परंतु ईश्वरी संकल्पनेशिवायसुद्धा ही मूल्ये रुजवता येऊ शकतात.   

गंमत म्हणजे परमेश्वरांच्या पुरस्कर्त्यांना त्यांच्या परमेश्वरामध्ये ही सर्व मूल्ये आहेत, याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्रही शंका नाही. याचेच भांडवल करून शतकानुशतके सर्व जगभर बुद्धिभेद केला जात आहे. परंतु ज्या धर्माच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहारात ही मूल्ये रुजवायला हवीत, तोच धर्म या मूल्यांना पायदळी तुडवत आला आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यात किंवा हा एक कुटील डाव आहे, हे सांगणाऱ्या चार्वाक पंथीयापासून अलिकडील सर्व नास्तिकांपर्यंतच्या सर्वांचे आपण आभार मानायला हवेत.

मुळात सर्वसामान्यातील दैवी भक्ती नेहमीच नैसर्गिक प्रकोपाच्या काळात उफाळून येते. कारण सर्वसामान्यांना या कठीण काळात कुणाचा तरी आधार हवा असतो, सहानुभूती हवी असते. आणि देवाच्या नावाने चाललेले धर्म या गोष्टी काही प्रमाणात पुरवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे धर्म अजूनही टिकून आहेत. मुळात निसर्गाला मानवी वा इतर प्राण्याविषयी थोडीसुद्धा आसक्ती नाही, आकस नाही, प्रेम नाही की द्वेषही नाही. थंडीच्या दिवसातील सूर्याची ऊब तुमच्यासाठी नसते, पावसाळ्यातला पाऊस तुमची तहान भागवण्यासाठीच नसते, हिवाळ्यातील गुलाबी थंडी तुमचे मन रिझवण्यासाठी नसते, हे मान्य करायला हवे. हा एक निसर्ग क्रम आहे, त्यात दैवी कृपा वगैरे काही नाही.  त्याचप्रमाणे भूकंप, अतीवृष्टी, अनावृष्टी, वादळ, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ, अशा प्रकारची संकटेसुद्धा या जगावर अधून मधून कोसळत असतात. यात कुठल्याही देवाचा हात नसतो आणि ही काही देवाची अवकृपा नसते. या सर्व गोष्टी प्रकृतीनियमाप्रमाणे घडत असतात. आणि त्यांचा आजकाल अचूक अंदाजही घेता येऊ शकतो.

ही संकटे कुणीतरी मुद्दाम घडवत नाहीत. परंतु देवाचा बाजार मांडणाऱ्यांना ही संकटे देवानेच, देवाचे अस्तित्व विसरता कामा नये म्हणून आलेल्या आहेत, असे अपप्रचार करत सामान्यांची दिशाभूल करत असतात. वैज्ञानिकदृष्ट्या या संकटांचे विश्लेषण केल्यास त्यात ईश्वराचा काहीही संबंध नाही हे लक्षात येईल. अशा निसर्ग प्रकोपाच्या वेळी करुणा, प्रेम, सहानुभूती कामी येतात हाही अनुभव आहे. परंतु या मूल्यांसाठी जगताना आपल्यात सामर्थ्य हवे, जिद्द हवे व मनातली भीती नष्ट व्हायला हवी. म्हणूनच कदाचित माणसांना परमेश्वराला नाकारण्यास एवढा वेळ लागला असावा.

खरे पाहता निसर्गाकडे आपण केवळ त्याचे रौद्र स्वरूप बघून घाबरण्याचे कारण नाही. कारण निसर्गाची भव्यता रौद्र स्वरूपाच्या कित्येक पटीने जास्त आहे. ही भव्यता आनंददायी आहे, मनाला समाधान देणारी आहे. हे समजून घेण्यासाठी कलावंताचे मन हवे, हे मात्र निश्चित.

आपल्या या नास्तिकतेच्या वाटचालीत आपण सर्व आस्तिकांना आपल्या जाळ्यात ओढायला हवे हा हट्टसुद्धा योग्य ठरणारा नाही. कुठलीही गोष्ट बळे बळे करायला लावल्यास ती टिकणार नाही. आपण फार फार तर वाट दाखवू शकतो, त्यावरून चालायचे की नाही हे त्या वाटाड्याला ठरवू दे.

मुळात नास्तिकतेच्या आनंदाला, नास्तिकतेतून मिळणाऱ्या समाधानाला तोड नाही. मनातल्या मनात कशी जिरली म्हणत शॉडेन फ्रॉडेनची (schaden freuden) ची मजाही येथे लुटता येते. नास्तिकतेत आपणच आपले शिल्पकार असतो, आपल्याला घडवत असतो. आपण आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या कृतीला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे आपल्याला निर्भयपणाने मान वर करून जगता येते. आपल्यावर कुठल्याही गोष्टीचा दबाव नसतो. हे केल्यास काय होईल, ते नाही केल्यास काय होईल वा मृत्युनंतर काय होईल, याची अजिबात काळजी करत बसण्याचे कारणच उरणार नाही. पाप पुण्याचा हिशोब मांडणारा तेथे नसणार. आपल्या कृतीचे आपणच मूल्यमापन करत जगणे हे एक समाधानाची बाब ठरेल.

परंतु हे समाधान टिकवण्यासाठी, कठिण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आणि या चिरंतन मूल्यांना जपण्यासाठी आणखी जास्त प्रयत्न करावे लागतील.  

.............................................................................................................................................

नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - https://goo.gl/5QMWGo

.............................................................................................................................................

लेखक प्रभाकर नानावटी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

pkn.ans@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 23 January 2018

प्रभाकर नाणावटी, तुम्ही म्हणता की परमेश्वराला नाकारणे किंवा त्याचे अस्तित्व अमान्य करणे हेही नैसर्गिकरित्या घडले पाहिजे. आता असा प्रश्न उद्भवतो की परमेश्वरास नाकारणे नैसर्गिक कसे? पण ठीके. आपण हे युक्तिवादापुरतं खरं धरूया. मग गंमत अशी उद्भवते की वेदांमध्येही सत्य अगदी अशाच प्रकारे वर्णिलेलं आहे. ते स्वयंसिद्ध असून त्याच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा देता येत नाही. मूळ सत्य हा पुरावा होऊ शकतो. पण मूळ सत्याचा कोणताही पुरावा अस्तित्वात नाही. मूळ सत्य सत्, चित् व आनंद स्वरूपी आहे. याचबरोबर वेदांमध्ये आजून एक अत्यंत महत्त्वाचं विधान आहे. ते म्हणजे सत्य एकंच असून विप्र लोक निरनिराळ्या पद्धतीने त्याचं वर्णन करतात. तुम्ही ज्याला 'परमेश्वराची नैसर्गिक अस्वीकृती' म्हणता, ती मूळ सत्याचं तुमच्या शब्दांत वर्णन करणारी एक आवृत्ती आहे. अशा अनेक लोकांनी अनेक आवृत्त्या लिहिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही खरंतर एक वैदिक सत्यंच वेगळ्या शब्दांत मांडता आहात. त्याबद्दल अभिनंदन. तुमचं नाही. माझं. कारण की ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले होते. तर मी तुमच्यासारख्या नास्तिकामुखी चक्क वेदान्त वदवला पहा. बघा, उभ्या महाराष्ट्रात माऊलींनंतर असा पराक्रम गाजवणारा मीच! आपला नम्र, -गामा पैलवान


Amol Gore

Sat , 20 January 2018

'माणूस घडवण्याचं स्थान' आपण अनेक मंदिरं बघतो.मंदिरात दर्शनासाठी जातो.मंदिर अनेक देव-देवतांची असतात.गाभाऱ्यात देवांची मूर्ती स्थापलेली असते.त्यांची नित्य पूजाअर्चा केली जाते.हजारो वर्षांपासून मंदिर बांधण्याची परंपरा आहे. कळस खूप उंच..... आकाशाशी स्पर्धा करणारा असतो.मंदिराच्या आत आणि बाहेरही सुरेख कोरीव काम केलेलं असतं. शिल्पकला आणि वास्तुकला यांचा संगम प्राचीन मंदिरामध्ये दिसून येतो. दगडी भक्कम बांधकाम हजारो वर्षे पूर्ण झाली तरी सुस्थितीत असल्याचं आश्चर्य वाटतं, काही मंदिरामध्ये शिलालेख कोरलेले असतात.मंदिर हा एक अभ्यासाचा विषय आहे. मंदिर बांधण्याच्या मागील उद्देश कोणता असेल ? भक्तांना भगवंताचं दर्शन आणि अर्चन करण्यासाठी मंदिराची उभारणी झाली. मंदिरामधील मूर्तीमध्ये भक्तांना श्रद्धापूर्वक केलेल्या पूजनामुळे चैतन्य सदैव जागृत राहतं. ग्रंथांची पारायण, जप,अभिषेक यामुळे भगवंताला आपल्यासारखी तहान-भूक,उकाडा-थंडी या गोष्टी असतात. ( ते दगडात जिवंत असतात ना ?) या भावनेतून केलेली भक्ती भगवंतांच्या अगदी निकट जाते. यात देवाचं नावं करून अंधश्रद्धा मानणे याचं समर्थन कोणीच प्रेमळ माणूस करणार नाही. काही मंदिरं..... देवस्थानं यामधील दानपेट्या भरभरून वाहताना दिसतात.सुवर्णाचे अलंकार, चांदीच्या वस्तू अमाप दिसतात.अशा देवस्थानांमध्ये संपत्ती जमा करण्याकडे कल दिसून येतो. असे उदाहरण खूप आहेत. वेगळेपणानं अशा अध्यात्माचा बाजार मांडलेल्या पार्श्वभूमीवर काही मंदिर नजरेत भरतात. विदर्भातील लाखनी नगरातील श्री गुरु मंदिर,गणेशपुरी,श्रीक्षेत्रगोंदवले,शेगावजवळील भांबेरी येथील गुरुपंचायत मंदिर ! या सर्व मंदिरामध्ये नि:स्पूहपणानं कार्य करणारा सेवकवर्ग आहे.सगळे उत्सव,कीर्तन, प्रवचन, पूजा,महाप्रसाद याकरिता कोणाकडे काही मागितलं जात नाही.दया, क्षमा,प्रेम,त्याग हे गुण ज्यांच्या अंगी आहेत तो माणूस ! दैवी गुणसंपदा लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी मंदिराची उभारणी असते. एकमेकांविषयी आपुलकी निर्माण होऊन मदतीला धावून जाणारी माणसं घडवणं ! देशप्रेम, देवप्रेम,धर्मप्रेम, या तीन प्रेमाचा उगम ह्र्दयात होऊन त्याचा झरा सदैव वहात राहण्यासाठी मंदिरं ! अशा प्रकारचं कार्य समर्थ रामदास स्वामीनी मंदिरांमधून केलं,माणूस व समाज घडवण्याचं मैलिक कार्य करून भगवंताची भक्ती करणं यासाठी मंदिरं असतात.या यथार्थ उद्देश हेतू लक्ष्यात ठेवून मंदिराची कार्य चालणं ही काळाची गरज आहे. शेवटी मी लेखिका महोदयांना एक विनंती करेल की,त्यांनी जस नास्तिक कसा असतो हे मस्त विश्लेषण केले तसं एक आस्तिक कसा असावा हे स्पष्ट करा ना तुमच्या लेखनिय शैलीत आम्हाला वाचक म्हणून नक्की वाचायला आवडेल. कळावे.


Sourabh suryawanshi

Fri , 19 January 2018

खूप सुंदर विश्लेषण...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......