२०१७ : काही उत्तम, काही तद्दन व्यावसायिक आणि काही गुणात्मक दर्जा असलेले…
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार 
  • २०१७मधील काही निवडक हिंदी चित्रपट
  • Tue , 02 January 2018
  • संकीर्ण वर्षाखेर विशेष हिंदी सिनेमा Hindi Movie

खरं तर 'हे वर्ष बॉलिवुडला नवसंजीवनी देणारं वर्ष ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही', अशा अर्थाची वाक्यं आता बरीच क्लिशे झाली आहेत. पण गतवर्षात बॉलिवुडनं खरोखर उत्तम सिनेमे आपल्यासमोर आणले, हेही तितकंच खरं आहे. कारण बॉलिवुडमधील तद्दन व्यावसायिक चित्रपटांनी जरी या वर्षी नेहमीप्रमाणेच भरपूर गल्ला जमवला असला, तरी या वर्षी आलेल्या चित्रपटांमधून एकूणच गुणात्मक दर्जा झालेली वाढ दिसून आली. या वर्षीच्या काही उत्तम आणि महत्त्वाच्या चित्रपटांचा घेतलेला हा आढावा.

हरामखोर

या वर्षाची सुरुवातच या चित्रपटानं झाली. श्लोक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट एका शिक्षक आणि विद्यार्थिनीतील एक असामान्य प्रेमकथा, आणि त्यात आणखी एका किशोरवयीन मुलाचा सहभाग वाढल्यानं झालेला प्रेमाचा त्रिकोण समोर घेऊन येतो. अर्थात यात नैतिक-अनैतिक, चूक-बरोबर या गोष्टींना महत्त्व राहत नाही. तर समोर घडणारी गोष्ट आपल्यासमोर कशी आणली जाते, याला जास्त महत्त्व उरतं. आणि आपली हीच गोष्ट ‘रॉ’ हाताळणीनं आपल्यासमोर आणण्यात हरामखोर यशस्वी होतो. 

जॉली एल. एल. बी. २ : 

तसं पाहिलं जगदीश्वर मिश्रा ऊर्फ जॉलीनं हातात घेतलेली एक फेक एन्काउंटरची केस आणि त्यानं ती लढणं, अशा साध्या वन लायनरमधून ही गोष्ट संपवता येऊ शकते. पण जॉलीचा रीच याहून अधिक आहे. ज्यात पोलिस यंत्रणा, न्यायव्यवस्था यांच्यातील उणीवा आणि भ्रष्टाचार अधोरेखित करत, ब्लॅक कॉमेडीचा जबरदस्त वापर करत पहिल्या चित्रपटाइतकीच उत्तम गोष्ट, योग्य आणि संयत हाताळणीच्या जोरावर समोर आणली जाते. 

मुक्ती भवन

मुक्ती भवन बाप मुलातील आणि एकूणच कुटुंबातील नातेसंबंध, मृत्यूच्या चाहुलीनंतरची प्रतीक्षा, कुटुंबातील प्रत्येकाची एकमेकांना झालेली सवय वगैरे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील लहान-मोठ्या गोष्टी, वाराणसी, जन्म-मृत्यू अशा अनेक गोष्टींवर भाष्य करतो. यासोबतीला असलेलं तरल संगीत यातील नाट्य आपल्यापर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवतं. आदिल हुसैन, ललित बहल, गीतांजली कुलकर्णी यांच्या भूमिका, सुभाशिष भुतियानी यांची एकसंध आणि प्रभावी पटकथा आणि दिग्दर्शन यांनी हा चित्रपट अजून प्रभावीपणे समोर मांडला जातो. आणि या वर्षातील काही सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरतो. 

हिंदी मिडीयम

अलीकडील काळात शैक्षणिक व्यवस्थेत झालेले बदल आणि या क्षेत्राच्या खाजगीकरणातून कळत नकळतपणे तयार झालेली एक उतरंड आणि तिचे परिणाम, याचं एक प्रगल्भ रूप या चित्रपटातून समोर येतं. अर्थात याला विनोदाची झालर असली तरी त्यात उपरोध अधिक असल्यानं त्याचा योग्य तो परिणाम होतोच. आणि सध्याच्या तथाकथित 'स्टँडर्ड' शिक्षणव्यवस्थेवर ओढलेले ताशेरे, इरफान खान आणि दीपक डोब्रियाल यांच्यातील जुगलबंदी यांच्यामुळे चित्रपट खास होतो. 

लिपस्टिक अंडर माय बुरखा  

आपल्या संसाराच्या, कुटुंबाच्या रहाटगाडग्यात अडकून पडलेल्या आणि सामाजिक दडपणाखाली दबलेल्या चार स्त्रियांची गोष्ट म्हणजे 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'. अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या वर्षीपासून सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला होता. अखेर या वर्षी तो प्रदर्शित झाला. या एक दीड वर्षात निर्माण झालेल्या हाइपमुळे त्यानं व्यावसायिक यश तर मिळवलंच. पण त्याच्याकडून एक चित्रपट म्हणून असलेल्या अपेक्षादेखील त्यानं पूर्ण केल्या. आणि या वर्षातील लो बजेट चित्रपटांच्या यादीत बराच वरचढ ठरण्यातही यश मिळवलं. 

न्यूटन

‘न्यूटन’ प्रदर्शित झाला. मात्र त्याच्या ऑस्करवारीमुळे त्याच्यावर चर्चा होण्याऐवजी तो ऑस्करला पाठवण्यालायक आहे, का यावरच चर्चा सुरू झाली. पण या चर्चा वगळताही तो चित्रपट म्हणून उजवा आहे. हा चित्रपट नूतनकुमार हा सरकारी अधिकारी, त्याला आदिवासी भागात मिळालेली इलेक्शन ड्युटी आणि ‘ते’ इलेक्शन यांच्याभोवती फिरतो. पण या साधीसरळ कथेत राजकुमार राव व पंकज त्रिपाठी यांचा अभिनय आणि अमित मसुरकर याचं दिग्दर्शन याही पलीकडे बऱ्याच बिटवीन द लाइन्स आहेत. त्यासाठी हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे. 

सिक्रेट सुपरस्टार  

आमिर खानचं प्रॉडक्शन, झायरा वसिम आणि मेहेर विजची उत्तम केमिस्ट्री, अद्वैत चंदनची कथानकावर घट्ट पकड असलेली पटकथा यामुळे हा चित्रपट तद्दन व्यावसायिक चित्रपटांच्या भाऊगर्दीतही उठून दिसतो. आपली स्वप्नं आणि सामजिक आणि वडिलांचं दडपण यांच्यात संघर्ष करत असलेली पौगंडावस्थेतील मुलगी आणि तिला साथ देणारी आई, यांची ही गोष्ट डोळ्यात पाणी आणल्यावाचून राहत नाही. याचं शेवटचं दृश्य तर यावर्षीच्या काही उत्कृष्ट सिनेमॅटिक क्षणात समाविष्ट करावं, इतकं खास आहे. 

करिब करिब सिंगल

एक लग्नाचं वय उलटून गेलेली मुलगी, जया आणि ऑनलाइन डेटिंग साइट्सद्वारे तिच्या आयुष्यात आलेला एक व्यक्ती, योगी यांची गोष्ट म्हणजे 'करिब करिब सिंगल'. यात हलकाफुलका विनोद आणि पार्वती व इरफान खानमधील केमिस्ट्री, सोबतीला एक भन्नाट रोड ट्रिप यांच्यामुळे चित्रपट मनोरंजक ठरतो. शिवाय इरफानच्या चाहत्यांसाठी ‘हिंदी मिडीयम’नंतर हा चित्रपट म्हणजे एक मेजवानी ठरली. 

तुम्हारी सुलु

सुलोचना ऊर्फ सुलुचा जरासा ऑफबीट, नाईट शिफ्टचा जॉब, तेही रेडिओ जॉकी म्हणून, मग त्यात कुटुंबाची आणि तिची होणारी ओढाताण, वर्किंग मॉमच्या समस्या या सर्वांचा एकत्रित आणि इम्पॅक्टफुल परिणाम म्हणजे सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित तुम्हारा सुलु. विद्या बालनचा सुखद वावर, मानव कौल आणि नेहा धुपिया यांनी सहाय्यक भूमिकेत दिलेली उत्तम साथ आणि जराशी सदोष पण खिळवून ठेवणारी पटकथा यांच्या जोरावर हा चित्रपट मनावर एक वेगळा ठसा उमटवून गेला, हे मात्र नक्की. 

मान्सून शूटआउट

चारेक वर्षांनंतर सेन्सॉरच्या तावडीतून सुटलेल्या या चित्रपटानं या वर्षी त्याच्याकडे लक्ष वेधून घेतलं. एका निर्णायक क्षणातील तणाव, काही सेकंदात निर्णय घेण्याची गरज आणि क्षमता, एकाच गोष्टीचे तीन पैलू आणि शक्यता अशा खिळवून ठेवणाऱ्या कथानकामुळे आणि उत्तमरीत्या हाताळलेल्या तांत्रिक बाबींमुळे मान्सून शूटआउट प्रभावी वाटतो. एव्हढं असूनही मोजकेच आणि बहुतांशी कॅन्सल झालेल्या शोंमुळे याच्याही पदरात व्यावसायिक यश पडलं नसलं तरी बॉलिवुडला एक चांगला दिग्दर्शक लाभला, हेही नसे थोडकं. 

थोडक्यात, गतवर्षी लक्षवेधी आणि महत्त्वाच्या ठरलेल्या बहुतांशी चित्रपटांद्वारे नवीन आणि प्रयोगशील दिग्दर्शकांची एक फळी तयार झाली आहे. आणि या वर्षाचा शेवट होत असताना त्यांच्या याच कामाचा आढावा घेत, त्यांचं कौतुक करण्याचं किमान काम तरी आपण नक्कीच करू शकतो. 

(चित्रपटांचा क्रम आवडीनुसार किंवा कोणता जास्त उत्तम आहे यानुसार न करता संबंधित चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याच्या तारखांवरून करण्यात आली आहे.)

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......