‘न्यूड’च्या निमित्तानं आलेली जाग अशीच राहावी; म्हणतात ना, ‘जागो तब सवेरा!’ 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
मिलिंद कांबळे
  • ‘न्यूड’चं पोस्टर
  • Sat , 18 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie रवी जाधव Ravi Jadhav न्यूड Nude

रवी जाधवांच्या ‘न्यूड’ या चित्रपटाला इफ्फीमधून वगळण्यात आलं आणि जवळ जवळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी इफ्फीवर बहिष्कार टाकण्यासाठी आवाहन करू लागली, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय असं बोलू लागली. जे प्रत्यक्षातही सुरू आहे. ‘न्यूड’च्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीला याची जाणीव झाली आणि ती सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करू लागली. न्यायासाठी उभं राहणं हे ‘जाग्या व्यक्तीचं’ लक्षण आहे, पण फक्त आपल्या न्यायाच्या वेळेस सर्वांना आवाहन करून न्याय मिळवण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे.

आपली मराठी चित्रपटसृष्टी देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात दर्जेदारपणा, आशयघन चित्रपटांसाठी ओळखली जाते. ‘श्वास’नं सुरू झालेला हा प्रवास ‘दशक्रिया’पर्यंत येऊन ठेपलाय. चित्रपट वेगळा आणि प्रत्यक्ष चित्र वेगळं आहे. पण मराठी चित्रपटसृष्टीनं कधीच सामाजिक मुद्दयांवर ठोस भूमिका घेतलेली नाही.

काही उदाहरणं पाहूया. फार दूर जाण्याची गरज नाही. २०१४मध्ये पुण्यात मोहसीन शेख या मुस्लिम तरुणाची द्वेषातून हत्या झाली, हैदराबादला रोहित वेमुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं, दादरीला बीफच्या संशयातून अखलाकला जमावानं मारून टाकलं, १६ वर्षाच्या जुनेदला मुस्लीम आहे म्हणून रेल्वेमध्ये मारलं गेलं, राजस्थानला पहू खानला मारलं, देशात गायीच्या नावावर माणसं मारली जाऊ लागलीत, गुजरातच्या उन्नामध्ये दलितांना अमानुष मारहाण झाली, (त्याचा व्हिडिओ अजून युट्युबवर आहे. तो पाहिला तर समजेल हे विष किती पसरत चाललं आहे. कधी नव्हे ते लोक सरळसरळ जातीवरून बोलू लागले आहेत.) याशिवाय दाभोलकरांची हत्या, कॉ. गोविंद पानसरेंची हत्या, कुलबुर्गींची हत्या, अगदी परवा झालेली गौरी लंकेश यांची हत्या, कांचा इल्लया यांनाही सरळ सरळ मारण्याची धमक्या येत आहेत, पण आपली मराठी चित्रपटसृष्टी ‘बागो में बहार है’ या उक्तीप्रमाणे ‘आमच निवांत चाललंय’ याच धुंदीत आहे.

कधी चित्रपटावरून जात काढली गेली. ‘सैराट’च्या वेळेस जे झालं, तेव्हा कुणीच अशा प्रकारे उभं नाही राहीलं. मागे मराठीतल्या एका संगीतकारानं एकदा सोशल मीडियावर सरळ सरळ लिहिलं होतं- “जे लोक जात मानत नाहीत, त्यांनी बालगंधर्वसारखा चित्रपट बनवून दाखवावा.” हे नक्की काय आहे? कशाचं द्योतक आहे? आणि तरीही मराठीतील रेणुका शहाणे, जितेंद्र जोशी, नागराज मंजुळे इत्यादी मंडळी कायम न्यायासाठी उभी राहत आलीत. अशा काहींचा अपवाद सोडला तर मराठी चित्रपटसृष्टी वेगळ्या जगात, वेगळ्या धुंदीत असते असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही.  

मराठी चित्रपटसृष्टीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायची इच्छा नाही, पण ती कायम ‘सिलेक्टिव्ह अप्रोच’नं काम करत आहे. पुण्यात राम गणेश गडकरींचा पुतळा तोडण्यात आल्यावर मराठी चित्रपटसृष्टी लगेच हलली. कुणी कविता लिहिल्या, कुणी प्रयोग करणार नाही म्हटलं. ज्याला जमेल तसा ज्यानं त्यानं निषेध केला आणि आज परत ‘न्यूड’साठी केला जात आहे. फक्त स्वतःच्या घरावर दगड पडायला लागले की, तुम्हाला न्यायाची आठवण येते का?

या बाबतीत मला दक्षिणेतली चित्रपटसृष्टी खूप चांगली आणि माणूसपण जपणारी वाटते. कुठलाही मुद्दा असो, त्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष सहभागी असो, जी बाजू न्याय्य असेल, त्यासाठी सगळे जण उभे राहतात. मागे निटचा मुद्द्यावरून वातावरण तापल्यानंतर अनिता नावाच्या १७ वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आणि संपूर्ण तामिळनाडू पेटून उठलं. त्याचं नेतृत्व कुणी केलं? तर तमिळ कलाकारांनी. पा रणजित ते ग्रेट रजनीकांतपर्यंत सगळ्यांनी आवाज उठवला.

ती मुलगी दलित होती म्हणून तिकडे कुठल्या कलाकारानं हात आखडता घेतला नाही. अगदी कालपरवा झालेला  ‘मर्सल’चा वाद आठवून पहा. रजनीकांत एका राजकीय पक्षाची जवळीक साधत आहेत असं असूनसुद्धा त्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला. 

हे महाराष्ट्रात अजिबात दिसत नाही. एक राजकीय पक्ष कायदा हातात घेऊन कायम दमदाटीची भाषा करत असतो. कधी याला मार, कधी त्याला मार. त्या राजकीय पक्षाचा अजेंडा सोडून देऊ. पण दुसरा एक राजकीय पक्ष कायदा हातात घेऊन हिंसा करत आहे. निदान त्याच्या विरोधात तरी उभे राहाल का नाही? 

एकीकडे ‘न्यूड’च्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीची जशी गळचेपी होतेय, तशीच दुसरीकडे सर्वसामान्य लोकांनाचीही होतेय. अगदी बीफबंदीपासून, गरिबांचं अन्न हिरावलं जाण्यापासून ते फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टसाठी नोटीस देऊन दहशत बसवण्याचं काम सुरू आहे. आज ‘न्यूड’च्या निमित्तानं परत आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला जाग आलीय. ही जाग अशीच राहावी हीच इच्छा! तशीही हिंदीतमध्ये एक म्हण आहेच की – ‘जागो तब सवेरा!’  

इफ्फीमधून ‘न्यूड’ काढून टाकण्यात आला. सरकारच्या या अघोषित आणीबाणीमध्ये सर्वसामान्य लोक तुमच्यासोबत आहेत, जमेल तसा आवाज उठवत आहेत. तशीच जबाबदारी तुमच्यावरसुद्धा येऊन पडलीय की, तुम्हीसुद्धा न्यायासाठी कायम उभं राहिलं पाहिजे. नाहीतर दगड फेकल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई झाली की, तुम्ही परत ‘बागों में बहार है’ म्हणाल. म्हणून तुमच्यासाठी मार्टिन निमोलरची ही कविता  -

First they came for the Socialists, and I did not speak out—

Because I was not a Socialist.

Then they came for the Trade Unionists, and I did not speak out—

Because I was not a Trade Unionist.

Then they came for the Jews, and I did not speak out—

Because I was not a Jew.

Then they came for me—and there was no one left to speak for me.

.............................................................................................................................................

लेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.

milind.k@dcfadvisory.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Amol Pathak

Mon , 20 November 2017

लेखकाचं नेमकं म्हणणं काय? चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रपटात जातीय जुलुमाच प्रदर्शन करावं का? का लेखक स्वतः आपल्या लेखातून करतोय त्या प्रमाणे जातीय वादाचे उदात्तीकरण करावे? महाशय चित्रपट निर्माते आणि प्रेक्षक यांच्यावर तुमची पक्षपाती विचारधारा थोपवू नका


???? P

Sat , 18 November 2017

वा रे मोठा विद्वान ! आम्हाला शहाणपण शिकवतोय. स्वत: जी उदाहरणे दिली आहेत ती कशी पक्षपाती आहेत ती बघ पहले. फक्त पहलू, जुनेद, रोहित, वगैरे वगैरे यांचीच उदा. दिलेली आहेत याने. अजूनही काही ऊदा. आहेत ती बघ, १) काश्मिरी पंडितांना काश्मिरबाहेर काढण्यात आले. २) बसिरहतमध्ये दंगलीत मुसलमानांनी एका निष्पाप हिंदू व्यक्तीचा बळी घेतला. ३) केरळात कित्येक संघस्वयंसेवकांची दिवसाढवळ्या निघृण हत्या झाली ४) कोपर्डीत उच्चवर्णिय तरूणिवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. (कोर्टाने आरोपीना आज दोषी ठरवले) ५) काॅग्रेसच्या नेत्याने मिडीयासमोर कोवळया वासराला ठार मारले ६) महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊ कदमने घरी गणपती आणला म्हणून काही लोकांनी त्याला बहिष्कृत करण्याची धमकी दिली असेही एेकले होते. या वरिल घटनांचा आपण कधी निषेध केल्याचे आमच्या स्मरणात नाही. त्यामुळे फुकटचे शहाणपण इतरांना शिकवू नका. प्रथम धर्म, जात,पक्ष यांचा विचार न करता चुकिच्या गोष्टींचा निषेध करायला शिका व मगच इतरांना ज्ञान( ! )द्या


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......