युरोपच नव्हे साऱ्या जगाचा इतिहास बदलणारा मार्टिन लुथर
पडघम - विदेशनामा
भूषण निगळे
  • मार्टिन लुथरच्या ५००व्या जयंतीची वेगवेगळी पोस्टर्स
  • Tue , 21 November 2017
  • पडघम विदेशनामा मार्टिन लुथर Martin Luther प्रोटेस्टंट Protestant प्रोटेस्टंट धर्मसुधारणा Protestant Reformation 

जर्मनीत सध्या राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. निवडणुकींचा माहोल संपून युती सरकारच्या स्थापनेच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अँजेला मर्कल स्वत: ब्रेग्झिटच्या वाटाघाटींचे नेतृत्व करत आहेत. कॅटालान प्रांताच्या स्वातंत्र्यात चळवळीच्या भवितव्यावर अनेक युरोपियन प्रांत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (त्यात एकेकाळी स्वतंत्र असलेला आणि अजूनही स्वतःची वेगळी अस्मिता जपणारा जर्मनीचा बायर्न प्रांतही आला.). सर्वसामान्य जनतेचे लक्ष मात्र सध्या बर्लिनहून शंभर किलोमीटर दूर असलेल्या व्हिट्टेनबर्ग या एका छोटेखानी शहरावर केंद्रित आहे. युरोपचाच नव्हे तर साऱ्या जगाचा इतिहास बदलणाऱ्या तिथल्या एका घटनेची ५००वी जयंती  ३१ ऑक्टोबर रोजी काही दिवसांपूर्वीच साजरी करण्यात आली.

वरवर पाहता ती घटना तशी साधीच वाटणारी. व्हिट्टेनबर्ग चर्चच्या दरवाज्यावर एका तरुण प्राध्यापकाने एक कागद खिळ्याने दरवाज्यावर ठोकला. मध्ययुगीन पद्धतीनुसार चर्चेचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी असे प्रबंध चर्चच्या दरवाज्यावर 'प्रकाशित' करत. मात्र नेहमीच्या धर्मचर्चेपेक्षा त्या प्रबंधाचा सूर वेगळा होता. त्या कागदावरच्या ९५ मुद्द्यांनी एकच खळबळ उडवून दिली - त्या धर्ममीमांसक प्राध्यापकाच्या हातोड्याचा आवाज युरोपभर घुमला.

५०० वर्षांपूर्वी युरोपमधली परिस्थिती स्फोटक होती. धर्मसंस्था आणि राज्यसंस्थेचे विभाजन झाले नव्हते. रोमन आणि हॅब्सबर्ग साम्राज्यांत युरोपच्या स्वामित्वासाठीची स्पर्धा तीव्र होती, कॉन्स्टॅन्टिनोपॉल (आजचे इस्तंम्बूल) ऑटोमन साम्राज्याने काबीज केले होते आणि तुर्की सेना थेट रोमचा पाडाव करण्याचा बेत करत होत्या. रोमची पुनर्स्थापना करायला पोपने एकाहून एक प्रकल्प हाती घेतले होते. मात्र या बांधकामासाठी लागणारा पैसा सामान्य जनतेकडून वसूल होत असे. आवकेत वाढ होण्यासाठी पोपने एक शक्कल लढवली, ती अशी- कुणालाही आपल्या पापक्षालनासाठी चर्चला पैसे देऊन मुक्त होता येईल.

पृथीवरच्या पापाची भरपाई करण्यासाठी पैसे भरून खुद्ध पोपकडून पापविमोचनाचा खलिता मिळवण्याची ही योजना यशस्वी झाली. राजे-सरदार, सुखवस्तू लोक आणि सामान्यजन या नरकमुक्ती संधीचा लाभ घेऊ लागले. आपल्या हातून होणाऱ्या संभाव्य पापाचे क्षालन होण्यासाठी रक्कम आगाऊ भरता येऊ लागली आणि या प्रमाणपत्रांचा व्यापार होऊ लागला. आणि चर्चवर, आर्चबिशपांवर आणि पाद्र्यांवर सौदेबाजीचे, भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले.

सामान्य जनतेचे दैन्य आणि धार्मिक क्षेत्रातली बजबजपुरी मार्टिन लुथर या आदर्शवादी भिक्षू-प्राध्यापकाला रुचेना. पुनर्प्रस्थापित रोमचे ऐश्वर्य आणि आजूबाजूला नांदत असलेले दैन्य लुथरने स्वतः १५१०मध्ये पहिले होते. व्हिट्टेनबर्गला परतल्यावर तरुण लुथरचे विचारमंथन चालू झाले. एका विलक्षण आंतरिक ऊर्जेने, प्रभूवरच्या सखोल श्रद्धेने भारलेल्या लुथरने शेवटी एक धाडसी निर्णय घेतला आणि थेट धर्मसंस्थेलाच आव्हान दिले. तर्कसुसंगत भाषेत लुथरने हे आव्हान ९५ प्रबंधांत सूत्रबद्ध केले आणि ३१ ऑक्टोबर १५१७ला विचारविनिमयासाठी प्रकाशित केले.

पापविमोचनसाठी चाललेल्या सौदेबाजीवर लुथरने घणाघाती टीका केली. देव आणि माणूस यांच्यामध्ये कोण्या मध्यस्थाची आवश्यकता नाही आणि त्या मध्यस्थांच्या खलित्यांची तर बिलकुल गरज नाही हे त्याने ठणकावून सांगितले. मुक्तीचा मार्ग आपल्याच हातात आहे, पापक्षालनासाठी निर्मळ मनाने केलेली साधना आणि पापकर्माबद्दल झालेला पश्चाताप कुठल्याही शुद्धिपत्रापेक्षा महत्त्वाचा असतो हे लुथरने ओघवत्या भाषेत मांडले.

लुथरचे हे ९५ प्रबंध वेगाने 'व्हायरल' झाले. पिचून गेलेल्या पापभिरू रयतेने आणि धर्मसंस्थेचे जोखड फेकायला आतुर असलेल्या राज्यसंस्थेने लुथरला प्रोत्साहन दिले. लुथरला मिळत जाणाऱ्या प्रतिसादाची दखल घेणे आवश्यक असून त्याच्या मुद्द्यांच्या प्रतिवाद करणे जरुरीचे आहे हे पोपने ओळखले. रोमन सम्राट पाचव्या चार्ल्सने खुद्द आपल्या अध्यक्षतेखाली १५२१ साली वोर्म्स येथे खास विचारविनिमयासाठी परिषद आयोजित करून लुथरला पाचारण केले. या धर्मसंसदेत लुथरने राजे आणि प्रकांडपंडितांसमोर मोठ्या हिरिरीने आपल्या विचारांचे समर्थन केले. सभेची सांगता लुथरला ‘पाखंडी’ घोषित करून करण्यात आली.

पुढच्या घटना रोमांचकारी आहेत. अटळ असलेली अटक चुकवून लुथर तिसऱ्या फ्रेडरिक या आपल्या राजाच्या मदतीने, वेषांतर करून वार्टबुर्ग या किल्ल्यात राहिला. वार्टबुर्ग मुक्कामी लुथरने बायबलचे जर्मन भाषांतर केले (आणि विखुरलेली जर्मन भाषा प्रमाणित केली). मग व्हिट्टेनबर्गला परतून त्याने एका माजी भिक्षुणीबरोबर लग्न करून प्रपंच चालवला. प्रस्थापित आचारविचारांना धक्के देत लुथर आपल्या विचारांचा प्रसार करत धर्मसुधारणा करत राहिला. (मात्र ज्यूंविरोधात आयुष्यभर त्याने केलेले द्वेषात्मक लिखाण - जे पुढे नाझींनी वापरले -  ही त्याच्या धार्मिक कडवेपणाची बेसूर किनार.) लुथरने धर्मसंस्थेच्या केलेल्या निषेधाची कृतीची ज्या अनुयायांना पटली त्यांना प्रोटेस्टंट म्हणण्यात आले, आणि त्याच्या कृतीला प्रोटेस्टंट धर्मसुधारणा (रिफॉर्मेशन) असे संबोधण्यात येऊ लागले.

(वोर्म्सच्या धर्मसंसदेत लूथरला आपली मते परत घेण्याची संधी देण्यात आली. आपल्या मतांबद्दल क्षमा मागणे सोडाच, खुद्द रोमन सम्राटाला 'इष्ट वाटेल तेच साध्य करीन' हे लुथरने ठणकावून सांगितले.)

या सुधारणांचे दूरगामी परिणाम ज्या अनेक क्षेत्रांवर झाले, त्यातली सर्वप्रथम म्हणजे युरोपभर झालेली राजकीय उलथापालथ. अनेक जर्मन राज्ये, स्वित्झर्लंड, हॉलंड, बेल्जियम ते अगदी इंग्लंडमधल्या राजांनी आणि जनतेने या सुधारणांचा स्वीकार केला. (रोमन साम्राज्यापासून घेतलेली फारकत म्हणजे इंग्लंडचे 'पहिले ब्रेग्झिट' असे अनेक अभ्यासकांनी  नमूद केले आहे.) लुथरवादी आणि कॅथॉलिक राज्यांमधील संघर्ष वाढत गेला - सतराव्या शकातल्या 'तीस वर्षी'  युद्धात तर ४० टक्के जर्मन मारले गेले. शेवटी वेस्टफिलिया येथे केलेल्या शांतीसंधीत धर्म- आणि राज्यसंस्थेचा घटस्फोट मान्य झाला. राजांना त्यांच्या मताप्रमाणे राज्यशकट चालवण्याची मुभा मिळाली, आणि लोकांच्या धार्मिक आचरणात कोणाला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही हे मान्य करण्यात आले.

दुसरा परिणाम विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांवर झाला. लुथरचे विचार दूरवर वेगाने पसरायला गुटेनबर्गने विकसित केलेली मुद्रणकला कामी आली. उत्तम निर्मितीमूल्ये असलेले (तेही रोजच्या जर्मन भाषेतले - क्लिष्ट लॅटिनमधले नव्हे) लुथरलिखित बायबल चटकन बेस्टसेलर ठरले. पुस्तकांच्या किमती परवडण्यासारख्या झाल्या. पत्रके आणि पुस्तिका प्रकाशित करणे सोपे होऊ लागले. निव्वळ धार्मिकच नव्हे तर इतरही पुस्तके लिहिण्यात आली. एकूणच साक्षरतेत (विशेषतः स्त्रियांच्या) वाढ झाली.

तिसरा आणि सर्वांत खोलवरचा परिणाम म्हणजे जनतेत घडून आलेली वैचारिक क्रांती. देवाचा शब्द आपण स्वतः कोणाचाही मध्यस्थीशिवाय समजून घेऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. इतकेच नव्हे तर दैवी विचारपरंपरेची तर्क कठोरपणे आपण चिकित्सा करू शकतो आणि असे करणे म्हणजे पाप नव्हे हे लोकांना पटले. पुढच्या शंभर-दोनशे वर्षांत मग पाश्च्यात्य विज्ञानाचा स्फोट झाला, केप्लर-न्यूटन-बॉयल हे लुथरला मानणारे वैज्ञानिक होते.

गेल्या अर्धसहस्त्रकात लुथरला अभिप्रेत असलेल्या बदलांपेक्षा कितीतरी जास्त प्रवर्तने घडली. युरोप अनेकदा शांतता-रणधुमाळी-नृशसंहार अशा चक्रात सापडून शेवटी एकसंध (सध्यातरी?)  अवस्थेत पोहोचला. दुफळीचे झालेले हलाहल पचवून, अंतर्विरोध सामावून घेऊन युरोपियन समाज कणखर झाला. लोकशाहीचे युग अवतरले. श्रमप्रतिष्ठा, दीर्घोद्योग आणि काटकसर या त्रिसूत्रीला अंगिकारणारी प्रोटेस्टंट कार्यनीती जगमान्य पावली, पुढे येणाऱ्या औद्योगिक क्रांतीची पाय या कार्यशैलीने रचला. विज्ञान-तंत्रज्ञानाने तर अनेक क्रांत्या पहिल्या. खुद्ध ख्रिस्ती धर्माने अनेक प्रोटेस्टंटसूत्रे  स्वीकारली. (आजमितीला जगातले जवळजवळ ३७ टक्के ख्रिस्ती हे प्रोटेस्टंट आहेत.)

असे असूनही लुथर कालबाह्य झालेला नाही. आजच्या सत्योत्तरी (Post Truth) समाजात, जेथे 'छ्द्मवार्तांचे' (Fake News) प्राबल्य वाढत आहे, आणि कृत्रिम प्रज्ञा-अथांग डेटा या आयुधांनी सज्ज झालेले 'बॉट्स' धुमाकूळ घालत आहेत (आणि थेट अमेरिकन निवडणुकांत हस्तक्षेप करताहेत), तेथे सत्य आणि मानव यात अंतर निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत विचारांचे अधिष्ठान मानणारा, आपल्या मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता 'इष्ट वाटेल तेच साध्य करीन' हेखुद्द आपल्या सम्राटाला ठणकावून सांगणारा (आणि त्याप्रमाणे जगणारा ) लुथर आजही ताजा वाटतो. चिकित्सा, नैतिक धैर्य आणि वैचारिक कणखरपणा हे लूथरचे गुण ५०० वर्षांपूर्वी जेवढे समर्पक होते तेवढेच आजही आहेत. आणि या गुणांचा विकास करणे हीच लूथरला खरी श्रद्धांजली ठरेल.

.............................................................................................................................................

लेखक भूषण निगळे हे साहित्यात रुची असलेले संगणक अभियंता आहेत. ते जर्मनीतील Hemsbach इथं राहतात.

bhushan.nigale@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......