आजचे वर्तमान हे फॅसिस्ट स्वरूपाचे आहे…
पडघम - साहित्यिक
संतोष पद्माकर पवार    
  • पहिले युवा विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन
  • Thu , 07 December 2017
  • पडघम साहित्यिक पहिले युवा विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन 1st Yuva Sahitya Sanskruti Sanmelan संतोष पद्माकर पवार Santosh padmakar Pawar

‘पहिले युवा विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन’ पुण्यात २८ नोव्हेंबर २०१७ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी तरुण कवी संतोष पद्माकर पवार यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

बंधू आणि भगिनींनो,

आपणा सर्वांना माझा आदराचा जयभीम!

पहिल्या ‘युवा विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलना’ची आज सुरुवात होते आहे. युवकांमध्ये विद्रोही विचारांची पेरणी होण्यासाठी विद्रोही चळवळीने या संमेलनाची आखणी करून माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्त्याची निवड केली, त्यासाठी मी आपणा सर्वांचे आधीच आभार मानतो. जो विद्रोह करतो तो तरुणच असतो, या न्यायाने आजचे सारे विद्रोही हे तरुणच आहेत. तरी खास युवा संमेलनाचा घाट घातल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद.

‘साम टीव्ही’चे संवादक संजय आवटे यांचे सर्वांग परिपूर्ण घणाघाती भाषण झाल्यानंतर पुढच्या वक्त्याला आपले भाषण विसरायला व्हावे, अशी आता परिस्थिती असताना मी बोलायला उभा आहे.

विद्यापीठात पुरोगामी विचारांची चळवळ नेहमी होत राहावी, याचा आनंद माजी कला अधिष्ठाता आणि मराठी विभागाचे डॉ. मनोहर जाधव यांच्या चेहऱ्यावर ही तरुणाई जमल्याचे पाहून मला आनंद झालेला दिसतोय.

डॉ. बाबुराव गुरव, धनाजी गुरव यांनी युवा विद्रोही सुरू करून पुढच्या पिढीत ही विद्रोही संस्कृती नेऊन ठेवली आहे. येत्या विद्रोहीच्या अध्यक्ष कादंबरीकार, कार्यकर्त्या नजुबाई गावीत याप्रसंगी उपस्थित आहेत.

या संमेलनाचे एक विशेष म्हणजे दिशा शेख ही एक तृतीयपंथी डाव्या विचारसरणीची कवयित्री या विचारपीठावर कवीसंमेलनाची अध्यक्ष आहे. यातून विद्रोहीची व्यापक दृष्टी दिसते आहे. साहित्य आणि संस्कृती यांच्यात विद्रोहाची पेरणी करण्याची ही मला महत्त्वाची खूण वाटते. यासाठी मी तुम्हा सर्व आयोजक तरुणांना धन्यवाद देतो.

लेखकाला पक्ष, पंथ, जात, धर्म यांच्याशी काही घेणे नसते, असे मानणारा लेखक वर्ग आपल्याकडे अस्तित्वात आहे. परंतु आताच्या नव्या नव्वदोत्तरी व्यवस्थेने सर्वांची वर्गवारी लावून ठेवली आहे. आणि त्या अपरिहार्यतेशी तुम्हाला तिने जोडून ठेवले आहे. आता लेखक म्हटले की, त्याची जात, वर्ग, व्यवसाय, त्याचा साहित्यिक गट अशी वर्गवारी होते. लेखक आपल्या लेखक म्हणूनच्या बाह्य वास्तवाकडे आता दुर्लक्ष करू शकत नाही.

आजचे वर्तमान हे फॅसिस्ट स्वरूपाचे असून चाळीसच्या दशकात जे युरोपात घडत होते, त्याची आवृत्ती आता सर्व जगभर निघू लागली आहे. आपल्या भारतातही या प्रतिगामी शक्तींनी कधी नव्हे ते उजळमाथ्याने फिरणे सुरू केले आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या धक्कादायक आहेत. फॅसिस्ट शक्ती मोकाट सुटल्याची ही उदाहरणे आहेत.

रोज नव्याने घडणाऱ्या अनेक घटना या फॅसिस्ट शक्तींचे धाडस वाढत असल्याच्या निदर्शक आहेत. रोहित वेमुला प्रकरण, कन्हैय्या कुमारच्या प्रकरणाची चुकीची हाताळणी, अखलाकची घटना, उनातील दलित हत्याकांड, अगदी मिशा ठेवल्या म्हणून हत्या, जयभीम रिंगटोन ठेवली म्हणून हत्या, इथपासून ते नथुरामसारख्या खुन्याचे मंदिर बांधण्यापर्यंत गेलेली मजल, ही येत्या काळात आणखी वाईट स्वरूपाच्या घटना बघावयास मिळू शकतील याचीच साक्ष देत आहेत. सर्वसामान्य माणूस म्हणून आता चिंता वाटू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे ‘युवा विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन’ या फॅसिस्ट प्रवृत्तींचा धिक्कार करत आहे.

इतिहास

विद्रोही साहित्य संस्कृती शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या लेखकांकडे आदराने पाहते. इथे लेखकाला विद्रोहाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाचारण केले जाते. इथे बंदिस्तपणा नाही. आत-बाहेर जाण्याचे दरवाजे खुले आहेत. हे विद्रोहीचा आजवरचा इतिहास सांगतो.

चक्रधर स्वामी, स्वामी बसवण्णा, नामदेव, एकनाथ, तुकाराम, यामार्गे हा विद्रोह मराठी जनांना दिसून आला आहे. हे संत-माहात्म्यांचे योगदान.

आपल्या इतिहासातील सन १८१८ च्या कोरेगाव भीमाच्या लढाईत सहाशे महार सैनिकांनी केलेला विद्रोह अपूर्व असा होता. त्यांनी पेशवाई भीमेच्या पात्रात बुडविली. हे महार सैनिक दुसऱ्या बाजीरावाकडे आपले गाऱ्हाणे घेऊन गेले की, आता ब्रिटिशांसोबत तुमचे युद्ध अटळ आहे, आम्ही तुमच्या बाजूने लढू इच्छितो. पण बदल्यात तुम्ही आमच्या गुलामगिरीचे प्रतीक असलेले गाडगे-झाडू हटवा. बाजीराव म्हणाला, “हे शक्य नाही, हे देव-ब्राह्मणाचे राज्य...इथे हे अनुचित होणार नाही. तुम्ही आमच्या बाजूने नाही लढलात तर फरक पडणार नाही. आमचे त्या मोहिमेवर पंचवीस हजार सैनिक आहेत. तुम्ही सहाशे आमचे काय करणार?’’

आणि विद्रोहाने पेटलेल्या सैनिकांनी पेशव्यांचा भिमा-कोरेगाव लढाईत पराभव केला. वंचितांची उपेक्षा करणे, त्यांच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञानव्यवस्थेला नाकारणे, हे काम इथल्या धर्मव्यवस्थेने हजारो वर्षे केले. आजही याच पद्धतीने बहुजनांना विविध क्षेत्रात अनुभव येतो आहे. विद्रोही संस्कृती संमेलन या मुद्द्यावर आज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. विद्रोही संमेलनाचे सर्व कार्यघटक याच दिशेने कार्य करीत आहेत. ब्राह्मण आणि भांडवलवादी संरचना खिळखिळी करणे, श्रमण संस्कृती सर्वांना परिचित करणे, हे विद्रोही चळवळीचे उद्दिष्ट आहे.

सर्वांची तोंडे शिवली जाण्याच्या काळात हे विद्रोही संमेलन होते आहे. भाषण करा, लेख लिहा, विचार व्यक्त करा, तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची, अटक होण्याची भीती आहे. हे एक अराजक आहे. आणि गृहयुद्धाची सुरुवात झालीच आहे, असे जाहीर करणेही मुश्कील व्हावे असा हा काळ आहे.

बाबुराव बागुलांच्या एका कवितेतील ओळी या वर्तमानाच्या पृष्ठावर येऊन अक्षरशः नाचत आहेत-

ज्यांनी चूक केली

इथं जन्म घेण्याची

त्यांनीच ती सुधारली पाहिजे

अशोकापरी भीषण युद्धे करून

आंबेडकरांपरी प्रखर प्रचार करून

अथवा धर्मत्याग करून

मोझेसप्रमाणे देशत्याग करून...

या देशात प्रतिक्रांतीचा उदय झालाय आणि असे कधीही होणार नाही असे वाटणारे सर्व स्तंभित होऊन गेले आहेत. प्रतिक्रांतीचा शत्रू आपल्यात रोज फूट पाडतोय आणि बहुजन समाज कुठल्या तरी वर्गीकरणाखाली त्याला आपोआप बळी पडतो आहे. शेतकरी संप, मराठा मोर्चे यांची कशी वाट लागली हे सर्वांच्या समोर आहे. बहुजनांतील वेगवेगळे घटक हेरून त्यांना फॅसिस्ट बनविण्याच्या या जाहीर कार्यशाळा सुरू आहेत. आणि लेखक-कलावंत म्हणून आपल्याकडे कोणत्याही प्रतिवादाचा कार्यक्रम नसावा, याचे मोठे विदारक चित्र समोर आहे. बंडखोर चित्रपटांच्या विरोधी होणारी आंदोलने नेमकी याच विचारसरणीतून जन्मली आहेत. बुद्धिवादी जातीत वाटले गेले आहेत. आता साकल्याने विचार ऐकावयास मिळणे दुर्मिळच झाले आहे. वाहिन्यांतून काम करणारे अँकर एका दिवसात घरी पाठवून या क्षेत्रात भांडवलशाही अर्थव्यवस्थेशी फॅसिस्ट लोकांचा असलेला घरोबा कधीच लपून नाही.

दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी पाहता लवकरच हातची भाकरी हिसकावून खाणारी माणसे रस्तोरस्ती दिसू लागतील. त्याला आजची बिघडलेली परिस्थिती जबाबदार असेल.

या पार्श्वभूमीवर आजचा तरुण हा समाजमाध्यमावर बसून येईल, त्या गोष्टी फॉरवर्ड करीत राहण्याचे काम करतो आहे. त्याला अधिक-उणे, चूक-बरोबर यांच्याशी घेणे दिसत नाही. सगळ्या महाराष्ट्रात काही मूठभर तरुण आपल्या सार्वजनिक चिंतेतून व्यक्त होताना दिसतात. त्यांची संख्या वाढविणे हे आता विद्रोही चळवळीचे काम असले पाहिजे.

या तरुणाला समाजप्रबोधनाचा विचार हा पुरोगामी, विद्रोही चळवळीत असल्याचे दाखवून द्यावे लागेल.

जातवास्तव आपल्याला कधीही नाकारता येणार नाही, पण त्यातून निर्माण होणारे दुःख निवारण करून विद्रोही चळवळ समतेच्या वाटेवर सर्वांना एकत्र ठेवील, आणि नवसमाज त्यातून निर्माण होईल.

मात्र आजकाल तमाम पुरोगामी शक्तींना केवळ प्रतिक्रियावादी बनवून ठेवण्यात प्रतिगामी शक्ती व्यवस्था यशस्वी होत आहेत. निरनिराळ्या घटना घडल्या की, त्यांचा निषेध करण्यात, आणि नंतरच्या घटनाक्रमात त्यामागे फरपटत राहण्याव्यतिरिक्त आपल्याला काहीही कार्यक्रम उरलेला नाही. कुणी खोलेबाई सोवळे उचकून काढते आणि सारेजण त्यातच अडकून पडतात. आणि कित्येक दिवस त्यात वाया जातात.

विद्रोही चळवळीने हा कावा ओळखून आता बाह्य आणि आंतरस्तरावर काम करणे गरजेचे आहे. एक स्पेशल फोर्स प्रतिक्रिया देईल, दुसरी आपले शाश्वत प्रबोधनाचे राहणारे मूळकाम कायमस्वरूपी करत राहावे. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी लेखनाकडे वळावे. आपले अनुभव मांडावे. चळवळीचे संघटन करावे. कार्यकर्त्यांनी उदरनिर्वाहासाठी आपली नोकरी-व्यवसाय पक्का करावा. त्यात जम बसवावा. आणि आपल्या पुढच्या कार्यकर्त्याला उभे करावे. चळवळीला मदत करावी. उत्पन्नाचा छोटासा हिस्सा चळवळीला द्यावा. 

कार्यकर्ता म्हटले की त्याचे वाचन असले पाहिजे, पुस्तके विकत घेऊन वाचावी. त्याचा प्रसार करावा. नाहीतर सांगली येथे झालेल्या विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगुप्पे यांचे ‘न पेटलेले दिवे’ हे पुस्तक नुकतेच छापून आले असताना अध्यक्ष म्हणून केवळ त्यांची आठ पुस्तके विकली गेली. हे काही चांगले लक्षण नाही.

त्यासाठी कामाचे वाटप करून विद्रोहीचे विविध प्रवाह झोकून देतील तर ही बाब सहज शक्य आहे.याचा गांभीर्याने सर्व विचार करतील अशी अपेक्षा मी करतो.

विद्रोही संमेलन माझा सहभाग आणि कवितेची भूमिका

१९९९ साली झालेल्या पहिल्या विद्रोही संमेलनाला मी उपस्थित होतो, आणि तिथेच मला सर्व समविचारी मित्रमंडळी भेटली. आणि माझ्या लेखनाला आणि विचाराला एक योग्य दिशा तिथे भेटली. नंतर मी बहुतांश विद्रोही संमेलनात सहभागी झालो, चळवळीत अधिक उणे झाले. एकाच नावाची विद्रोही संमेलने माझे मित्र भरविताना मी सर्व गटांच्या संमेलनाला जात राहिलो, कारण नकार आणि विद्रोहाचा धागा मला या साऱ्यात समान वाटला. साथी जालिंदर घिगे आणि मी गेली अकरा वर्षे मित्र राहिलो आहे, आणि त्यांनी राहुरी येथे भरविल्या विद्रोही संमेलनाला मला आयोजकांसोबत काम करता आले. मी विद्रोहीच्या इंदापूर, कणकवली, सांगली, राहुरी, परभणी, बीड आणि इतरही अनेक कविसंमेलनात कविता सादर केल्या आहेत.

ही चळवळ माझ्या रोमारोमांत बसली आणि माझ्या कविताही त्या दिशेने प्रवास करत गेल्या आहेत. मला वेगळे काही करावे लागले नाही. 

मला सुचणारी कविता ही चळवळीच्या विचाराला स्पर्श करते. आणि ती पुढे जात राहते. काही कवितेत कार्यकर्ताच जास्त पुढे धावतो. मी तेव्हा स्वतःला मोकळे सोडतो. कवितेला अतिवैचारिकता झेपत नाही. मग ती गद्यात्मक निबंध होण्याचा धोका असतो. मी तेव्हा कवी म्हणून सावध असतो, माझी ही भूमिका काहींना पटणार नाही. पण काही काळजी लिहिताना घ्यावी या मताचा मी आहे. मी कित्येकदा लोकलयीचा आधार घेऊन माझा ‘कवितिकपणा’ जपला आहे. मला भाषेत जगायचे असेल तर ते केलेच पाहिजे. अन्यथा पुढच्या पिढीत ही कविता ‘कविता’ म्हणून जाणार नाही. याची मी कायम चिंता वाहिली आहे. विद्रोही संकल्पना स्वीकारताना कवितेच्या रूपबंधात मी स्वातंत्र्य घेऊन अनेक वेगळ्या तऱ्हेने ती हाताळली. मी कवितेत सच्चा हवा असेल तर मला ते करणे गरजेचे वाटले आहे. माझ्या ‘भ्रमिष्टाचा जाहीरनामा’, ‘पिढीपेस्तर प्यादेमात’ आणि ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ या संग्रहांमध्ये मी स्वतःला चांगले सादर करू शकलो आहे. जाणकारांनी ती पुस्तके अवश्य वाचण्याची मी विनंती करतो. तत्कालीन विषयावर लिहिताना खूप सपक होण्याचा धोका असतो, तो कसा टाळता येईल याकडे मी काहीसे लक्ष दिले आहे. बहुतांश वेळा चळवळीत कविता लिहिणाऱ्या कविलोकांना कुंठित अवस्था येते. ते एकमेकांचे अनुकरण करू लागतात. इतके की कोणती कविता कोणाची हे ओळखणे दुरापास्त व्हावे, अशी परिस्थिती आहे.

प्रतिक्रिया स्वरूपाचे लेखन मीही केले आहे. पण त्यात लेखन म्हणून कवितेचा आणि तिच्या कविता असण्याचा समन्वय घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मी असे करताना रुढीग्रस्त साहित्यपरंपरा पुढे नेतोय, असा कुणी त्यातून गैरअर्थ काढू नये, ही नम्रतेची विनंती. 

राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशी माझ्या कामाची सुरुवात झाली. ९० सालच्या आसपास हिंदुत्ववादी शक्तींनी मोठी उचल खाल्ली. त्या काळात माझे काही मित्र राम मंदिरासाठी फिरून विटा गोळा करीत असत. मला अंनिस आणि नरेंद्र दाभोलकर भेटले आणि मी बदललो. दरम्यान मला पुढील शिक्षण घेण्याचा सल्ला मिळाला. लेखनाचे कौशल्य प्राप्त झाले. मी एक सरकारी नोकरी धरली, पुढे प्राध्यापक झालो, आता तीनेक वर्षांपूर्वी गावाकडे गेलो असताना जुन्या मित्रांना भेटलो, तर ते म्हणे भंगार गोळा करत होते, सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी. दरम्यानच्या काळात त्यांना कसलाही जीवन सुधारण्यासाठी कार्यक्रम मिळाला नसावा. मला त्यांची कीव आली. प्रतिगामी शक्तीने एकदा वेढले की मुक्तता कठिण असते.

मला नेहमी वाटते असे जे कुणी सनातनी विचाराच्या मागे लागलेले जे लोक आहेत, त्यांची त्या दास्यातून मुक्तता करणे, त्यांना हृदपरिवर्तन करून बदलण्याचा कार्यक्रम आपल्याकडे असला पाहिजे. साने गुरुजींनी सेनापती बापट यांना हिंदुत्ववादी तरुणांनी मारहाण केल्यानंतर जे भाषण केले होते, ते मला अशा प्रसंगी आठवते आहे. त्यात त्यांनी या मतपरिवर्तनाचे आवाहन केले होते. याच पद्धतीने आपण समन्वय आणि संवादाचे दरवाजे कायम उघडे ठेवले पाहिजे, असे माझे मत आहे. 

जे जे म्हणून आपले कार्यकर्ते आहेत, त्यांची सार्वजनिक जीवनात काही प्रसंगी कोंडी होते. विशेषतः विविध सणवार प्रसंगी त्याला काही नकोशा गोष्टींना तोंड देण्याची वेळ येते किंवा तेव्हा तो कुठेतरी नकारात्मक भावना घेऊन एकटा बसून असतो. तेव्हा त्याला त्याच्या कुटुंबियांसह साजरा करता येईल असा सांस्कृतिक पर्यायी कार्यक्रम आपल्याकडे असला पाहिजे. यावर चळवळीने खोलवर कार्यक्रम तयार करण्याची निकड मला वाटते.

महात्मा फुल्यांच्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकास अनुसरून ही उपाययोजना अस्तित्वात यावी असे मला वाटते.

विद्रोही भावना ही उपजत असून चळवळीत ती शिस्तबद्ध व्हावी. शत्रूविचाराला ती उद्ध्वस्त करते. पारंपरिक समाजव्यवस्था ही तिचा शत्रू आहे, आणि ती त्यास कायम नकार देते. भारतात धर्मव्यवस्थेतील चातुर्वर्ण्याने इथल्या मातीत फॅसिझमची मुळे आधीच रोवली आहेत. म्हणून दलित, पीडित, गोरगरिबांना हरघडी भेदभाव अनुभवास मिळतो. म्हणून विद्रोही संस्कृती चार्वाकापासून त्याचा धिक्कार करत आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून या लढ्याला मोठे करत या फॅसिझमला रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आज हा समाजवाद लोकशाही व्यवस्था यांची भारतात भक्कम अंमलबजावणी होत नाही, म्हणून या फॅसिझमने पुन्हा थैमान घालावयास सुरुवात केली आहे. अंतिम लढाई फार निकराची आहे. आणि त्यासाठी आपल्या धडावर आपले शीर हवे आहे. ही मांडणी वारंवार होत राहण्याची गरज आहे...

.............................................................................................................................................

‘शॅडो आर्मीज’ या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4296

.............................................................................................................................................

लेखक संतोष पद्माकर पवार मान्यवर कवी आहेत.

santoshpawar365@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 07 December 2017

संतोष पद्माकर पवार, आयशप्पत वर्तमान सुद्धा फ्यासिस्ट दिसू लागलं तुम्हाला? कमाल आहे. अहो, चाळीसच्या दशकात युरोपात तर नाझी धुमाकूळ घालंत होते ना? मग हे फ्यासिस्ट कुठनं उपटले? नाझी नाव घ्यायला लाजताय का? घ्या ना खुशाल. असो. तुमची एकेक विधाने पाहूया. १. >> चक्रधर स्वामी, स्वामी बसवण्णा, नामदेव, एकनाथ, तुकाराम, यामार्गे हा विद्रोह मराठी जनांना दिसून आला आहे. >> संत तुकाराम व संत एकनाथांनी ईश्वरभक्ती केली होती. तुम्ही हा वारसा का आचरणांत आणला नाही? २. >> हे महार सैनिक दुसऱ्या बाजीरावाकडे आपले गाऱ्हाणे घेऊन गेले की, आता ब्रिटिशांसोबत तुमचे युद्ध अटळ आहे, >> >> आम्ही तुमच्या बाजूने लढू इच्छितो. पण बदल्यात तुम्ही आमच्या गुलामगिरीचे प्रतीक असलेले गाडगे-झाडू हटवा. >> >> बाजीराव म्हणाला, “हे शक्य नाही, हे देव-ब्राह्मणाचे राज्य...इथे हे अनुचित होणार नाही. >> ही तद्दन थापेबाजी आहे. पुण्यांत कोणीही महार झाडू लटकावून फिरंत नसे. आणि महार रेजिमेंट जवळ होती म्हणून तिला ब्रिटिशांनी पाचारण केलं. काही महार तर बापू गोखल्यांच्या (म्हणजे पेशव्यांच्या) बाजूने सुद्धा लढले होते. शिवाय जेता पक्ष रणांगाणाचा ताबा घेतो. महारांनी असा ताबा घेतल्याचं आढळून येत नाही. ३. >> कुणी खोलेबाई सोवळे उचकून काढते आणि सारेजण त्यातच अडकून पडतात. आणि कित्येक दिवस त्यात वाया जातात.>> अगदी बरोबर बोललात. खोलेबाईंचे सोवळेओवळे त्यांच्या घरात. नसता चोंबडेपण कोणी करायला सांगितला होता? गेले ना क्रांतीचे दिवस फुकट? ४. >> विद्रोही चळवळीने हा कावा ओळखून आता बाह्य आणि आंतरस्तरावर काम करणे गरजेचे आहे. >> ऐला, म्हंजे कुठेच काम चालू नाही? मग काय माशा मारंत बसलेत विद्रोही लोकं? ५. >> एक स्पेशल फोर्स प्रतिक्रिया देईल, दुसरी आपले शाश्वत प्रबोधनाचे राहणारे मूळकाम कायमस्वरूपी करत राहावे. >> आरेसेस असंच करतो. वेलकम टू हिंदुइझम. ६. >> जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी लेखनाकडे वळावे. आपले अनुभव मांडावे. चळवळीचे संघटन करावे. >> >> कार्यकर्त्यांनी उदरनिर्वाहासाठी आपली नोकरी-व्यवसाय पक्का करावा. त्यात जम बसवावा. आणि आपल्या >> >> पुढच्या कार्यकर्त्याला उभे करावे. चळवळीला मदत करावी. उत्पन्नाचा छोटासा हिस्सा चळवळीला द्यावा. >> हे सगळं करायचं तर अंगी कर्तृत्व हवं ना! आरक्षणात अडकून पडल्यावर काय डोंबल्याचं कर्तृत्व गाजवणार? ७. >> विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगुप्पे यांचे ‘न पेटलेले दिवे’ हे पुस्तक नुकतेच छापून आले >> >> असताना अध्यक्ष म्हणून केवळ त्यांची आठ पुस्तके विकली गेली. हे काही चांगले लक्षण नाही. >> बरोबरे. विद्रोही जनतेने विद्रोही संमेलनाच्या अध्यक्षाविरुद्ध विद्रोह केला. ही तर आनंदाची बातमी आहे ना? ८. >> भारतात धर्मव्यवस्थेतील चातुर्वर्ण्याने इथल्या मातीत फॅसिझमची मुळे आधीच रोवली आहेत. >> >> म्हणून दलित, पीडित, गोरगरिबांना हरघडी भेदभाव अनुभवास मिळतो. >> रोचक विधान आहे. जर हिंदू धर्मव्यवस्था इतकी फ्यासिस्ट आहे तर अफगाणिस्थान, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया हे मुस्लिम देश नेहमी भारताच्या प्रगतीचं आणि निर्भयतेचं उदाहरण का देत असतात? असो. प्रतिसादाची अपेक्षा नाही. मात्र आत्मचिंतन जरूर करावे. आपला नम्र, -गामा पैलवान


Rakshit P

Thu , 07 December 2017

लेखामध्ये रोहित वेमुला,ऊनाची घटना, अख़लाक़ हत्या या घटनांचा धिक्कार केला आहे व ते बरोबर आहे. पण मागच्या वर्षी कोपर्डीमध्ये एका बालिकेवर काही नराधमांनी बलात्कार करून तिची निघृण हत्या केली. या घटनेचा निषेध आपण लेखात केला नाही. तसेच खोले बाईंवर आपण सोवळी पाळले म्हणून टिका करतात पण भाऊ कदम याने गणपती आणला म्हणून काही लोकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली त्याबद्दल आपण मौन बाळगता. असे का बरे ? आरोपी आणि पिडीत व्यक्तिची जात बघून, एखाद्या घटनेचा निषेध करायचा की नाही हे विद्रोही साहित्यिक ठरवतात का ? आणि तसे असल्यास, हे वागणे फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी म्हणवणारया महाराष्ट्राला साजेसे आहे का ? असो. बाकी साहित्य संमेलन वगैरे याबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही. हंगामी लेखक/कवी (ज्यांचे नवांसुद्धा कधी एेकले नसते) यांना मिरवता येण्यासाठी संमेलने भरवली जातात का अशी शंका मनांत येते कधी कधी. ज्या महाराष्ट्राने एके काळी अत्रे, पुल, चिवि जोशी, आनंद यादव, कुसुमाग्रज यांसांरखे महान लेखक व कवी पाहिले. तेथे आज साहित्याची दुरावस्था झाली आहे. लेखक व कवींचा महापूर आला आहे. जो उठतो तो कवि बनतो. संमेलनात गणती केल्यास श्रोते कमी व कवि/लेखकांची संख्याच जास्त असा प्रकार आढळून येईल. भविष्यात तर कदाचित 'किलोवर' कविता/लेख विकले जातील. त्यामुळे अशया संमेलन व सभांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......