हिटलर आणि मुसोलिनीचा राष्ट्रवाद (उत्तरार्ध)
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
किशोर बेडकीहाळ
  • अडॉल्फ हिटलर
  • Wed , 29 November 2017
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बेनिटो मुसोलिनी Benito Mussolini अडॉल्फ हिटलर Adolf Hitler राष्ट्र राष्ट्रवाद

मुसोलिनी आणि हिटलर या हुकूमशहांबद्दल बहुतेक सर्वजण ऐकून असतात. पण त्यांच्याविषयी अनेकांना सविस्तर  माहिती नसते. या हुकूमशहांना जाणून घेणं आजच्या काळात नितांत निकडीचं झालं आहे. त्यामुळे या प्रदीर्घ लेखाचं हे पुनर्प्रकाशन. या लेखाचा पूर्वार्ध काल प्रकाशित झाला होता.

.............................................................................................................................................

हिटलर हे रसायन मुसोलिनीपेक्षा थोडं वेगळं आणि मुसोलिनीपेक्षा अधिक निर्दयतेच्या, क्रौर्याच्या सर्व सीमा पार करून गेलेलं व्यक्तिमत्त्व. आणि तरीसुद्धा ते वरून अत्यंत शांत आहे. म्हणजे शांत माणसाच्या आतमध्ये ठासून भरलेल्या निर्दयतेचं तो प्रतीक होता. ही निर्दयता त्याने जगापुढे आणली. हिटलर १८८९ला जन्मला, १९४९ साली त्याचा मृत्यू झाला. (नंतरच्या काही संशोधकांनी पुढेही तो जगला, अर्जेंटिनात गेला, काही काळ त्याने अज्ञातवासात काढला, अशा प्रकारचं संशोधन मांडलेलं आहे. त्याची पुस्तकं उपलब्ध झाली आहेत, पण त्याला अजूनही निर्णायक पुरावा मिळत नाही.) हिटलरच्या जोडीला त्याने सांगितले त्याप्रमाणे त्याचे अंत्यसंस्कार करायला जे लोक होते, त्यांनी लिहिलेल्या लेखनाप्रमाणे तो मेला हे आजतरी आपल्याला मान्य करावं लागतं. हिटलरवर प्रभाव कोणाचा? हा जन्माला आला ऑस्ट्रिया आणि जर्मनी याच्यामध्ये डॅन्यूब नदी आहे तिच्या तीरावर एका खेड्यात. हा कलावंत (चित्रकार) होणार होता, पण त्याला महायुद्धाच्या काळात ऑस्ट्रियामध्ये प्रोत्साहन मिळालं नाही.

त्याने ‘माईन काम्फ’ (‘माझी वाटचाल’) म्हणून आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्याने त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा होता, तर त्याला इतिहास शिकवणारे एक शिक्षक होते त्यांचा, त्यांच्यावर भरभरून लिहिलं आहे. आणि ते कसा इतिहास शिकवायचे? त्याने असं लिहिलं की, ते तो सबंध इतिहास उभा करायचे. हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा प्रभाव.

दुसरा प्रभाव ‘राइट टू डेथ’ नावाच्या पुस्तकाचा आहे. त्या ‘राईट टू डेथ’ची थिअरी काय आहे, तर जगात मानवजातीनं निर्माण केलेली सर्वांत श्रेष्ठ संस्था कोणती? त्याचं एक उत्तर आहे ‘स्टेट’ नावाची. समाज विस्कळीत होता. त्याचं समाजामध्ये रूपांतर झालं. त्याचं राष्ट्रात रूपांतर झालं. राष्ट्राचा निर्णायक घटक कोणता असतो, तर राष्ट्र एका विशिष्ट सरहद्दीमध्ये, एका केंद्रीय राज्यसंस्थेखाली असतं. ज्याला समान परंपरा आहेत, समान भविष्याच्या आकांक्षा आहेत, दीर्घकाळाचा सहवास आहे, परस्परावलंबित्व त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्यांना एकत्र राहण्याची इच्छा आहे, अशा एका विशिष्ट सरहद्दीमध्ये एका केंद्रीय राज्यसंस्थेखाली नांदणारा समूह म्हणजे राष्ट्र, अशी एक व्याख्या राज्यशास्त्रामध्ये उत्क्रांत होत आलेली आपल्याला दिसते. हिटलरला ही केंद्रीय राज्यसंस्था सर्वश्रेष्ठ वाटत होती व समूह दुय्यम वाटत होते.

हिटलर राहत होता ऑस्ट्रियामध्ये. हे एक साम्राज्य होतं. ते फेडरल आहे, त्याच्यामध्ये जर्मनी आहे. म्हणजे स्लाव्ह, जर्मन्स आणि ऑस्ट्रियन्स अशा तीन-चार प्रकारच्या वंशाचे लोक एकत्रित राहणारे हे फेडरेशन आहे. म्हणून हिटलरनं त्याचं वर्णन ‘मल्टिनॅशनल स्टेट’ असं केलं आहे. ऑस्ट्रिया हे ‘मल्टिनॅशनल स्टेट’ आहे आणि पुढे तो असं म्हणतो की, इतक्या वेगवेगळ्या, विविध प्रकारचे वांशिक लोक एकत्र राहणं हीच गोष्ट अशक्य आहे. कारण त्याच्यातून सरकारद्वारा त्यांच्यावर योग्य नियंत्रण होत नाही आणि प्रत्येक वंश वेगवेगळा असल्यामुळे जो वंश जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, त्याची गळचेपी होते.

सर्वश्रेष्ठ वंश कोणता आहे, तर तो जर्मनांचा. हिटलरची अशी धारणा होती की, तो वंश हा त्यावेळच्या युरोपमधला सर्वश्रेष्ठ असल्यामुळे डार्विनच्या नियमाप्रमाणे त्यालाच फक्त जगायचा अधिकार आहे, उरलेल्यांनी त्याच्या अंकित व्हायला पाहिजे. म्हणून तो राष्ट्राकडे वेगळ्या पद्धतीनं बघतो, ते वंशवादाने प्रभावित झालेल्या सिद्धान्तनाच्या आधारे.

दुसरं, हिटलरला एक अनुकूलता होती. इटलीला जशा व्हर्सायच्या तहामध्ये जाचक अटी स्वीकाराव्या लागल्या, तशाच जर्मनीलाही जाचक अटी स्वीकाराव्या लागल्या. आणि जर्मनी नामशेषच व्हायला पाहिजे, भविष्यात जर्मनीचं डोकंच वर येता कामा नये ही व्हर्सायच्या तहाच्या वाटाघाटी करताना फ्रेंच मुत्सद्द्यांची भूमिका होती, ब्रिटिश मुत्सद्द्यांची नव्हती. कारण त्यांचे हेतू वेगळेच होते. त्यांना जर्मनी आपल्या चौकटीत, नियंत्रणात हवा होता, पण फ्रेंचांना हेच नको होते. हे पहिल्या महायुद्धात अनुभवाला आलं आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं थेट फ्रान्सचा पाडाव केला. त्यामुळे फ्रेंचांचं जर्मनांशी सतत वाकडं होतं. परिणामी फ्रेंचांची जर्मनीनं डोकं वर काढू नये अशी भूमिका असल्यामुळे वाटाघाटीत जर्मनीला अपमानास्पद अटी सहन कराव्या लागल्या.

दुसरं कारण त्याला सापडत नव्हतं. ते ऑस्ट्रियामधल्या वास्तव्यात त्याला सापडलं. जर्मनीमध्ये ज्यूंची संख्या बऱ्यापैकी होती, ते अल्पसंख्याक होते, तरीसुद्धा ज्यू धनाढ्यांची संख्या बऱ्यापैकी होती. म्हणजे २५-३० धनाढ्य त्यावेळच्या जर्मनीत असतील, तर त्यातील पाच-सात कुटुंबं ज्यूंची होती. शिक्षणसंस्था, उद्योगधंदे या ठिकाणी आणि जर्मनीमध्ये लष्करी उत्पादकांचा मोठा व्यवसाय होता, तो ज्यूंच्या सहभाग व पाठिंब्यानेच चालतो अशी त्याची धारणा होती. काही अंशी त्यात तथ्यांशही होता.

हिटलरच्या काळामध्ये, युरोपमध्ये ज्यूंच्या विरोधाची लाट आली होती. त्याच्यातून काही अंशी त्या काळातला आणि नंतरच्या काळातला रशियाही सुटलेला नाही. त्याचाही परिणाम हिटलरच्या विचारात झालेला आहे. (पण युरोपातील राष्ट्रांनी महायुद्धानंतर पश्चिम युरोपमध्ये ज्या पद्धतीनं लोकशाही प्रणाली स्वीकारली, तिथं त्या लाटेला प्रतिबंध झाला.) त्यामुळे एका बाजूला फ्रेंच आणि दुसच्या बाजूला ज्यू, हे दोन शत्रू हिटलरच्या डोळ्यापुढे होते.

तिसऱ्या बाजूला हिटलरला ऑस्ट्रियासारखं ‘मल्टिनॅशनल स्टेट’ नको होतं, कारण जर्मन वंशाची सत्ता सगळ्यात बलवान असलेली आणि नैसर्गिकदृष्ट्या राज्य करायला योग्य असणारा हा एकमेव वंश. त्याच्या श्रेष्ठत्वाला त्यात अवसर नव्हता. या तीन भूमिकांचा परिणाम त्याच्यावर झाला.

राष्ट्रवादाच्या मांडणीत हिटलरने वेगळी भर टाकली आहे. (मुसोलिनी काही फार वेगळं मांडत नाही आहे.) बहुतांशी हिटलरच्या अभ्यासकांना त्याच्या मांडणीमध्ये समान सूत्र दिसतं की, त्यानं राष्ट्र नावाची एक फँटसी निर्माण केली. ही त्याची फँटसी अशी आहे की, राष्ट्र नावाची जी गोष्ट आहे ती काहीतरी मूर्त स्वरूपामधील ‘रिअ‍ॅलिटी’ आहे, वास्तव आहे. ती स्वतंत्र आहे, इन्डिपेंडंट ऑफ पर्सन आहे. आतापर्यंतच्या राष्ट्रवादी विचारामध्ये राष्ट्र ही संकल्पना अमूर्त आहे, ती मनात असते आणि जोपर्यंत मनात असते, तोपर्यंत नाहीशी होत नाही. हिटलरसाठी मात्र ती मूर्त होती.

दुसऱ्या बाजूला हिटलरचं एक प्रसिद्ध वाक्य आहे – ‘ह्युमन बिइंग इज नथिंग, नेशन इज एव्हरीथिंग’. माणसाच्या अस्तित्वाला शून्य किंमत आहे. यू आर नथिंग, जर्मन मॅन इज नथिंग, व्हॉट इज एव्हरीथिंग? जर्मनी इज एव्हरीथिंग, नेशन इज एव्हरीथिंग हा त्याच्या फॅसिझमचा खरा गाभा आहे. आणि म्हणून तो युवकांना संबोधित करत असताना काय सांगायचा – ‘यू आर अ जर्मनी, युवर पास्ट इज जर्मन, युवर प्रेझेंट इज जर्मन, युवर फ्युचर इज जर्मन, व्हॉटएव्हर देअर इज शुड बी जर्मन’.

हिटलरसुद्धा १९१९ला सैन्यात दाखल झाला. (मुसोलिनी त्या काळात सैन्यात दाखल झाला) तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, जर्मनी पडली ती लष्कराची म्हणून जी एस्टॅब्लिशमेंट असते त्या सर्वांनी व्हर्सायच्या अटी मान्य केल्या म्हणून. त्यामुळे व्हर्सायच्या अटी ज्यांनी आमच्यावर लादल्या ती दोस्त राष्ट्रं आमची शत्रू आहेत. व्हर्सायच्या अटी ज्या लिबरल डेमॉक्रॅट्सच्या सरकारनी मान्य केल्या, त्यांनी जर्मनीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असं त्याचं म्हणणं होतं. या अपमानाचा बदला घेण्यासाठी जर्मनीचं स्वतंत्र संघटन उभं करणं, हे त्याच्या आयुष्याचं इतिकर्तव्य ठरलं आणि म्हणून तो ऑस्ट्रियातून बाहेर आला. त्याची भाषणाची स्टाईल इतकी प्रभावी होती की, त्याला त्या पातळीवर समांतर कोणी शोधायचं असेल तर आजचं आपलं नेतृत्व पाहावं लागेल. तो इतकं प्रभावी बोलायचा की, आता जर्मनी मीच वाचवू शकतो, दुसरं कोणीही नाही. पण हे वाचवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं विसर्जन.

म्हणून हिटलरच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये व्यक्ती स्वत:ला विसर्जित करत असते. राष्ट्राविषयी ह्युमन बिइंग इज नथिंग, नेशन इज एव्हरीथिंग ही भूमिका घेऊन तो उभा राहिला. त्याने सरळ भांडवलदारांसोबत तडजोड केली. काही शाळा सुरू केल्या. सबंध अर्थव्यवस्था युद्धाच्या कामी लावली आणि युद्धमान राष्ट्र म्हणून जर्मनीला घोषित केलं. हे त्याला लपूनछपून करावं लागलं, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या आधी ज्या अटी लादलेल्या होत्या, त्यात लष्करी उत्पादनावर बंदी होती. या सगळ्याचा अंदाज जोखून त्याने लष्करी उत्पादनाला सुरुवात केली आणि मग शाळा, कॉलेजेस्, वर्तमानपत्रं ही सगळी साधनं त्याला स्वत:ला चालणारी असली पाहिजेत. याशिवाय राष्ट्राला अशा एका दैवी शक्तीची भीती वाटावी आणि वाटली पाहिजे, अशीही कल्पना केली. तो म्हणाला – ‘देअर इज अ कॉस्मिक फोर्स ट्रायिंग टू डिस्ट्रॉय द जर्मनी’.

सतत लोकांना तो सांगतो की, अशी एक शक्ती आहे की, जी जर्मनीचा नाश करण्यासाठी टपलेली आहे. दुसऱ्या बाजूला – ‘बायो केमिकलक व्हायरस इन द ब्लड ऑफ जर्मनी दॅट इज ज्यू’. ज्यूंच्या रूपाने बायो केमिकल व्हायरस आहे. म्हणून जर्मनी काय आहे? इट इज अ ब्लड, इट इज अ रेस, इट इज अ नेशन. त्या राष्ट्रामध्ये जर व्हायरस शिरला असेल तर काय करावं लागतं? तो असं म्हणतो, (जर्मनीमध्ये नाझी डॉक्टर्स नावाची संघटना होती पूर्वी नाझींच्या काळात.) ‘वंश शुद्ध करायचा असेल तर ज्या पद्धतीने शरीराचा अशुद्ध भाग काढून टाकावा लागतो, तसं या वंशामध्ये जे मिश्रण झालं आहे ते काढून टाकायचं.’ ६० लाख ज्यूंची कत्तल गॅस चेंबरमध्ये त्याने केली आणि ती त्याच्या दृष्टीने आवश्यक होती. जर्मनवंशाच्या शुद्धीकरणाकरता.

जर्मन वंश पुन्हा बळकट होईल आणि तो बळकट झाला तर तो पुन्हा जगावर राज्य करेल, म्हणून त्याने त्याच्या राष्ट्रवादाच्या चिंतनामध्ये एक खुबीनं तिसरी गोष्ट टाकली. हिटलरच्या राष्ट्रवादाच्या मांडणीमधला कळीचा मुद्दा जर कोणता असेल तर ‘नागरी राष्ट्रवाद’ (Civic nationalism) विरुद्ध ‘वांशिक राष्ट्रवाद’ (Racial nationalism ). सिव्हिक नॅशनॅलिझमचा अर्थ काय? यात नागरिकांना काही हक्क, कर्तव्यं आहेत; नागरिक आणि राज्य यांचा काहीतरी संबंध आहे आणि तिथे राष्ट्र नावाची गोष्ट ऑरगॅनिक राहत नाही, ती मानवी राहते. हा सिव्हिक नॅशनॅलिझमचा प्रभाव आहे.

हे नष्ट करून रेसिअल नॅशनॅलिझमचा प्रभाव उभा करणं आणि त्यासाठी जिथे जिथे जर्मन्स आहेत, तिथे जर्मन्सना हक्क हवेत. त्याच्या काळामध्ये जर्मनीच्या इतिहासामध्ये सुडेटो जर्मन्स नावाचं एक प्रकरण होतं. शेजारच्या राष्ट्रामध्ये राहणारे जे जर्मन्स आहेत, त्यांना जर्मनीच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क द्यायचा का, असा एक प्रश्न उपस्थित झालेला होता. (जसं आपण म्हणतो की, एनआरआयना मतदानाचा हक्क द्या. ते तिकडे राहतात पण भारताचे नागरिक आहेत.) तेव्हा हिटलरने असं सांगितलं की, असा हक्क असला पाहिजे. जिथं जिथं जर्मन्स आहेत, ते जर्मन राष्ट्र आहे आणि जर्मनीत जे इतर राहतात ते जरी जर्मनीची भाषा बोलणारे असले, माझ्या पक्षाला मतदान करणारे असले तरीसुद्धा दे आर नॉट जर्मन्स.

हिटलरने चीनचं उदाहरण दिलेलं आहे. चीनमधला एखादा माणूस जर्मनीत राहतो, जर्मन भाषा बोलतो, जर्मनीच्या समाजजीवनात भर टाकतो, जर्मन संस्कृतीमध्ये काही भर टाकतो, आणखी जर्मनीबद्दल काही आस्था बाळगतो. इतकं त्याने केलं तरीसुद्धा ही इज नॉट अ जर्मन. जो जर्मन नाही, त्याला मतदानाचा हक्क नाही. याचा अर्थ काय तर जर्मन प्रदेशाची व्याप्ती वाढवत जाणं, विस्तारवादी राष्ट्रवाद तयार करणं आणि जितकं आणता येईल तितकं जग आपल्या ताब्यात आणणं आणि मग त्याचं साम्राज्य करणं.

याचा दुसरा अर्थ काय होतो हे लक्षात घ्या. जर्मन राष्ट्राने जर्मन वंशाचं संरक्षण केलं नाही तर ती जर्मन राष्ट्राची हानी होय. त्याचं गृहीतच हे आहे. म्हणून त्याने मार्क्सवादाचा एक सिद्धान्त उत्तमपणे वापरला आहे. मार्क्सवादामध्ये ‘शेप अ‍ॅन्ड कन्टेन्ट’ नावाचा सिद्धान्त आहे. कन्टेन्ट म्हणजे काय तर तुम्ही कुठल्याही आकाराचं भांडं घेतलं आणि त्यात पाणी ओतलं तर पाण्याचा आकार कसा असेल? जसं भांडं असेल तसा आकार होईल. त्याचा वापर त्याने ‘जर्मनी इज अ कन्टेन्ट शेप्स’ असा केला. म्हणजे जर्मन रेस आणि म्हणून त्या भांड्यामध्ये जोपर्यंत जर्मन रेस आहे, तोपर्यंत ते भांडं टिकलं पाहिजे, तसं जर्मनीत जर्मन राष्ट्र टिकलं पाहिजे. कारण आपल्या वंशाचं संरक्षण करणं हीच रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट असं त्यानं मांडलं. हेच त्याचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य करण्यासाठी मग जर्मनीचं राज्य येणं म्हणजे जर्मन्सचं राज्य येणं, नाझी असणं म्हणजे जर्मनीचं प्रतीक असणं, त्यासाठी फ्युरर अशी त्याने स्वत:ची इमेज तयार केली. फ्युरर आणि तो यांच्यामध्ये तो भाषणांद्वारा संवाद करायचा. पत्रकारांना वगैरे तो फारसं मानायचा नाही. थेट लोकांच्यात संवाद करणं ही फॅसिस्ट नेत्यांची एक युक्ती असते. लोकांशी संवाद करून लोकांना तुम्ही जर कन्व्हिन्स केलंत तर यू डोन्ट नीड एनी इन्स्ट्रूमेन्ट लाइक पार्टी. तुमचं नेतृत्व उभं करायला पक्ष लागत नाही. आणि पक्ष तुमच्या पंखाखाली असला आणि तुमच्यामध्ये लोकांना अपील करायची ताकद असली तर ज्या प्रकारे इंदिरा गांधींनी राज्य केलं, आता आपल्याकडे मोदी राज्य करताहेत, तसं हिटलरने केलं. त्याला फार वर्षे त्याला मिळाली नाहीत, फक्त बाराच वर्षे मिळाली. म्हणून तो जर्मन हे ‘ऑरगॅनिक स्टेट’ आहे, तसेच अ‍ॅबसोल्यूट स्टेट आहे, असं म्हणे.

हिटलरच्या राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये काय? राष्ट्र नावाची एक स्वतंत्र गोष्ट आहे, ज्यूज् आर बॅक्टेरिया. हा जर्मनीच्या वंशामध्ये रक्तात शिरलेला व्हायरस आहे, वंशाचं रक्षण करणं हे राष्ट्राचं कर्तव्य आहे. ह्युमन बिइंग इज नथिंग, नेशन इज एव्हरीथिंग. पास्ट, प्रेझेन्ट, फ्यूचर इव्हरीथिंग इज जर्मनी, मी जर्मन आहे, तुम्ही जर्मन आहात, तुमच्यात जर्मनी आहे व जर्मनीपेक्षा तुम्ही वेगळे नाही. म्हणून तुम्हाला स्वत:चं व्यक्तिमत्त्व नाही. जर्मनी इज सुपर्ब, अल्टिमेट, टॉपमोस्ट अ‍ॅण्ड पर्सन इज सेकंडरी. स्टेट हॅज राइट टू कील इ. तो असं म्हणतो की, माणसाच्या जीवितावर अंतिम सत्ता कोणाची तर ती स्टेटची. माणसावर स्वत:ची सत्ता नाहीच, माझं आणि मी स्वत:चं नातं काय ते नातं नाही, माझ्यावर सत्ता स्टेटची म्हणून स्टेट हॅज राइट टू कील. राज्यसंस्थेला लोकांचा जीव घेण्याचा अधिकार आहे. हे त्याच्या राष्ट्रवादाचं भयानक वास्तव आहे. पुढे तो म्हणतो, इन्डिव्हिज्यूअल अ‍ॅण्ड स्टेट यांच्यात निर्णायक कोण आहे तर स्टेट. लोकशाहीच्या भूमिकेच्या पूर्ण विरोधी. ते हुकूमशहाच्या मर्जीनं बहाल केलेलं ‘कन्सेशन’ आहे. पण तेसुद्धा सब्जेक्ट टू म्हणजे कोणाच्यातरी मर्जीच्या अधीन असलेलं. व्यक्तीनं स्वत:चं संपूर्ण विसर्जन करायची तयारी ठेवणं हा सर्वोच्च त्याग आहे. म्हणून माझं स्टेट पॉलिटिक्स ऑफ सिंगल पार्टी असेल असं तो म्हणे. त्याच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यानं जाहीर केलं, जर्मनीमध्ये सर्व पक्ष बरखास्त करण्यात आलेले आहेत. नाझी नावाचा जो पक्ष आहे, तो एकमेव पक्ष या देशात राहील. मोड ऑफ फंक्शन डिक्टेटोरल, हुकूमशाहीच्या पद्धतीनं. सोसायटीचं स्ट्रक्चर कसं असेल? ते सिंग्युलर पद्धतीचं असेल. हिटलर सिव्हिक नॅशनॅलिझम आणि एथनिक नॅशनॅलिझम याच्यात फरक करतो.

रा. स्व. संघाचे गुरू गोळवलकरांचं सबंध लेखन\साहित्य पाहिलं तर काय दिसतं? हिटलरचा ज्यू बाजूला करा तिथे मुसलमान ठेवा. काहीही फरक दिसणार नाही. बाकी स्टेटची रचना तीच, विस्तारवाद तोच, राइट टू कील स्टेटकडे असावं हे म्हणणं तेच आहे, ‘अ‍ॅटॅक इज द बेस्ट डिफेन्स’ तेच. हे सगळं जे हिटलरचं म्हणणं आहे ते गोळवलकरांच्या लेखनामध्ये दिसेल. म्हणून या गोळवलकर, हिटलर, मुसोलिनी या तिघांचाही ऑरगॅनिक स्टेट, एथनिक स्टेट, डेमोक्रॅटिक स्टेट या गोष्टीवर विश्वास… राज्यसंस्था सर्वोच्च सर्वंकष असली पाहिजे. गोळवलकरांनी काय सांगितलं, एक धर्म, एक प्रांत, एक भाषा, एक विधिमंडळ पुढे दुसरं काहीही नाही. नेशन इज एव्हरीथिंग ही त्यांची भूमिका. १९१९ साली नाझी पक्षाची स्थापना झाली, गोळवलकर पारतंत्र्यात असल्यामुळे त्यांना पक्ष काढायला १९५० साल उजाडलं. त्यांच्या जनसंघ पक्षाची स्थापना स्वातंत्र्यानंतरची, एवढा काय तो फरक. अ‍ॅन्टी मार्क्ससिझम, अ‍ॅन्टी सोशॅलिझम, अ‍ॅन्टी डेमॉक्रॅटिक, अ‍ॅन्टी लिबरल, पर्सन इज सेकंडरी हे कॉमन. गोळवलकरांनी सांगितलं की, आपण महान हिंदू राष्ट्राचा एक छोटा घटक आहोत, हिंदू राष्ट्रासाठी आपलं स्वत:चं विसर्जन करणं ज्याप्रमाणे हिटलर, मुसोलिनी म्हणतो. राष्ट्राची ताकद कशात आहे हल्ला करण्यामध्ये आहे, संरक्षण करण्यामध्ये नाही.

.............................................................................................................................................

नवनवीन मराठी पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/

.............................................................................................................................................

आता आजच्या परिस्थितीचं साधर्म्य. हिटलर, मुसोलिनीला एक अनुकूलता काय होती राष्ट्र एका बाजूला... अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय सत्ता एकसंध नाही अशा वेळेला एका अनुकूल परिस्थितीमध्ये एक प्रभावी प्रचाराचं माध्यम त्यांनी वापरलं. ही दोन्हीही राष्ट्रे स्वतंत्र होती. आजच्या काळात हे आपल्याकडे मोदींच्या बाबतीत आहे. २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या काळात जे युपीएचं राज्य होतं जे कामच करत नाही, राज्यात भ्रष्टाचार अमाप वाढलेला आहे, लोकांचा राज्यसंस्थेवरचा विश्वास चाललेला आहे ही कंडिशन मोदींना अनुकूल होती आणि प्रभावी प्रचाराचा आणि माध्यमांचा वापर करून त्यानी स्वत:चं नेतृत्व सिद्ध केलं. हे तिघांमधील साम्य आहे.

मुसोलिनी आणि हिटलर या दोघांचा अंत झाला. दोघांची कुठलाही वारसा मागे उरला नाही. फारसे अनुयायी उरले नाहीत. आजही फॅसिस्ट पक्ष आहेत, पण त्यांना कुठल्याही पातळीवर प्रतिष्ठा नाही. हिटलरचं नाव उच्चारायचीसुद्धा जर्मनीमध्ये बंदी आहे, इतका तो वारसा लोकांनी टाकून दिलेला आहे. (आपल्याकडे उलट घडतं. एवढं मल्टिकल्चरल असणारं स्टेट आता सिंगल नेशनकडे वाटचाल करायला लागलं आहे.) याचं कारण मुसोलिनी आणि हिटलरने दीर्घकालीन संयम न पाळता संस्थात्मक कामाच्या समाज बांधणीकडे दुर्लक्ष केलं. गोळवलकरांनी तसं दुर्लक्ष केलं नाही, म्हणून त्यांच्या माघारी संघाच्या सगळ्या यंत्रणा आणि त्याच्या हाती सत्ता आली. म्हणजे संस्थात्मक बांधणी समाजजीवनात किती महत्त्वाची असते ते या दोघांना उलगडलं नाही, सावरकरांना उलगडलं नाही, पण गोळवलकरांना उलगडलं. म्हणून गोळवलकरांचा संघ आज सत्तेमध्ये तुम्हाला दिसतो. हिटलर व मुसोलिनी हे सत्तेच्या बाहेर गेलेले दिसतात. सावरकरांचा फक्त जपमाळ म्हणून वापर केला जातो, यापलीकडे सावरकरांना काहीएक स्थान नाही.

(पन्हाळा येथील युवा शिबिरात १३ मे २०१७ रोजी केलेले भाषण.)

.............................................................................................................................................

हा प्रदीर्घ लेख ‘साप्ताहिक युगांतर’च्या दिवाळी २०१७च्या अंकात प्रकाशित झाला आहे. लेखक-प्रकाशकांच्या पूर्वसंमतीने त्याचे पुनर्प्रकाशन करत आहोत. 

.............................................................................................................................................

लेखक किशोर बेडकीहाळ राजकीय-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

kishor077@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 30 November 2017

किशोरबुवा, तुमच्या विवेचनात एक गोष्ट राहून गेली. ती म्हणजे जर्मनी आणि हिटलर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर्मनी हिटलरच्या बराच आधी निर्माण झाला आहे. हिटलरला वंशवादी म्हणून हिणवणं सोपंय पण तसं करतांना जर्मनीच्या समस्येकडे दुर्लक्ष होतंय. जर्मनीची अडचण अशी की युरोपातल्या बलाढ्य सत्ता इंग्लंड, फ्रान्स , रशिया यांच्याकडे आपत्कालीन सहाय्याचा मोठा साठा होता. गरज पडल्यास इंग्लंड अमेरिकेचं सहाय्य घेऊ शकत होतं. रशिया तशाच धर्तीवर सैबिरीया व मंगोलिया इथून कच्चा माल व मनुष्यबळ मिळवू शकंत होतं. फ्रान्सकडे उत्तर आफ्रिकेतल्या वसाहती होत्या. जर्मनीकडे व्यापनभूमी (= लिबेनस्राऊम = lebensraum) म्हणून काय होतं? काहीच नाही. भरीस भर म्हणून देशभर यहुदी धुडगूस घालीत बसले होते. वायमर प्रजासत्ताकाची अंदाधुंदीची कल्पना आजच्या झिम्बाब्वेकडे बघून येईल. अशा परिस्थितीत देशाला कोणी स्थैर्य पुरवलं तर जर्मन लोकं त्यास पाठींबा देणारंच ना? हिटलरचा वंशवाद आणि यहुद्यांचा द्वेष वगैरे परीकथा आहेत. तुम्ही लिहिलेत ते हिटलरचे भांडवलदार प्रामुख्याने यहुदी (=ज्यू) पतपुरवठादार होते. याच पतपुरवठादारांच्या सहाय्याने सर्वसामान्य यहुद्यांना प्यालेस्टाईन मध्ये स्थलांतरास उद्युक्त केलं गेलं. या योजनेस हावरा करार म्हणतात. हिटलरला ज्यू जर्मनीबाहेर जायला हवे होते आणि या योजनेस ज्यू भांडवलदारांचा पूर्ण पाठींबा होता. सांगायचा मुद्दा काये की वस्तुस्थिती नीट लक्षात घेऊन मगंच लिखाण करावे. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......