माध्यमांतर - साहित्य आणि चित्रपट
कला-संस्कृती - चलत्-चित्र
प्रा. कमलाकर सोनटक्के
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 22 October 2016
  • कमलाकर सोनटक्के Kamlakar Sontakke साहित्य सिनेमा Cinema Literature

साहित्य, नाटक, चित्रपट… कुठलंही संवादमाध्यम... अगदी दृककलापासून तो मूर्त-अमूर्त संगीतासारख्या क्षेत्रात कलावंत हा आपल्या प्रेक्षकांशी, दर्शकांशी, रसिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. ही संवाद साधण्याची, व्यक्त होण्याची आणि दुसऱ्या बाजूनं जिज्ञासेनं ते समजून घेण्याची वृत्तीच माणसाला इतरांपासून वेगळं करते, एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बहाल करते. संवादाची क्षमता ही प्रत्येकाच्या कुवतीनुसार, पर्यावरणानुसार, तसंच संवेदना, अनुभूती, सांस्कृतिक संचित, जीवनविषयक जाण आणि प्रगल्भता यावर अवलंबून असते. सर्वसामान्यांच्या जाणीवा-नेणीवा समृद्ध करता करता त्या-त्या क्षेत्रातल्या जाणकारांना विचार करायला प्रवृत्त करणारा सर्जक कलावंत विरळाच असतो. प्रस्थापित चौकटींना छेद देत नवनव्या संकल्पनांना वस्तुनिष्ठपणे साकारत नव्या वाटा शोधणारे मोजके कलावंतच पथदर्शक ठरत असतात.

आदिम काळापासूनच्या अभिव्यक्तीचा वेध घेतला तर भाषेच्या जन्मापासून मौखिक अनुभवकथन हे आद्य साहित्य ठरावं. प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्याच्या मनावर प्रतिमाचित्र, अनुभवचित्र निर्माण करून त्याच्या अनुभवविश्वाला समृद्ध करून आश्वस्त करणाऱ्या, उन्नयन करणाऱ्या लोककथा, कहाण्या, गेयरचना, म्हणी-वाक्प्रचार यांनी सभोवतालच्या समाजाचं प्रबोधन केलं आणि दुसऱ्या बाजूला समाधानी आणि आश्वस्त केलं.  ‘‘माझ्या शब्दांच्या शक्तीद्वारे जे सांगितलं जातं ते ऐकायला यायला हवं, त्याची त्याला अनुभूती यायला हवी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ते त्याला प्रत्यक्ष दिसायला हवं,”  असं आधुनिक साहित्याचे भाष्यकारही जॉन कॉनरॅड म्हणतात.

हे प्रत्यक्ष अनुभवणं, प्रत्यक्ष दिसणं हेच मला वाटतं साहित्य आणि चित्रपटातलं साधर्म्याचं नातं व्यक्त करणारं मूलतत्त्व आहे.

अगदी अनादि काळापासूनसुद्धा आदिमानव आपल्या जीवनातल्या अनुभवांना गुंफाचित्रात खोदून\कोरून ठेवायचा. पुढे हीच वृत्ती अधिक परिपक्व झाली आणि त्यातूनच अजिंठा-वेरूळसारख्या लेण्यांची निर्मिती झाली. या लेण्यांतील चित्रांमधून चितारलेल्या जातककथा किंवा मंदिर शिल्पातील चित्रावली या केवळ आपल्या डोळ्यांनाच नाही तर साऱ्या संवेदनांना आवाहन करतात. सर्जक आणि आस्वादकाचं गूढ नातं निर्माण करतात.

चित्रपटकला ही उण्यापुऱ्या शंभर-सव्वाशे वर्षांची असली तरी तिची पाळंमुळं या पारंपरिक शिल्पकलांमधून, भित्तीचित्रांमधून, पोथ्या-पुराणातील चित्रांतून, ‘चित्रकथी’सारख्या कलाप्रकारातून, मधुबनी, वारली, पटचित्रकारीतून व्यक्त होत आली आहे.

उत्तम साहित्यकृतीतील शब्दांच्या प्रतिमा या प्रत्यक्ष दिसत असतात आणि मनाला साद घालत सहसंवेदना निर्माण करतात. साहित्याच्या व्याख्या या प्रत्येक दशकात तपासल्या जातात. चित्रपट माध्यम नवीन असल्यानं साहित्याच्या तुलनेत या माध्यमाला मान्यता देण्याबाबत मात्र सुरुवातीच्या काळात बरीच मतभिन्नता दिसून येते. आज चित्रपट माध्यमाला बऱ्यापैकी मान्यता मिळाली असली तरी अजूनही साहित्याचे निर्भेळ पुरस्कर्ते समीक्षक मात्र चित्रपट माध्यमाला रंगभूमी आणि चित्रकलेचं अनौरस अपत्यच मानतात. एवढंच नाही तर चित्रपट हे एक संथ, बाष्कळ, धंदेवाईक माध्यम आहे अशीही संभावना करतात. क्वचित प्रसंगी चित्रपटाचं स्वतंत्र कलात्मक मूल्य सिद्ध न झाल्याची टोकाची तक्रारसुद्धा ही मंडळी करताना दिसतात.

असं असलं तरी चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकांना नेहमीच उत्तमोत्तम साहित्यकृतींनी खुणावलं आहे. यात मराठी, हिंदी कथा-कादंबऱ्यांवरील चित्रपटांची संख्या खूपच कमी आहे. ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘आषाढ का एक दिन’, ‘उसकी रोटी’पासून तो शरदचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद, फनिश्वरनाथ रेणू, अनंतमूर्ती यांच्या कादंबऱ्यांवर यशस्वी चित्रपटांची निर्मिती झालेली दिसून येते.

इंग्रजी आणि सुप्रसिद्ध युरोपिय साहित्यातील विशेषत: कादंबऱ्या आणि काही नाटकांवर त ५०-५५ वर्षांच्या कालावधीत तीन-तीन चित्रपट निर्माण झाल्याची उदाहरणं आहेत. शेक्सपिअरच्या ‘अँटनी अँड क्लिओपात्रा’, ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’, ‘ज्युलिअस सिझर’, ‘किंग लिअर’, ‘मॅकबेथ’, ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’, ‘मिडसमर नाईटस ड्रीम’, ‘ऑथेल्लो’, ‘रोमिओ अँड ज्युलिअेट’, ‘द टेम्पेस्ट’ या नाटकांवर इंग्लंड, युरोपातच नाही तर रशियन आणि जपानी भाषेतही चित्रपट निघाले आणि गाजलेही. कलात्मक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरावर यातील काही चित्रपट जगातील सर्वोत्तम चित्रपटात गणले जातात हे विशेष.

ज्यांच्या साहित्यकृतींवर लक्षणीय चित्रपट आले आणि गाजले अशा इंग्रजी लेखकांची यादी खूप विस्तृत आहे. यात जेन ऑस्टिन, अगाथा ख्रिस्ती, चार्ल्स डिकन्स, ग्रॅहॅम ग्रीन, थॉमस हार्डी, हेन्री जेम्स, रुडयार्ड किपलिंग, सॉमरसेट मॉम, जॉर्ज ऑर्वेल, टेरेन्स रॅटिगन, एच.जी.वेल ही यादी आणखीही वाढवता येईल.

शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या किमान १५-२० साहित्यकृतींवर हिंदीत चित्रपट झाले. यात ‘अंतरात्मा’, ‘अपने-पराए’, ‘बिराज बहू’, ‘छोटी बहू’, ‘इति श्रीकांत’, ‘खुशबू’, ‘मंझली दीदी’ आणि ‘स्वामी’ महत्त्वपूर्ण आहेत. एकट्या ‘परिणीता’वर १९४२ ते २००५ या काळात चार चित्रपट निघाले आणि गाजले. ‘देवदास’चीही चार-पाच रूपं गेल्या ५० वर्षांत आली आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘चोखेर बाली’, ‘चार अध्याय’, ‘घरेबाहेरे’, ‘काबुलीवाला’, ‘ताशेर देश’, ‘तीन कन्या’, ‘उपहार’ या कलाकृतींवर चित्रपट आले. टागोरांच्या ‘चारुलता’वर सत्यजित रे यांनी काढलेल्या चित्रपटानं कलात्मक आणि व्यावसायिक स्तरावर विक्रमी यश मिळवलं.

चित्रपटाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून उत्तम साहित्याकडे चित्रपट दिग्दर्शक आकृष्ट झाल्याचं दिसून येतं. प्रथमेश बारुआ, देवकी बसू या दिग्दर्शकांनी शरदचंद्र चटोपाध्याय, ताराशंकर बंदोपाध्याय आणि इतर लेखकांच्या साहित्यकृतींवर चित्रपट बेतले. सत्यजित रे यांचा जगप्रसिद्ध ‘पथेर पांचाली’देखील बिभुतीभूषण बंदोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित होता.

साहित्य आणि चित्रपटाच्या परस्परसंबंधाचा विचार करता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. चित्रपट दिग्दर्शकानं लेखकाच्या दृष्टिकोनाशी किती प्रामाणिक राहायचं? टागोरांच्या ‘काबुलीवाला’ या कथेवर चित्रपट निर्माण करताना तपन सिन्हा यांनी मूळ कथेशी शतप्रतिशत इमान राखलं. याउलट प्रख्यात दिग्दर्शक मृणाल सेन, कुमार सहानी, अदुर गोपालकृष्णन यांनी जेव्हा साहित्यकृतीवर चित्रपट निर्माण केले, तेव्हा त्याच्यावर टीकेची झोड उठली. मूळ कलाकृतीपासून ते दूर वहावते गेले. त्यांना जर चित्रपट आपल्याच मनाप्रमाने करायचे होते तर त्यांनी साहित्यकृतींचा आधार घेण्याची गरजच काय होती अशी प्रखर टीकाही त्यांच्यावर झाली. मृणाल सेन यांनी ठरवून त्यानंतर कुठल्याही चित्रपटासाठी पूर्वी लिहिलेल्या कथा किंवा कादंबरीचा आधार घेतला नाही. मात्र योगायोग असा की, त्यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात उच्च अभिरूचीची साहित्यमूल्यं दिसून यायची.

बहुतेक वेळा सुप्रसिद्ध साहित्यकृतींवर आधारित चित्रपटाबाबत टीकेचाच सूर ऐकू येतो. यात प्रेक्षक, समीक्षक बहुश:  वरकरणी तुलनेत अडकून पडलेले दिसून येतात. चित्रपट मुळाबरहुकूम नाही, नको तेवढी काटछाट झाली, काही पात्रं आणि घटनांना कात्री लावली, पात्रांची योजना चुकीचा झाली वगैरे वगैरे. पण चित्रपट दिग्दर्शकानं नेमकं कशाशी प्रामाणिक राहायचं, बाह्यरुपाशी की अंतर्गत अर्थसंगतीशी? जसं एका कादंबरीचे अनेक वाचक असतात, तसं स्वातंत्र्य चित्रपट दिग्दर्शकाला का नको?

पटकथा लेखकापुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो निवडीचा. नेमकं काय टाळावं आणि जे टाळलं त्याची भरपाई नेमकी कशानं करावी? यात घटना, चरित्रं, संघर्ष या साऱ्यांचाच एक तार्किक मेळ घालावा लागतो. यात साहित्यकृती वाचणं आणि चित्रपट बघणं या दोन आस्वाद प्रक्रिया असतात. इथं एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की, आपण कादंबरी टप्प्याटप्प्यानं काही दिवसांत, काही आठवड्यांत पूर्ण करू शकतो. आस्वादन प्रक्रियेत काही फरक पडत नाही. हवं तेव्हा आपण मागं जाऊन काही पानं वाचू शकतो. चित्रपट बघण्याची प्रक्रिया मात्र दिलेल्या विवक्षित स्थळी, सार्वनिक एकांतात पूर्ण करायची असते. सारं काही दोन-अडीच तासांत संपतं. एकाग्र चित्तानं चित्रपटाच्या गतीला आणि कृतीला शरण जाऊन चित्रपट बघावा लागतो. अगदी चित्रपट व्हिडिओ किंवा डीव्हीडीवर बघितला तरी आस्वादावर त्याचा फारसा काही परिणाम होत नाही.

साहित्यकृतीचं चित्रपटासाठीचं रूपांतर तीन पद्धतीनं होऊ शकतं. पहिल्यात,  अगदी शब्दश: केलं जातं, दुसऱ्यात अर्थान्तरण प्रक्रियेत इंटरप्रिटेशनला महत्त्व दिलं जातं. तिसऱ्या वर्गात साहित्यकृतीचा केवळ आधार घेतला जातो.

कुठल्याही पद्धतीचं नातं असो, साहित्यानं चित्रपटसृष्टीला समृद्ध केल्याचं फार मोठं योगदान जागतिक आणि भारतीय स्तरावर दिसून येतं. अगदी ठळक उदाहरणं द्यायची झाली तर आर. के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारित देव आनंद यांचा ‘गाईड’, ‘पथेर पांचाली’, आमीर खान यांचा ‘थ्री इडियट’ आणि चेतन भगत यांच्या दुसऱ्या लोकप्रिय ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’वर आधारित ‘कोई पो चे’ हे चित्रपट डोळ्यापुढे येतात. ‘संस्कार’, ‘काडू’ हे कन्नड चित्रपटही तेवढेच महत्त्वाचे आहेत. ‘चोखेर बाली’, ‘पिंजर’ या चित्रपटांनी स्त्रियांच्या दमनकारी वेदनांना वाचा फोडली तर ‘चित्या रियावर’ या मल्याळम चित्रपटानं दलितांच्या वेदनांना आवाज दिला. लिंगभेदासारख्या नाजूक समस्येवर भाष्य करणारा रितूपर्ण घोष यांचा ‘चित्रांगदा’ हा महत्त्वपूर्ण चित्रपट आहे.

ज्या ज्या साहित्यकृतींवर भारतातील विविध भाषांमधून चित्रपटनिर्मिती झाली, त्या त्या साहित्यकृतींच्या वाचकसंख्येत भर पडली. पुनर्प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी बऱ्याच साहित्यकृतींच्या शेकड्यांनी लोक आवृत्त्या निघाल्या आणि विकल्या गेल्या.

काल्पनिक कथानकांवर आधारित ज्या चित्रपटांनी जागतिक स्तरावर कलात्मक आणि व्यावसायिक विक्रम केले त्यातील निवडक कलाकृतींवर जर पुस्तकांची निर्मिती झाली तर वाचक-प्रेक्षक निश्चितच त्यावर तुटून पडतील.

उत्तम साहित्यकृतीवर आधारित अनेक चित्रपट फसले पण ज्यांचे बहुतेक चित्रपट साहित्यकृतींना योग्य न्याय देऊन कलात्मकदृष्ट्याही श्रेष्ठ ठरलेल्या सत्यजित रे यांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या ‘शतरंज के खिलाडी’वर चित्रपटाची निर्मिती केली. लखनौच्या सामंतशाहीचा ऱ्हास दाखव‌णाऱ्या दोन नबाबांची ही कथा. जीवनापेक्षा शतरंजवर प्रेम करणारे हे दोन नवाब या खेळासाठी आपलं सारं आयुष्य घालवतात आणि इंग्रजांच्या सैन्यानं कैद केल्यानंतरही आपल्या राजाला वाचवण्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठतात.

मुळात ही कथा पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी लहान होती याची राय यांना पूर्ण जाणीव होती. मग पटकथा लिहिताना राय यांनी तत्कालीन भारतातल्या प्रांताप्रांतातील अराजक, इंग्रजी सत्तेचं दमन, हेही चित्रपटात दाखवलं. नवाब वाजिद अली शहासारखी धर्माची आज्ञा काटेकोरपणे पाळणारा पण अनेक शानशौक करणारा, खालच्या स्तरातील स्त्रियांशी रत होणारा राजा होता. पण राय यांना त्याची संगीत साधना, त्याचं कलाप्रेम याची भुरळ पाडली. त्यांनी वरकरणी भारतीय आणि इंग्रजांचा संघर्ष उभा केला. सारा समाज कोंबड्यांच्या आणि रेड्यांच्या झुंजी लावण्यात आणि पतंग उडवण्यात मस्त. वाजिद अली शहा चित्रपटात दिसतो तो कृष्णाच्या वेशात, बायकांच्या घोळक्यात. राजाचं विलासीपण, राजकारणाबद्दलची उदासीनता, लखनौ शहराची वर्णनं येतात पण खूप संथपणे.

संजीवकुमार, सईद मिर्झा यांच्या जोडीला वाजिद अलीच्या भूमिकेसाठी अमजद खान, जनरलच्या भूमिकेत रिचर्ड अॅटनबरो तर टॉम आल्टर कॅप्टनचय्या भूमिकेत आहेत. जोडीला शबाना आजमी आणि फरिदा जलाल. मात्र या सक्षम कलाकारांची जबरदस्त साथ असूनही हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही.

कथेचा लहान जीव, सूक्ष्म तरल कथेचे भयानक गंभीर परिणाम कथाविस्तामुळे आणि स्वातंत्र्य चळवळीच्या वाढीव वेष्टनामुळे मूळ पात्रांवरून लक्ष विचलित झालं. कथेत राज्य लयाला गेलं तरी चालेल खेळातल्या राजासाठी मात्र दोन्ही नवाब एकमेकांचा शिरच्छेद करतात. राय यांच्या चित्रपटात मात्र दोघे संगनमत करून रात्रीच्या अंधारात गुपचूप घरी जाऊ इच्छितात.

आकलनीय-अनाकलनीय, सुसंगत-विसंगत प्रवाही ओघ आणि अडथळे यांच्यात प्रेक्षकाचा गोंधळ उडतो. त्यांची कलातंद्री वारंवार भंग पावते आणि राय यांचा भक्त असलेला प्रेक्षकही निराश होतो.

कलाकारणातले निर्णय हे फार संवेदनशील असतात. स्वभाषेत, स्वसंस्कृतीत स्वत:च्या गडकिल्ल्यात मैदान मारणं तुलनेनं सोपं असतं. उर्दूसारख्या अनोळखी भाषेत, लखनौसारख्या अनोळखी पर्यावरणात राय यांच्या कालनिर्णयक्षमतेची परीक्षा झाली असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल.

सुरुवातीलाच मी सांगितलं की, साहित्य असो वा चित्रपट दोन्हींचाही उद्देश कथा सांगणं, नाट्यपूर्ण चित्रमय पद्धतीनं सांगणं हाच आहे. त्याची अभिव्यक्तीची साधनं आणि पद्धती भिन्न असल्या तरी उद्देश वाचक-प्रेक्षकांना विश्वासात घेऊन त्यांचं रंजन करत करत त्यांना प्रभावित करणं, त्यांचं उन्नयन करणं हाच आहे. लेखकाच्या दृष्टीपेक्षा एक वेगळा दृष्टिकोन घेऊन प्रेक्षकांना त्यांच्या परिसरातील वास्तवाच्या संदर्भात गोष्ट सांगणं हे महत्त्वाचं ठरतं. लिखित साहित्याला चित्रपटामुळे मोठा प्रेक्षकवर्ग मिळत असला तरी दृकचित्राच्या प्रभावामुळे वाचन संस्कृतीपासून समाज आज दूर जातानाही दिसतो आहे. लोकप्रियतेच्या नावाखाली आपण कसदार साहित्याचं अवमूल्यन तर करत नाही ना, याचं भान माध्यमांतर करताना ठेवणं तेवढंच गरजेचं आहे असं वाटतं.

साहित्य आणि चित्रपट माध्यमांचा तौलनिक अभ्यास करताना दोन्ही माध्यमांची शक्तिस्थानं, त्यांचे गुणविशेष आणि मर्यादा यांचा विचार करावा लागेल. संवाद माध्यमातील स्वीकृती, माध्यमांतरांचा गहिरा अनुभव चित्रपट आस्वादन आणि सामाजिक तसंच आर्थिक दृष्टिकोनातून अर्थगहनतेला शोधण्याचे विनम्र पण गंभीर प्रयास करावे लागतील हे मात्र खरं.

 

लेखक ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.

sontakkekm@gmail.com

Post Comment

Jayant Raleraskar

Mon , 28 August 2017

मालिका वाल्यानी म्हणायचे प्रेक्षकांना हे (च) हवे आहे. आणि प्रेक्षकातील मंडळीनी नाके मुरडत मालिकेची वेळ झाली की टीवी समोर बैठक मारायची. हे आता सवयीचे झाले आहे. मात्र हे खरे की आपल्या बाळबोध आकलनातून फक्त दिवाळखोरी जाहीर होते. मात्र खिळवून ठेवण्याचे कसब (कुठल्याही स्तरातील का होईना) झेलगुंडा घातलेल्या पतंगा सारखे कायम गोता खात राहतील.... -----जयंत राळेरासकर, सोलापूर.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......