‘तुम्हारी सुलु’ : चौकटीबाहेर जाऊन जगण्याचा प्रयत्न 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘तुम्हारी सुलु’चं पोस्टर
  • Sat , 18 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie तुम्हारी सुलु Tumhari Sulu विद्या बालन Vidya Balan

आजकाल बॉलिवुडनं वास्तववादी आणि खऱ्या आयुष्याशी नातं जोडणाऱ्या पात्रांच्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या तितक्याच वास्तववादी कथा समोर आणण्याचा पवित्रा घेतला आहे. ज्याला त्यातील मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या पात्राच्या काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आणि जिद्द यांची जोड असते. मग तो अलीकडेच आलेला 'सिक्रेट सुपरस्टार' असो वा या आठवड्यातील 'तुम्हारी सुलु' असो. यातून बॉलिवुड आपल्या खऱ्या आयुष्याशी नातं जोडता येतील, अशा कथा दाखवण्याचा एक उल्लेखनीय प्रयत्न करत आहे हे नक्की. 

सुलोचना ऊर्फ सुलु (विद्या बालन) या गृहिणीला स्वतःचा व्यवसाय किंवा किमान नोकरी तरी करायची आहे. तिला नोकरीची गरज आहे अशातला भाग नाही. पण आपल्याला कधीच महत्त्व न देणाऱ्या आणि लग्नानंतरही आपल्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत टोमणे मारत राहणाऱ्या माहेरच्या लोकांना उत्तर म्हणून ती नोकरी करायचं ठरवते. बऱ्याच खटाटोपानंतर तिला थेट रेडिओ जॉकी म्हणून नोकरी मिळते. त्यातही पुन्हा तिला स्वतःचा असा एक लेट नाइट शो कंडक्ट करायला मिळतो. 

आपला पती अशोकच्या (मानव कौल) सहाय्यानं ती हे आव्हान पेलते. ते करत असताना तिच्यासमोर येत असलेल्या अडचणी, तिचं आणि पर्यायानं तिच्या कुटुंबातील बदलत जाणारं वातावरण वगैरे गोष्टी म्हणजे 'तुम्हारी सुलु'. 

सुलु, तिचं आयुष्य, तिची मध्यमवर्गीय मानसिकता आणि समस्या, कुठलंही हातचं न राखता बोलायची तिची सवय, तिचा गंमतीशीर स्वभाव अशा लहानसहान गोष्टी चित्रपट टिपतो. शिवाय, सुलुला नोकरी मिळाल्यावर नेमकी अशोकची नोकरी जाण्याची वेळ येते. मग यावेळी त्याची मानसिकता, त्याचा डॉमिनंट होऊ पाहणारा स्वभाव, त्याची चिडचिड, तरीही पुन्हा कुटुंबाला एकत्र ठेवण्याची, त्या दोघांची धडपड या सर्व गोष्टी या ओघात येतात. 

या प्रवासात तिला मदत करणारा, सांभाळून घेणारा, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा पती, अशोक; तिला संधी देणारी रेडिओ वॉवची हेड मारिया (नेहा धुपिया); तिला ट्रेनिंग देणारा, कवी, वगैरे पंकज (विजय मौर्य); कॅब ड्रायव्हर (तृप्ती खामकर) हे सर्व लोक या कथानकात येतात आणि अगदी छोट्याछोट्या भूमिका आणि दृश्यांमधून आपल्यावर एक ठसा उमटवून जातात. 

चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग सहजासहजी पाडता येतात. ते खरं तर त्यातील अगदी टोकाच्या बदलांमुळे. कारण एकीकडे पूर्वार्ध एकदम हलकाफुलका, खुसखुशीत संवाद आणि दृश्यांनी आपलं लक्ष वेधून घेतो, तर दुसरीकडे उत्तरार्ध जरासा टिपिकल फॅमिली ड्रामा पद्धतीनं प्रवास करतो. 

अर्थात याला कारण चित्रपटाची मूळ कथा हे आहे. पण तरीही हे बदल इतक्या ठळकपणे दिसले नसते, यातील या दोन्ही गोष्टींचं, म्हणजे खुसखुशीतपणा आणि गंभीर नाट्य, यांचं उत्तम मिश्रण असतं तर चित्रपट एकसंध पटकथेच्या हिशोबानं आणखी चांगला झाला असता. 

शिवाय, काही प्रसंग जास्त ताणल्यासारखे आणि फक्त एखाद्या आवश्यक दृश्याला पूरक म्हणून किंवा त्याचा पाया म्हणून ओढूनताणून उभे केले आहेत असं वाटत राहतं.

अर्थात पडद्यावर जे नाट्य घडतं, ते या थोड्याशा मोठ्या पण चित्रपटाच्या ओघात दुर्लक्ष करता येण्याजोग्या चुका वगळता आपल्याला खिळवून ठेवतं. 

विद्या बालनची सुलोचना ऊर्फ सुलु ही उत्कृष्ट आहे आणि तिच्या उत्तम परफॉर्मन्सपैकी एक म्हणता येईल इतकी चांगली आहे. मानव कौलनं साकारलेला अशोकही तितकाच प्रभावी आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री छान आहे. खासकरून त्यांच्यातील रोमँटिक दृश्यं चांगल्या प्रकारे लिहिली आणि चित्रित करण्यात आली आहेत. पार्श्वसंगीतदेखील कथानकाला पूरक आहे. 'मनवा लाइक्स टू फ्लाय' आणि 'हवा हवाई 2. 0' ही दोन गाणी कथानकात अडथळा ठरत नाहीत. अगदी 'बन जा रानी'देखील फ्रेश आहे. पण 'फराटा' हे गाणं यात का आहे, असं पुन्हापुन्हा वाटत राहतं. बाकी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उजवा आहे. छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत खास उल्लेख करावं असं आहे. 

अशोक आणि सुलोचना ही पात्रं आपल्यासमोर उत्तमरीत्या उभी करण्यात आली आहेत. ही पात्रं दाखवताना दिग्दर्शक कुठेही हातचं राखतोय असं वाटत नाही. इतर पात्र कथानकाला पूरक ठरतील या हिशोबानं समोर येतात. 

दिग्दर्शक त्रिवेदीचा हा पहिला चित्रपट. त्यानं हा चांगल्या प्रकारे हाताळलाय. फक्त तो डगमगतो तो यातील लिखाणात. त्यातही पुन्हा हलकीफुलकी विनोदी अंगानं जाणारी कथा आणि त्यात अचानक निर्माण होणारं नाट्यपूर्ण आणि तणावपूर्ण वातावरण यात. अर्थात पुन्हा शेवटच्या काही दृश्यांमध्ये चित्रपट पुन्हा रूळावर येतो. आणि 'हॅप्पी एंडिंग' होतं. 

शिवाय, चित्रपटभर अनेक लहानसहान रूपकं आणि सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या गोष्टी आहे. उदाहरणार्थ, एकीकडे ती राहत असलेल्या घराच्या पाटीवर 'मि. अॅण्ड मिसेस अशोक' असा उल्लेख असणं, तर दुसरीकडे सुलुला नोकरी मिळाल्यावर तिच्या हर्षोल्हासाच्या वेळी पार्श्वभूमीवर ती आनंदात असताना समोरून एका कबुतराचं (ज्याला ती भाग्यशाली म्हणते) उडणं, या गोष्टी जितक्या परस्परविरोधी आहेत, तितक्याच बोलक्या आहेत. तिच्या सुरुवातीच्या काहीतरी करू पाहण्यासाठी धडपडणाऱ्या गृहिणीपासून ते तिच्या 'आरजे सुलु' बनण्याचा हा प्रवास दाखवण्यासाठी, या दोन गोष्टीदेखील रूपक म्हणून पुरेशा आहेत. 

तृप्ती खामकरच्या कॅब ड्रायव्हरचं पाकिस्तानी गाणी आवडत असूनही केवळ देशभक्तीचा आव आणणारे लोक आणि त्यांच्या मानसिकतेमुळे ती न लावण्यावरील भाष्यदेखील केवळ हास्यात विरून न जाता कुठेतरी आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नावर बोट ठेवतं.  

चित्रपट तसा सुलु आणि तिची स्वप्नं यांच्याभोवती फिरतो. पण असं करताना तो कुठेही स्त्रीवाद, वगैरेचा आव आणत नाही. मला स्वैर आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य हवंय, असं तिचं मत नाही. तसं पाहिलं तर ती तिच्या चौकटीबद्ध आयुष्यात खुश आहे. पण तिला फक्त त्यात रमायचं नाहीये. तिला स्वतःसाठी, कुटुंबासाठी काहीतरी करायचंय. तिचं लग्न झालंय, तिला एक मुलगा आहे या सर्व मर्यादा ती जाणून आहे. पण या मर्यादा समस्या तिच्या आड येणार नाहीत, अशा पद्धतीनं ती त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करते. 

नोकरी आणि कुटुंब, सांसारिक जीवन यांचा समतोल ती राखते. तिच्या हातात आहे, तोपर्यंत तो समतोल कायम ठेवण्याचा प्रयत्न करते. पण असं करताना जेव्हा प्रश्न या दोन्हीपैकी एक निवडायचा येतो तेव्हा ती कुटुंब निवडते. पण एवढंच करून ती थांबते का? तर नाही. ती पुन्हा नव्यानं स्वतःचा शोध घेऊ लागते. 

हे प्रसंग हलकेच 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाची आठवण करून देतात. पण ते तेवढ्यापुरतंच. कारण तोपर्यंत 'तुम्हारी सुलु' आपल्यावर एक वेगळा चित्रपट म्हणून प्रभाव टाकण्यात यशस्वी झालेला असतो. 

सुलुचा हा प्रवास दुर्लक्ष करण्याजोगा तर नक्कीच नाही. आजच्या 'वर्किंग वुमन'चं एक उत्तम चित्रण म्हणू याकडे पाहता येईल. आपल्या आसपास अशा अनेक सुलु आपल्याला सापडतील, यात काही नवल नाही. बाकी सुलुचा हा प्रवास एकदातरी मोठ्या पडद्यावर पहावाच असा आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......