मला प्राणी का आवडतात?
पडघम - बालदिन विशेष
सिद्धार्थ मांडके
  • लेखक त्याच्या लाडक्या कुत्र्यासह
  • Mon , 14 November 2016
  • कुत्री प्राणीप्रेम बालदिन विशेष सर्पमित्र Animal Lovers Children's Day

मला आठवतं तेव्हापासून मला कुत्री खूप आवडतात. ही कुत्री रस्त्यावरची कुत्री होती. त्या वेळी आमच्या समोरच्या रस्त्यावर फक्त दोन कुत्री होती. एकाचं नाव ब्राऊनी होतं आणि दुसऱ्याला नाव नव्हतं.  मी त्याला गमतीने इलू-पिलू म्हणायचो. ब्राऊनी धिप्पाड आणि चांगला आक्रमक होता, तर इलू-पिलू हे छोटं पिल्लू होतं. पहिलीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या सोसायटीच्या गेटपाशी मी त्यांना रोज सकाळी बिस्किटं घालायचो. त्यांचं नुसतं निरीक्षण करतानासुद्धा मला मजा यायची. एकदा संध्याकाळी पाचच्या सुमारास मी त्या पिल्लाशी खेळायला गेलो. कुत्र्यांना हात नसतात. त्यामुळे ती त्यांच्या दातांनी आणि पंजांनी खेळतात. मी इलू-पिलूशी खेळायला गेलो, तेव्हा त्याने माझ्यावर अचानक झेप घेतली. त्यामुळे मी खाली पडलो. खरं तर तो फक्त खेळत होतं, पण मी घाबरून गेलो.

आता राजू (इलू-पिलू) ९ वर्षाचा आहे. आता तो त्याच्या कळपातल्या इतर १२ कुत्र्यांबरोबर आनंदाने राहतो. या सगळ्या कुत्र्यांना रोहित कुलकर्णी (काका) रोज रात्री खायला घालतात. त्यांनाही कुत्र्यांचं वेड आहे. त्यांच्या स्वतःच्या घरी दोन कुत्री आहेत आणि आमच्या भागातल्या जवळजवळ ४०-४५ कुत्र्यांना ते खायला घालतात. मीही कधीतरी त्यांच्याबरोबर जातो. त्यांची कुत्र्यांना खायला घालायची वेळ रात्री उशिरची असल्याने मला नेहमीच त्यांच्याबरोबर जायला जमतं, असं नाही. आम्ही कुत्र्यांच्या नवीन पिल्लांना दत्तक शिबिरांसाठी घेऊन जातो, त्यांची नसबंदी करतो आणि ऑपरेशननंतर पाच दिवसांनी त्यांना त्यांच्या भागात सोडून देतो. आम्ही त्यांना लस टोचून आणतो आणि गरज पडली, तर डॉक्टरांकडेही घेऊन जातो. आता हळूहळू मला कुत्र्या-मांजरांबरोबर साप, पक्षी आणि इतर प्राणीही आवडायला लागले आहेत.

एके दिवशी मला माझ्या आई-वडलांनी सांगितलं की, ‘प्राण्यांवर प्रेम करणं ही चांगली गोष्ट आहे, पण ही गोष्ट फक्त प्रेमापुरती मर्यादित ठेऊ नकोस. त्यांच्याबद्दल आणखी जाणून घे, माहिती गोळा कर, त्यांच्यावरची पुस्तकं वाच आणि त्यांच्यावरची कार्टून्स आणि त्यांच्यावरचे चित्रपट दाखवणारी चॅनेल्स पाहण्याऐवजी डिस्कव्हरी चॅनेल पाहा.’ मला नॅशनल जिऑग्राफिक हे चॅनेल पाहायला खूप आवडतं. एकदा मी सिझर मिलनने केलेला ‘डॉग व्हिस्परर’ नावाचा कार्यक्रम पाहिला आणि काही दिवसांमध्येच तो माझा आवडता कार्यक्रम झाला. नंतर तो कार्यक्रम फक्त एचडी चॅनेलवर दाखवायला सुरुवात झाली आणि आमच्याकडे ते चॅनेल दिसत नव्हतं. मग मी यू ट्यूबवरचे त्याचे व्हिडिओ शोधले आणि पाहिले. सिझर मिलन अमेरिकेत कुत्र्यांच्या पुनर्वसनासाठी काम करतो. कुत्र्यांच्या मानसशास्त्राच्या आधाराने तो कुत्र्यांचं पुनर्वसन करतो. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये तो कुत्र्यांसाठीच्या मानसशास्त्राचं केंद्र चालवतो. त्याने अनेक पुस्तकंही लिहिली असल्याचं नंतर माझ्या लक्षात आलं. सध्या मी ती पुस्तकं वाचतोय. ती खरोखरच अतिशय सुंदर आहेत आणि कुत्री आवडणार्‍या सगळ्यांनी ती वाचावीत, अशी मी शिफारस करीन.

आज कुत्र्यांबद्दल अनेक चुकीच्या समजुती रूढ आहेत, पण खरं तर यासाठी आपण जबाबदार आहोत. कुत्री हा चार पायांचा जिवंत आरसा असतात. तुम्ही त्यांना जी ऊर्जा देत असता, तीच ऊर्जा ती तुम्हाला परत देत असतात. ऊर्जेच्या माध्यमातूनच ती तुमच्याशी संवाद साधतात. आपल्या जन्मदात्या निसर्गाने सगळ्या प्राण्यांचा समतोल राखला आहे. आपणच हा तोल बिघडवत असतो. असे विचार करता करताच माझं प्राण्यांबद्दलचं कुतूहल वाढत गेलं. मी आधी म्हटल्याप्रमाणे मला साप हा प्राणीही आवडतो. का ते माहीत नाही, पण मला त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं. जोवर तुम्ही कुठल्या प्राण्याला इजा पोहोचवत नाही, तोवर कुठलाही प्राणी तुम्हाला इजा पोहोचवणार नाही, असं मी मानतो. ‘साप’ या शब्दानेच अनेकांच्या मनात मरणाची भीती निर्माण होते. आजघडीला भारतात सापाच्या साधारण २९४ जाती अस्तित्वात आहेत. त्यांच्यापैकी फारच थोड्या जाती विषारी आहेत. प्रसिद्ध सर्पमित्र नीलिमकुमार खैरे म्हणतात, ‘‘देवाने निर्माण केलेला प्रत्येक जीव अनमोल असेल, तर या जीवसाखळीतल्या कमकुवत जिवांना बळकटी मिळावी, म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे आपण पुन्हा एकदा परिपूर्ण आणि निर्दोष जीवनसाखळीकडे जाऊ शकू. निसर्गातली सापाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. ते जगातल्या उपद्रवी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. उंदराची एक जोडी वर्षाला जवळजवळ २००० उंदरांना जन्म देते. उंदीर हे सापाचं मुख्य अन्न आहे. म्हणूनच सापांना ‘शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं’.’’

जगात विषारी सापही आहेत, पण ते केवळ मजा म्हणून कुणाला चावत नाहीत. किंबहुना माणूस समोर आल्यावर कुठलाही साप निसर्गतः त्याच्यापासून दूरच पळतो. बहुतांश विषारी साप चावण्याआधी सावधगिरीचे अनेक इशारे देतात. त्यांच्या दृष्टीने माणसाला चावणं म्हणजे स्वतःचं विष वाया घालवणं असतं. नाग चावण्याआधीचा इशारा म्हणून फणा काढतो, घोणस कुकरच्या शिट्टीप्रमाणे फुसफुसतो आणि फुरसं स्वत:च अंग स्वत:वरच घासून लाकूड कापल्यासारखा आवाज करतो. अगदी ‘किस ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जाणारा आफ्रिकेतला ब्लॅक माम्बाही पहिल्यांदा तोंड उघडतो आणि काही वेळाने गरज लागली, तरच दंश करतो. थोडक्यात, एखाद्या माणसापासून खूप धोका असल्याचं जाणवल्याशिवाय कुठलाही साप माणसाला चावत नाही.

भारतात विषारी सापांच्या विशेषतः चार जाती सगळीकडे सापडतात. त्या म्हणजे, नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. वास्तविक, सापाच्या याहीपेक्षा विषारी जाती अस्तित्वात आहेत, मात्र या चार जाती जास्त आढळत असल्याने त्यांच्या चाव्याचं प्रमाणही जास्त आहे. सापांच्या अभ्यासाला ‘ओफियॉलॉजी’ असं म्हणतात. विषारी साप चावला, तर फक्त एकच उपचार आहे – सर्पविषरोधक औषध ताबडतोब देणं. यामुळे विषारी साप चावलेल्या माणसाचा जीव वाचू शकतो.

एखादा प्राणी आपल्यावर जितकं प्रेम करू शकतो, तितकं प्रेम कुठलाही माणूस करू शकत नाही. जन्मदाता निसर्ग हा आपला एकमेव गुरू आहे. माणसांपेक्षाही प्राण्यांकडून मी खूप काही शिकलो आणि अजूनही शिकतो आहे. प्राण्यांनी मला वर्तमानात जगायला शिकवलं. एखाद्या कुत्र्याला कॅन्सर झाला, तरी ‘आता माझ्या आयुष्याचे दोनच महिने बाकी आहेत’, असा विचार ते करत नाही. कुठलाही प्राणी दिवसेंदिवस आणि तासन्तास त्याच्या प्रिय सहचरांच्या मृत्यूचा शोक करत बसत नाही. अर्थात, प्राण्यांनाही भावना असतात; पण आपण माणसंच फक्त भविष्याचा आणि भूतकाळाचा विचार करत चिंता करत राहतो; आपल्यातल्या दुबळ्या जिवांना विशेष महत्त्व देतो. निसर्गात मात्र जे कमकुवत असतं ते कुणाच्यातरी वर्चस्वाला बळी पडतं. अशी दुबळी शक्ती भक्षकाचं लक्ष्य बनतं आणि त्यामुळे त्या संपूर्ण कळपाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. निसर्गात प्रत्येक जिवाला तग धरून राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

मी मागच्या वर्षी हेमलकशालाही जाऊन आलो. तो अगदी आगळावेगळा अनुभव होता. आता मी नववीत आहे. रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी काम करणार्‍या एनजीओज् सोबतही मी काम करतो. सध्या काही दिवसांसाठी मी राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानातही स्वयंसेवक म्हणून काम करतो आहे. या उद्यानात सर्पोद्यान आणि वन्य प्राण्यांचं उद्यान असे दोन विभाग आहेत. पैकी मी सर्पोद्यानात काम करतो. इथे काम करण्याचा अनुभव फारच सुंदर आहे. मी जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याचं एक पिल्लूही नुकतंच पाळलं आहे. ते अडीच महिन्यांचं आहे. मला सर्पमित्र व्हायचं असल्याचं समजल्यानंतरही माझ्या घरच्यांनी माझ्या या आवडीला पाठिंबा दिला. नियमानुसार बारावीनंतरच सर्पमित्र होण्यासाठी परवानगी मिळू शकते. त्यामुळे सध्या मी त्यांचं निरीक्षण करायला आणि त्यांना ओळखायला शिकतो आहे. हा माझा छोटासा प्रवास आहे, पण त्याला लवकरच एका मोठ्या प्रवासाचं रूप येईल, अशी माझी खात्री आहे. आत्तापर्यंतच्या या छोट्या, पण सतत चालू असलेल्या प्रवासासाठी ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे.   

..................................................................................................................................................................

लेखक नवव्या इयत्तेत शिकत आहेत.

editor@aksharnama.com

Post Comment

Rohit Deo

Tue , 15 November 2016

Uttam Lekh...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......