‘द थ्री पेनी ऑपेरा’ - भांडवलशाही व्यवस्थेतील भ्रष्टाचार उजेडात आणणारं नाटक
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘द थ्री पेनी ऑपेरा’चं पोस्टर
  • Sat , 18 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe द थ्री पेनी ऑपेरा the threepenny opera बर्टोल्ट ब्रेख्त Bertolt Brecht

गेली काही महिने मुंबर्इकर नाट्यरसिकांना जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त (१८९८-१९५६) या जागतिक दर्जाच्या नाटककाराची नाटकं बघण्याची सुवर्णसंधी मिळते आहे. काही दिवसांपूर्वी ‘मदर करेज अँड हर चिल्डेन’ हे नाटक बघायला मिळालं, तर अलीकडे ‘द थ्री पेनी ऑपेरा’ हे अतिशय गाजलेलं नाटक. ही संगीतिका असून यात ब्रेख्तच्या जोडीला एलिझाबेथ हॉप्टमान यांनी लेखन केलं आहे.

ब्रेख्तच्या इतर नाटकांपेक्षा हे नाटक मराठी रसिकांना माहिती असतं, कारण पु.ल.देशपांडे यांनी याचं ‘तीन पैशाचा तमाशा’ या नावानं मराठी भाषांतर केलं आहे. हे नाटक १९८० च्या दशकात पुण्याच्या ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’तर्फे सादर करण्यात आलं होतं. पु.लं.नी केलेल्या भाषांतराबद्दल तेव्हासुद्धा महत्त्वाचे आक्षेप होते. ब्रेख्तला ‘ऑपेरा’ हे पाश्चात्य जगातील अभिजन वर्गाच्या करमणुकीच्या साधनाची टिंगल करत तिकडच्या समाजातील विसंगती वेशीवर टांगायच्या होत्या. म्हणून त्याच्या नाटकाचं शीर्षक ‘थ्री पेनी ऑपेरा’ असं आहे. पण पु.लं.नी त्याचं ‘तीन पैशाचा तमाशा’ असं धादान्त चुकीचं भाषांतर करून ठेवलं. शिवाय जी धार ब्रेख्तच्या नाटकात आहे, त्यातील बरंच काही ‘तीन पैशाचा तमाशा’मध्ये उतरलेलं नाही. असो.

ब्रेख्तच्या नाटकाचा पहिला प्रयोग बर्लिनमध्ये ऑगस्ट १९३१ मध्ये झाला. म्हणजे हिटलर सत्तेत येण्याच्या दोन वर्षं अगोदर. ब्रेख्तचं हे नाटक संगीतिका आहे. यात नाच-गाण्यांना महत्त्व आहे. पाश्चात्य जगात या नाटकावर आधारित तीन सिनेमेसुद्धा येऊन गेले. ब्रेख्तच्या नाट्यसृष्टीत या नाटकाला महत्त्वाचं स्थान आहे.

आदित्य बिर्ला उद्योग समूहातर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘आद्यम’ उपक्रमांतर्गत या नाटकाची निर्मिती करण्यात आली असून त्याचं सादरीकरण ‘मॉटली’ या मुंबर्इस्थित नाट्यसंस्थेतर्फे करण्यात आलं.

या नाटकाचं कथानक १९ व्या शतकातील लंडन शहरात घडतं. श्रीयुत जोनाथन पिचम व त्यांची पत्नी दारिद्रयात जगत असतात. ते भिकाऱ्यांचा संघटित व्यवसाय चालवतात. यासाठी ते लंडन शहराचे भाग पाडतात आणि संघटनेच्या कोणत्या सभासदानं कोठे व कोणत्या दिवशी भीक मागायची वगैरे सर्व निर्णय ते घेतात. त्यांच्या संघटनेच्या सदस्यालाच फक्त भीक मागण्याची परवानगी असते. सदस्यांच्या उत्पन्नातील पन्नास टक्के कमिशन पिचम यांचं, असा हा व्यवहार असतो.

पिचम यांना पॉली नावाची तरुण मुलगी असते. ती गावातल्या मॅक नावाच्या एका दरोडेखोराच्या प्रेमात पडते, पुढे जाऊन त्याच्याशी लग्नही करते. मॅक म्हणजे सर्व प्रकारच्या गुन्हांत व अनैतिक कामांत तरबेज. हे लग्न पिचम यांच्या इच्छेविरुद्ध होतं. मॅक सतत वेश्यागमन करत असतो. तो जर चोरी करत नसेल किंवा घरफोडी करत नसेल तर एखाद्या वेश्येकडे असेल इतका तो बदनाम असतो. ब्रेख्त इथं आधुनिक शहरी जीवनातील एक विसंगतीकडे बोट दाखवतो. मॅकचा सर्वांत चांगला मित्र म्हणजे लंडन शहराचा पोलिस आयुक्त ब्राऊन. त्यांच्यात मैत्रीपेक्षा व्यावसायिक हितसंबंध जास्त असतात. मॅकनं केलेल्या प्रत्येक चोरीत किंवा टाकलेल्या दरोड्यात पोलिस आयुक्ताचा हिस्सा असतो. म्हणूनच एवढ्या चोऱ्या करूनही पोलिसांच्या रेकॉर्डवर मॅकबद्दल काहीही नसतं.

पिचम यांना वाटतं की, पॉलीचं लग्न मोडायचं असेल तर मॅकला पोलिसांच्या तावडीत दिलं पाहिजे. या दरम्यान नाटककार प्रेक्षकांना झगमगाट असलेल्या आधुनिक शहरांच्या पोटातच गरिबी, भयानक दारिद्रय, उपासमार वगैरेंचं दर्शन घडवतो.

जेव्हा हे कथानक लंडनमध्ये घडत असतं, त्याच वेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहण समारंभाची जय्यत तयारी सुरू असते. यातील विसंगती चटका लावणारी आहे. पिचम आणि त्याच्या गटातील भिकाऱ्यांना हा शाही समारंभ म्हणजे भरपूर कमार्इ करण्याची सुवर्णसंधी वाटते. मागच्या वर्षी गणपतीच्या दिवसांत मुंबर्इच्या वृत्तपत्रांत एक बातमी प्रकाशित झाली. या बातमीत म्हटलं होतं की, मुंबर्इत उत्तर प्रदेश व बिहारमधून अनेक पाकिटमार दाखल झालेत. कारण लालबागच्या राजाच्या गणपतीत खूप पाकिटं मारता येतात. हे बघितलं की ब्रेख्तसारखे लेखक कसे काळाच्या मर्यादा ओलांडून जातात हे दिसतं.

पॉलीला समजतं की, तिचे वडील तिच्या नवऱ्याच्या म्हणजे मॅकच्या मागे लागले आहेत आणि त्यांच्याजवळ त्याला तुरुंगात टाकण्याइतका सज्जड पुरावा आहे. ती त्याला लंडन सोडून जाण्यास सांगते. जाताना मॅक तिला त्याच्या व्यवसायाच्या सर्व खुब्या समजावून सांगतो आणि त्याच्या चेल्यांना पॉलीच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या सूचना देतो. मॅक लंडनबाहेर जाताना त्याला त्याची जुनी मैत्रीण जेनी भेटते. वास्तविक पाहता जेनीला सौ. पिचम यांनीच मॅकला अडकवण्याची कामगिरी दिलेली असते. त्यानुसार मॅकला अटक होते. लंडनचा पोलिस आयुक्त ब्राऊन मॅकचा मित्र असूनही मॅकला तुरुंगात जावं लागतं.

हेसुद्धा आज आपण सर्रास बघत असतो. मोठमोठे गुन्हेगार पोलिस दलातील उच्चपदस्थांचे मित्र असतात. पण क्वचित अशी वेळ येते की, त्या नामवंत गुंडांनासुद्धा जेलची हवा खावी लागते. म्हणूनच ब्रेख्तसारख्यांच्या प्रतिभेला सलाम करावा लागतो.

मॅकचे कारनामे इथं संपत नाहीत. तो तुरुंगात असताना त्याची पत्नी पॉली त्याला भेटायला जाते, तर तिथं तिची गाठ मॅकच्या जुन्या मैत्रीणीशी ल्युसीशी पडते. ही ल्युसी म्हणजे पोलिस आयुक्त ब्राऊनची मुलगी. त्या दोघीत अक्षरशः मारामारी होते. पॉली रागारागानं निघून जाते, तर ल्युसी मॅकला तुरुंगातून पळून जाण्यास मदत करते. मॅक तुरुंगातून पळून गेल्याचं पिचमला समजतं, तेव्हा तो ब्राऊनला धमकावतो की, जर त्यानं मॅकला लवकरात लवकर अटक केली नाही तर पिचम व त्याचे भिकारी राणीच्या सोहळयादरम्यान गोंधळ घालतील. या धमकीला घाबरून ब्राऊन मॅकला अटक करतो व जेलमध्ये घालतो. आता मॅकला फाशीची शिक्षा दिली जाते. मृत्युच्या दारात उभा असलेला मॅक तुरुंगातून सुटण्यासाठी तुरुंगाधिकाऱ्याला लाच देऊ करतो. पण त्याची पत्नी किंवा त्याचे चोर मित्र तुरुंगाधिकारी मागत असलेली रक्कम उभी करू शकत नाहीत. पराभूत मॅक मृत्यूला सामोरा जाण्याची तयारी करतो. तेवढ्यात बातमी येते की, राणीच्या राज्यारोहणाच्या निमित्तानं मॅकची शिक्षा माफ करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्याला एक बंगला व निवृत्तीवेतनसुद्धा मंजूर झालं आहे. अशा आनंदी पण विदारक मानसिकतेत नाटक संपतं.

या तशा अवघड नाटकाचं दिग्दर्शन इमाद शहा या तरुण रंगकर्मीनं केलं आहे. जाता जाता उल्लेख करायला हरकत नाही की, इमाद शहा हा नासिरुद्दीन शहांचा मुलगा आहे. लहान वयातच शिवधनुष्य उचलण्याची हिंमत दाखवल्याबद्दल इमादचं अभिनंदन. त्याच्या दिग्दर्शनात सफार्इ दिसून येते. त्याला ख्यातकीर्त नटांची उत्तम साथ लाभली आहे. पिचमच्या मुख्य भूमिकेत इंग्रजी रंगभूमीवरील एक आदरणीय नाव बग्स भार्गव आहेत. त्यांनी कमालीच्या सहजतेनं जोनाथन पिचमच्या भूमिकेत रंग भरले आहेत. मेहेर मिस्त्री (मिसेस पिचम), साबा आझाद (पॉली) यांनी योग्य साथ दिली. खास उल्लेख करावा लागतो तो मॅकच्या भूमिकेतील अरुणोदय सिंग या तरुण व कमालीच्या देखण्या नटाचा. हा नट अलिकडे काही हिंदी सिनेमात येऊन गेला आहे. पण त्याचा अभिनय रंगभूमीवर खूप खुलतो.

हे नाटक एक संगीतिका असल्यामुळे यात नाच व गाण्यांना खूप महत्त्व आहे. नाटकातील नृत्यांची जबाबदारी साबा आझाद यांनी पेलली. येल क्रिश्ना यांची प्रकाशयोजना नाटकाची गरज भागवणारी होती. या नाटकाचं संगीत जर्मन पियानोवादक.फेलीक्स हग, जहांगिर जहांगिर व नितीश रामभ्रदम या त्रिमूर्तीनं दिलं आहे. ही सर्व जेष्ठांची टीम इमाद शहानं व्यवस्थित हाताळली आहे. परिणामी हे नाटक बघणं हा एकाच वेळी प्रसन्न करणारा व अंतर्मुख करणारा अनुभव ठरतो. ब्रेख्तनं या नाटकाच्या माध्यमातून भांडवलशाही समाजव्यवस्थेतील भ्रष्टाचार व्यवस्थित चव्हाट्यावर आणला. शहरातील नामवंत चोर व पोलिस आयुक्तांची मैत्री व भागीदारी; राजघराण्यातील कार्यक्रमानिमित्त गुंडांना माफ करणं वगैरे प्रकार एकविसाव्या शतकातही घडताना दिसतात.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......