हिंदी चित्रपटसृष्टीतील 'अभिनयचंद्र' मावळला
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी 
  • शशी कपूर - १८ मार्च १९३८ - ४ डिसेंबर २०१७
  • Tue , 05 December 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie शशी कपूर Shashi Kapoor

अभिनेता शशी कपूर अखेर दीर्घ आजारानं गेला. 'शशी' म्हणजे चंद्र. त्यामुळे शशी कपूरच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अभिनयचंद्र’च जणू मावळला आहे. कारण त्याचं व्यक्तिमत्त्वदेखील चंद्रासारखंच 'शीतल' होतं. त्याचे ज्येष्ठ बंधू राज कपूर यांचं १९८८ मध्ये निधन झालं. त्यानंतरचे बंधू, शम्मी कपूर (२०११) गेला आणि आता शशी कपूर. त्यामुळे शशीच्या निधनानं कपूर खानदानातील दुसऱ्या पिढीचाही एका अर्थानं अस्तच झाला असं म्हणावं लागेल. ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांची ही तीन मुलं. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून 'कपूर खानदान' म्हणजे हिंदी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील मोठं 'घराणं' बनलं होतं. मात्र राज, शम्मी आणि शशी या त्यांच्या तिघांही मुलांनी आपल्या 'घराणेशाही'चा कधी टेंभा मिरवला नाही. तिघंही आपापल्या अभिनय श्रेष्ठतेवर यशस्वी होत गेले.

त्यातही शशी कपूरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत मिळवलेलं यश खरोखरच अद्वितीय आणि कौतुकास्पद होतं. कारण एकीकडे राज कपूर आणि शम्मी कपूर या आपल्या ज्येष्ठ बंधूंचं हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी वरचं स्थान असताना, आणि दुसरीकडे 'अँग्री यंग मॅन' अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार राजेश खन्ना, विनोद खन्ना यांसारख्या अभिनेत्यांशी स्पर्धा असतानाही शशी कपूर यांनी अभिनयात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आणि आपले जवळजवळ  सर्वच चित्रपट यशस्वी केले. 'कपूर खानदान' का हा तिसरा बेटा केवळ स्वकर्तृत्वावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करू शकला. 

निरागस पण देखणा चेहरा हे शशी कपूरचं खास वैशिष्टय होतं. त्याच्या चेहऱ्यावरचं मोहक हास्य आणि हसताना त्याच्या गालाला पडणारी खळी, यामुळे त्याचा देखणा चेहरा आणखीनच खुलून जायचा. आपला निरागस चेहरा त्यानं बालकलाकार म्हणून अगदी सुरुवातीच्या 'आग', 'आवारा' चित्रपटापासून ते मोठेपणी नायक म्हणून 'शर्मिली', 'त्रिशूल' आदी अनेक चित्रपटांपर्यंत कायम टिकवला. 'आवारा' चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करताना तर त्याचा 'मासूम' चेहरा अजूनही डोळ्यासमोर तरळतो. आपल्या आजारी आईसाठी 'वडा-पाव'ची चोरी करताना पकडल्यानंतर त्याच्या  'मासूम' चेहऱ्यानं जे भाव व्यक्त केले, ते पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही.

तर दुसरीकडे 'दीवार' चित्रपटात 'अँग्री यंग मॅन' अमिताभ बच्चनच्या ‘मेरे पास बंगला है, कार है, बँक बॅलन्स है, शोहरत हैं, और तुम्हारे पास क्या है?’ या उसळत्या आणि त्वेषानं म्हटलेल्या 'डायलॉग'ला ‘मेरे पास माँ हैं’ हे कमालीच्या शांतपणे शशी कपूरनं दिलेलं चार शब्दांचं उत्तर, कोणालाही हेलावून टाकल्याशिवाय राहत नाही. त्याचं हे उत्तर अमिताभच्या आधीच्या शंभर शब्दांच्या 'डॉयलाग'वर एका क्षणात मात करून जातं. शशी कपूरच्या अभिनयाची हीच तर खासीयत होती! 

हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या शशी कपूरचा नायक म्हणून 'धर्मपुत्र' (१९६१) हा पहिला चित्रपट. त्यानं एकूण ११६ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांपैकी ६१ चित्रपटांमध्ये तो 'नायक' होता. साठ ते ऐंशीच्या दशकांपर्यंत त्यानं आपल्या विविध भूमिकांद्वारे एक कसदार अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. त्या काळात गाजलेल्या सर्वच अभिनेत्यांबरोबर आणि अभिनेत्रींबरोबर शशी कपूरनं काम केलं. अभिनेत्री नंदा आणि शशी कपूरची रोमँटिक जोडी त्या काळात विशेष गाजली. 'जब जब फुल खिले' (१९६५), 'मोहब्बत इसको कहते हैं (१९६५), 'नींद हमारी ख्वाब तुम्हारे', (१९६६) 'राजा साब', (१९६९) 'रुठा ना करो' (१९७०) हे उभयतांचे चित्रपट चांगलेच गाजले. शशी कपूरच्या मते नंदा ही त्याची सर्वांत जास्त आवडती अभिनेत्री होती, तर नंदाच्या मते शशी कपूर हा तिचा सर्वांत जास्त आवडता अभिनेता होता. 

आशा पारेख, झीनत अमान, शर्मिला टागोर, हेमा मालिनी, राखी, परवीन बाबी, रिना रॉय, मौसमी चॅटर्जी आदी नायिकांबरोबर तर शशी कपूरनं नायक म्हणून काम केलंच, शिवाय बबिता व नीतू सिंग यांसारख्या त्यावेळच्या नवोदित नायिकांबरोबरही नायक म्हणून त्यानं काम केलं. (बबिता आणि नीतू सिंग पुढे चालून कपूर खानदानाच्या सुना आणि शशी कपूरच्या वहिनी झाल्या.) अभिनेत्यांबरोबर म्हणाल तर त्याची अमिताभ बच्चनबरोबर विशेष जोडी जमली होती आणि निर्माते-दिग्दर्शकही अमिताभबरोबर काम करायला सर्वांत अधिक पसंती द्यायचे ते शशी कपूरलाच. कारण अमिताभ बच्चनला तोडीस तोड 'टक्कर' देणारा हा एकमेव अभिनेता आहे याची त्यांना खात्री असायची. 'रोटी कपडा और मकान', 'दीवार', 'कभी कभी', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'सुहाग', 'नमक हलाल,' 'इमान धरम', 'दो और दो पाच', 'शान', 'सिलसिला', 'अकेला' या बारा चित्रपटांत अमिताभ बच्चन-शशी कपूरची जोडी गाजली. याशिवाय अनेक मल्टिस्टारर चित्रपटांतही शशी कपूरनं काम केलं, मात्र त्यातही आपल्या भूमिकेचा स्वतंत्र ठसा उमटवला.  

हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणेच शशी कपूरनं 'हॉलिवुड' चित्रपटसृष्टीही गाजविली. 'मर्चंट आयव्हरी प्रौडक्शन'नं निर्मिती केलेल्या 'हाऊसहोल्डर', 'शेक्सपिअर वाल्ला', 'बॉम्बे टॉकी', 'हिट अँड डस्ट' या चित्रपटांत, तसंच 'द डिसिव्हर्स', 'साईड स्ट्रीट' 'सिद्धार्थ', 'मुहाफीज' आदी चित्रपटांतही त्याच्या प्रमुख भूमिका होत्या. यापैकी 'सिद्धार्थ'ची नायिका होती सिमी गरेवाल. 

पृथ्वीराज कपूर यांनी स्थापित केलेल्या 'पृथ्वी थिएटर्स ग्रुप'चा खरा वारसा चालवला तो शशी कपूरनंच. चित्रपटात काम करत असतानाच त्यांनी अनेक नाटकांतही कामं केली. 'पृथ्वी थिएटर्स'मध्ये काम करत असतानाच त्याची अभिनेत्री जेनिफरशी ओळख झाली आणि नंतर त्यांच्या प्रेमाचं रूपांतर विवाहात झालं. शशी कपूर-जेनिफरची संजना आणि कुणाल ही दोन मुलं आता 'पृथ्वी थिएटर्स ग्रुप'चा वारसा पुढे चालवत आहेत.

शशी कपूरनं नाटक आणि चित्रपटांत केवळ अभिनय केला नाही, तर चांगल्या नाटकांची आणि चित्रपटांची निर्मितीही केली. 'जूनून', 'कलयुग', '३६ चौरंगी लेन', 'विजेता', 'उत्सव' 'अजुबा' हे काही त्यानं निर्मित केलेले दर्जेदार चित्रपट होत. त्याच्या या चित्रपटांना समीक्षकांनीही गौरवलं होतं. यापैकी '३६ चौरंगी लेन'ची नायिका होती जेनिफर, तर 'विजेता' चा नायक होता शशी कपूरचा मुलगा कुणाल कपूर. अर्थात कुणाल कपूर व करण कपूर ही त्याची दोन मुलं चित्रपटसृष्टीत टिकू शकली नाहीत. १९७८ मध्ये पत्नी जेनिफरचं कर्करोगामुळे निधन झाल्यानंतर शशी कपूर एकाकी पडला. काही चित्रपटांत सहायक कलाकारांच्या भूमिका केल्यानंतर त्यानं पडद्यावरील आपल्या अभिनय कलेला 'गुडबाय' केलं. अलीकडच्या काळात किडनीच्या विकारानं दीर्घ काळ तो आजारी होता. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारतर्फे त्याला 'दादासाहेब फाळके' हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कारदेखील त्यानं आपले बंधू राज कपूर यांच्याप्रमाणेच 'व्हील चेअर'वरच स्वीकारला. 

.............................................................................................................................................

निवडक नरहर कुरुंदकर : खंड तीन (ग्रंथवेध) – संपादन – विनोद शिरसाठ, देशमुख आणि कंपनी, पुणे, पाने – ३२०, मूल्य – ३२५ रुपये. या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4291

.............................................................................................................................................

एक चांगला संवेदनशील अभिनेता असण्याबरोबरच शशी कपूरची माणुसकी जपणारा एक उत्तम माणूस म्हणूनही ख्याती होती. आपल्या कार चालकाच्या विवाहानिमित्त त्यानं स्वतःहून जंगी पार्टी दिली होती. चित्रीकरणाच्या वेळीही सेटवर वातावरण नेहमीच खेळकर ठेवण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असायचा. अशा या खेळकर अभिनेत्यानं काल सायंकाळी 'एक्झिट' घेतली.

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......