टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नारायण राणे, रावसाहेब दानवे, नरेंद्र मोदी, गिरीश बापट आणि हादिया
  • Tue , 28 November 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya नारायण राणे Narayan Rane रावसाहेब दानवे Raosaheb Danve नरेंद्र मोदी Narendra Modi गिरीश बापट Girish Bapat हादिया Hadiya

१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांच्या सांगण्यावरूनच मी काँग्रेसचा राजीनामा देऊन ‘एनडीए’त सामील झालो. आता भाजपची भूमिका मला मान्य आहे. माझ्याविरोधात तीन पक्षांना एकत्र यावं लागतं, यातच माझा विजय आहे, असा टोला नारायण राणे यांनी विरोधकांना लगावला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपनं नारायण राणेंऐवजी प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याचं जाहीर केल्यानंतर ते बोलत होते.  

दादानूं, सावरून घेताय खरं; पण, दोन्ही घरचा पाहुणा उपाशीच राहिला की हो! काँग्रेसपेक्षा भाजप काय वेगळी वागली हो तुमच्याशी? प्रसंगी शिवसेनेशी पंगा घेऊ, पण कोकणातल्या बलाढ्य नेत्याला मंत्रीपद देऊच, अशी भूमिका भाजपने का घेतली नाही? तुम्ही एनडीएत सहभागी व्हायचं ठरवलंत तेव्हा तुमच्या स्वागतासाठी शिवसेना सुवासिनींचं तबकधारी पथक पाठवेल, अशी मुख्यमंत्र्यांची भाबडी समजूत होती की तुमची?

.............................................................................................................................................

२. आपल्या वडिलांनी आपल्याला ११ महिने सक्तीने डांबून ठेवलं आहे. आपल्याला स्वातंत्र्य हवं आहे. आपली जबाबदारी वाहायला आपला पती समर्थ आहे, असा स्वच्छ जबाब केरळमधील तथाकथित लव्ह जिहाद प्रकरणात हादिया या वधूनं सर्वोच्च न्यायालयासमोर दिला. आता तिच्या पित्याच्या तावडीतून तिची सुटका झाली असून पुढील शिक्षणासाठी तिला सेलममधील महाविद्यालयात पाठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयां दिले आहेत. तिनं इस्लाम धर्म स्वीकारून जहान या मुस्लीम तरुणाशी विवाह केल्यानंतर हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला होता आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) त्याला दुजोरा दिला होता.

कायद्यानं सज्ञान असलेल्या मुलीच्या निर्णयांमध्ये आई-वडिलांनी किती ढवळाढवळ करावी आणि ते किती खेचावं, याला काही मर्यादा असतात. त्या उल्लंघल्या की असा मुखभंग होतो. बाकी या प्रकरणामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा केवढ्या महत्त्वाच्या राष्ट्रकार्याला जुंपण्यात आली आहे, हेही उघड झालं आहेच.

.............................................................................................................................................

३. ‘पद्मावती’ चित्रपटातील अमान्य असणाऱ्या चित्रिकरणाला कात्री लावूनच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी द्यावी, अशी भूमिका भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतली आहे. देशभरात पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी होत असताना पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात राज्य सरकार योग्य निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी विनंती पोलिस प्रशासनाला केली आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

गिरीश बापट आणि त्यांच्या देशभरातल्या पक्षबांधवांनी नेमकं कशाचं सेवन करून मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे तुमचं काम आहे, उपकार नव्हेत. सिनेमे सेन्सॉर करण्याचे अधिकार हवेत, तर सेन्सॉर झालेल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची जबाबदारीही घ्यायला हवी. ते झेपत नसेल, तर सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा, म्हणजे निर्माते आपल्या जबाबदारीवर सिनेमे काढतील, प्रदर्शित करतील आणि स्टेनगनधारी रक्षक नेमून त्यांची सुरक्षाही पाहतील. सेन्सॉर बोर्डानं मंजूर केलेल्या सिनेमांमध्ये कोणताही सोमाजी गोमाजी कापसे आक्षेप घेणार आणि तुम्ही मान तुकवणार असाल, तर घटनात्मक पदं सोडून पायउतार व्हा.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

४. मी चहा विकला होता. पण देश विकला नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर नुकताच जोरदार हल्ला चढवला. ‘मी गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून माझ्यावर टीका केली जाते. एका गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान झाली आहे. मात्र हे काँग्रेसच्या अद्याप पचनी पडलेलं नाही. काँग्रेसनं अशा प्रकारे गरिबांची थट्टा करणं थांबवावं. त्यांनी माझ्या बालपणीच्या गरिबीची चेष्टा करू नये,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी ‘चहावाला’ म्हणून टीका करणाऱ्या काँग्रेसला उत्तर दिलं. ‘एखादा पक्ष इतक्या खालच्या पातळीवर कसा काय उतरु शकतो?,’ असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मोदींनी आपल्या पक्षाच्या दिवट्यांनी २०१४पासून चालवलेला प्रचार पाहिलेला नाही काय? पक्ष आणि समर्थक किती खाली उतरू शकतात, याचं त्यांना घरच्या घरीच दर्शन घडलं असतं. लालबहादूर शास्त्रींपासून मनमोहन सिंगांपर्यंत गरीब घरातून आलेले पंतप्रधान तर काँग्रेसनेही दिले; फक्त त्यांनी नंतर दिवसाला सात सूट बदलून गरिबीचं उट्टं काढलं नाही आणि मी गरीब घरातून आलो म्हणून मला बोलतात, असं रडून-गागूनही दाखवलं नाही. गरीब घरातून आलो, हे काही पात्रता प्रमाणपत्र नाही, याची त्यांना कल्पना होती. बाकी राफेलच्या सौद्याची चर्चा सुरू असताना त्यांनी देश विकण्याबिकण्यावर बोलावं, हे तर फारच थोर आहे.

.............................................................................................................................................

५. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषद अथवा मंत्रिपदाचं कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. मात्र, एनडीएच्या मंत्रिमंडळ विस्तारप्रसंगी त्यांना मंत्रिपद देण्याबाबत विचार करण्यात येईल, असं भाजप प्रदेश अध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं.

देशात उसाची शेती हे हमखास उत्पन्नाचं नगदी पीक मानलं जात होतं आतापर्यंत. पण, आताच्या या क्रांतिकारक सरकारनं कॅश क्रॉपही बदलून दाखवलं आहे. आता देशात सर्वाधिक नफा मिळवून देणारं पीक एकच... गाजराचं पीक.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......