‘द वुमन इन द विंडो’ : ‘फिल्म न्वार’चा जन्मदाता
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘द वुमन इन द विंडो’ची पोस्टर्स
  • Sat , 23 December 2017
  • इंग्रजी सिनेमा English Movie न-क्लासिक चिंतामणी भिडे Chintamani Bhide द वुमन इन द विंडो The Woman in the Window फ्रिट्झ लँग Fritz Lang

दिग्दर्शक फ्रिट्झ लँगचा ‘एम’ हा सार्वकालिक महान जर्मन चित्रपट १९३१ साली जर्मनीत प्रदर्शित झाला, त्यावेळी तशा प्रकारच्या सिनेमासाठी ‘फिल्म न्वार’ ही स्वतंत्र ओळख किंवा ज्यॉनरचा जन्म अद्याप झाला नव्हता. संदिग्धता, स्खलनशील व्यक्तिरेखा, त्यांचं नैतिक अध:पतन आणि भल्याबुऱ्याच्या सीमारेषेवर घुटमळणारे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांना काही अंशी संभ्रमात टाकणारे, त्यांच्या मनात प्रश्नांचं मोहळ निर्माण करणारे असे हे चित्रपट. ‘एम’ हा त्यांचा उद्गाता. पण ‘फिल्म न्वार’ ज्यॉनरला ‘एम’ने जन्म दिला असला तरी या शब्द प्रयोगाचा जन्मदाता ‘एम’ नव्हता. ‘एम’नंतर सुमारे १३ वर्षांनी अमेरिकेत प्रदर्शित झालेला लँगचाच एक चित्रपट ‘फिल्म न्वार’ या शब्दप्रयोगाला जन्म देण्यास बऱ्याच अंशी कारणीभूत ठरला.

‘द वुमन इन द विंडो’ हे त्याचं नाव!

वर उल्लेख केलेल्या विशिष्ट पद्धतीच्या चित्रपटांच्या जातकुळीला ‘फिल्म न्वार’ हे नाव देण्याचं काम केलं एका फ्रेंच नियतकालिकाने. ‘द माल्टीज फाल्कन’, ‘डबल इंडेम्निटी’, ‘लॉरा’, ‘मर्डर, माय स्वीट’ आणि ‘द वुमन इन द विंडो’ हे ४०च्या दशकाच्या पूर्वार्धात बनलेले सिनेमे १९४६ साली फ्रान्समध्ये प्रदर्शित झाले होते. या सिनेमांचं एकत्रित वर्णन निनो फ्रँक या फ्रेंच समीक्षकाने ‘फिल्म न्वार’ असं केलं. वर वर बघता हे सर्वच क्राइम थ्रिलर, सस्पेन्स या प्रकारातले. पण निव्वळ क्राइम थ्रिलरमध्ये असतं त्याप्रमाणे केवळ प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवत, त्यांना खुर्चीच्या टोकावर आणून बसवणारे चीप थ्रिल्स देणं, इतकाच मर्यादित हेतू या चित्रपटांचा नव्हता. त्यांचा अवकाश त्यापेक्षा खूप व्यापक होता. माणसाची स्खलनशीलता दाखवून निर्णायक क्षणी होणारं त्याचं अध:पतन, नियतीचा खेळ, मानवी स्वभावातली गुंतागुंत आणि मनाच्या तळातील अंधारा कोपरा शोधून काढण्याची धडपड या चित्रपटांमध्ये होती. त्यामुळेच ‘डबल इंडेम्निटी’सारखे सिनेमे केवळ थरारपट न राहता ऑल टाइम क्लासिक्सच्या यादीत गणले जातात.

‘द वुमन इन द विंडो’च्या वाट्याला मात्र हे भाग्य आलं नाही. खरं म्हणजे लँगच्या यशस्वी सिनेमांपैकी तो एक. पण लँगने अमेरिकेत सिनेमे बनवायच्या आधी जर्मनीत बनवलेले सिनेमे आशय आणि हाताळणीच्या पातळीवर अधिक उजवे होते, असा मतप्रवाह त्या काळच्या समीक्षकांमध्ये होता. त्यामुळेच ‘बियाँड द रिझनेबल डाउट’, ‘द वुमन इन द विंडो’, ‘स्कार्लेट स्ट्रीट’, ‘द बिग हीट’ यांसारख्या सिनेमांमधून काही अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करूनही समीक्षकांनी या सिनेमांना लँगच्या अन्य सिनेमांच्या तुलनेत काहीसं दुय्यम स्थान दिलं.

पण ‘फिल्म न्वार’च्या प्रवाहात मात्र ‘द वुमन इन द विंडो’ला मानाचं स्थान आहे.

प्रोफेसर रिचर्ड वॅनली हे मध्यमवयीन, लब्धप्रतिष्ठित गृहस्थ. सुटीसाठी बाहेरगावी निघालेली बायको आणि दोन मुलांना गुड बाय करून नेहमीप्रमाणे क्लबमध्ये येतात. क्लबच्या ग्लास विंडोमध्ये लावलेलं एका स्त्रीचं पोर्ट्रेट त्यांचं लक्ष वेधून घेतं. तेवढ्यात त्याचे दोन स्नेही डिस्ट्रिक्ट अॅटर्नी फ्रँक लॅलॉर आणि डॉक्टर मायकल बार्कस्टेन तिथं येतात. क्लबमध्ये निवांत वेळ घालवल्यानंतर परत जात असताना प्रोफेसर वॅनलींचे पाय पुन्हा त्या पोर्ट्रेटसमोर थबकतात. त्याच वेळी ते पोर्ट्रेट जिच्यावरून बनवलंय ती अॅलिस रीड ही तरुणी तिथं येते. वॅनलींचा विश्वास बसत नाही. दोघांमध्ये संभाषण वाढत जातं. ती त्यांना तिची आणखी काही चित्रं बघण्यासाठी घरी बोलावते. ते तिच्यासोबत तिच्या घरी जातात. थोड्याच वेळात तिथं अॅलिसचा धनिक प्रेमी क्लॉड मॅझार्ड येतो. त्याचा गैरसमज होऊन तो वॅनलीच्या अंगावर झेपावतो. दोघांच्या झटापटीत वॅनलीच्या हातून मॅझार्डचा खून होतो. मुळातल्या पापभिरू वृत्तीमुळे आधी तो पोलिसांना बोलावण्याचा विचार करतो; पण ज्या क्षणी त्याच्या लक्षात येतं की, मॅझार्ड आणि रीड यांचा काही संबंध आहे, हे कोणालाच माहिती असण्याची शक्यता नाही, त्या क्षणी तो आणि रीड हा खून दडपण्याचा निर्णय घेतात आणि वॅनली तो मृतदेह घेऊन लांब जंगलात नेऊन टाकतो.

आता कुठलाही धोका नाही, असं वाटत असतानाच काही अनपेक्षित अडचणी उभ्या राहातात आणि वॅनलीला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात. बायको आणि दोन मुलांसमवेत साधं सरळ आयुष्य जगणारा एक मध्यमवयीन, सुखवस्तू, पापभिरू प्रोफेसर गुन्हेगारी आणि कटकारस्थानांच्या खोल दलदलीत रुतत जात असतानाच पुन्हा एकदा आयुष्य एक अनपेक्षित वळण घेतं.

जिच्याविषयी आसुसून आकर्षण वाटावी, अशी काहीशा गूढ व्यक्तिमत्त्वाची स्त्री एका पुरुषाचा आपलं इप्सित साध्य करण्यासाठी वापर करून घेते, ही कुठल्याही फिल्म न्वारची वन लाइन. त्यात कधी कधी, ती गूढ व्यक्तिमत्त्वाची स्त्री खरोखरच अडचणीत असते आणि हिरो तिच्या आकर्षणापायी काहीही देणंघेणं नसताना तिला मदत करायला जाऊन स्वत:च अडचणीत येतो, एवढाच काय तो बदल होतो. या वन लायनर पलिकडे न्वार सहसा जात नाही. बहुतांशी फिल्म न्वार पहिल्या प्रकारात मोडतात; ‘वुमन इन द विंडो’ दुसऱ्या प्रकारात मोडतो.

जर्मन एक्स्प्रेशनिझम आणि लोकप्रिय व्यावसायिक पैलू यांची बेमालूम सांगड घालण्याचं लँगचं कसब याही चित्रपटात दिसून येतं. एरवी माशीही न मारणारी व्यक्ती परिस्थितीच्या रेट्याखाली खुनासारखा टोकाचा गुन्हा करू शकते, इतकंच नव्हे आपला गुन्हा दडपण्यासाठी कटकारस्थानं रचू शकते, ही ‘वुमन इन द विंडो’ची मध्यवर्ती कल्पना घाबरवून सोडणारी आहे. पापभिरू माणूसही वेळप्रसंगी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, याचं दर्शन अस्वस्थ करणारं आहे.

यात लँगने आणखी एक गंमत केली आहे. खरं म्हणजे त्याविषयी विस्तारानं सांगता येणार नाही, कारण त्यामुळे रहस्यभेद होऊन पहिल्यांदा चित्रपट पाहण्यातली गंमत निघून जाईल. पण फिल्म न्वार म्हणजे त्यातल्या मुख्य पात्रांसाठी एक प्रकारचं दु:स्वप्नच असतं. काहीही ध्यानीमनी नसताना अचानक धोका, कपट, कटकारस्थानं आणि गुन्हेगारीच्या दलदलीत प्रमुख व्यक्तिरेखा फसत जाते आणि कधी एकदा हे दु:स्वप्न संपून जाईल, असं तिला होतं. नेमका याचाच वापर करत लँगने कथानकाला शेवटी अफलातून कलाटणी दिली आहे.

या शेवटाबद्दल दोन मतप्रवाहदेखील आहेत. अनेकांना हा शेवट रुचलेला नाही. काहींना ती लँगची मजबुरी वाटलेली आहे. पण मजबुरीतून लँगने असा शेवट केला, हे एकवेळ खरं मानलं तरी ते करताना त्याने न्वारची कास सोडलेली नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लँगचे सिनेमे डार्क असतात आणि बऱ्याचदा निष्कर्ष काढण्याचं काम तो प्रेक्षकांवरच सोपवतो. ‘एम’मधला पीटर लॉरेचा हॅन्स बेकर्ट हा अतिशय विकृत असा लहान मुलांचा खुनी आहे, हे माहीत असूनही लँग शेवटी त्याला असा काही तत्त्वज्ञानात्मक आधार देतो की, त्याच्या कृत्याचा निवाडा करणारे तरी कुठे भले आहेत, या प्रश्नात प्रेक्षकाला आपलंच प्रतिरूप दिसून प्रेक्षक सैरभैर होतो. झाडाला बांधलेली पापी स्त्री तिला दगड मारणाऱ्यांसाठी सरसावलेल्या लोकांना सांगते की, मला दगड जरूर मारा, पण त्याची सुरुवात अशा पुण्यवान माणसानं करावी, ज्यानं आजवर कुठलाच गुन्हा केलेला नाही, या गोष्टीची आठवण त्या वेळी येते. ‘बियाँड अ रिझनेबल डाऊट’मध्ये देखील एका बेसावध क्षणी आपल्या कृत्याची कबुली देणारा टॉम गॅरेट खरोखरंच त्याने जे केलं, त्याविषयी दोषी आहे का, याचा संदेह प्रेक्षकाच्या मनात उरतोच.

‘द वुमन इन द विंडो’च्या बाबतीतही नेमकं हेच होतं. चित्रपटाच्या सुरुवातीला क्लबमध्ये वॅनलीचं आपल्या मित्रांबरोबर प्रलोभनाला बळी पडण्यामागील धोक्यांबाबतीत होणारं संभाषण आणि पुढे आपल्या सुप्त वासनांना मूर्त रूप देण्याच्या प्रबळ इच्छेतून घडणारा घटनाक्रम यामुळे वॅनली हा सुरुवातीला अकस्मात आणि नंतर समजून उमजून गुन्हा करताना उघड उघड दिसूनही प्रेक्षकांच्या मनात मात्र त्याची खरोखरच चूक काय, याविषयीचा संदेह कायम राहतो.

वॅनलीची भूमिका करणारा एडवर्ड रॉबिनसन हा फिल्म न्वारमधला नेहमीचा चेहरा. ‘डबल इंडेम्निटी’, ‘की लार्गो’, ‘स्कार्लेट स्ट्रीट’, ‘हाऊस ऑफ स्ट्रेंजर्स’, ‘नाइट हॅज अ थाउजंड आईज’, ‘द स्ट्रेंजर’ अशा असंख्य गाजलेल्या न्वारमध्ये त्यानं ठसा उमटवला होता. दिसायला तो थेट आपल्या मध्यमवयीन अशोक कुमारसारखा. उंची साधारण, पण व्यक्तिमत्त्व अतिशय रुबाबदार आणि प्रसन्न. ‘हावडा ब्रिज’, ‘गुमराह’, ‘ज्यूल थीफ’मधला अशोक कुमार आठवा. वॅनलीच्या भूमिकेतला रॉबिनसन थेट त्याच जातकुळीतला आहे आणि त्यामुळेच त्याचं प्रेक्षकाशी नातं जुळतं. प्रेक्षक त्याच्या अडचणींशी समरस होतो.

‘पेस्ट’ या ऑनलाइन नियतकालिकानं ऑगस्ट २०१५ मध्ये ‘फिल्म न्वार’ या शब्दप्रयोगाला ७० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त १०० सर्वोत्कृष्ट न्वार चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, त्यात ‘डबल इंडेम्निटी’, ‘आउट ऑफ द पास्ट’, ‘चायना टाऊन’, ‘सनसेट बुलेवार्ड’सारखे ऑल टाइम क्लासिक्स न्वार असताना ‘द वुमन इन द विंडो’ पहिल्या क्रमांकावर होता. कदाचित त्याविषयी मतभेद होऊ शकतील. पण ‘फिल्म न्वार’ ही सिनेमाची स्वतंत्र शैली म्हणून ओळख निर्माण करण्याचं या सिनेमाचं श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

.............................................................................................................................................

लेखक चिंतामणी भिडे मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......