काँग्रेसचे अध्यक्षपद व नेहरू-गांधी परिवार...
पडघम - देशकारण
राज कुलकर्णी
  • नेहरू-गांधी कुुटुंब
  • Sat , 25 November 2017
  • पडघम देशकारण नेहरू-गांधी कुटुंब Nehru–Gandhi family काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतील, असं चित्र दिसत आहे. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असतानाही, विरोधी पक्ष तथा काही विचारवंतांनी काँग्रेस पक्षातील गांधी-नेहरू परिवाराची घराणेशाही हा जुनाच आरोप करायला पुन्हा सुरुवात केली आहे!

भारतात गांधी आडनावांसोबतच सिंधीया- यादव- हुडा- पटनायक- महाजन- मुंडे- पवार- ठाकरे या आडनावांचेही अनेक नेते पाहायला मिळतात. दक्षिण भारतातील करुणानिधी वा एनटीआर यांची घराणेशाही हा तर एक कौतुकाचाच विषय आहे. याबाबत संपूर्ण भारतीय उपखंडसुद्धा अपवाद नाही. पाकिस्तानमध्ये भुट्टो, झरदारी,शरीफ यांची राजकीय घराणी असून बांगलादेशात शेख मुजीबूर रहेमान आणि जिया उर रहेमान आहेत. नेपाळमधील कोईराला परिवार आणि श्रीलंकेत बंदारनायके-राजपक्षे परिवार यांचीही स्थिती अशीच आहे. अमेरिकेतही बुश सिनीयर-ज्युनियर व बिल, हिलरी क्लिंटन असंही चित्र पाहायला मिळालं. जवळपास हीच बाब फ्रान्स, इंग्लड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या प्रगत देशांतदेखील कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळते. एकंदर प्रत्येक  देशातील राजकारणात, एखाद्या ठराविक पक्षात, एखाद्या ठरविक घराण्याचा वरचष्मा राहिलेला आहे. भारतीय राजकारणात काँग्रेसबाबत हे ठळकपणे जाणवतं, कारण काँग्रेस हा सव्वाशे वर्षांपेक्षाही जास्त जुना पक्ष आहे! 

काँग्रेसचा जन्मच मुंबईतला! तेव्हापासूनच काँग्रेस ही सातत्यानं स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईमधील नेत्यांच्या अधिपत्याखाली राहिलेली आहे. नवरोजी, गोखले, टिळक आणि गांधीजी, हे सर्व नेते मुंबई प्रांतातीलच होते! मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू हे मुंबईबाहेरील नेते होते आणि जनतेत लोकप्रिय असूनही त्यांची काँग्रेस पक्ष संघटनेवर कधीच पकड नव्हती, हे वास्तव आहे. नेहरूंचा पूर्ण प्रभाव काँग्रेस पक्षावर निर्माण होऊ शकला नाही. हे तर सर्वश्रुत आहे की, पंतप्रधान कोणास करावे याबाबत १९४६ साली बहुसंख्य प्रदेश समित्यांनी नेहरूंऐवजी पटेल यांना पाठिंबा दिला होता! परंतु नेहरू हे पक्षाच्या समित्यांचे नेते नव्हते तर समस्त भारतीयांचे नेते होते. म्हणून काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या इच्छेपेक्षा जनतेच्या इच्छांना मान दिला गेला आणि नेहरूंना पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवण्यात आलं! 

जवाहरलाल नेहरू १९४७ ते १९६४ या काळात पंतप्रधान होते, मात्र त्यांच्या हयातीत इंदिरा गांधी संसदेच्या सदस्य नव्हत्या. स्वत:नंतरचा पंतप्रधानपदाचा वारसदार म्हणून त्यांनी डिसेंबर १९६३ मध्येच शास्त्रीजींची निवड केली होती. इंदिरा गांधी सक्रिय राजकारणात आल्या, त्या नेहरूंच्या  मृत्यूनंतरच! तरीही नेहरूंवर घराणेशाहीचा आरोप केला जातो, हे अनाकलनीय आहे!    

काँग्रेस पक्ष आणि त्यात नेहरू-गांधी घराण्याकडे अध्यक्षपद याचा कालावधी पहिला तर काँग्रेस पक्षावर नेहरू-गांधी घराण्यापैकी कोणी अध्यक्षपदी असण्याचा कालावधी खूप अल्प आहे. मोतीलाल नेहरू हे १९१९, १९२८ असे दोन वेळा, तर जवाहरलाल नेहरू १९२९, १९३६, १९३७, १९५१, १९५३ आणि १९५४ असे सहा वेळा अध्यक्ष होते. इंदिरा गांधी केवळ एका विशेष अधिवेशनापुरत्या १९५९ साली आणि त्यानंतर थेट १९७८ व १९८३, अशा तीन वेळा अध्यक्ष झाल्या आहेत. इंदिराजीनंतर १९८५ मध्ये राजीव गांधी पहिल्यांदा अध्यक्ष झाले, तर सोनिया गांधी १९९८ पासून आजपर्यंत अध्यक्ष आहेत. पण प्रत्येक वेळी मूळ काँग्रेस म्हणून एक गट या नेतृत्वाच्या विरोधात राहिलेला आहेच. 

इंदिरा गांधीं मोरारजी देसाईंना काँग्रेस अंतर्गत झालेल्या निवडणुकीत पराभूत करून २४ फेब्रुवारी १९६६ रोजी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. त्यावेळी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. व्ही. के. नरसिंम्हन त्यांच्या ‘Kamraj - A study’ या पुस्तकात म्हणतात “ ….... there was general welcome to her election not only as Nehru’s Daughter but also as a Leader in her own right.” परंतु नेहरूंप्रमाणेच इंदिरा गांधींनाही पक्षातून सतत विरोध होत राहिला. १९६७ सालीच जुनी काँग्रेस म्हणून के. कामराज यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींना विरोध करण्याचं धोरण आखलं गेलं होतं. काँग्रेस (आर) हा पक्ष इंदिराजींचा समर्थक होता. मोरारजी देसाई, निजलिंगप्पा, के. कामराज हे इंदिराजीच्या विरोधात होते. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘The Dramatic Decade - The Indira Gandhi Years’ या ग्रंथात याबद्दल खूप विस्तृत वर्णन केलं आहे. 

इंदिरा गांधी यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना ही बाब आवर्जुन दुर्लक्ष केली जाते की, प्रत्येक वेळी मूळ काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेससोबत संघर्ष करत त्यांनी स्वतंत्र यश मिळवलेलं आहे. नेहरू १९५४ ला अध्यक्ष झाल्यानंतर हे पद १९५५ पासून १९५९ पर्यंत यु. एन. ढेबर यांच्याकडे होतं. त्यानंतर १९६०, १९६१ आणि १९६३ नीलम संजीव रेड्डी हे अध्यक्ष होते, तर १९६४ पासून १९६७ पर्यंत के. कामराज अध्यक्ष होते. हे सर्वच नेते इंदिराजींचे विरोधक होते! पुन्हा १९६८ आणि १९६९ रेड्डी हेच अध्यक्ष होते. या काळात काँग्रेसवर दक्षिणात्य नेत्यांचा वरचष्मा होता आणि हे सर्व इंदिरा गांधींचे विरोधक होते. माजी केंद्रीय मंत्री के. नटवर सिंग यांनी त्यांच्या ‘One life is not enough’ पुस्तकात लिहिले आहे की, ‘From 1966 to 1969- Indira Gandhi was in office but not in power. The actual power rested in the hands of Syndicate- S. Nijlingappa, Atulya Ghosh, K.Kamraj, Morarji Deasi and S.K. Patil.’ म्हणजे पंतप्रधान असूनही त्या पक्षात कमजोरच होत्या! 

उत्तर भारतात काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट होती, म्हणून काँग्रेसला उत्तर भारतीय नेता हवा होता, जो केवळ बाहुला (Puppet) म्हणून काम पाहू शकेल. इंदिरा गांधी यांचा 'गुंगी गुडिया' हा उल्लेख याच वेळेचा आहे. म्हणजे नेहरू या नावाचं 'गुडवील' वा 'ब्रँड' वापरून त्यांना सत्ता मिळवायची होती, परंतु अंकुश मात्र स्वत:चा ठेवायचा होता. वास्तविक इंदिरा गांधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसमध्ये कार्यरत होत्या आणि ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला होता. त्यांचं हे वैयक्तिक योगदान होतं. हे पाहता खरं तर या इंदिरा विरोधकांना नेहरू-गांधी परिवारावर घराणेशाहीचा आरोप करण्याचा नैतिक अधिकारच नाही! कारण स्वहित पाहताना इंदिराजीचं स्वतंत्र अस्तित्व त्यांना मान्यच नव्हतं! 

इंदिरा गांधी १९६७ ला झालेल्या निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधान झाल्या, तेव्हा काँग्रेसच्या २८४ खासदारांपैकी त्यांना केवळ २११ खासदारांचा पाठिंबा होता. डाव्या पक्षातील खासदारांच्या पाठिंब्यावर त्यांचं सरकार उभं होतं. पुढच्या तीन वर्षांत पक्षातील प्रभावशाली नेत्यांनी अडचणी निर्माण केल्यावर त्यांनी २७ डिसेंबर १९७० रोजी लोकसभा विसर्जित करून पुन्हा जनतेसमोर जाण्याचं ठरवलं. मूळ काँग्रेस पक्षाचे 'बैल-जोडी' चिन्ह त्यांना मिळालं नाही, कारण ते संघटना काँग्रेसनं स्वत:कडे ठेवलं होतं. इंदिरा गांधींनी मूळ काँग्रेसचा त्याग करत काँग्रेस (जगजीवनराम) या पक्षासाठी 'गाय वासरू' हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवली आणि ३५० जागांसह जिंकली. इंदिरा-जगजीवनराम काँग्रेसनं संघटना काँग्रेसला पराभूत केलं होतं. अतिशय अल्पकाळातच त्यांनी स्वतःचा वेगळा असा ठसा आणि वेगळी ओळख निर्माण केली, जी जवाहरलाल नेहरूंच्या कन्या या पेक्षा पूर्णत: स्वतंत्र आणि वेगळी होती! इंदिरा गांधी यांनी स्वतःचा स्वतंत्र असा प्रभाव निर्माण केला होता, इथंच खरं तर घराणेशाही हा मुद्दाच नष्ट झाला होता!  

गमतीचा भाग असा की, इंदिरा गांधी नेहरूंच्या कन्या म्हणून जेव्हा प्रचारादरम्यान त्यांचा उल्लेख ‘इंदिरा नेहरू’ असा कोणी केला तर त्यावर विरोधकांकडून टीका केली जायची की, विवाहानंतर नाव बदलतं मग इंदिराजींनी नेहरू हे नाव का लावावं? अगदी हाच प्रत्यय प्रियांका गांधी म्हटल्यावर हल्ली फेसबुकवरही येतो! वास्तवात काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा अडचणीत आला, तेव्हा तेव्हा पक्षातील नेतेच पुन्हा पक्षाला गांधी-नेहरू घराण्याचा आश्रयाला घेऊन गेलेले आहेत! जवाहरलाल नेहरू १९५४ मध्ये अध्यक्ष होते. त्यानंतर हे पद इंदिरा गांधी यांना तब्बल २४ वर्षांनी १९७८ साली मिळाले हे विशेष! 

'बैलजोडी' सोडून मिळवलेलं 'गाय-वासरू' हे चिन्हही पुन्हा त्यांना सोडावं लागलं आणि इंदिरा काँग्रेस स्थापन झाल्यावर 'हात' या चिन्हांसह त्यांनी पुन्हा विजय मिळवला! यावरून इंदिरा गांधींची राजकीय नेता म्हणून ओळख आणि लोकस्वीकृती स्वतंत्र होती, हेच स्पष्ट होतं. प्रत्येक वेळी स्वतःच्या नवीन पक्षाच्या नवीन चिन्हावर निवडणुका जिंकून आल्यावर पुन्हा मूळ काँग्रेसचे म्हणवणारे नेते इंदिराजीकडे गेले आहेत, या खूप मोठा अर्थ लपलेला आहे!

इंदिराजीनंतर राजीव गांधींची हत्या केवळ सात वर्षांत झाली, या काळातही मूळ काँग्रेस म्हणून त्यांचा विरोध करणारा एक गट निर्माण झाला होताच! राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेतला होता. पण सिताराम केसरींऐवजी त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती काँग्रेसमधील नेत्यांनी केल्यामुळेच, त्या पुन्हा राजकारणात आल्या. यावेळी काँग्रेस नेत्यांनी त्यांना कसा आग्रह केला, कोणकोणत्या बाबतीत काय काय आश्वासनं दिली आणि नेमक्या विचारानं त्या राजी झाल्या, याबद्दल अर्जुन सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात खूप तपशीलवार लिहिलं आहे. 

नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्ती ज्या पक्षात, त्याच पक्षांवर जनतेनं अलोट प्रेम केल्याचं दिसून येतं. नेहरू-गांधी परिवारास भारतीय समाज जीवनात एवढा आदर आणि मान्यता मिळण्यास अनेक कारणं आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात केलेला त्याग, भोगलेला कारावास, स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीतलं त्यांचं योगदान, यातून हा आदर निर्माण झाला आहे. नेहरू-गांधी कुटुंब धर्म, जात, वंश, प्रदेश आणि भाषा याबाबत कोणत्याही चौकटीत बंदिस्त होत नाही, हे या कुटुंबाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. अमुक हे हिंदूंचे नेते, तमुक हे मुस्लिम नेते, हे बंगाली नेते, ते गुजराती नेते, हे जाट, ते पाटीदार, हे यादवांचे, ते ओबीसींचे वा दलितांचे अशी कोणतीच ओळख नेहरू वा गांधी घराण्यातील एकाही व्यक्तीला नाही!

आजही राहुल गांधी हे कोणाचे नेते आहेत म्हटले तर ठराविक धर्माची, जातीची वा प्रदेशाची ओळख त्यांना चिकटत नाही! ही भारतीय समाजमान्यतेच्या परिप्रेक्ष्यात खूप सकारात्मक बाब आहे!  

भारतीय उपखंडातील आणि जगातील अनेक देशातील जनतेने ठराविक घराण्याचं नेतृत्व लोकशाहीतील निवडणुकीच्या माध्यमातूनही मान्य केलं आहे. ज्या प्रमाणे बाजारातील एखाद्या वस्तूचं 'गुडविल' असतं किंवा एखादा 'ब्रँड' असतो, त्याप्रमाणे राजकारणातसुद्धा लोक स्वीकृती काही ब्रँडवर ठरते, हे वास्तव आहे. टाटा, बिर्ला, गोदरेज, फिलिप्स, पँनासोनिक या नावांना जशी 'ब्रँड व्हॅल्यू' असते, तशाच प्रकारची 'ब्रँड व्हॅल्यू' वा 'वलय' अथवा 'इलेक्टेरल मेरीट' भारतीय उपखंडातील अनेक नावांना आहे. नेहरू-गांधी या नावास ते सर्वाधिक आहे इतकंच! सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं गांधी घराण्यातील मनेका गांधी यांना पक्षात प्रवेश केल्यावर लगेच मंत्रिपद दिलं आणि वरुण गांधी भाजपमध्ये येताच पक्षाचे महासचिव झाले. त्यामुळे गांधी या नावाचा 'ब्रँड' वा 'मेरीट' भाजपनंसुद्धा प्रसंगी यशस्वीपणे वापरलेलं आहे! 

.............................................................................................................................................

‘बखर संस्थानांची’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

ब्रिटनमध्ये आज राजेशाही आहे, मात्र त्याच ब्रिटनला लोकशाहीची गंगोत्री म्हणतात. अनेकांना हे विचित्र वाटतं, मात्र काँग्रेसची अवस्था गांधी घराण्याच्या अनुषंगानं आजघडीला ब्रिटनमधील लोकशाहीप्रमाणे बनलेली आहे! 

राहुल गांधी यांच्या जमेची आणखी एक महत्त्वपूर्ण बाब अशी की, राहुल गांधी आज घडीला ४७ वर्षांचे असले तरीही भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात ते तरुण नेते आहेत. ते अतिशय उच्चशिक्षित असून मृदू स्वभावाचे आहेत. आजकाल आपण जेवढे जास्त हिंसक बोलू तेवढे लोक आपल्याला जास्त स्वीकारतील आणि तेवढे जास्त आपण लोकप्रिय बनू शकतो, ही धारणा डावलून सुसंवाद साधून शांततेनं आणि विनयानं आपला मुद्दा मांडणारे ते नेते आहेत!

राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारल्यावर पक्षासाठी ते यश कितपत खेचून आणतील, हे काळच ठरवेल. मात्र आज देशातील अनेक नेत्यांची वक्तव्यं पाहता, प्रत्येक पक्षाला अशाच सुसंस्कारी, नम्र, विनयशील व्यक्तिमत्त्वाच्या नेत्याची आवश्यकता आहे. निवडणुकीतील यशापयश हा भाग वेगळा मात्र, काँग्रेस सुदैवी आहे, कारण काँग्रेसकडे राहुल गांधी आहेत! 

संदर्भ -

1) 'Bombay And Congress Presidents' - T. K. Tope, Maharashtra State Board Literature and Culture, Mumbai,1985, Page No. 242-243.

2) 'The Dramatic Decade : The Indira Gandhi Years'- Pranav Mukharji, Rupa Publication, Dariya Ganj, Delhi, 2015, Page No. 161-176. 

3) 'Kamraj- A study' – V. K. Narsimhan, NBT, Delhi, 2007, Page No. 139, 147. 

4) ‘One Life is not enough’- K. Natwar Singh, Rupa Publication, Dariya Ganj, Delhi, 2014, Page No. 132. 

5) 'First Draft, Witness to the making of Modern India' - B. G. Verghese, Tranquebar Press, Chennai, 2010, Page No.82. 

6) ‘A Grain of Sand in the Hourglass of Time - an Autobiography' - Arjun Singh, Hay House India, Vasant Kunj, New Delhi, 2012, Page No. 355-357. 

7) The Red Sari - A Dramatized Biography Of Sonia Gandhi, Rolli Books, New Dehli, 2015, Page No.371-372.

8) माझे जीवन राजकारण – प्रभाकर कुंटे, ग्रंथाली, मुंबई, २००३, पान क्र. १३१, १८०. 

9) ज्वालामुखीच्या तोंडावर – कुमार केतकर , ग्रंथाली, मुंबई, २०१७, पान क्र. ८२, ८६,८८.     

.............................................................................................................................................

लेखक राज कुलकर्णी उस्मानाबादस्थित वकील असून पं. नेहरूंचे अभ्यासकही आहेत.

rajkulkarniji@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Praveen Bardapurkar

Sat , 25 November 2017

बाकी सर्व ठीक . एकूण राजकीय स्थिती लक्षात घेता काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत लोकशाहीचा समर्थक म्हणून आशादायक असलंच पाहिजे . अशात तर राहुल यांनी अशी आशा पुरेशा प्रमाणात निर्माणही केलेली आहे पण , राहुल गांधी ' सुसंस्कारी, नम्र, विनयशील व्यक्तिमत्त्व' हे विधान मुळीच पटणारं नाही , तसा अनुभवही नाही आलेला .


Soniya S

Sat , 25 November 2017

हा हा! फारच विनोदी लेख आहे बुवा. छान करमणूक झाली. राहूलबाबा उच्चशिक्षित (?) आहेत हे कळल्याने आनंद झाला आणि हसू फुटले. युनिवर्सिटी ड्राॅपआउट माणसाला उच्चशिक्षित समजणारे लोकही आहेत हे कळले. अर्थात १०-१२ शिकलेल्या माणसाच्या तुलनेत व त्यांच्यामते १३ पास माणूस हा उच्चशिक्षितच असतो. तसाच प्रकार असावा हा कदाचित. आजकाल , काही लोकांना राहूलबाबा हे नम्र, विनयशिल आहेत हा साक्षात्कार झाला आहे. हे त्यांना कसे व कधी जाणवले ते कळत नाही. ते राहूलबाबंच्या घरी धुणीभांडी करायला जायचे का ? जेव्हा त्यांना याचा अनुभव आला ? लोकांनी याबाबत खुलासा करावा कारण मागच्या काही वर्षात बर्याच लोकांनी पक्ष सोडला व तेव्हा कारण असे दिले होते की राहूलबाबा गर्विष्ठ आहेत, कोणाला भेटत नाहीत., त्यामुळे खर काय आहे ? जाणकार पत्रकारांनी याबाबत खुलासा करावा कारण काही पेड पत्रकारांनी चि. राहूलबाबंच्या पब्लिसिटीचे कंत्राट घेतले आहे असे वाटते. त्यामुळे खरे पत्रकारांच यांवर प्रकाश टाकू शकतील


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......