जेरुसलेम ज्वालाग्रही पेटी आहे… तिचा कधीही भडका उडू शकतो...
ग्रंथनामा - झलक
सायमन सीबग मांटफिऑरी
  • ‘जेरुसलेम : एक चरित्रकथा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ-मलपृष्ठ
  • Tue , 12 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक जेरुसलेम : एक चरित्रकथा Jerusalem : Ek Charitrakatha सायमन सीबग मांटफिऑरी Simon Sebag Montefiore डायमंड पब्लिकेशन्स Diamond Publications

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्जेया आठवड्यात जेरुसलेमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली. आपला दुतावासही तेल अविववरून जेरुसलेममध्ये हलवण्याचा निर्मय जाहीर केला आणि मध्य पूर्वेसह जगभरात वादंग माजलं. त्यायानिमित्ताने शहराचा ३००० हजार वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश. ‘जेरुसलेम - एक चरित्रकथा’ हा सायमन सीबग मांटफिऑरी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद सविता दामले यांनी केला आहे.

.............................................................................................................................................

जेरुसलेमचा इतिहास म्हणजे अनेकदा विस्तारलेल्या, आक्रसलेल्या नगरीतल्या बाहेरून स्थायिक झालेल्या लोकांची, वसाहतवाद्यांची आणि भाविकांची गाथा आहे. तिच्यात अरब, ज्यू आणि इतर अनेक जमातींचा समावेश होतो. एका सहस्रकाहून अधिकच्या इस्लामी सत्तेच्या काळात जेरुसलेममध्ये वारंवार इस्लामी विद्वान, बाहेरून स्थायिक झालेल्या मुसलमान, सुफी पंथी आणि भाविकांनी वस्त्या केल्या. त्यांत अरब, तुर्क, भारतीय, सुदानी, इराणी, कुर्द, इराकी आणि मघरेबी लोकांचा समावेश आहे, त्याबरोबर ख्रिश्चन आर्मेनियन, सर्ब, जॉर्जियन आणि रशियन, तसंच त्यांसारख्याच सेफार्डिक आणि रशियन ज्यूंचाही समावेश आहे. त्यामुळेच ही नगरी एका अरब नगरीपेक्षाही एक लेवांटिन (ऑटोमनी) नगरी असल्याचं, आणि हाच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असल्याचं लॉरेन्स ऑफ अरेबियाचं ठाम मत होतं.

वेशीबाहेरची जेरुसलेमची उपनगरं म्हणजे ज्यू, अरब आणि युरोपीय लोकांनी १८६० ते १९४८ या काळात उभारलेल्या नव्या वस्त्या असल्याची गोष्ट बरेचदा नजरेआड केली जाते. शेख जर्रासारख्या अरबी वस्त्या त्या भागातल्या ज्यू वस्त्यांपेक्षा जुन्या नाहीत आणि अधिकृतपणाबाबत तर दोन्हीही सारख्या आहेत.

मुसलमान आणि ज्यू दोघांचेही ऐतिहासिक दावे निर्विवाद आहेत. या शहरात ३००० वर्षांपासून ज्यू राहत आहेत, या नगरीची भक्ती करत आहेत. जेरुसलेममध्ये राहण्याचे आणि तिथल्या परिसरात वस्ती करण्याचे अधिकार अरबांना आहेत, तसेच ते ज्यूंनाही आहेत, पण तरीही काही वेळा ज्यूंच्या केलेल्या अगदी निरुपद्रवी डागडुजीलाही अनधिकृत ठरवलं गेलं : १९४८ साली जॉर्डनवासीयांनी ज्यू वस्तीतलं हुर्वा सिनगॉग पाडून टाकलं होतं. इस्राइलींनी त्याची २०१० साली पुनर्बांधणी केली, आणि त्याची प्रतिष्ठापना केली, पण तरीही त्यावर युरोपीय प्रसारमाध्यमांतून टीका झाली आणि पूर्व जेरुसलेममध्ये किरकोळ दंगलीही झाल्या.

पण जेव्हा सरकारच्या आणि महापौरांच्या सर्व ताकदीच्या जोरावर आणि दैवी योजनेवर श्रद्धा असलेल्या दृढनिश्चयी लोकांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर पूर्वापार स्थायिक असलेल्या अरब रहिवाशांना हाकलून दिलं जातं, त्यांच्यावर सक्ती  केली जाते, त्यांचा छळ होतो आणि संशयास्पद न्यायालयीन निर्णयांच्या जोरावर त्यांची मालमत्ता जप्त होऊन नवीन ज्यू वस्त्यांसाठी जागा केली जाते, तेव्हा मात्र गोष्ट निराळी असते. अरब भागात वसाहती निर्माण करण्याच्या आणि कुठलीही  शांतताप्रक्रिया पूर्णत्वास जाऊ न देण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या आक्रमक घरउभारणीमुळे आणि अरब भागातल्या नवीन बांधकामांकडे आणि सोयीसुविधांकडे जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अगदी साधारण, निष्पाप ज्यू प्रकल्पालाही दूषणं दिली जातात.

इस्राइलसमोर दोन मार्ग आहेत - जेरुसलेमकेंद्री, धार्मिक-राष्ट्रवादी राज्य विरुद्ध ‘बुडबुडा’ (बबल) म्हणून ओळखलं जाणारं, पाश्चात्त्यीकरण झालेलं तेल-अवीवकेंद्री उदारमतवादी राज्य. जेरुसलेममधल्या राष्ट्रवादी योजना आणि वेस्ट बँक परिसरात बेछूटणे उभे राहणारे इमले यामुळे इस्राइलचे स्वत:चेच हितसंबंध अत्यंत बिघडून त्यातून ज्यूंच्या जेरुसलेमला फायदा होण्यापेक्षा इस्राइल देशालाच अधिक तोटा होण्याचाही एक धोका आहे.

(टीप : शिथिल पडलेल्या इस्राइलच्या लोकशाहीला दुर्बळ युती-सरकारांचं ग्रहण लागलेलं आहे. त्यामुळे जेरुसलेमच्या विकासयोजना आणि पुरातत्त्वशास्त्राच्या योजना ठरवण्याच्या बाबतीत धार्मिक-राष्ट्रवादी संघटनांनाच अधिक महत्त्व मिळालं आहे. जुन्या नगरीच्या पूर्वेला असलेल्या महत्त्वाच्या इस्ट वन (इआ) या भागात २००३ साली इस्राइली इमारती उभ्या राहायला सुरुवात झाली. त्यामुळे पूर्व जेरुसलेमचा भाग वेस्ट बँक या पश्चिमेकडच्या भागापासून तुटल्यात जमा झाला असता. आणि पॅलेस्ताईनचं स्वतंत्र राज्य स्थापन होण्याची कल्पना धुळीला मिळाली असती. इस्राइलमधले उदारमतवादी आणि अमेरिका यांनी इस्राइल सरकारचं मन वळवून ते कृत्य करण्यापासून त्यांना रोखलं, पण तरीही शेख जर्रा आणि सिल्वानच्या अरब वस्त्यांमध्ये ज्यूंची घरबांधणी करण्याच्या योजना मात्र चालूच राहिल्या. सिल्वान ही अरबी वस्ती पुष्कळदा उत्खनन झालेल्या डेव्हिडनगरीच्या जवळ आहे. तिथे चालणाऱ्या अमूल्य अशा पुरातत्त्वशास्त्रीय उत्खननासाठीचा निधी एलाद नावाची एक ज्यू धार्मिक राष्ट्रवादी संस्था पुरवते. तिथेच त्यांनी पाहुण्यांसाठी एक केंद्रही उघडलेलं आहे. त्या केंद्रात ज्यूंच्या जेरुसलेमची कथा सांगितली जाते. तिथल्या पॅलेस्तिनी अरब प्रजेला जवळपासच्या घरांत हलवून ज्यू रहिवाशांसाठी अधिक जागा मोकळी करून देण्याची त्यांची योजना आहे. त्याशिवाय तिथे किंग डेव्हिड पार्क नावाची बागही उभारण्याचा त्यांचा मानस आहे. अशा परिस्थितीमुळे पुरातत्त्वशास्त्राच्या व्यावसायिकतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उभं राहू शकतं. डॉक्टर राफाएल ग्रीनबर्ग या इतिहासकाराने या योजनेविरुद्ध मोहीम उघडली आहे. तो म्हणतो, ‘पुरातत्त्वशास्त्राचा हेतू निरपेक्ष आणि अभ्यासू असतो’, पण उत्खननासाठी निधी पुरवणाऱ्यांची मात्र ‘इतिहासाच्या त्यांच्या आवृत्तीवर शिक्कामोर्तब करणारे निष्कर्ष निघावेत, अशी अपेक्षा असते.’ अजूनपर्यंत तरी त्यांना वाटणारी भीती प्रत्यक्षात उतरलेली नाही, कारण पुरातत्त्वशास्त्रज्ञांची निष्ठा जाज्वल्य आहे. अलीकडेच झालेल्या उत्खननात ज्यू भिंती सापडल्या नसून केनन काळातल्या भिंती सापडल्या असल्याचं आपण पूर्वीच पाहिलं आहे. तरीदेखील ही पॅलेस्तिनी आणि इस्राइली उदारमतवाद्यांच्या निदर्शनाची ठिकाणं बनली आहेत.)

तथापि, मतामतांच्या प्रवाहांना भरती-ओहोटी येत असते. जेरुसलेम म्हणजे एक कुठलीही सर्वसाधारण राजधानी नसली, तरी दुसऱ्या कुठल्याही राष्ट्राप्रमाणेच सुरक्षितता आणि समृद्धी प्राप्त करण्याचा अधिकार इस्राइललादेखील आहे. काही वस्त्यांमुळे इस्राइलचं नाव खराब झालं असलं, तरी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सर्व धर्मांच्या जेरुसलेमचा राखणदार म्हणून इस्राइलची कामगिरी प्रभावी आहे. लेखक एली विझल याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना लिहिलेल्या सार्वजनिक पत्रात म्हटलं आहे, ‘इतिहासात आज प्रथमच जेरुसलेममध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान असे सर्वच जण आपापल्या धर्मस्थळी जाऊन मोकळेपणाने प्रार्थना करू शकतात.’ इस्राइलच्या लोकशाहीच्या युगात या म्हणण्यात बराचसा तथ्यांश आहे.

इ. स. ७०नंतर ज्यूंना प्रथमच जेरुसलेममध्ये मोकळेपणाने त्यांचा धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, हे नक्कीच खरं आहे. ख्रिश्चनांच्या सत्ताकाळात ज्यूंना नगरीच्या जवळ जाण्याचीदेखील मुभा नव्हती. इस्लामी सत्तेच्या शतकांत ख्रिश्चनांना आणि ज्यूंना ‘धिम्मी’, म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून सहन केलं गेलं, तरी त्यांच्यावर अनेकदा धार्मिक अत्याचार होत होते. ख्रिश्चनांना युरोपीय सत्तांचं अभय होतं, पण ज्यूंना अशा पद्धतीने कुणाचंही संरक्षण नसल्याने खूपच वाईट वागणूक मिळत असे. अर्थात, ख्रिश्चन युरोपइतकी वाईट वागणूक त्यांना इथे मिळाली नाही. त्या काळात जेरुसलेममध्ये एखादा ज्यू माणूस मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मस्थळाजवळ गेल्याबद्दलही ते त्याला ठार मारून टाकू शकत, पण ज्यूंच्या पवित्र भिंतीजवळच्या पाऊलवाटेवरून मात्र कुणीही स्वत:चं गाढव घेऊन जाऊ शकत असे. प्रत्यक्षात, ज्यूंना मात्र त्या परिसरात जाण्यासाठी परवाना असण्याची गरज होती. अगदी विसाव्या शतकातही बि‘टिशांनी त्या भिंतीकडे जाण्याबद्दल ज्यूंवर अनेक बंधनं घातली होती आणि जॉर्डनवासीयांनी त्यांना तिथे पाऊलही टाकण्यास मनाई केली होती. तथापि इस्राइली ज्या परिस्थितीला ‘ती परिस्थिती’ म्हणतात, तिच्यामुळे धर्माचरणाच्या स्वातंत्र्याबद्दल विझल याने केलेला दावा नेहमीच खरा ठरत नाही. बिगर ज्यूंना पावलोपावली नोकरशाहीच्या छळाला तोंड द्यावं लागतं. तसंच संरक्षक भिंतींमुळे वेस्ट बँक भागातल्या पॅलेस्तिनींना चर्च किंवा अक्सामध्ये प्रार्थना करणं अतिशय कठीण होऊन बसलं आहे.

ज्यू, मुसलमान आणि ख्रिश्चन जेव्हा आपापसांत झगडण्याच्या पवित्र्यात नसतात, तेव्हा जेरुसलेमचं शहामृगासारखं तोंड वाळूत खुपसून बाकीचे लोक अस्तित्वातच नसल्याचं सोंग घेण्याचं पुरातन धोरण ते अवलंबतात. सप्टेंबर २००८मध्ये ज्यूंचे पवित्र दिवस आणि रमझानचे दिवस एकाच काळात आल्यामुळे ज्यू आणि अरब एकाच वेळी टेंपल माऊंट आणि भिंतीजवळ प्रार्थना करायला आले आणि तिथल्या गल्लीबोळांत ‘एकेश्वरवाद्यांची कोंडी’ झाली. त्याबद्दल इथन ब्रॉनर याने न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलं, ‘त्या भेटीला तणावग‘स्त म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ती भेट नव्हतीच. ते एकमेकांशी एक अक्षरही बोलले नाहीत. त्यांनी एकमेकांकडे पाहिलंदेखील नाही. जणूकाही ती प्रत्येक ठिकाणाला वेगवेगळी नावं असलेली आणि एकाच क्षणावर स्वत:चा हक्क सांगणारी दोन समांतर विश्वं होती. ते गट एकमेकाशेजारून पुढे निघून गेले.’

पण जेरुसलेमच्या हिंस्र मापदंडांपुढे हे वर्तन सामान्य परिस्थितीचं लक्षण म्हणता येईल - विशेषत: आता या नगरीला जागतिक पातळीवर मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. आज जेरुसलेम मध्यपूर्वेचं कॉकपिट बनलं आहे. अगदी इस्राइली-पॅलेस्तिनी संघर्ष बाजूला ठेवला, तरी पाश्चात्त्य निधर्मीपणा आणि इस्लामी मूलतत्त्ववादी यांच्यातल्या लढाईची ही युद्धभूमी आहे. न्यूयॉर्क, लंडन आणि पॅरीसमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ते एका निरीश्वरवादी आणि निधर्मी जगात राहतात, असं वाटतं. त्या जगात संघटित धर्मांची आणि त्यांच्या अनुयायांची सौम्य चेष्टाही होते, पण तरीही ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यू या तिन्ही अब्राहमी धर्मांच्या मूलतत्त्ववादी विचारांच्या कट्टर अनुयायांची संख्याही एकीकडे वाढते आहे.

कयामतच्या संकल्पनेतलं जेरुसलेमचं स्थान आणि तिचं राजकीय महत्त्व अधिकच तणावग्रस्त झालं आहे. अमेरिकीची चैतन्यमय संस्कृती वैविध्यपूर्ण आणि निधर्मी आहे आणि तरीही त्याच वेळी अमेरिका ही शेवटची आणि बहुधा आतापर्यंतची सर्वांत शक्तिशाली ख्रिश्चन महासत्ता आहे. तिथले शुभवर्तमानवादी पंथीय जेरुसलेममध्ये येणाऱ्या ‘अंतिम दिवसाकडे’ डोळे लावून बसले आहेत, तर अमेरिकी सरकारच्या दृष्टीने मध्य-पूर्वेतल्या शांततेच्या दृष्टीने आणि त्यांच्या अरब मित्रराष्ट्रांबरोबरच्या व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या संबंधांच्या दृष्टीने जेरुसलेममध्ये शांतता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे; पण याच काळात अल-कुद्स इस्राइलच्या ताब्यात गेल्यामुळे मुसलमानांची त्याच्यावरची भक्तीची उत्कटता वाढली आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे १९७९ साली आयातुल्ला खोमेनीने इराणमध्ये वार्षिक जेरुसलेम दिनाला सुरुवात केली. त्या वेळी या नगरीला एक इस्लामी धर्मस्थळ आणि पॅलेस्ताईनची राजधानी म्हणून दर्शवलं जातं. अण्वस्त्रांच्या जोरावर प्रादेशिक वर्चस्व मिळवण्यासाठी इराण प्रयत्नशील आहे. तसंच त्यांचं अमेरिकेबरोबर शीतयुद्ध सुरू आहे. या दोन्ही गोष्टींसाठी इराणच्या महत्त्वाकांक्षांबाबत साशंक असलेले सुन्नी अरब आणि शिया पंथीय इराण यांना सोयीस्कररित्या एकत्र आणण्यासाठी जेरुसलेमचा प्रश्न कामी येतो. लेबनॉनमधल्या शियांची हिझबुल्ला असो की गाझा पट्टीतल्या सुन्नींची हमास असो, या सर्वांच्या दृष्टीने जेरुसलेम म्हणजे झायनवादविरोधी, अमेरिकाविरोधी विचारांचं आणि इराणच्या नेतृत्वाचं प्रतीक आहे. इराणचा अध्यक्ष महमुद अहमदिनेजादने म्हटलं आहे, ‘जेरुसलेम ताब्यात घेणाऱ्या सत्तेचं इतिहासाच्या पानांतून उच्चाटन व्हायला हवं आहे.’ अहमदिनेजाददेखील मसीहावादी आहे. लवकरच ‘नीतिमान, देवाने निवडलेला, अद्भुत शक्तिशाली, पुरुषोत्तम अल्-माहदी’ बारावा इमाम अवतरणार असल्याची आणि कुरणामध्ये ज्याला ‘प्रहर’ म्हटलं आहे, त्याचं स्थान असलेल्या जेरुसलेमला मुक्त करणार असल्याची त्याची श्रद्धा आहे.

या अंतिम दिवसाबद्दलच्या (एस्कॅटोलॉजिकल) आणि प्रखर राजकीय भावनांमुळे तिन्ही धर्मांनी निवडलेली जेरुसलेम नगरी अनेक संघर्षांच्या आणि महत्त्वाकांक्षांच्या निशाण्यावर आली आहे. कयामतच्या दिवसाच्या संकल्पनेत जेरुसलेमची भूमिका अतिशयोक्त असेलही, पण अरब जगतात बदलाचे वारे वाहत असताना; सत्ता, श्रद्धा आणि फॅशनचं अद्भुत रसायन असलेल्या या परिस्थितीवर चोवीस तास चालू असलेल्या टीव्ही न्यूज चॅनेल्सची सतत नजर असताना या वैश्विक नगरीतल्या नाजूक शिळांवर भयंकर ताण पडतो आहे. एका प्रकारे ती जगाचं केंद्रस्थान बनली आहे.

अब्दुल्लाचा खापरपणतू असलेला सध्याचा जॉर्डनचा राजा अब्दुल्ला दुसरा याने सावधगिरीचा इशारा दिला आहे, ‘जेरुसलेम ही एक ज्वालाग्रही पेटी आहे आणि तिचा कधीही भडका उडू शकतो. जगातल्या आमच्या या भागातले सर्व रस्ते, सर्व झगडे जेरुसलेमच्या दिशेने जातात.’ केवळ याच कारणामुळे कितीही अशुभ घटिका असली, तरी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची गरज वाटते. शांतता हवी असलेल्या पक्षाला इस्राइली लोकशाहीत ग्रहण लागलं आहे. तिथल्या नाजूक युती सरकारांवर शक्तिशाली राष्ट्रवादी पक्षांचा पगडा आहे, तर धसमुसळे पॅलेस्तिनी गट अरब स्प्रिंगपासून प्रेरणा घेऊन आपसांतल्या अगदी विरुद्ध उद्दिष्टांमध्ये (निधर्मी आणि तडजोडीला तयार फताह, तर बंडखोर आणि इस्लामवादी हमास) मेळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे फताह्च्या नियंत्रणाखालचं वेस्ट बँक दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करतं आहे, तर गाझावर नियंत्रण असलेली सर्वांत गतिमान पॅलेस्तिनी संघटना मूलतत्त्ववादी हमास इस्राइलचा सर्वनाश करण्यासाठी कटिबद्ध आहे. ती आत्मघातकी बॉम्बहल्ला करण्यासारखे मार्ग निवडते आणि दक्षिण इस्रायलवर मधूनमधून क्षेपणास्त्रांचा मारा करते. त्यामुळे इस्राइली घुसखोरीला उत्तेजन मिळतं. युरोपीय आणि अमेरिकी लोक हमासला दहशतवादी संघटना मानतात. १९६७ साली ज्या सीमा होत्या, त्यावर आधारित तोडगा स्वीकारण्यासाठी तयारी असल्याच्या हमासकडून येणाऱ्या संदेशांना आतापर्यंत युरोपीय आणि अमेरिकी लोकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. कुठल्यातरी क्षणी निवडणुका होऊन लोकशाहीवर आधारित पॅलेस्तिनी सरकार अस्तित्वात येईल, अशी आशा वाटते, पण फताह आणि हमास हे दोन्ही पक्ष एकत्र काम करून इस्राइलसोबतचा संवाद कायम ठेवू शकतील का, हे मात्र अजूनही स्पष्ट नाही. तसंच इस्राइलसोबतच्या शांतताप्रक्रियेत हमास हा एक विश्वासू भागीदार म्हणून काम करेल, याचीही खात्री देता येत नाही. चर्चेच्या कुठल्यातरी वळणावर हमासला हिंसेचा त्याग करावाच लागेल आणि ज्यू राष्ट्राला मान्यता द्यावीच लागेल. त्याबरोबरच इतिहासाला अनुसरून २०११च्या अरब स्प्रिंगमध्ये इजिप्त, सिरिया आणि इतर देशांमध्ये सुरू झालेल्या क्रांत्यांच्या खडतर नियतींचे परिणाम जेरुसलेमवरही होतील.

जेरुसलेमवर सामूहिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती तडजोड करण्याची दोन्ही पक्षांची इच्छा नसल्याचं १९९३ सालापासून चालत आलेला चर्चेचा इतिहास, उदात्त वक्तव्यं आणि बेभरवशी, हिंसक कृत्यांमधली विसंगती यांवरून स्पष्ट होतं. अगदी चांगल्या परिस्थितीतही जेरुससेममधल्या धार्मिक, राष्ट्रीय आणि भावनिक गोष्टींमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे एखाद्या चक्रव्यूहाच्या मध्यभागी असलेलं कोडं सोडवण्यासारखं आहे : विसाव्या शतकात जेरुसलेमसाठी चाळीसच्या वर योजना बनवल्या गेल्या आणि त्या सर्व अपयशी झाल्या. आजच्या घडीला केवळ टेंपल माऊंटची विभागणी करणारे कमीतकमी तेरा आराखडे तयार आहेत.

२०१० साली नेतान्याहू आणि एहुद बराक या दोघांचे पक्ष युती करून सत्तेवर आले. अमेरिकन अध्यक्ष ओबामा यांनी त्यांना जबरदस्तीने जेरुसलेममधल्या नव्या वसाहतींची बांधकामं तात्पुरती थांबवायला लावली. त्या वेळी अमेरिका आणि इस्राइल संबंधांनी कडवटपणाची परिसीमा गाठली होती, पण ती किंमत मोजून ओबामांनी दोन्ही बाजूंना एकमेकांशी किमान बोलण्यासाठी पुन्हा राजी केलं, तरीही त्या बोलण्यातली प्रगती थंड आणि अल्पजीवी ठरली.

इस्राइलने बरेचदा राजनैतिकदृष्ट्या आडमुठेपणा केला आहे. नव्यानव्या वस्त्या उभारून स्वत:ची सुरक्षितता आणि प्रतिष्ठाही धोक्यात घातली आहे, पण तरीही वस्त्यांचा प्रश्न चर्चा करून सोडवता येऊ शकतो. त्याच वेळी अरबांपुढच्या समस्याही तेवढ्याच मूलभूत आहेत. राबीन, बराक आणि ओल्मर्ट यांच्या नेतृत्वाखाली इस्राइलने जुन्या नगरीसह जेरुसलेमवर सामूहिक नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या योजनेला मान्यता दिली होती. १९९३ नंतर जवळजवळ दोन दशकं वैतागवाण्या वाटाघाटी होऊनही पॅलेस्तिनींनी या योजनेला अधिकृतरित्या एकदाही मान्यता दिलेली नाही, पण आशा ठेवायला जागा आहे, कारण २००७-०८ साली त्यांनी तसं करण्यासाठी अनौपचारिकरित्या, गुप्तपणे मान्यता दिली होती. तरीही जेव्हा या दोन्ही पक्षांनी अत्यंत लवचीक आणि एकमेकांशी मिळत्याजुळत्या भूमिका घेतल्या, तेव्हा ती वेळ दुसऱ्या पक्षासाठी चुकीची होती आणि फुटलेल्या कागदपत्रांत पॅलेस्तिनी प्रस्तावाची माहिती उघड झाल्यावर अरबांनी त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप ठेवला.

सध्या आहे त्या अवस्थेत पुढची काही दशकं जेरुसलेम नगरी राहू शकते, पण जर कधी शांतता करारावर सह्या झाल्याच, तर दोन देश निर्माण होतील. इस्राइलला एक राष्ट्र आणि एक लोकशाही म्हणून टिकून राहायचं असेल आणि पॅलेस्तिनी लोकांना न्यायाने आणि सन्मानाने जगायचं असेल, तर हे आवश्यक आहे. पॅलेस्ताईन देशाचा आकार आणि दोघांनी एकमेकांत केलेली जेरुसलेमची विभागणी कशी असेल, ते दोन्ही पक्षांना ठाऊक आहे. १९९३ साली झालेल्या ऑस्लो कराराचे शिल्पकार इस्राइली अध्यक्ष शिमॉन पेरेझ म्हणतात, ‘जेरुसलेम नगरी ही दोन्ही देशांची राजधानी म्हणून राहील. तिथली अरबी उपनगरं पॅलेस्ताईनमध्ये असतील, तर ज्यू उपनगरं इस्राइलमध्ये असतील.’ इतरांसारखंच त्यांच्या डोळ्यापुढेही चित्र स्पष्ट होतं. बिल क्लिंटनने सांगितलेल्या निकषांनुसार पूर्व जेरुसलेममधल्या बाराच्या आसपास असलेल्या ज्यू वस्त्या इस्रायलला मिळणार होत्या आणि त्या बदल्यात इतर ठिकाणच्या इस्राइली जमिनी पॅलेस्ताईनला मिळणार होत्या. तसंच वेस्ट बँक परिसरातल्या इस्राइली वस्त्या इतरत्र हलवल्या जाणार होत्या. ऐकायला ते अगदी सोपं होतं, पण पेरेझ सांगतात, ‘जुन्या नगरीचं काय करायचं, हेच आमच्यासमोरचं मुख्य आव्हान आहे. मुळात, देशाचं सार्वभौमत्व आणि धर्म या बाबी वेगळ्या करायला आपण शिकलं पाहिजे. प्रत्येकाचा आपापल्या पुरातन धर्मस्थानावर ताबा असावा, पण जुन्या नगरीचे तुकडे केले जाऊ नयेत.’

रोममध्येच कॅथलिकांची वेगळी व्हॅटिकन नगरी नांदते. त्या नगरीला स्वतःचं वेगळं अस्तित्व असलं, तरी स्वतःचं वेगळं लष्कर नाही. जुन्या जेरुसलेमची व्यवस्थाही तशीच करता येईल. तिचा कारभार आंतरराष्ट्रीय समिती चालवेल. त्या ठिकाणची पोलीस गस्त अरब-इस्राइल यांच्या संयुक्त दलांमार्फत किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत घातली जाईल. कदाचित व्हॅटिकनमध्ये जसे स्वित्झर्लंडचे रक्षक आहेत, तशीच काहीतरी व्यवस्था इथेही करता येईल. अरबांना कदाचित अमेरिका चालणार नाही, तर इस्राइलचा संयुक्त राष्ट्र संघटनेवर आणि युरोपीय युनियनवर विेशास नाही. त्यामुळे रशियाच्या मदतीने नाटो संघटना हे काम करू शकेल. कारण जेरुसलेममध्ये काहीतरी भूमिका मिळावी, यासाठी रशिया पुनश्च उत्सुक आहे.

(टीप : व्लादिमीर पुतीनने रुजवलेल्या सत्तावादी-राष्ट्रवादाला सोयीस्कर अशा पद्धतीने रशियन समाजाच्या जेरुसलेमप्रति असलेल्या श्रद्धेचं आधुनिकीकरण करण्यात आलं आहे. त्यासाठी त्याने २००७ साली माजी सोव्हिएत पॅट्रिआर्केट चर्चचं आणि रशियाबाहेर असलेल्या व्हाईट रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचं विलिनीकरण घडवून आणलं. भक्तिगीतं गाणाऱ्या हजारो रशियन भक्तांनी नगरीचे रस्ते पुन्हा फुलून गेले आहेत. विमानाद्वारे पवित्र अग्नी मॉस्कोला नेण्यात येतो. त्यासाठी सेंटर फॉर नॅशनल ग्लोरी अँड अपॉसल आन्द्रे फाउंडेशन ही संस्था भाड्याचं विमान पुरवते. क्रेमलिनने नेमलेली व्यक्ती या संस्थेची प्रमुख असते. त्या संस्थेने ‘झार डेव्हिडचा’ एक पूर्णाकृती सोनेरी पुतळा डेव्हिडच्या कबरीबाहेर उभारला आहे. रशियाचे माजी पंतप्रधान स्टीफन स्तेपाशिन नव्याने स्थापलेल्या पॅलेस्ताईन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. ते म्हणतात, ‘जेरुसलेमच्या मध्यभागी रशियाचा ध्वज असणं अमूल्य आहे.’)

टेंपल माऊंटचं आंतरराष्ट्रीयीकरण करणं अत्यंत कठीण आहे, कारण कुठलाही इस्राइली राजकारणी मंदिराच्या पायाच्या शिळेवरचा स्वत:चा हक्क संपूर्णतया सोडून देणार नाही आणि तो हक्क त्याने सोडलाच, तर तो फार काळ जिवंत असणार नाही. त्याचप्रमाणे कुठलाही मुसलमान राजकारणी पवित्र आश्रयस्थानावरची इस्राइलची मालकी मान्य करून जिवंत राहू शकणार नाही. तसंच आंतरराष्ट्रीय किंवा मुक्त शहरांचा (दान्झिंग किंवा त्रिएस्ते) यापूर्वीचा अनुभव चांगला नाही.

हराम, कोटेल, घुमट, अक्सा आणि भिंत हे सर्व एकाच बांधकामाचे भाग असल्यामुळे टेंपल माऊंटची विभागणी करणं अवघड आहे. पेरेझ म्हणतो, ‘पावित्र्यावर कुणाची मक्तेदारी नाही. जेरुसलेम ही एक नगरीच नाही, तर ती एक ज्वाला आहे. ज्वालेची विभागणी करता येते का?’ ती ज्वाला असो किंवा नसो, पण कुणालातरी जेरुसलेमचं सार्वभौमत्व राखावं लागेल. वेगवेगळे प्रस्ताव मुसलमानांना वरचा भाग देतात आणि खालची भुयारं आणि कालवे (अर्थातच पायाचा भाग) इस्राइलला देतात. या भूगर्भीय गुहांच्या, नलिकांच्या आणि कालव्यांच्या विश्वातली सूक्ष्म जटिलता आश्‍चर्यजनक आहे, आणि त्यावर जेरुसलेमची पक्की छाप आहे : भूगर्भावर कुणाची मालकी आहे? जमिनीवर कुणाची मालकी आहे? आकाशावर कुणाची मालकी आहे?

अजून एका गोष्टीचा समावेश असल्याशिवाय कोणतीही योजना मान्य होणार नाही, टिकणार नाही. राजकीय सार्वभौमत्व नकाशावर दाखवता येईल, कायदेशीर करारात लिहिता येईल आणि एम-१६ मशीन गनच्या बळावर राखताही येईल, पण जर त्याला ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि भावनिक परिमाण नसेल, तर ते व्यर्थ असेल, निरर्थक असेल. सदात म्हणाला होता, ‘अरब-इस्राइली वाद हा दोन तृतीयांश मानसिक आहे.’ कुठली हेरडकालीन कुपिका पॅलेस्ताईनची असेल आणि कुठली इस्राइलची असेल, एवढीच नोंद शांतता नांदण्यासाठी महत्त्वाची नाही, तर त्यासाठी एकमेकांबद्दल मनापासून वाटत असलेला विेशास आणि आदर आवश्यक आहे. दोन्ही पक्षांतले घटक दुसऱ्याचा इतिहास नाकारतात. या पुस्तकाचं काही मिशन असेलच, तर या पुस्तकामुळे दोन्ही बाजूंच्या लोकांना एकमेकांच्या प्राचीन वारशांना मान्यता देऊन त्यांचा आदर करण्याची प्रेरणा मिळावी, अशी मी अतीव उत्कटतेने आशा करतो : अराफतनी जेरुसलेमचा ज्यूकालीन इतिहास मान्य करण्यासाठी दिलेला नकार त्याच्या स्वतःच्या इतिहासकारांनाही वेडगळपणाचा वाटला (ते इतिहासकार खाजगीमध्ये तो इतिहास अगदी राजीखुशीने मान्य करतात), पण उघडपणे त्याला विरोध करण्याचं धाडस कुणीही दाखवत नाही. अगदी २०१०मध्ये फक्त सारी नुसीबै या तत्त्वज्ञाने हराम अल्-शरीफ या जागीच पूर्वी ज्यूंचं मंदिर असल्याचं मान्य करण्याचं धाडस दाखवलं आहे. इस्राइली स्वत:च्या वस्त्या बांधत असल्यामुळे अरबांचा आत्मविेशास आणि पॅलेस्ताईनचं राज्य उभारण्याबाबतची व्यवहार्यता यांना धक्का बसतो आहे. जेव्हा हमास इस्राइलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करते, तेव्हा ती एक युद्धातली खेळी ठरते.

तसंच जेव्हा पॅलेस्तिनी लोक पुरातन ज्यू वारसा आणि आधुनिक इस्राइल राष्ट्राचा ज्यू धर्म नाकारतात, तेव्हाही शांततानिर्मितीला खीळच बसते, आणि या सर्वांहूनही मोठं असं एक आव्हान आपल्यापुढे आहेच : दोन्ही बाजूंना दुसऱ्याच्या शोकान्तिका आणि शौर्याच्या आधुनिक कथानकाला मान्यता देणं गरजेचं आहे. एकाच्या कथेतला नायक दुसऱ्याच्या कथेतला खलनायक असल्यामुळे हे खूप मोठं आव्हान आहे; पण हेही शक्य आहे.

हे जेरुसलेम असल्यामुळे आपण अतर्क्य गोष्टींची सहज कल्पना करू शकतो : आजपासून पाच किंवा चाळीस वर्षांनंतर जेरुसलेम नगरी अस्तित्वात तरी असेल का? दहशतवादी कुठल्याही क्षणी टेंपल माऊंट उडवून देतील आणि साऱ्या जगाचा हृदयभंग करतील, अशी एक शक्यता नेहमीच वाटते. मग अंतिम निवाड्याचा दिवस जवळ आला असल्याची आणि ख्रिस्त आणि प्रति-ख्रिस्त यांच्यात लढाई सुरू झाली असल्याची सर्व प्रकारच्या मूलतत्त्ववाद्यांची खात्री पटेल.

आमोस ऑझ हा जेरुसलेमवासी लेखक सध्या इस्राइलमध्ये निगेव इथे राहतो. त्याने एक गंमतशीर उपाय सुचवला आहे, ‘आपण या पवित्र स्थानांवरचा प्रत्येक दगड हलवू आणि तो पुढच्या शंभर वर्षांसाठी स्कँडिनेव्हियाला पाठवून देऊ. जोपर्यंत जेरुसलेमवासी एकमेकांसोबत राहायला शिकत नाहीत, तोपर्यंत ते दगड आपण परत आणायचे नाहीत.’ खेदाची गोष्ट म्हणजे, ही कल्पना थोडी अव्यवहार्य आहे.

१,००० वर्षं जेरुसलेम संपूर्णपणे ज्यू धर्मीय होतं. त्यानंतर जवळजवळ ४०० वर्षं त्यावर ख्रिश्चनांची आणि १,३०० वर्षं इस्लामी सत्ता होती. मात्र तिथली सत्ता काबीज करताना यातल्या प्रत्येक धर्माला तलवार, तोफा किंवा हॉवित्झरसारख्या शस्त्रांची आणि आयुधांची मदत घ्यावी लागली. या तिन्ही धर्मांचे राष्ट्रवादी इतिहास एकामागून एक येणाऱ्या अपरिहार्य शौर्यगाथा आणि महासंकटांच्या साचेबंद कहाण्या सांगतात; पण जे काही घडलं, ते कधीच अटळ नसल्याचं मी या इतिहासलेखनातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतेच. जेरुसलेमवासीयांची नियती आणि त्यांची ओळख कधीच विशिष्ट अशी नव्हती. आज आपलं जीवन जेवढं गुंतागुंतीचं आणि सूक्ष्म आहे, तेवढंच हेरड, क्रुसेडर आणि ब्रिटिशकालीन जेरुसलेमधलं जीवनही गुंतागुंतीचं आणि सूक्ष्म होतं.

इथे नाट्यपूर्ण क्रांत्यांबरोबर शांतपणे होणाऱ्या उत्क्रांत्याही झाल्या आहेत. प्रसंगी सुरुंग, पोलाद आणि रक्ताच्या जोरावर जेरुसलेममध्ये परिवर्तन झालं, तर कधी त्यामागे पिढ्यानपिढ्यांमधून झालेले हळूवार बदल, गाणी, कथा, कविता, शिल्पकला अशा गोष्टींचा हातभार आहे. तसंच एखाद्या वक्राकार जिन्यावरून हळूहळू उतरत असल्याप्रमाणे भासणाऱ्या अनेक शतकांच्या घराण्यांच्या धूसर, अर्ध-शुद्धी अवस्थेतल्या दिनचर्या, शेजाऱ्यांशी झालेलं मिश्रण आणि काळाच्या ओघात घासून गुळगुळीत झालेल्या गोष्टींचाही त्यात समावेश आहे.

जेरुसलेम हे कित्येक बाबतींत अतीव प्रेम करण्यासारखं आहे, तर कित्येक बाबतींत अगदी तिरस्करणीय आहे. तिथे पावित्र्य आणि उद्दामपणा एकाच वेळी नांदत असतो. इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा हास्यास्पद रुचिहीनता आणि अद्भुत सौंदर्य इथे अधिक प्रकर्षाने जाणवतं. इथे सर्वकाही जसंच्या तसंच राहतं, तरीही कुठलीही गोष्ट इथे स्थिर नसते. इथे दररोज पहाटे तीन धर्मांची तीन धर्मस्थळं आपापल्या पद्धतीने सजीव होऊन उठतात.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/206

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......