महार बटालियननं केलेला पराभव कोणाचा? पेशवार्इचा की मराठ्यांचा?
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
कॉ. भीमराव बनसोड
  • भीमा कोरेगाव येथील स्मृतिस्तंभ
  • Wed , 03 January 2018
  • पडघम कोमविप भीमा कोरेगाव Bhima Koregaon महार बटालियन Mahar Battalion

हा लेख १ जानेवारी २०१८च्या आधी भीमा कोरेगाव येथील महार बटालियनच्या २००व्या स्मृतिदिनानिमित्त लिहिलेला आहे. त्यामुळे यात नंतरच्या संघर्षाविषयीचा कुठलाही उल्लेख नाही. - संपादक

.............................................................................................................................................

१ जानेवारी १८१८ रोजी इंग्रजांच्या अत्यंत कमी संख्येनं असलेल्या महार बटालियननं मराठ्यांचं राज्य चालवणाऱ्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या प्रचंड संख्येनं असलेल्या सैनिकांचा भिमा कोरेगांव येथे झालेल्या लढार्इत निर्णायक पराभव केला. त्याला १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त पेशवार्इसारखंच राज्य चालवू इच्छिणाऱ्या विद्यमान सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भिमा कोरेगांव येथे मोठा समारंभ आयोजित करण्याचं ठरवलं. त्याचबरोबर सरकारविरोधी असलेल्या विविध सामाजिक संघटनांनीही या लढार्इतील विजयी सरदार दुसरे सिदनाक यांच्या कळंबी गावापासून, काहींनी येवल्यापासून भिमा कोरेगांवपर्यंत संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. शनिवारवाड्यासमोर जाहीर सभांसह भिमा कोरेगांव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं. याप्रमाणे सरकारी पक्षापासून तर सरकार विरोधकांपर्यंत सर्वांनीट हा विजयोत्सव साजरा केला. म्हणून हा खरोखर पेशवार्इचा पराभव होता की लढावू मराठ्यांचा पराभव होता, असा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे, असं दिसतं. (ते काहीही असलं तरी विजय महार बटालियनचा होता हे मात्र निश्चित.)

राज्यातील आताच्या सोनर्इ, जवखेडा, खर्डा, शिर्डी, कोपर्डी इत्यादी ठिकाणच्या अत्याचाराच्या घटना, त्यापैकी कोपर्डी व खर्डा प्रकरणात नुकतेच लागलेले न्यायालयीन निकाल, त्यापूर्वी संपूर्ण राज्याला ढवळून काढणारे मराठा मोर्चे, नंतरच्या काळात त्यांच्याच जोडीला बहुजन, दलित, मुस्लिम व ओबीसींचे मोर्चे, या पार्श्वभूमीवर असे प्रश्न उपस्थित करण्याला वेगळाच अर्थ येत आहे.

तेव्हा पेशवार्इ हे खरोखर कोणाचं राज्य होतं? ब्राह्मणांचं की मराठ्यांचं? खरं तर रूढ अर्थानं ते या दोघांचंही राज्य होतं. मराठ्यांचं राज्य पेशवे चालवत होते. शहाजी राजांनी त्यांच्या जहागिरीची वाटणी आपली मुलं, शिवराय आणि एकोजीमध्ये केली होती. शिवरायांकडे पुण्याची जहागिरी तर एकोजींच्या वाट्याला तंजावरची जहागिरी आली. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या शेवटच्या काळात छत्रपती संभाजीराजे आणि राजाराम यांच्यात राज्याची वाटणी करण्याचा विचार केला होता. छत्रपती शाहू आणि राणी ताराबार्इ यांच्यातील ही वाटणी यशस्वी ठरली. कोल्हापूरच्या राज्यानं अठराव्या शतकात आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलं. (एकोणिसाव्या-विसाव्या शतकात त्याचंच रूपांतर एका स्वतंत्र संस्थानात झालं. समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे त्याचे संस्थानिक होते.)

(अठराव्या शतकातले) छत्रपती शाहू स्वत: लष्करी सेनानी असते, तर अधिक फायदेशीर झालं असतं. त्यामुळे त्यांचे कायदेशीर वारसत्व अधिक लवकर सिद्ध झालं असतं आणि सत्ताग्रहणाचा मार्ग सोपा झाला असता. परंतु अशी परिस्थिती नव्हती. त्याऐवजी छत्रपती शाहूजवळ एक दुसरा गुण होता. त्यांना माणसांच्या कर्तृत्वाविषयी अचूक अंदाज होता. बाळाजी विश्वनाथ भट आणि नंतर त्याच्या मुलामध्ये लक्षणीय नेतृत्वगुण असल्याचं त्यांनी हेरलं. त्या काळी वजीर, दिवाण अथवा पेशवा यांनी फौजेचं नेतृत्व करण्याची पद्धतच होती. त्यामुळे छत्रपती शाहुंनी पेशवे पदासाठी त्यांच्यासारख्या योग्य व्यक्तीची निवड केली. पुढे चालून सत्तेच्या दृढीकरणात लष्करी सरंजाम देण्याचा अधिकार पेशव्याला प्राप्त झाला आणि ब्राह्मण कारभारी आणि सावकार हेदेखील त्याच्या अधिकाराखाली आले. त्यामुळे पुढील काळात (मराठा) राजे नाममात्र होऊन (ब्राह्मण) पेशवेच खरे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. त्यांचेच पुढील वारसदार असलेल्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी नियुक्त केलेल्या सेनापती बापु गोखल्यांच्या मराठा सैन्यांचा भिमा कोरेगांवच्या लढार्इत महार बटालियननं पराभव केला. तेथूनच पेशवार्इ व मराठा राज्याची घसरण आणि ब्रिटिश राजवट बळकट व्हायला सुरुवात झाली.

यामुळे चिडून जाऊन काही तथाकथित देशभक्त म्हणतात की, महाराष्ट्रातील महारांनी एक प्रकारे इंग्रज राज्य बळकट करून देशद्रोहच केला आहे. या आरोपात काडीचंही तथ्य नाही. कारण त्या वेळी भारत हा एक देश अथवा राष्ट्र म्हणून उदयालाच आलेला नव्हता. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला प्रगत भांडवलशाहीचे प्रतिनिधी असलेल्या इंग्रजांच्या विजयामुळेच भारताला एक देश म्हणून संघटित करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. तोपर्यंत भारत हा वेगवेगळ्या राजे-रजवाड्यांच्या लहानलहान तुकड्यांत विखुरलेला होता. हे वेगवेगळे राजे आपापसांत लढाया करण्यात मशगूल होते. तेच पुढे आपापल्या संस्थानांचे संस्थानिक झाले. या सर्वांचे कानून कायदे, वजन, मापे, चलनी नाणे, राज्य कारभाराची भाषा हे सर्व ज्याचे त्याचे वेगवेगळे होते. इंग्रजांनी मात्र देशभर राज्य कारभाराची एकच इंग्रजी भाषा, सर्वत्र सारखेच कानून कायदे, कोर्ट कचेऱ्या, न्याय व प्रशासन  व्यवस्था, करप्रणाली, आधुनिक रेल्वे, पोस्ट व टेलिग्राम व्यवस्था इत्यादी करण्याचा प्रयत्न केला.

त्यात या लहानलहान राजे-रजवाड्यांचा अडथळा होत होता म्हणून त्यांनी विविध निमित्तानं ते बरखास्त करण्याचा सपाटा लावला होता. म्हणून तर उत्तर भारतातील झांशी हे संस्थान कायदेशीर वारसाच्या मुद्यावरून जेव्हा इंग्रजांनी बरखास्त केलं, तेव्हा झांशीच्या राणीनं ‘मेरी झांशी नहीं दुंगी’ असे उद्गार काढले. कारण त्या वेळी तिचा लढा फक्त तिच्या झांशीपुरताच होता. कारण त्या वेळी एकसंध भारत देश असा निर्माणच झाला नव्हता. त्याची प्रक्रिया चालू होती. नाहीतर तिनं ‘मेरा भारत नहीं दुंगी’ असे उद्गार काढले असते. एकसंध भारत देशच निर्माण झालेला नसल्यामुळे कोणाकडूनही देशद्रोह होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे महार बटालियननं पेशव्याचा पराभव केल्यानं कोणताही देशद्रोह होत नाही.  

दुसरं म्हणजे पेशवे अथवा त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौज देशभक्तीनं भारून इंग्रजांच्या कट्टर विरोधात होती, असंही समजण्याचं कारण नाही. याउलट इंग्रजांच्या कट्टर विरोधात हैदर अली व त्यांचा मुलगा टिपू सुलतान हे शेवटपर्यंत लढत होते. पुढे चालून टिपू सुलतानविरुद्ध लढण्यासाठी इंग्रजांना मदत करण्याकरता पेशव्यांनी व निझामानं इंग्रजांशी संगनमत केलं होतं असा इतिहास आहे. पण इंग्रजांना तापदायक ठरलेल्या टिपु सुलतानाच्या विरोधात ब्रिटिश व पेशव्यामध्ये पुण्याच्याच शनिवारवाड्यात झालेला मैत्रीपूर्ण करार फार काळ टिकला नाही, हा भाग वेगळा. त्यामुळे या दोघांच्याही परस्परसंबंधात वैमनस्य येऊ लागलं. या वैमनस्याचा स्फोट नोव्हेंबर १८१७ रोजी झाला. या दिवशी दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या सैन्यानं पुण्यातील इंग्रज वकिलातीवर हल्ला केला. आपल्या वकिलातीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न ब्रिटिश कर्नल बर यांनी केला. पण त्यात त्याला यश आलं नाही. याच वेळी पुण्यापासून ३८ मैलावर असलेल्या शिरूर या गावी ब्रिटिशांच्या (बॉम्बे नेटिव्ह इंन्फंट्री) सेकंड महार बटालियन, फर्स्ट रेजिमेंटचा मुक्काम होता. या बटालियनचा प्रमुख कॅप्टन फ्रान्सिस स्टॉटन हा होता. कर्नल बरला बाजीराव पेशव्यांच्या संख्येनं प्रचंड असलेल्या सैन्याचा मुकाबला करणं अशक्य वाटल्यामुळे त्यानं कॅप्टन स्टॉटनला पुणे वकिलातीच्या संरक्षणाकरता मदतीला येण्याबद्दल तातडीचा संदेश पाठवला. कॅप्टन स्टॉटन ३१ डिसेंबर १८१७ रोजी रात्री ८ वाजता सेकंड महार बटालियनला घेऊन शिरूरहून पुण्याकडे निघाला. कॅप्टन स्टॉटन बरोबरच्या या बटालियनमध्ये ५०० पायदळ, ३०० घोडदळ, ५ ऑफिसर्स, २०६ पौंडर तोफा एवढा लवाजमा होता. या बटालियननं सुमारे २५ मैल रात्रीचा प्रवास केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ही बटालियन भिमा नदीच्या तिरावर पोहोचली. नदीच्या दुसऱ्या तिरावर पेशव्यांचं प्रचंड सैन्य लढार्इच्या तयारीतच होतं. त्यांच्या सैन्यात ५ हजार पायदळ व २५ हजार घोडदळ होतं. महार बटालियनच्या तुलनेत हे सैन्य फारच जास्त होतं. त्यामुळे कॅप्टन स्टॉटन चिंतेत पडणं साहजिक होतं.

कशी झाली होती ही लढार्इ?

तरीही महार बटालियननं पेशव्यांच्या सैन्याला हुलकावण्या देऊन कोरेगांव या खेड्यात प्रवेश केला. या गावाला मातीची संरक्षक भिंत होती. ही भिंत आणि गावातील घरं यामुळे पेशव्यांच्या घोडदळाला गावात शिरून लढार्इ करणं कठीण जार्इल हे जाणून या बटालियननं गाव आपल्या ताब्यात घेतलं. पेशव्यांच्या सैन्यावर तोफगोळे फेकणं सोयीचं होर्इल अशा रीतीनं भिमा नदीच्या किनाऱ्यावर आणि शिरूरला जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी तोफा डागल्या. तरीही प्रचंड संख्येनं असलेल्या पेशव्यांच्या सैन्यानं गावात प्रवेश केलाच. यावेळी तुंबळ लढार्इ झाली. यात या बटालियनमधीलही बरेचसे सैनिक व काही इंग्रज अधिकारीही मारले गेले. पण शेवटी या बटालियननं आक्रमक भूमिका घेऊन पेशव्यांच्या सैन्यावर निकराचे हल्ले चढवले. अखेर १ जानेवारी १८१८ च्या रात्री ९ वाजता पेशव्यांच्या सैन्यानं तेथून पळ काढला. या बटालियननं भिमा नदीपर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना पळता भूर्इ थोडी केली. या लढार्इत बटालियनमधील एकूण ८३४ लढवय्यांपैकी २७५ सैनिक व अधिकारी मारले गेले. तर पेशव्यांचे ६०० सैनिक व अधिकारी मारले गेले. जवळजवळ २५ तास चाललेल्या या लढार्इत महार बटालियननं पेशव्यांचा निर्णायक पराभव केला.

सरंजामी पेशव्यांचा पराभव करणाऱ्या या महार बटालियनच्या विजयाची स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत कायम रहावी, यासाठी १८८२ साली भिमा कोरेगांव येथे विजय स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. या विजय स्तंभावर या लढार्इत हुतात्मे झालेल्या सैनिकांची नावं कोरलेली आहेत. त्यात बहुसंख्य महार जातीचेच आहेत हे सांगावयास नकोच. तेव्हा इंग्रजांनी या लढार्इतील महार बटालियनच्या विजयाचा स्तंभ उभारला म्हणून कितीतरी बरं झालं. कारण तो त्या इतिहासाचा जिताजागता पुरावाच त्यांनी उभा केलेला आहे. अन्यथा आताच्या इतिहास बदलाच्या काळात असं काही घडलंच नव्हतं किंवा लढार्इ झाली होती, पण पेशव्यांच्या सैन्यानंच इंग्रजांच्या महार बटालियनचा पराभव केला होता, असा उल्टापाल्टा इतिहास सांगायला आताच्या तथाकथित इतिहास तज्ज्ञांनी कमी केलं नसतं. असो.

आता प्रश्न असा आहे की, एवढ्या कमी संख्येनं असलेल्या या महार बटालियननं प्रचंड संख्या असलेल्या पेशव्यांच्या सैन्यांचा पराभव करण्यामागची प्रेरणा काय होती? तथाकथित देशभक्तांनी या ठिकाणी फारसा गांभीर्यानं विचार केला नाही तरी जे संवर्णीय संस्करातून स्वत:ला मुक्त करून घेऊ शकले नाहीत, तरीही जे पुरोगामी आहेत आणि स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेतात त्यांच्याही मते ही बाब इंग्रजांना मदत करणारीच होती. इंग्रजांना मदत झाली हे खरं असलं तरी शास्त्रीय अन्वेषण पद्धतीनं विचार करणाऱ्या पुरोगाम्यांनी ही बाब ध्यानात घेणं आवश्यक आहे की, पेशवे हे जर्जर झालेल्या सरंजामी समाजव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करत होते, तर इंग्रज हे त्यापुढच्या भांडवली समाजव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करत होते. जुनाट, मरणासन्न असलेली सरंजामशाही व उदयोन्मुख भांडवलशाही व्यवस्था यांतील संघर्षात नवीन समाजव्यवस्थेचंच स्वागत व्हायला पाहिजे. जे महात्मा फुलेंसारख्या समाजसुधारकांनी केलं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या तेच बरोबर आहे.

तेव्हा महार सैनिक हे इंग्रजांचे ताबेदार होते, इंग्रजांकडून त्यांना पगार मिळत होता, ‘खाल्लेल्या मिठाला जागावे’ एवढ्याच कारणानं ते पेशवार्इविरुद्ध प्राणपणानं लढले नाहीत, तर एकूणच सरंजामी व्यवस्थेत सर्वच दलितांना जे माणुसकीहीन जीणं जगावं लागत होतं, त्याचा कळस पेशवार्इत झाला. ‘मनुस्मृती’च्या सर्वच नियमांची काटेकोर अंमलबजावणी पेशवार्इत केली जात होती. त्याचाच भाग म्हणून याच पेशवार्इत दलितांच्या गळ्यात गाडगं आणि कंबरेला झाडू लावून फिरावं लागत होतं. या सर्वांची चीड महारांना होती. ती चीड, तो त्वेष त्यांनी भिमा कोरेगांवच्या लढार्इत दाखवला.

इंग्रजांमार्फत भांडवली व्यवस्थेनं भारतात चंचूप्रवेश केल्यानं इथली सरंजामी व्यवस्था मोडली नाही, पण खिळखिळी झाली. याचे कोणकोणते परिणाम झाले त्याचे वर्णन येथे करीत नाही. पण त्याचाच भाग म्हणून इंग्रजांनी सैन्यामध्ये महारांची भरती सुरू केली होती. मुंबर्इ इलाख्यात इस्ट इंडिया कंपनीनं १८५७ च्या बंडापर्यंत आणि त्यानंतर इंग्रज सरकारनं ज्या लष्करी पलटणी उभारल्या, त्यात बहुसंख्य सैनिक महार होते. १८८०च्या आधी नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात २१८० महार सैनिक होते. इतर जिल्ह्यातूनही थोड्याफार फरकानं अशीच महार सैनिकांची संख्या होती. महार बटालियन नावानं ओळखल्या जाणाऱ्या अशा एकूण २९ बटालियन होत्या. पुढे सवर्णांच्या विरोधामुळे मात्र १८९१ साली इंग्रजांनी महारांची सैन्य भरती थांबवली.

पूर्वी आपल्या खेड्यातूनही बाहेर न पडणारे हे महार सैनिक झाल्यानंतर त्यांना निरनिराळ्या मोहिमांनिमित्त राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागांत तसेच देशाबाहेरही जात होते. सैनिक असल्यानं त्यांना इंग्रजाकडून किमान शिक्षण सक्तीनं दिलं जात होतं. तो त्यांच्या सैनिकी पेशाचाच भाग होता. त्यात इंग्रजी, मराठी भाषेबरोबरच इतिहास, गणित, भूगोल इत्यादी विषयांचंही शिक्षण दिलं जात होतं. एवढंच नव्हे तर त्यांची नॉर्मल स्कुलची शेवटची मॅट्रिक स्तरापर्यंतची परीक्षाही घेतली जायची. त्यामुळे सैनिकी पेशाव्यतिरिक्त इतरही वाचन होऊन त्यांची विचार करण्याची कक्षा वाढत होती. मुख्य म्हणजे भारतीय असलेल्या हिंदूकडून माणुसकीहीन वागणूक मिळत असली तरी इंग्रजांकडून मात्र माणुसकीची वागणूक मिळत होती. इंग्रजांच्या स्वयंपाक घरापर्यंत महारांची पोहोच होती. काही इंग्रज अधिकाऱ्याकडे महारच स्वयंपाकी म्हणून होते. सैनिक असताना त्यांच्या कुवतीनुसार वा पराक्रमानुसार प्रमोशनही मिळत होतं. त्यांना निश्चित वेतन होतं, सेवानिवृत्त झाल्यानंतर मूळ गावी परत आल्यावर पेंशनही मिळत होती, त्यामुळे सवर्णावर पूर्वीइतकं अवलंबित्वही नव्हतं, इत्यादी बाबींचा परिणाम या महार सैनिकावर होत होता.

त्या काळी सरकारी शाळा फारशा नव्हत्या. ज्या होत्या त्यातूनही दलितांना सहज प्रवेश नव्हता. सवर्णांच्या खाजगी शाळेत तर प्रवेशाचा प्रश्नच नव्हता. अशा काळात बहुसंख्य सैनिक महिना दोन महिन्याच्या सुटीसाठी अथवा सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावी आल्यानंतर गावातील अशिक्षित दलितांना शिक्षण देण्याचं काम करत असत. याचं उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील आद्य दलित नेते गोपाळबुवा वलंगकर यांचं देता येर्इल. ते इंग्रजांच्या राजवटीत लष्करात सैनिक म्हणूनच भरती झालेले होते. सुटीवर आल्यानंतर ते दलितांना शिक्षित करण्याचं काम करत. तसंच पुण्याला जाऊन महात्मा ज्योतिबा फुले यांची भेट घेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी दलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘अनार्य दोष परिहार संस्था’ स्थापन करून त्यामार्फत दलितोद्धाराचे कार्य केलं. सुभेदार बहादुर गंगाराम कृष्णाजी भातणकर यांच्यासारखी बरीच उदाहरणं देता येतील. 

इथं एवढंच ध्यानात ठेवणं आवश्यक आहे की, सरंजामशाहीचे अवशेष असलेल्या जातीव्यवस्थेविरुद्ध पुढील काळात ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त संघर्ष झाला. त्यात आंबेडकरांचे वडील रामजी हे ब्रिटिश लष्करात सुभेदार या पदावर होते. इतकंच नव्हे तर त्यांचे आजोबा म्हणजे रामजी सुभेदारांचे वडील मालोजी (सैन्यातील नाव मालनाक महार) हेही लष्करातच होते. हा निव्वळ योगायोग नाही तर ब्रिटिश लष्करातील महार बटालियनच्या सैनिकांनी सरंजामी जातीव्यवस्थेविरुद्ध महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनांत विविध पातळ्यावर जे कार्य केलं, त्याचा तो दृश्य परिणाम होता. त्यामुळे या महार सैनिकांनी जातीव्यवस्थेविरुद्धची पायाभरणी किंवा वातावरण निर्मिती केली होती असं म्हणता येर्इल. अशाच संघर्षाचा एक महत्त्वाचा लष्करी शौर्यशाली लढा म्हणून, भिमा कोरेगांवच्या लढार्इत महारापेक्षा संख्येनं चौपट असलेल्या सरंजामी पेशवार्इ सैनिकांच्या पराभवाकडे पाहिलं पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून त्यात हुतात्मे झालेल्या महार सैनिकांना विनम्रपणे अभिवादन केलं पाहिजे.

तरीही कोणाला दलित शोषितांच्या लष्करी कारवार्इबद्दल शंका असेलच तर त्यांनी रोमन गुलामांच्या बंडाचा इतिहास ध्यानांत घ्यावा. रोमन गुलामांचा नेता ‘स्पार्टाकस’ हा नुसता गुलाम नव्हता, तर त्यातील शस्त्रास्त्रं चालवण्याचं शिक्षण घेतलेला, त्यात तरबेज झालेला ‘ग्लॅडिएटर’ होता. या ग्लॅडिएटर्संना गुलाममालकांनीच त्यांच्या मनोरंजनासाठी व त्यातून भक्कम पैसे कमावण्यासाठी शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलेलं होतं. या शिक्षणातून आपल्यापेक्षा तुल्यबळ असलेल्या प्रतिस्पर्धी ग्लॅडिएटर्सशी तर मुकाबला करावाच लागत होता, पण वाघ, सिंह, अस्वल यांसारख्या हिंस्त्र पशुशीही त्यांचा मुकाबला लावला जात होता. त्यामुळे त्यांना अशा शिक्षणांत स्वत:च्या बचावासाठीही तरबेज व्हावं लागत होतं. गुलाममालक इतर गुलामांच्या तुलनेत या ‘ग्लॅडिएटर्स’ना खाण्यापिण्यासाठी जरा बरं अन्न, राहण्यासाठी स्वतंत्र कोठडी यासारख्या इतरही काही सवलती देत होते.

‘ग्लॅडिएटर्स’ असलेल्या याच स्पार्टाकसच्या नेतृत्वाखाली प्रथम इतर ग्लॅडिएटर्संनीच गुलामांच्या शोषणाविरुद्धच्या बंडाला सुरुवात केली होती. नंतर विविध प्रांतातले व शेती, खाणी इत्यादी ठिकाणी काम करणारे गुलाम मोठ्या संख्येनं त्यात सामील झाले. या बंडातून काय निष्पन्न झालं? तर त्यांच्यावर घोर दडपशाही करण्यात आली. रोमपासून तर कापुआपर्यंतच्या रस्त्यावर गुलामांना क्रॉसवर खिळे ठोकून त्यांची प्रेतं उभी करण्यात आली. ते बंड चिरडून टाकण्यात आलं. मग त्या बंडाचा काहीच उपयोग झाला नाही काय? जरूर झाला. गुलामगिरीची समाजव्यवस्था खिळखिळी झाली. पुढे चालून गुलामांना बऱ्याच सवलती द्याव्या लागल्या. त्यातूनच पुढे भूदासतेवर आधारलेली सरंजामी समाजव्यवस्था उदयाला आली.

पेशवार्इविरुद्ध झालेल्या वरील संघर्षातही बरेच हुतात्मे झाले. पण त्यातूनच पेशवार्इ मोडायला सुरुवात झाली होती. म्हणून १ जानेवारी १९२७ रोजी स्वत: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भिमा कोरेगांव येथे जाऊन तेथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं होतं. तोच शिरस्ता महाराष्ट्रातील दलित दरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगांव येथे जाऊन पाळत आहेत. १ जानेवारी १८१८ हा सरंजामी पेशवार्इला थडग्यात गाडण्याचा व दलितांसाठी नवीन पहाट उगवण्याचा हा दिवस असल्याचं ते मानतात. म्हणून या दिवशी ते भिमा कोरेगांव येथे पेशवार्इला मूठमाती देण्यासाठी झालेल्या या संघर्षात हौतात्म्य पत्करलेल्या महार सैनिकांना ते अभिवादन करतात.

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

Post Comment

ADITYA KORDE

Thu , 04 January 2018

भीमा कोरेगाव ला खरेच मराठ्यांचा पराभव झाला का ? १९३४ साली शिवरामपंत परांजपे ह्यांनी लिहिलेल्या " मराठ्यांचा लढायांचा इतिहास १८०२ ते १८१८ " ह्या पुस्तकात वेगळाच दावा केलेला आहे. नुकतीच ह्याची नवी आवृत्ती आलेली आहे जाणकारांनी वाचून पाहावे.(पृ ३१ ते ४०- जुनी आवृत्ती ) ह्या कालखंडात एकूण १५ लढाया झाल्यात त्यातली ही शेवटून तिसरी म्हणजे निर्णायक नाहीच पण त्यात पराभव ही झालाच नाही . इंग्रजांकडे तोफखाना होता म्हणून हुलकावणी देऊन वाघोली आणि पुढे सातार्याकडे प्माराथ्यानी आपली फौज वळवली असा उल्लेख आहे . इतिहासाची मोड तोड करणे बरे नव्हे आता मुख्य मुद्दा समजा वरील लेखातल्या गोष्टी बरोबर असे गृहीत धरले तरी काही गोष्टी समजून येत नाहीत "ब्रिटिश लष्करातील महार बटालियनच्या सैनिकांनी सरंजामी जातीव्यवस्थेविरुद्ध महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनांत विविध पातळ्यावर जे कार्य केलं, त्याचा तो दृश्य परिणाम होता. त्यामुळे या महार सैनिकांनी जातीव्यवस्थेविरुद्धची पायाभरणी किंवा वातावरण निर्मिती केली होती असं म्हणता येर्इल. " हे अत्यंत भरमसाट विधान आहे. एकदा महार जातीला लष्कर भरतीला बंदी आणि इंग्रजांची मार्शल रेस थियरीचा इतिहास वाचावा मराठा लाईट ब्रिगेड ची स्थापना झाली १७६८ ला ... राजपूत रेजिमेंट १७७८ रोजी ... शीख रेजिमेंट १८४६ ला कुमाऊँ रेजिमेंट १८१३ मध्ये ... गढवाल रायफल्स १८८७ ला ... महार रेजिमेंट कधी स्थापन झाली? महार रेजिमेंटची स्थापना झाली १९४१ साली - मार्शल रेस थियरी सारख्या अन्याय्य आणि जन्माधिष्ठित उच्च नीचत्व मानणार्या थियरी विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला म्हणून ...... ब्रिटिश गुणग्राहक आणि सुधारक होते म्हणून नव्हे! तिलाही नंतर मशीनगन रेजिमेंट, बॉर्डर स्काऊट अशा विविध ठिकाणी नाचवलं गेलं ... स्वातंत्र्य मिळाल्यावर महार रेजिमेंटला पूर्ण वाव मिळाला ... आज १९ बटालियन आहेत महार रेजिमेंट मध्ये... तरी देखील ५०० महार सैनिकांनी २८००० हजार पेशव्यांचा ( म्हणजे ब्राह्मणाचा )दारुण पराभव केला. ह्या बाबत स्वत: बाबासाहेबांनी काय म्हटले आहे ते वाचायचे कष्ट घ्यायचे नसेल ( म्हणजे नाहीच घ्यायचेत ) तर त्यातला एक वेचा असा ज्या महार जातीच्या शेकडो सैनिकांनी अनेक लढ्यात सरकारला यश मिळवून दिले त्या महार जातीच्या तरुणांना लष्करात प्रवेश नाकारून ( इंग्रज) सरकारने त्यांचा विश्वासघात केला आहे.ब्रिटीशांच्या बाजूने महार तरुणांनी लढावे ही काही विशेष अभिमानाची गोष्ट नाही हे खरे पण स्पृश्य हिंदुनी त्याना नीच मानून कुत्र्या मांजरापेक्षा वाईट वागवले म्हणून, चरितार्थाचे इतर काही साधन नव्हते म्हणून नाईलाजाने ते ब्रीत्श फौजेत भरती झाले- बाबासाहेबांनी १ जाने १९२७ रोजी भीमा कोरेगाव इथून केलेल्या भाषणातील काही भागाचा सारांश संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर- ले धनंजय कीर , पृ ७६( इथे देखील बाबासाहेब स्पृश्य हिंदू म्हणतात फक्त ब्राह्मण नाही – शिवाय प्रच्छन्न, अभिमान निखळ कौतुक हे देखील दिसत नाही त्याना इतिहासाचे भान किंवा राजकीय समज नव्हती असे ज्याना म्हणायचे आहे त्यानी तसे म्हणावे.) दरवर्षी दलित संघटना इथे ( भीमा कोरेगाव ) मानवंदना देतायत... ब्राह्मणानी काही कधी गडबड केल्याचे ऐकिवात नाही (तसे त्यानी पुरुषोत्तम खेडेकरनी केलेल्या अश्लील शेरेबाजी बद्दल ही काही केल्याचे ऐकिवात नाही...असो तो विषय नाही ) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू, त्यांच्या शवावर अंत्यसंस्कार करणारे गोविंद गोपाळ( गायकवाड ), त्यांची समाधी तिथे अचानक २८ डिसेंबर २०१७ ला लागलेला फलक, त्यावरचा मजकूर, तो हटवणे त्यावरून वढू गावात झालेला गोंधळ आणि नंतर पोलिसांच्या शिष्टाई नंतर स्थापन झालेले सामंजस्य, ह्या सगळ्या गोष्टींचा १८१८ मधील इंग्रज मराठा (किंवा ब्राह्मण महार) युद्धाशी काय संबंध. सध्या मुख्यमंत्री फडणवीस आहेत म्हणजे ब्राह्मण आहेत हा धागा पकडून 21व्या शतकातल्या जाणत्या राजाने केलेला पेशव्यांचा उल्लेख आणि अगदी आता आता जिग्नेश मेवानी सारख्या थोर विद्या वाचास्पतीने केलेली पेशवाई संपवण्याची घोषणा त्याकरता रस्त्यावर उतरून लढाई करण्याचे आवाहन हे सगळे खरेतर ब्राह्मण विरुद्ध दलित असेच जायला पाहिजे होते पण नेहमी प्रमाणे धूर्त ब्राह्मण नामानिराळे झाले आणि बहुजन आपापसात भांडत बसले ( उपरोध नाही कळला तर शब्दश: घ्या)ह्यातून एक फायदा म्हणजे मनुवादि, ब्राह्मण्यवादी, ब्राह्मण, बामन, भट भटाळलेले, ह्या समानार्थी शब्दात पेशवे आणि पेशवाई ह्या दोन समानार्थी शब्दांची मराठी शब्द संग्रहात भर पडली. २०१७ मध्ये महाराष्ट्रभर शांततेत आणि शिस्तीत निघालेल्या लक्षावधीच्या मराठा मूक मोर्चाचे कौतुक आता मोकळेपणाने सगळ्यांना ( ह्यात प्रकाश आंबेडकरदेखील आले ) करायला काही हरकत नसावी .... आणि नितीन आगे चे मारेकरी निर्दोष सुटले, तुमच्या आमच्या नाकावर टिच्चून समाजात उजळ माथ्याने फिरताहेत . इंद्रजीत कुलकर्णी आणि मेघना पाटील ह्या दाम्पत्याच्या खुनाची ( तिच्या भावाकडूनच ) चर्चाच नाही. भोतमांगे , बबन मिसाळ, साहेबराव जोंधळे, सुशीलाबाई पोवार , रोहिदास तुपे तर कुणाला माहितीही नसणार ... पेटून उठायला आणि पेटवायला फक्त २०० वर्षांपूर्वी ची घटना महत्वाची .... हे जाळपोळीचे समर्थन नाही पण ह्या वर्तमानातील घटनांकडे जाणीवपूर्वक केलेला कानाडोळा दुखावून जातो .. भावना सुद्धा राजकीय सोय पाहून दुखावतात ....आणि दुखावल्या जातात. प्रेरणास्थान आणि स्फूर्ती स्थान आज मर्मस्थान होउन गेली... माणसं माणुसकी हरवुन बसली आणि माणूस म्हणून माणसाची किम्मत ही... उष:काल होता होता, काळ रात्र झाली .... स्वत:चे राजकीय अजेंडे स्वत:च्या बुद्धीवर आणि युक्तिवादावर पुढे न्यावेत , इतिहासाला आणि ऐतिहासिक पुरुषांच्या कर्तृत्वाला दावणीला बंधू नये...


Gamma Pailvan

Thu , 04 January 2018

लेखाबद्दल धन्यवाद Rohidas P !


Rohidas P

Wed , 03 January 2018

आनंद तेलतुंबडे यांच्या लेखाची लिंक खाली दिली आहे. https://thewire.in/209824/myth-bhima-koregaon-reinforces-identities-seeks-transcend/


Rohidas P

Wed , 03 January 2018

इतिहासाचा विपर्यास करणे हे कम्युनिस्टांचे पिढीजात कामच आहे. इतिहासाला हवे तसे वळण देऊन दलित आणि सवर्णामध्ये भांडण लावायची काम हे लोक करतात. वरिल लेखामध्ये, लेखकाने असाच प्रयत्न केला आहे. हा लढा दलित व पेशवे यांतला नक्किच नव्हता, तर ब्रिटिश व पेशवे यांतील होता. दोन्ही सैन्यामध्ये ( ब्रिटिश व पेशवे) सर्व जातीचे लोक होते. व ते त्याच्या मालकांसाठीच पोटापाक्ण्यसाठी लढत होते, जातीसाठी नाही. लेखकाने म्हणल्याप्रमाणे जर ते सैनिक जातियतेविरूद्ध लढत होते तर ब्रिटीशांनी जातीव्यवस्था १९१८ लाच नष्ट का केली नाही ? तसेच ब्रिटिशांनी महार भरती हि सवर्णांच्या दबावाने रद्द केली हेही असत्य आहे. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांचा भारतीय सैनिकांवरचा विश्वास उडला होता व त्यामुळेच त्यांनी महार रेजिमेंट बंद केली होती. व ती पहिल्या महायुद्धात नाइलाजास्तव त्यांनी सुरू केली कारण त्यांना सैन्याची गरज होती. पण आजकाल राजकिय पक्ष ऊगाज दलितांना सवर्णाविरूद्ध भडकवक्ण्यासाठी या घटनेचा वापर करत आहेत. यांवर आनंद तेलतुंबडे या दलित विद्वानाने (जे बाबासाहेबांचे नातजावई आहेत ) अत्यंत सुंदर लेख लिहीला आहे, तो लोकांनी जरूर वाचावा. तसेच अक्षरनामाने या लेखकाचे मराठीत भाषांतर करावे. त्यामुळे लोकांची माथी थंड होतील व महाराष्ट्रात शांती निर्माण होण्यास मदत होईल. https://thewir.in/209824/myth-bhima-koregaon-reinforces-identities-seeks-transcend/


Rohidas P

Wed , 03 January 2018

इतिहासाचा विपर्यास करणे हे कम्युनिस्टांचे पिढीजात कामच आहे. इतिहासाला हवे तसे वळण देऊन दलित आणि सवर्णामध्ये भांडण लावायची काम हे लोक करतात. वरिल लेखामध्ये, लेखकाने असाच प्रयत्न केला आहे. हा लढा दलित व पेशवे यांतला नक्किच नव्हता, तर ब्रिटिश व पेशवे यांतील होता. दोन्ही सैन्यामध्ये ( ब्रिटिश व पेशवे) सर्व जातीचे लोक होते. व ते त्याच्या मालकांसाठीच पोटापाक्ण्यसाठी लढत होते, जातीसाठी नाही. लेखकाने म्हणल्याप्रमाणे जर ते सैनिक जातियतेविरूद्ध लढत होते तर ब्रिटीशांनी जातीव्यवस्था १९१८ लाच नष्ट का केली नाही ? तसेच ब्रिटिशांनी महार भरती हि सवर्णांच्या दबावाने रद्द केली हेही असत्य आहे. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटीशांचा भारतीय सैनिकांवरचा विश्वास उडला होता व त्यामुळेच त्यांनी महार रेजिमेंट बंद केली होती. व ती पहिल्या महायुद्धात नाइलाजास्तव त्यांनी सुरू केली कारण त्यांना सैन्याची गरज होती. पण आजकाल राजकिय पक्ष ऊगाज दलितांना सवर्णाविरूद्ध भडकवक्ण्यासाठी या घटनेचा वापर करत आहेत. यांवर आनंद तेलतुंबडे या दलित विद्वानाने (जे बाबासाहेबांचे नातजावई आहेत ) अत्यंत सुंदर लेख लिहीला आहे, तो लोकांनी जरूर वाचावा. तसेच अक्षरनामाने या लेखकाचे मराठीत भाषांतर करावे. त्यामुळे लोकांची माथी थंड होतील व महाराष्ट्रात शांती निर्माण होण्यास मदत होईल. https://thewir.in/209824/myth-bhima-koregaon-reinforces-identities-seeks-transcend/


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......