टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • @BJP4Maharashtra या हँडलवरून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करण्यात आलेलं ट्विट
  • Mon , 04 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis राहुल गांधी Rahul Gandhi सुब्रम्हण्यम स्वामी Subramanian Swamy

१. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या @BJP4Maharashtra या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ट्विट करण्यात आलं होतं. राज्य प्रशासनात दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना देवेंद्र फडणवीस सरकार ३० टक्के कर्मचारी कपात करायला निघाले आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ आहे की, ‘फूल इन महाराष्ट्र’ असे दोन हॅशटॅगही या ट्विटमध्ये वापरण्यात आले. तसंच या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, महाराष्ट्र काँग्रेस, संजय निरूपम, सचिन सावंत या सगळ्यांना टॅगही करण्यात आलं होतं. चूक लक्षात आल्यावर हे ट्विट हटवण्यात आलं. मात्र या ट्विटचा स्क्रीन शॉटही व्हायरल होतो आहे.

भाजपमध्ये कोणाचं हृदयपरिवर्तन होऊन त्यांना सत्यदर्शन झालं की, मुख्यमंत्र्यांना आतल्या आतून इशारा दिला गेला की, इतरांसाठी खणलेल्या (हॅकिंग, ट्रोलिंग, सायबर बुलिइंगच्या) खड्ड्यात आपणच पडण्याचा अनुभव मिळाला, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, यानिमित्तानं ‘मेक फूल्स इन इंडिया’ असं एक सार्वकालिक, सर्वपक्षीय स्लोगन मिळून गेलं.

.............................................................................................................................................

२. गुजरातमधील महिलांना न्याय का मिळत नाही, असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. गुजरातमध्ये महिलांविरोधात वाढत असलेले गुन्हे, त्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि शिक्षणाच्या स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मोदींनी महिलांना खोटं आश्वासन दिल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमध्ये भाजप २२ वर्षांपासून सत्तेवर आहे, पण येथील महिलांविरोधातील गुन्ह्याप्रकरणी शिक्षेचा दर फक्त तीन टक्के इतकाच असल्याचं आकडेवारीसह स्पष्ट केलं. गुजरात मानव तस्करीत तिसरा, महिलांवर अॅसिड हल्ल्याप्रकरणी पाचवा आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कारप्रकरणी दहाव्या स्थानी असल्याची माहिती त्यांनी दिली.

महिला? हा काय प्रकार असतो बुवा? गाय वगैरेंच्या वर्गातली असेल, तर ती आम्हाला मातेसमान आहे. माता आम्हाला अधूनमधून लोकांपुढे आणून वात्सल्याचं प्रदर्शन घडवण्यापुरतीच हवी असते. इतर महिलांना तर आम्ही गणतीतच धरत नाही. त्यामुळे उगाच विकासात बिलकुलही गणले न जाणारे मुद्दे काढून लोकांचा बुद्धिभ्रम करू नका... तसा तो होण्याची शक्यताही नाही म्हणा.

.............................................................................................................................................

३. सोमनाथ मंदिरातील वादानंतर राहुल गांधी हे ‘जानवेधारी हिंदू’ असल्याचं सांगणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शिवभक्त असलेल्या राहुल यांचा भगवान रामावरही तितकाच विश्वास आहे का, असा सवाल लेखी यांनी विचारला. राहुल गांधी हे कपड्यांच्या वर जानवे घालणारे एकमेव ब्राह्मण असल्याचं त्यांनी म्हटलं. राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिराविषयी काय विचार करतात, हे सांगावं, तसंच त्यांनी २००२ साली गोध्रा येथे झालेल्या कारसेवकांच्या कत्तलीविषयी भाष्य करावं, असं मीनाक्षी लेखी यांनी म्हटलं आहे.

लेखीबाईंनी आपलं आडनाव फारच सिरिअसली घेऊन राहुल यांची लेखी परीक्षाच घ्यायला सुरुवात केलेली दिसते. इतके प्रश्न त्यांनी कधी मोदींना विचारले असते, तर त्यांना प्रश्नोत्तरांची सवय तरी झाली असती. बाय द वे, रामाच्या अस्तित्वाच्या पुराव्यांची गरज काय, राम हा श्रद्धेचा विषय आहे, असं सांगणाऱ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी इतरांच्या विश्वासाची उलटतपासणी घ्यावी, हे मजेशीर आहे. रामाला न मानणाऱ्यांसाठी पाकिस्तानची गाडी सुटणार वाटतं लवकर...

.............................................................................................................................................

४. अयोध्येत लवकरच राम मंदिराचं काम सुरू होणार असून पुढील दिवाळीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी ते खुलं होईल, असा दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. सर्व काही तयार आहे असून मंदिर निर्मितीसाठी आवश्यक सामानही तयार आहे. त्यांना फक्त स्वामी नारायण मंदिराप्रमाणे जोडण्याचीच गरज आहे. त्या जागेवर पूजा करण्याचा माझा आणि हिंदू समाजाचा मूलभूत अधिकार आहे, असं मी न्यायालयाला सांगितलं आहे.

राम मंदिर उभारल्यानंतर तिथं सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या कायमस्वरूपी बैठकीचीही व्यवस्था करायला हवी. त्यांना पाहिल्यावर भाविकांचा रामाबरोबरच वानरसेनेच्या अस्तित्वावरही विश्वास बसून जाईल.

.............................................................................................................................................

५. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात होणारा लाउडस्पीकर्स आणि डीजेचा गोंगाट बंद करावा, अशी मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे. महापरिनिर्वाण दिनाचं गांभीर्य राखणं, तसंच आंबेडकरी अनुयायांना होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास दूर व्हावा, या उद्देशानं विविध संघटनांनी ही मागणी केली आहे. सीडी विक्रेते, तसेच डीजेंवर कठोर कारवाई न झाल्यास आंबेडकरी जनता स्वयंस्फू्र्तीनं हा गोंगाट बंद पाडेल, असा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

सार्वजनिक उत्सवप्रसंगी गोंगाट नको असं खुद्द उत्सव करणाऱ्या संघटनांनीच सांगावं, हा अभिनंदनीय आणि अनुकरणीय असा विरळा प्रसंग आहे. सार्वजनिक सणसमारंभांमध्ये गोंगाट केल्याशिवाय ते साजरे होत नाहीत, आपल्या धर्माचं किंवा विचारांचं शक्तिप्रदर्शन होत नाही, असं मानून अनेक दिवस धिंगाणे घालून शहरं वेठीला धरणाऱ्या नादान मंडळं आणि संस्थांना ही मोठी चपराक आहे.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......