दिवसा पाहिलेलं स्वप्न मला पूर्ण करायचंच होतं
ग्रंथनामा - आगामी
इंदुमती जोंधळे
  • ‘पापणीआड पाणी’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 15 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama आगामी पापणीआड पाणी Papaniad Pani इंदुमती जोंधळे Indumati Jondhale सूर्यमुद्रा प्रकाशन Suryamudra Prakashan

‘बिनपटाची चौकट’ या गाजलेल्या आत्मचरित्राच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांची ‘पापणीआड पाणी’ ही नवी कादंबरी लवकरच नांदेडच्या सूर्यमुद्रा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीतील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

उद्यापासून कॉलेज सुरू होणार म्हणून रात्रभर नीट झोप नाही. पहाटे लवकर उठून सकाळची सगळी कामं आटोपून, काळीपिळी टमटमने निघाले. टमटम रोज दारावरून जायच्या. पहिल्यांदाच त्यात बसले. अठरा-वीस वर्षांचा पोऱ्या. ही रिक्षा म्हणजे मोठी सात-आठ माणसे बसतील एवढी, पण कोंबलेली बारा-चौदा अशी. काळीपिली. तिचा रंगच अर्धा काळा, मधी पिवळा म्हणून काळीपिली. आवाज तिचा खर्रऽऽ फटफटाक आणि चालवणारा जणू कोणत्या स्पर्धेत उतरलाय. रस्त्यातील दगडं नाही, खड्डे नाही, उंचवटे नाही. नुसता पळवत होता आणि आतली माणसं आतल्या आत उडत होती. एकमेकांच्या अंगावर पडत होती. प्रत्येक चारेक मिनिटाला ती रिक्षा थांबवून माणसं भरत होता. चार-पाच माणसांची आता दहा-बारा माणसं झाली. त्यात स्त्री, पुरुष, मुले, वृद्ध आणि सगळे कष्टकरी मजूर वर्गातले. कोणी तंबाखू, कोणी गुटखा, पान… काय काय खाणारे. एक प्रकारचा उग्र आणि जीवघेणा वास त्या गर्दीत भरून गेलेला... आता मागच्या सीटवर दोन सीटच्या मध्ये कोणी एकाच पायावर तर कोणी एकाच अंगावर दाटीवाटीत बसलेले… मला वाटलं थांबवेल हा आता माणसं घेणं… पण छे… अजून दोन माणसं… त्याच्या बाजूला, पुन्हा एक माणूस… बापरे हा कसा गाडी चालवणार? गेअर कसा पाडणार? मागे खचाखच माणसं… पुन्हा लटकणारी दोन तीन… आत हवा यायलाही जागा नाही. गुदमरायला व्हायला लागलं. आधीच अंग आखडून पायावर पाय घेऊन कशी तरी बसले होते. नुसती अवघडून गेले… कधी असा प्रवास बाप जन्मात पाहिला नव्हता आणि आता मी प्रत्यक्षात तो करत होते. रोज असे? कसे व्हावे माझे? नीट शेवटपर्यंत (प्रवासाचे ठिकाणी) आम्ही सगळे खरेच पोहचू का? काय काय आणि कसे कसे मला सहन करावे लागणार काय माहीत? साठ-पासष्ठ किमीचा प्रवास पाऊण तासात मुख्य स्टँडवर येऊन थांबला. माझ्या गावात, माझ्या आवडत्या शहरात, घरातून सकाळी आठ सव्वाआठला निघाले होते. कॉलेज दहाला. आता येथून पुन्हा शेअर रिक्षा. दहा दहा रुपयात. कॉलेजच्या गेटजवळ उतरले. सुंदर, भव्य कॉलेज. 

बी.ए. झाल्यावर पुन्हा कॉलेजची पायरी चढलीच नाही. M.A. Eng. External केले. कधी तरी विद्यापीठात English Department ला जाऊन बाबांचे मित्र तिथे मुख्य होते, त्यांच्याकडून पाहिजे ती पुस्तके मिळायची. ती वाचायची, नोटस् काढायची, सरांना (काकांना-बाबांचे मित्र) दाखवायची. घरी राहूनच असा M.A. चा अभ्यास करून A + A मिळवले आणि आता… प्रत्यक्षात कॉलेज… वर्ग अटेंड करणार होते. B.Ed. विभागात गेले. वर्ग चालू व्हायला वेळ होता. वर्गात सगळ्यांचा गोंगाट. आवाज... मला पाहाताच मैत्रीण पळत पळत आली आणि माझ्या गळ्यात पडली. माझा हात धरून वर्गात सर्वांना ओरडून सांगितलं… ही माझी जिवाभावाची मैत्रीण बरे! बोर्डवर जिचं यादीमध्ये पहिलंच नाव आहे ना ती हीच. सर्वांना मी हायऽऽ केलं. आम्ही दोघीही एकाच बेंचवर बसलो. ती काय काय बोलत होती… मीच अखेर म्हणाले, आता हे सारे आपण नंतर बोलू आता आतापर्यंत कोणत्या विषयाचा किती अभ्यास झाला… मला विषय सांग… अभ्यासक्रम सांग. तुम्ही सगळ्यांनी काय काय विकत घेतले? वह्या, पुस्तके, रजिस्टर्स आणि मुख्य म्हणजे ग्रंथालय… तेथून आपणाला काय आणि किती पुस्तके मिळणार? शिकवायला कोणकोण आहे? मला टेन्शन आलं होतं… माझा अभ्यास कसा होणार? घरकामं… प्रवास… प्रवासातला वेळ... कसं जमून येईल? अभ्यासासाठी माझ्याकडे वेळंच नाही… मग मी कशी बी.एड. पास होईल? English Method शिकवणऱ्या मॅडम वर्गात आल्या. कशा पद्धतीने आणि दिलेला अभ्यास कसा शिकवायचा याचे प्रात्यक्षिकच करून दाखवले. त्यानंतर अजून एका सरांचा Psychology चा तास झाला. त्यांचं शिकवणं बघून मला उगीचच मनात वाटलं... आपण करू शकू हे! नक्की… घरी तर वेळ शंभर टक्के मिळणार नाही. प्रवासात जाण्या-येण्यात खूप वेळ जाणार. मग अभ्यास... अभ्यास कधी… कसा करणार?

मनाशी पक्का निर्धार केला… जग उलथं पालथं होऊ दे... मला आहे या परिस्थितीतच अभ्यास करायचाय. आलेली संधी अशी तशी नाही घालवायची. त्या संधीचं नाही सोनं करता आलं तर निदान आपल्या परीने चांगला मौल्यवान एखादा धातू तरी बनवू. आणि मग मी वर्गात सर्व शिक्षक शिकवत असताना मनाचे आणि जिवाचे कान करून ऐकून घेत असे. ते सांगत असताना महत्त्वाचे points, notes घ्यायची. घरी जाता येता बसमध्ये ते शिकवलेले सारे recalling करायची. कॉलेजमधून जाताना तांबड्या बसनेच शक्यतो घरी जायची. फार कमी वेळा काळीपिळीने जाऊ लागले. पहिल्याच दिवशी घेतलेला धसका विसरू म्हटले तरी विसरता येत नव्हता. पण काही वेळा नाईलाजास्तव टमटमने जावेच लागायचे. त्यात मग कितीही गोंधळ गडबड चालो मी आपली डोळे मिटून आदले दिवशी वर्गात झालेले lecture आठवायची. शिकवणारेही खूप चांगले शिक्षक होते. वर्गातून एक शिक्षक गेल्यावर दुसरे शिक्षक (प्राध्यापक) येईपर्यंत पहिल्या शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करायची. आई-बाबांनी लग्नात मला दिलेले (हनिमूनसाठी) पैसे मी गुपचूप माझ्याच जवळ ठेवले होते. त्यातील काही खर्च करून वह्या, रजिस्टर गुंडाळ फळा, खडू, काही अत्यावश्यक पुस्तके विकत घेतली. जणू मी आता पुनः शालेय विद्यार्थिनी झाले होते. एवढे दप्तर (सॅक) माझ्या पाठीवर असायचे. बस, रिक्षा, टमटमसाठी फक्त नवऱ्याकडून मागून घ्यायची. B.Ed. College च्या विद्यार्थ्यांना गणवेष होता, तो शिवून घेतला. एकच. दोन दोन ड्रेसवर कुठे पैसे घालू? कॉलेजातून घरी पोहचायला संध्याकाळचे सहा-सात तर कधी आठही वाजत. तेव्हा मला घरच्या लोकांची भीतीही वाटायची. काय बोलतील, कसे React होतील? कायम टांगती तलवार. घरी गेले की सारे घर गप्प?

बाहेरून आले की अगोदर गणवेष बदलायचा. हात-पाय धुवायचे. साडेसहा सातच्या आत घरी आले असेल तर अगोदर विचारायचे, “मम्मीजी, चहा ठेवू?”

मग त्या घुश्श्यात म्हणणार… “ठेवा.”

सर्वांचा चहा. बिस्किटे वा खारी, टोस्ट द्यायचे. सगळा ओटा गच्च भरलेला असायचा, सिंक भांड्यांनी खचाखच भरलेले. खरकट्या भांड्यांचा वास… सर्वांना चहा दिला की, मी ओढणी खोचून बांधायची. भराभर भांडी घासून, पालथी घालून, ओटा शेगडी स्वच्छ, चकाचक करून... त्या सर्वांच्या समोरच्या कपबश्या उचलून त्याही घासून, धुवून ठेवायची. मम्मीजी रात्रीचा स्वयंपाक काय करायचा? भाजी करू? भाकरी की पोळ्या?

“तुला कळत नाय का आतापास्नच सैपाक केलास तर त्याच्या गारगोट्या व्हतील! अन् काय गं इतके दिस शाळेत हिथं यिवून भाकरी किती करायच्या? चपात्या किती टाकायच्या कळत न्हाय अजून?”

छोट्या नणंदबाई बारावी सायन्सला होत्या. त्यांना अभ्यासात काही शंका असेल तर माझ्याजवळ येऊन म्हणायच्या, “वहिनी, एवढं समजून देतेस का गं?”

मग मी तिचा अभ्यास घ्यायची. विज्ञान, गणित विशेषतः फिजिक्स, केमिस्ट्री मला शिकवायला खूप आवडायचे. मी जे बारावीला शिकले होते, तोच पण आणखी विस्तृत आणि क्लीष्ट केलेले विषय समजून देताना मला ते खूप छान आणि सोप्पे वाटायचे. पण मी बारावीत असताना बाप रे बाप... किती अवघड होते… आणि आता तेच विषय… चुटकी सरशी तिला समजावून सांगायची. फक्त पाच-दहा मिनिटं अगोदर मला तो Chapter वाचून समजून घ्यावा लागायचा… आम्ही दोघी आमच्या बेडरूममध्ये एक तासभर बसून अभ्यास करत असू. पप्पा येता-जाता बघत, ऐकत. छोटी म्हणायची,

“वहिनी किती छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगतेस गं? अगं ट्यूशन्समधले सर काय बोलतात ते कोणालाच कळत नाही बघ. जाऊ दे, ती ट्यूशन्स देते मी सोडून. तूच शिकवत जा मला रोज.”

“होय वो, काही हरकत नाही... पण मला कधी कधी वेळेवर बस मिळत नाही... मग घरी यायला वेळ होतो. मग सगळी कामं राहतात ना! रात्रीचा स्वयंपाक, भांडी, शिवाय कपडे धुवायचे... ते केव्हा करू?”

“ते मला नाही माहीत... तूच मला शिकवायचं आजपासून. मी सांगते मम्मी-पप्पांना की धुणी भांड्याला बाई लावा म्हणून!”

ती इतकी सरळ, साधी मुलगी होती की तिनेच मला सांगून टाकलं,

“अगं वहिनी, तू आलीस आणि मम्मीनं धुणी भांडीवाली बाई काढून टाकली बघ! मी सांगते आता तिला... त्या कामवालीला बोलव म्हणून!”

“ते जाऊ द्या. मला जसा वेळ मिळेल ना तशी मी तुमचा एकेक विषय घेत जाईन. ट्यशून्स नका बंद करू. तिथं शिकवलेलं मी पुन्हा शिकवत जाईन, जर तुम्हाला तिथं समजलं नसेल ना तर! चालेल ना?”

म्हणजे मी कॉलेजातून आले की हे आणखी एक जादाकाम माझ्या मागे लागले होते. पण त्या भांडी-धुण्यापेक्षा हे कितीतरी छान आणि माझ्या आवडीचे होते. त्या अर्ध्या-एका तासाच्या अभ्यासाने तिही खूश आणि मीही.

पण सासूबाईंनी नाहीच लावली बाई कामाला. दोनेक बादल्या धुणं... नवऱ्याच्या ताडपत्रीसारख्या जिन्स पँटस्... मोठमोठ्या बेडशीटस्... धुता धुता हात गळून जायचे. मग छोटी धुतलेलं धुणं मागच्या दोऱ्यांवर वाळत टाकायची. पार इथून तिथून मागचा परसदार धोबी घाटाने लांबवर रात्रभर सुकत असायचा. तिची तेवढीही मदत मला आनंद देऊन जायची. तिचं माझ्याभोवती फिरणं एक जवळकीचं नातं माझ्या भेदरलेल्या मनाला आश्वस्त करायचं. चला तेवढीच एक सुखाची तिरीप अंधारमय भविष्याचा मार्ग दाखवत होती. तिची स्वयंपाक घरातली छोटी छोटी कामंही मला फार मोठा हातभार लावायची. लसूण सोलून देणं, कोथिंबीर निवडणं, भांडी जागेवर लावणं आणि मग हे करता करता, कधी पोळ्या लाटता लाटता सायन्समधले फॉर्म्युले, काही महत्त्वाची गणितातली सूत्रे तिच्याकडून पाठ करून घ्यायची. जणू तिची आता अभ्यासात अधिकाधिक रूची वाढत होती... जणू मी तिची teacherच झाले होते. दुसरे दिवशीचा home work ही द्यायची आणि ती मोठ्या आनंदाने complete करून माझ्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायची. या अभ्यासाच्या निमित्तानं आम्हा दोघींचं छान ट्यूनिंग जमलं होतं. कॉलेज आणि ट्यूशन्सच्या शिक्षकांपेक्षा घरातल्या या हक्काच्या शिक्षकावर (वहिनीवर) तिचा गाढ विश्वास बसत चालला होता. ती तिचा अभ्यास पूर्ण करू लागली की, मग मीही माझी वह्या-पुस्तके हळूच बाहेर काढायची. राहिलेलं home work करायला घेतलं की, ती हळूच माझ्या वहीत डोकावून बघत म्हणायची,

“ए वहिनी… किती छान लिहितेस गं! किती सुंदरय तुझं हस्ताक्षर! आकृत्यापण किती छान काढतेस. मला कधी येईल गं तुझ्यासारखं छान, स्वच्छ लिहायला?”

“सराव केला ना की सगळं येतं आणि तुम्हाला तर खूप लवकर आणि छान जमून येईल. आपली मनापासून इच्छा असेल ना करायची... मग काहीही अवघड नसतं.”

अशा तऱ्हेने तिच्या निमित्ताने थोडा का होईना माझाही अभ्यास होऊ लागला. रात्रीचा स्वयंपाक-पाणी, जेवणं आटोपली की, रात्रीच सर्व भांडीकुंडी घासून, आवरून टाके. किचनओटा चकाचक म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या स्वच्छ ओट्यावर काम करायला आपल्यालाच छान वाटे. हे सर्व आटपेपर्यंत रात्रीचे अकरा वाजून गेलेले असायचे. दिवसभराचे सर्व आटपता आटपता कधी एकदा बिछान्यावर आडवी होते असे होऊन जायचे. इकडे घरातले सगळे झोपून जायचे. मी हात-पाय धुवून कामाने खराब झालेले आणि घामाने भिजलेले कपडे बदलून रात्रीचा पांढराशुभ्र स्वच्छ गाऊन घालायची आणि बिछान्यावर आडवी पडता क्षणीच झोपी जायची... आणि मग थोड्या वेळातच आमचे रावसाहेब... ‘ऊठ, जेवायला वाढ’ इच्छा नसताना बळेबळेच उठून त्याचं ताट वाढून द्यायचं... जेवण होईपर्यंत समोरच बसायचं... डोळे गपागप मिटायचे... पण बहादूर म्हणायचा नाही... ‘जा झोप तू!’ जेवण झाल्यावर आता ते ताट, वाटी घासायचे त्राण तर सोडा, पण बिलकूल इच्छा नसायची. रावसाहेब हात धुवून, पाणी पिऊन बिछान्यावर आडवे. मग त्यांचा मूड... नवरा म्हणून हक्काच्या बायकोवर... मी इतकी थकलेली असायची की बिलकुल इच्छा नसतानाही तो त्याची इच्छा बळजबरीने पुरी करायचा. कसं असतं ना... बायकोला काही मन आहे, तिला इच्छा आहेत, तिचंही शरीर आहे, दिवसभराचं थकणं आहे, काहीही पाहायचे नाही, विचारायचं नाही, तो नवरा आहे... आणि पुरुषय... त्याची इच्छा झाली की तिनं स्वतःच्या तनामनाविरुद्ध तयारच असलं पाहिजे, कारण देवा ब्राह्मणांसमोर त्याच्या हाताला हात लावून ‘मम’ म्हटलंय आणि हजारोंच्या समोर. सर्वसंमतीनुसार… समाजाने सर्वमान्य गृहीत धरलेला हा व्यवहार हा! तिथे कुठे बाईंच्या मनाचा... शरीराचा विचार केलेला असतो? तिच्या मनाविरुद्ध केलेला हा संभोग म्हणजे बलात्कार नव्हे का? असे रोज… राजरोसपणे घरातल्या घरात होणारी जबरदस्ती म्हणजे समाजमान्य ‘विवाह’ नावाची लग्नसंस्था. मूकपणे ‘ती’ सहन करत राहते. घराची लाज राखण्यासाठी, स्वतःची आणि घराचीही अब्रू वाचवण्यासाठी... याचा अर्थ तिला नको असतं असं नाही... पण तिची माफक इच्छा असते त्यानं तिला अलवारपणे... समजून घ्यावे, तिच्या भावना, संवेदना जाणून घ्याव्या, तिही एक ‘माणूस’ आहे, तिलाही इच्छा आहेत; पण हे न जाणता स्वतःच्या इच्छेनुसार कायम तिच्यावर बळजबरी करत राहिलात तर... तिला त्याची ‘घृणा’ वाटू लागली तर, नव्हे पुढील सारी कृती यंत्रवत, निर्जीव बनून जाते. मग तिथे कुठे आले प्रेम, ओलावा, आत्मीयता, जिव्हाळा? मग रोजचं ते रुटिन बनून जातं. तना-मनाविरुद्धच.

लग्नापूर्वीचा… माझा हा प्रियकर... माझा माझ्या मनातला ‘सपनोका राजकुमार’ तो हाच का? किती विश्‍वासानं... माझ्या घरातले बंध तोडून याचेकडे आले. किती आणाभाका घेतल्या होत्या आम्ही... एकमेकांना समजून घेऊ, प्रेम केलं मी याच्यावर. अगदी मनापासून. काही पाहिलं नाही याचं. जात, धर्म तर सोडाच पण स्टेटस, शिक्षण, नोकरी काही काही नाही. आयुष्यभर नातं निभावण्याच्या शपथा घेतल्या. प्रेमात संवाद असतो म्हणे. भरभक्कम विश्‍वास असतो. आपण एकमेकांचे आहोत आणि एकमेकांसाठीच आहोत हे इतकं आपण नैसर्गिकपणे गृहीत धरलेलं असतं. तिथे कुठेही असुरक्षिततेला थारा नसतो. मग आम्ही दोघेही गेल्या चार-पाच महिन्यात एकत्र असूनही एकमेकांपासून दूर का होतो? निदान मला तरी तसे वाटत होते. त्याच्या तशा वागण्याने मी व्याकुळ होत होते आणि मग निराशा आणि दुःख, मला एवढी थकलेली असूनही रात्रभर झोपू द्यायचे नाहीत. काय करू... कशी करू? आपण फारच उतावळेपणा केला का? का हा पोरकटपणा केला? केवळ आपण त्याच्या बाह्य आकर्षणाला बळी पडलो का? आतलं मन सांगायचं… फार मोठी चूक केलीस तू? अगं आयुष्याचा निर्णय कधी असा तडकाफडकी घेतला का? तरी आई-बाबांनी शंभरदा समजावून सांगितलं, आभासी वास्तवाच्या दुनियेत मी इतकी रममाण झाले होते की, आयुष्यातल्या वास्तवाचा, या व्यावहारिक जगाचा मला पार विसरच पडला, नव्हे हे असं काही असतं याची कल्पनाच कधी केली नाही. कायम फुलपंखी, स्वच्छंदी, सुखासीन आयुष्य जगलेली मी आज दाणकन जमिनीवर आदळले होते. मी स्वतःच स्वतःला या रुढी, परंपरावादी जंजाळाच्या पसाऱ्यात अडकवून घेतले होते. लग्नापूर्वी माझ्यावर प्रेम करणारा हा आता इतका हृदयशून्य कसा काय झाला? की आपण प्रेमाची पारखच करायला चुकलो? आणि मला हेही माहीत आहे जगात सर्वगुण संपन्न, परिपूर्ण व्यक्ती कोणीही असू शकत नाही, तिच्यामध्ये काही ना काही कमी असतेच... मग आम्ही तर... किस झाड की पत्ती? करू अ‍ॅडजस्ट करू, होईल याच्यातूनही काही तरी चांगलंच होईल, हा माझा विश्वास आणि मला केव्हा झोप लागली कळलंच नाही.

पहाटे जाग आली ती नवऱ्याच्या उठवण्याने. त्याने माझ्या पोटाला चिमटा घेतला, जोरात ‘आईऽऽ आई गऽऽ’ आई, आई करायला काय झालं? पाणी आलंय. अर्धा पाऊणतासही झोप झाली होती की नाही माहीत नाही. गुपचूप न कुरकुरता उठले. एक दिवसाड पाण्याची भांडी घासावी लागायची. आज भांडी घासण्याचा दिवस. मोठा स्टीलचा पिंप, मोठा पितळेचा हंडा, कळशी, त्यातलं पाणी, बाथरूमच्या डब्यात नेऊन ओतलं. नळाला स्वच्छ पांढरा कपडा लावून घासलेल्या पिंपात हंड्या-कळशीत पाणी भरलं. पाणी भरत भरतच ब्रश केला. चहाला आधण ठेवलं, कणीक घेतली. मोठ्या परातीत फ्रिजमधून रात्रीच निवडून ठेवलेली गवारीची भाजी काढली. पाणी पूर्ण भरून झालं. गॅसवर मोठ्या पातेल्यात अंघोळीसाठी गरम पाणी ठेवलं. पाणी भरेपर्यंत चहा होईपर्यंत ते पाणी गरम झालं की, गॅस बारीक करून ठेवला. घर झाडून घेतलं. अंगणात सडा टाकला. बाहेरच्या नळाच्या पाईपने भराभर फुल्ल धारेने मोठ्या, छोट्या झाडांना, कुंड्यांना पाणी घातलं. तोवर अर्धी अधिक स्वतः ओली झाले होते. सगळा गाव झोपेत होता. आमच्या वरच्या भाडेकरू वहिनींनी पाणी भरल्याचा आवाज आला. पंधरा वीस मिनिटात त्यांचं पाणी भरून व्हायचं आणि पुन्हा त्या झोपी जायच्या. पुन्हा सगळीकडे सामसूम… मी गरम पाण्याचं पातेलं बाथरूममध्ये बादलीनं नेऊन ओतलं. रात्रीच कॉलेजचा युनिफॉर्म पाण्यातून काढून वाळत टाकला होता. भराभर पाणी अंगावर घेतलं. माझे कपडे मी सकाळीच पिळून टाकायची. लगेच कीचनमध्ये झाकून ठेवलेला कपभर चहा घेत होते तर पप्पा उठले. पप्पाजी चहा देऊ..? ‘हो, ब्रश करतो… नको नको पाणी ठेव, अंघोळ करतो. सर्व आटोपतो आणि मग घेतो चहा. तू तुझं आटप... तुला वेळ नको व्हायला!’

पाणी भरून झाल्याबरोबर कणीक मळून ठेवली होती. अंघोळ झाल्याबरोबर अंगणात रांगोळी काढली. पायऱ्यांवर गोपद्म काढले. त्यावर हळदी, कुंकू वाहिले. रविवारी मात्र निवांत, छान, मोठ्ठी रांगोळी काढून त्यात रंग भरायची. पण रोज एवढं करायला वेळ कुठे होता. मग भराभर दहा-पंधरा पोळ्या केल्या. ते करत करत दुसऱ्या शेगडीवर ठेवलेलं पाण्याचं पातेलं पप्पांना विचारून बादलीत रिकामं केलं. तोवर त्याच शेगडीवर गवारीची भाजी केली. पप्पांचा चहा केला, ओटा आवरत, पडलेली भांडी घासून ओटा पुन्हा चकाचक केला. पप्पा आले. देवाजवळ दिवा लावला. त्यांनी काही मंत्र म्हटले. मला तर काहीच येत नव्हते देवाचे. फक्त हात जोडले. पप्पांना नमस्कार केला. त्यांना चहा बिस्कीटे दिली. तोवर सात वाजत आले होते. मी आत बेडरूममध्ये गेले. आवाज न करता लाईट न लावताच वेणी घातली. हातावर चिमूटभर पावडर घेऊन चेहऱ्यावर, मानेवर लावली. गॅससमोर असल्याने घामेजले होते ना! तेवढ्या चिमूटभर सुवासिक पावडरने फ्रेश वाटले. दप्तर उचलले आणि आवाज न करता हळूच बाहेर आले आणि दरवाजा लावला.

“येऊ पप्पा मी, सात वाजून गेलेत?”

“कशी जातेस?”

“स्टँडवर जाते आणि तेथून बसने. काळीपिळी मध्ये फारच गर्दी असते. एका पायावर बसून जा... मग खाली उतरून थोडावेळ चालताच येत नाही पप्पा आणि खरे सांगायचे तर हे टमटमवाले ना कशीपण गाडी चालवतात. मागच्या आठवड्यात दुसऱ्या गाडीला चुकवण्यासाठी पहिल्या टमटमवाल्याने समोरचा खड्डाच पाहिला नाही आणि ती टमटम उलटली. त्यातील बायामाणसांना खूप लागलं. कोणाला दवाखान्यात नेलं… काय माहीत नाही. पण खूप आरडाओरड, रडारड झाली. तेव्हापासून मनाशीच ठरवलं, नकोच ती टमटम.”

“मी आज तुला स्टँडवर सोडतो. उद्यापासून तुला एक रिक्षावाला ठरवून टाकू. तो तुला न्यायला आणि सोडायला येत जाईल. घरापासून अडीच तीन कि.मी. तर एस.टी.स्टँड आहे. दहा दहा रुपये घेत जाईल. पण चांगलाय तो.’ किती छान वाटलं मला. आजचा दिवस... व्वा मस्तय… मी एकदम खूष… पप्पंनी स्टँडवर सोडले तोवर सकाळचे आठ वाजत आले होते, समोरच बस उभी होती. पप्पांनी शंभराची नोट हातात ठेवली. आहेत माझेकडे, कशाला हे?’

“असू दे, प्रवासात आपल्या जवळ असावेत.”

मी त्यांच्याकडे पाहिले, माझे डबडबलेले डोळे पाहून त्यांनी हळूच माझ्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात बाबांचाच भास झाला. केवढा आधार, विश्वास वाटला मला! मी त्यांच्या प्रेमळ आपुलकीच्या वागण्याने भारावून गेले, नाही मी एकटी नाही… मला भरभक्कम साथ आहे पप्पांची. त्यांची ही कृती मला माझ्या कठीण परिस्थितीलाही सहन करण्याची ताकद देत राहिल. ‘बाई’ म्हणून वाट्याला आलेला भोगवटा सध्या तरी मलाच सहन करावा लागणार होता. निदान बी.एड. करणं आणि तेही उत्तम प्रकारे हे दिवसा पाहिलेलं स्वप्न मला पूर्ण करायचंच होतं.

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4293

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 15 December 2017

दिसेल ती गोष्ट खरी म्हणून धरल्याने लेखिकेवर ही पाळी आली आहे. हिंदी सिनेमे बघून प्रेमाविषयी अवास्तव कल्पना डोक्यात घेऊन वावरणे धोक्याचे आहे. इत्यलम. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......