“जर खरंच विकास झाला असता, तर मोदींना प्रचारसभा घ्याव्या लागल्या नसत्या”
पडघम - गुजरात निवडणूक २०१७
किशोर रक्ताटे
  • गुजरात निवडणूक २०१७
  • Mon , 27 November 2017
  • पडघम गुजरात निवडणूक २०१७ Gujarat Elections 2017 नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi भाजप BJP काँग्रेस Congress

गुजरात विधानसभा निवडणूक सर्व बाजूंनी राष्ट्रीय आस्थेचा विषय बनली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये नेमकी कुणाची सरशी होणार, का होणार, सध्याचं गुजरातमधील वातावरण कुणाला अनुकूल आहे, का आहे, अशा विविध प्रश्नांविषयी गुजरातमधील सर्वसामान्य जनतेपासून अभ्यासकांपर्यंत अनेकांशी प्रत्यक्ष बोलून निरीक्षणं मांडणारी ही खास लेखमालिका... फक्त ‘अक्षरनामा’वर.

..............................................................................................................................................

गुजरातमध्ये फिरण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सुरतनंतर आता भरुचमध्ये आहोत. भरुचला आल्यानंतर काँग्रेस या लढाईत आहे, असं सुरुवातीपासून जाणवत आहे. भरुच हा काँग्रेसचा जुना बालेकिल्ला. मात्र सध्या इथं पाच पैकी चार आमदार भाजपचे आहेत. मुस्लिम समाज संख्येनं दखलपात्र असलेला हा जिल्हा आहे. एकूणच, काँग्रेसच्या पारंपरिक मतांची संख्या भरुचला जास्त आहे, असं कळल्यानं हा जिल्हा आजच्या परिस्थितीत समजून घेणं जास्त महत्त्वाचं वाटल्यानं आम्ही या भागात जरा जास्त फिरण्याचं ठरवलं.

पहिल्यांदा पत्ता विचारण्याच्या निमित्तानं थबकलो. खूप रिक्षावाले एकत्र दिसले. त्यांना आम्ही इकडे गेस्ट हाऊस कुठे आहे असं विचारलं, तर एकदम चार-पाच रिक्षावाले जवळ आले. फारच आस्थेनं त्यांनी रस्ता सांगितला. पुण्याचा अनुभव पाठीशी असल्यानं रिक्षावाल्यांचं कौतुक वाटलं. म्हणून आम्ही गाडी थांबवली. हळूच निवडणुकीचा अभ्यास करत आहोत असं सांगितलं. महाराष्ट्रातून आलोय म्हटल्यावर त्यातल्या एकानं ‘तुम्हा, महाराष्ट्राच्या लोकांना राज ठाकरेबद्दल अन शिवसेनेबद्दल बोललं तर आवडत नाही,’ असं ऐकवलं. पण आम्ही विषयांतर करून त्यांना विश्वासात घेतलं. मग मात्र ते भरभरून बोलू लागले.     

गुजरातमध्ये सत्ता कोणाची येईल अन् गुजरातचं काय होईल, या प्रश्नावर सगळ्यांनी हे ठामपणे सांगणं अवघड असल्याचं मान्य केलं. जातीच्या राजकारणाला गुजरातमध्ये या वेळी अधिक महत्त्व आल्यानं ही निवडणूक गुंतागुंतीची बनत चालली आहे, असा त्यांचा सूर होता. हिंदुत्वाच्या राजकारणाची यशोभूमी असलेलं गुजरात जातकेंद्री राजकारणाचा विचित्र अड्डा बनला असल्याची त्यांची खदखद दिसत होती. तरीही निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होण्यासाठी भाजप नवनवे फॉर्मुले वापरणार असल्याचं ते सांगत होते. मात्र या सगळ्या चर्चेत गुजरातचा विकास या विषयावर जेव्हा चर्चा पुढे सरकली, तेव्हा मात्र त्यांचा सूर बदलला. त्यातल्या वयानं सर्वाधिक बुजर्ग असणार्‍या एकानं सांगितलं, “विकास तुम्हाला दिसत असेल असं आम्हाला वाटत नाही. कारण कोणतंही सरकार असतं तर विकास झालाच असता. आमचा विकास विशिष्ट भागाचा विकास आहे. त्यातच काही उद्योगपतींचा विकास आहे. जर खरंच विकास झाला असता, तर मोदींना प्रचारसभा घ्याव्या लागल्या नसत्या.”

त्याच्या म्हणण्यात भर टाकत दुसरा म्हणाला, “कितीही  सभा घेतल्या तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. यावेळी आम्ही काँग्रेसला निवडून देणार. मोदींच्या भाषणांची आता आम्हाला सवय झाली आहे. ते भावनिक बोलतात. मार्केटिंग करतात. न केलेल्या कामाचं क्रेडिट घेतात...”

हे सगळं बोलत असताना ते काँग्रेसच्या नाकर्तेपणावरही बोट ठेवत होतेच. राहुल गांधींकडे सातत्य नाही. ग्राउंडवर लोकांना काय हवंय ते काँग्रेस शोधत नाही, अशी नाराजी त्यांच्या बोलण्यात होती. मात्र एक प्रकारचा त्रागा ते व्यक्त करत होते. भाजप पक्ष म्हणून त्यांना फारसा खटकत नव्हता. मात्र मोदींच्या चुका अन आश्वासनावर ते नेमकेपणानं बोलत होते.

त्या चर्चेत एकानं मोदींची जुनी आठवण सांगून आम्हाला आश्चर्य चकित केलं. तो म्हणाला, “पूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना प्रचाराला आले, तेव्हा मोदींनी ‘काँग्रेस घाबरली म्हणून पंतप्रधानांना प्रचारात आणत आहे’, असं म्हटलं होतं. आता हीच गोष्ट मोदीजी विसरले आहेत का?” या माणसाच्या स्मरणशक्तीनं लोकशाही जिवंत असल्याचं अन लोक सजग असल्याचं आमच्या लक्षात आलं.

हे सगळं चर्चेतून अधिक उलगडत गेलं म्हणून भरूचमध्ये आणखी काही लोकांशी आम्ही बोलत गेलो. भरूचमध्ये सर्वसामान्य लोकांना भाजपबद्दल असणारा राग त्यांच्या बोलण्यात तर दिसतोच, पण गेल्या २२ वर्षांच्या काळात झालेल्या विकास कामाचं श्रेय केंद्राचं किती अन राज्याचं किती इतपर्यंत ही चर्चा गेली. या अनुषंगानं एकजण म्हणाला, “केंद्रातील काँग्रेस सरकारच्या कामांचीदेखील मोदींनी उदघाटनं केली आहेत.” ही सगळी चर्चा रस्त्यावर भेटलेल्या रिक्षावाल्यासोबत झालेली आहे. त्यांचा अभ्यास कमी, पण निरीक्षणं मात्र त्यांच्या त्यांच्या स्तरावर प्रामाणिक होती.

सर्वसामान्य माणसांचं सजगपण अनुभवल्यानंतर आम्ही भरुचला मुक्कामाच्या जागी पोहचलो. दुसर्‍या दिवशी भरुच जिल्हा काय आहे, याचा थोडा अभ्यास केला. हा दक्षिण गुजरातमधील लोकसंख्येच्या आकारमानानं व भौगोलिकदृष्ट्या लहान असलेला जिल्हा आहे. असं असलं तरीही या शहराला प्राचीन इतिहास आहे. १८८१ साली इंग्रजांनी नर्मदेच्या दक्षिण काठावर वसलेलं हे शहर आहे. या जिल्ह्यात नऊ तालुके व चार नगरपालिका (म्युन्सिपालटीज) असून १.६९ लाख लोकसंख्या आहे. हे शहर ‘इंड्रस्टियल हब’ म्हणून ओळखलं जातं. कारण याच शहरात अंकलेश्वर हे तालुक्याचं ठिकाण आहे. अंकलेश्वर हे आज आशिया खंडात जुनी इंड्रस्टी असणारं शहर म्हणूनही ओळखलं जातं. भरूचमध्ये जांबुसर, वगरा, झगेडिया, भरूच आणि अंकलेश्वर अशा पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. झगेडिया हा आदिवासींसाठींचा राखीव मतदारसंघ आहे.

२००७ पासून या मतदारसंघात जनता दल युनायटेड या पक्षाचे छोटुभाई वसावा हे निवडून येत आहेत. झगेडिया मतदारसंघात ६० ते ७० टक्के लोक आदिवासी आहेत. वगरा व जांबुसर हा मतदारसंघ २००७ साली काँग्रेसकडे होता, पण २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत झगेडिया वगळता पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आले. सध्या या पाचही विधानसभा मतदारसंघात खरी लढत ही भाजप व काँग्रेस या दोन्ही तुल्यबळ असणाऱ्या राष्ट्रीय पक्षांत आहे.

त्याशिवाय छोटुभाई वसावा ज्या मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाले, त्या झगेडिया या मतदारसंघात यावेळी छोटु वसावा नावाचाच उमेदवार उभा असल्यानं या मतदारसंघात रंगत वाढली आहे. हा नवीन छोटुभाई भाजपनं जाणीवपूर्वक अपक्ष उभा केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्याच बरोबर जनता दलाच्या छोटुभाईंनी त्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्याचं कळलं. यामागचं प्रमुख कारण म्हणजे जनता दलाचे छोटुभाई वसावा यांचं काम या मतदारसंघात चांगलं आहे. त्यांना मानणारा आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नावावरून लोकांमध्ये गोंधळ निर्माण व्हावा आणि भाजपच्या उमेदवाराला जनता दलाची मतं मिळावीत, यासाठीचा हा डाव असल्याची चर्चा इथं सुरू आहे.

जिल्हा पंचायतीमध्ये (जिल्हा परिषद) सध्या काँग्रेस व जनता दल (यु.)चं युती सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत जनता दल व काँग्रेसच्या आघाडीचा सामना करताना कसरत करावी लागणार आहे, असं लोक म्हणतात.

भरूच हा मतदारसंघ खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. कारण (इंदिरा गांधी यांचे पती अन राहुल गांधींचे आजोबा ) फिरोज गांधी यांचं मूळ गाव याच भागात असल्यानं आजवर काँग्रेसची अस्मिता या जिल्ह्यासोबत जोडलेली आहे. याबाबत काही मुस्लिम लोक गमतीनं असं म्हणतात की, भरूच हे तर इंदिरा गांधी यांचं सासर आहे. त्यामुळे येथील मुस्लिम समाज काँग्रेस पक्षाला आपला पक्ष मानतो. काँग्रेस पक्षाची पाळंमुळं या भागात घट्ट रुजलेली दिसतात.

सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार व काँग्रसचे राज्यसभा सदस्य अहमद पटेल हेदेखील मूळचे भरूचचे. त्यामुळे या शहरात व जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची व्होट बँक पक्की होती. असं असतानाही मागील दोन विधानसभांच्या टर्ममध्ये इथून भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. त्याला मुख्यतः काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद हेच कारण असल्याचं लोक सांगतात. त्यामुळे पक्षाचं संघटन कमकुवत होत गेलं. ओघानंच पक्ष सत्तेच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेला आणि त्याची जागा भाजपनं भरून काढली. हे जसं काँग्रेसचं संपूर्ण गुजरातमध्ये झालं, तेच भरुच शहरातदेखील घडलं.

भरूच हे शहर हिंदू, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी आणि काही प्रमाणात दलित अशा जातीय समीकरणांनी आकारास आलं आहे. पण हिंदू-मुस्लिम यांचं प्रमाण अधिक असल्यानं या दोन जाती एकमेकांच्या परस्परविरोधी आहेत. यातही जे हिंदुत्ववादी अस्मिता जोपासणारे हिंदू आहेत, ते मुस्लिमांचा द्वेष करतात. त्यामुळे त्यांच्यात राजकीयदृष्ट्या वैचारिक विरोधाभास आहे. येथील मुस्लिम हे खऱ्या अर्थानं पारंपरिक आहेत. भरुच शहरात साधारणतः मुस्लिमधर्मीय लोकांची वस्ती ही शहराच्या मध्यभागी मोहम्मदपुरा या ठिकाणी आहे. हे तसे श्रीमंत व्यापारी व शेतकरी आहेत. या समाजातील लोकांकडे मुबलक जमिनी होत्या. त्यांची आताची पिढी ही (बहुतेकांची) लंडनला स्थायिक आहे, पण येथे त्यांच्या जमिनी आजही आहेत, घर आहे. ते मतदानाच्यावेळी येतात. शेती कसण्यासाठी दुसऱ्याला देतात.

मुस्लिमांपाठोपाठ ओबीसी जातीची मासेमारी करणारी मच्छवा जातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या राजकारणाला भरुच शहरात फारसा वाव नाही. इथलं भाजपचं यश मतविभाजनाचं आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात आजदेखील काँग्रेस पक्ष सत्ताधारी पक्ष आहे. गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस अन् जनता दलाला मिळालेलं यश पाहता भाजप इथल्या सध्या हाती असलेल्या चार जागा टिकवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. यासाठी आगामी काळात मोदींच्या या भागात दोन सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इथली रंगत शेवटी वाढेल असं एकूण चित्र आहे.

यानंतरच्या टप्यात  मध्यमवर्गीय मुस्लिम वस्तीत जाऊन आम्ही गप्पा मारल्या. या भागातील मुस्लिम काही ना काही व्यवसाय करणारे आहेत. याबाबत बोलताना एक मुस्लिम गृहस्थ म्हणाले, “गुजरातमध्ये २००२ नंतर हिंदू-मुस्लिम दंगल नाही. त्या दंगलीनंतर आमचा समाज अधिक जागृत झाला, सामाजिक वादापेक्षा आपल्या व्यवसायात अधिक गंभीर झाला. त्यामुळे आमच्या समाजाची प्रगती झाली. सरकार आमच्यासाठी काय करतं किंवा काही करेल याची वाट आम्ही पाहत बसलो नाही. माझ्याकडे आज रिक्षा आहे, चार-पाच एकर पाण्याखालची जमीन आहे. माझं रोजचं नियमित उत्पन्न ८०० ते १००० रुपयांचे आहे.”

या भागातील गप्पांच्या नंतरच्या टप्यात असं लक्षात आलं की, या भागातील मुस्लिम समाज सध्या काँग्रेस पक्षाकडे भावनिक अस्मितेच्या बाजूनं आकर्षित झालेला आहे. गेल्या काही निवडणुकांत मुस्लिम समाजाचं मतविभाजन झालं. त्याचा फायदा भाजपला होतो, हे मुस्लिमांचं सार्वत्रिक आकलन झाल्याचं त्यांच्या चर्चेतून दिसून येत होतं. त्यामुळे काँग्रेसचा अंतिम आशेचा पर्याय म्हणून आम्ही काँग्रेसला निवडून आणण्यासाठी झटत आहोत. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असल्याचं काही तरुण निक्षुन  सांगत होते.

त्याच चर्चेत एकजण म्हणाला, “मी भरूच शहरात मोहम्मदपुरा या भागात राहतो. आमच्या भागात आजही भाजपचे लोक येण्यास घाबरतात. कारण त्यांना भीती वाटत असेल. पण आम्ही त्यांना घाबरत नाही.” या मुस्लिम तरुणाचं म्हणणं खरं आहे का हे तपासण्यासाठी म्हणून आम्ही काही हिंदू लोकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाचबत्ती चौकापर्यंतच भाजपची रॅली किंवा प्रचार सभा होते. त्याच्या पुढे भाजप सरकत नाही.

त्यानंतर एका हिंदू तरुण मुलाशी संवाद साधला. (तो इंजीनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे). तोदेखील म्हणाला, “मोहम्मदपुरा या भागात भाजपचा उमेदवार प्रचारालासुद्धा जात नाही. तसंच या भागात भाजपच्या रॅली, प्रचार सभा होत नाहीत. परंतु काँग्रेसच्या प्रचार सभा होतात. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींची भरूचमध्ये रॅली झाली, तेव्हा ते या भागात गेले असल्याचं दुसऱ्या एका तरुणानं सांगितलं. राहुल गांधींच्या रॅलीसाठीही लोकांनी गर्दी केली होती. लोकांमध्ये जाऊन ते बोलत होते. पण काही दिवसांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी येणार होते. त्यांना आमच्या लोकांनी येऊ दिलं नाही. जरी त्यांना यायचं असेल तर दोन दिवस आधीच पोलीस तैनात करावे लागतात आणि व कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळी न येता अर्धा तास आधी किंवा अर्धा तास उशीरानं येतात. मोदी तर आमच्या भागात कधीच आले नाहीत.”

भरुच मुस्लिमबहुल आहे. आदिवासी दखलपात्र आहेत. या जिल्ह्यात उद्योगधंदे आहेत. त्यामुळे दुरून पाहताना हा भाग विकसित दिसतो. मात्र जेव्हा आम्ही झगेडीया या आदिवासी तालुक्यात गेली ३५ वर्षं काम करणार्‍या ‘सेवा’ या सार्वजनिक आरोग्य महिला सक्षमीकरणाला वाहिलेल्या सामाजिक संस्थेला भेट दिली अन् तिथलं काम पाहिलं तेव्हा लक्षात आलं की सरकारनं करायला हवं असं काम सरकारच्या अल्पशा मदतीनं ती संस्था करत आहे. त्यामुळे आदिवासी लोक आरोग्याच्या अन्‍ रोजगाराच्या बाबतीत समाधानी आहेत. याच संस्थेत काम करणार्‍या महिलांना जवळपास १० हजार रुपये महिना पगार मिळतो. त्यामुळे त्या महिला ‘सेवा’ हेच आपलं सरकार असं समजून समाधानानं आयुष्य जगत आहेत. त्या संस्थेत येणार्‍या अन् आजूबाजूला वावरणार्‍या लोकांना छोटु वसावा या नेत्याबद्दल आदर आहे. राहुल गांधी त्यांच्यासाठी फारसे परिचयाचे नाहीत. अन् मोदींबद्दल ते चांगला नेता म्हणून ऐकून आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

याशिवाय गुजरात सरकारच्या पुढाकारानं जीएनएफसी या लिंबोळीपासून विविध वस्तू बनवणार्‍या कंपनीला भेट दिली. या कंपनीत गुजरात सरकारचा जवळपास ५० टक्के सहभाग आहे. या कंपनीत महिला बचत गटांना उत्तम रोजगार मिळाला आहे. यात सरकारचा पुढाकार आहे. महिलांना रोजगार मिळाल्यानं इथंही सरकारबाबत समाधान आहे. या कंपनीत मोदींची आकर्षक छायाचित्रं आहेत. त्यामुळे त्या बचत गटांच्या महिलांना एकच नेता माहीत आहे- मोदी.  

या जिल्ह्यात फिरून आल्यावर एक गोष्ट प्रकर्षानं नोंदवावी वाटते- जिथं काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठ्या संख्येनं आहे, तिथं मतविभाजन टाळण्याचा करता आला तर काँग्रेसला जुने दिवस परत मिळण्याची आहे. मात्र भाजपच्या काही अपक्षांना यश आलं तर मात्र जे आहे तेच!

.............................................................................................................................................

या मालिकेतल्या इतर लेखांसाठी पहा 

.............................................................................................................................................

लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.

kdraktate@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......