पेरुमल मुरुगन यांचं पुनरागमन (पूर्वार्ध)
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
एलिझाबेथ कुरुविला
  • लेखातील सर्व छायाचित्रं - Priyanka Parashar/Mint
  • Fri , 17 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो पेरुमल मुरुगन Perumal Murugan

२०१५मध्ये तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी आपल्यातील लेखकाचा मृत्यू झाल्याचं आणि यापुढे आपण लेखन करणार नसल्याचं जाहीर केलं, तेव्हा भारतीय साहित्यविश्वात मोठीच खळबळ माजली होती. मात्र त्यानंतर न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निकाल देऊन त्यांच्या लेखनाचा सन्मान केला. तेव्हापासून मुरुगन पुन्हा लिहू लागले आहेत. या वर्षी त्यांची चार पुस्तकं इंग्रजीमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांना प्रत्यक्ष भेटून लिहिलेला हा प्रदीर्घ लेख. हा मूळ लेख ‘mint’ या इंग्रजी दैनिकाच्या ‘Lounge’ या शनिवारच्या पुरवणीमध्ये प्रकाशित झाला आहे. त्याचा पूर्वपरवानगीनं केलेला हा मराठी अनुवाद.

.............................................................................................................................................

पहाटेचे पाच वाजलेत. तामिळनाडूतल्या नमक्कल शहरामधील रस्त्यांवर अंधार असला तरी चहाच्या दुकानांतून येणाऱ्या उजेडाच्या तिरिपीमुळे त्या अंधारात अधूनमधून खंड पडलेला दिसतो. एवढ्या पहाटेच्या वेळेस तीच दुकानं उघडी असणार म्हणा! लवकर उठणारी काही मध्यमवयीन माणसं रस्ता तुडवत जात आहेत. त्यांनी कमरेभोवती गुंडाळलेल्या पांढऱ्या ‘वेष्टी’ गुडघ्यापर्यंत वर ओढून घेतल्या आहेत आणि त्यांच्या पायात स्पोर्ट्स शूज आहेत. दुकानाच्या पायरीवर बसलेल्या माणसाला पत्ता विचारायला आम्ही थांबतो. त्याचे केस विस्कटलेले आहेत आणि झोपेतून उठल्यामुळे तारवटलेला चेहरा अजूनही उबदार वाटतो. आम्ही त्याला पत्ता विचारतो, तेव्हा तो गोंधळात पडल्यासारखा दिसतो. आम्ही तिथून पुढे जाणार तेवढ्यात गाडीत बसलेल्या एकाच्या डोक्यात कल्पना येते आणि तो विचारतो, ‘पेरुमल मुरुगनचं घर माहित्ये का?’ ते ऐकून त्या माणसाचा चेहरा उजळतो आणि आम्हाला नेमका पत्ता मिळतो. मग काही मिनिटांतच आम्ही त्या तमीळ लेखकाच्या घरी पोचतो.

मुरुगन आम्हाला पाहून एरवी नक्कीच भीतीनं खचले असते.

आम्ही त्यांना आमच्या सोबत घेतो आणि तिथून २० किमी अंतरावरील वात्तुर गावाच्या दिशेनं जातो. तिथं त्यांची पुतणी राहते. तिच्या घरी सहा वर्षांचा मुलगा, नवरा, त्याचे आईवडील आणि आजी एवढी माणसं आहेत. पुतणीचा निसर्गोपचाराचा व्यवसाय आहे. ही मंडळी छोटे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे गुरंही आहेत. त्यांची शेतजमीन मुरुगनच्या गावातील जमिनीसारखाच दिसतो. मुरुगन कुटापल्लीत लहानाचे मोठे झाले. कुटापल्ली ही नमक्कल जिल्ह्यातील तिरुचेनगोडे नगरपालिकेच्या हद्दीत येते. आता तिथं बरेच गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यांच्या लेखनात या भागाचा उल्लेख खूपच जिव्हाळ्यानं येतो. तिथं आम्हाला पामची झाडं क्षितिजरेषेवर उंच गेलेली दिसतात. या कोरड्या हवामानाच्या प्रदेशातील लहान लहान शेतांत मका आणि भुईमूग घेतला जातो. कारण त्यांचा गुरांना खायला उपयोग होतोच, शिवाय त्या पिकांना पाणीही कमी लागतं.

आम्ही बाजूच्या रस्त्यावर वळतो. कडेच्या शेतातली लाल माती नुकतीच नांगरल्यासारखी दिसते. आम्ही लेखकाचे फोटो काढण्यासाठी थांबतो, तेव्हा बाजूच्या चहाच्या दुकानातील लोकांचं लक्ष आमच्याकडे जातं. मुरुगनच्या नजरेतून त्याचं अवघडलेपण स्पष्ट जाणवतं. “अहो, लोक ओळखतात मला इथं.’’ ते आम्हाला पुढे चलायची विनंती करतात.

आणखी काही किलोमीटर पुढे गेल्यावर वातावरणात आणखीनच शांतता भरून राहिलेली दिसते. तिथंही तोच प्रकार घडतो. आमच्या बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या एका गाडीमुळे आम्ही सावध होतो. वातावरणात किंचितसा ताणही जाणवू लागतो. परंतु आम्ही जेव्हा त्यांच्या पुतणीच्या शेतावर पोचतो, तेव्हा हा ताण निवळतो. आता ते त्यांच्या विश्वासाच्या माणसांसोबत असतात.

मुरुगनची कादंबरी ‘मधोरूभागन’ (‘वन पार्ट वुमन’) बाजारातून काढून घ्यावी म्हणून मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेविरुद्ध जुलै २०१६ मध्ये न्यायालयानं निकाल देऊन म्हटलं होतं की, “लेखक पेरुमल मुरुगन यांनी यापुढे भीतीच्या छायेखाली राहू नये...’’

मुरुगनच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला मान देणाऱ्या त्या निकालपत्रात असं लिहिलं होतं, “या लेखकाला नवसंजीवनी मिळाली पाहिजे. तो लेखन उत्तम करतो. ते त्याला करायला मिळालं पाहिजे.’’ स्थानिक प्रशासनानं मुरुगनला आपल्या लेखनासाठी जाहीर बिनशर्त माफी मागणं भाग पाडलं होतं. परंतु न्याययंत्रणेची भूमिका मात्र त्यांना धीर देणारी होती. तथापि, तेव्हा झालेल्या जखमा अजूनही चिघळलेल्याच आहेत असं आम्हाला दिसत होतं.

२०१५ मध्ये अनेक जातीसंघटनांनी त्या कादंबरीबद्दल मुरुगनला धमक्या दिल्या होत्या आणि हिंसक निदर्शनंही केली होती. त्यामुळे त्यांना कित्येक आठवडे मन:स्ताप सहन करावा लागला होता. त्याची परिणती त्यांनी ‘मी लेखक म्हणून मरण पावलो आहे,’’ असं जाहीर करण्यात झाली होती. त्यांची पत्नी पी. एझिलारसी आणि ते स्वतः त्या वेळेस नमक्कल येथील सरकारी कला महाविद्यालयात तमीळ साहित्याचे प्राध्यापक होते. ज्या घरात त्यांचं सतरा वर्षांपासून वास्तव्य होतं, ते घर त्यांना सोडावं लागलं. दोघांचीही चेन्नईमधल्या महाविद्यालयात बदली झाली. आपल्याला जणू हद्दपार करण्यात आलं आहे असंच त्या दोघांना वाटू लागलं होतं. त्याबद्दल मुरुगन सांगतात- “मला एखाद्या निर्वासितासारखं वाटू लागलं होतं. माझं जीवन मी इथं घडवलं होतं. आमचं घर इथंच होतं. आमची मुलं इथं शिकली. चेन्नईमध्ये आम्ही आमच्या घरात नजरकैद झालो आहोत असंच वाटत होतं आम्हाला.’’

उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर त्यांनी चेन्नईहून अत्तुर इथं बदली मागून घेतली आहे. अजूनही ते नमक्कलला परत येतात, पण फक्त शनिवार-रविवारी. आठवडाभर ते तिथून १०० किलोमीटर अंतरावरील अत्तुरला असतात. तिथल्या अरिग्नार अण्णा सरकारी कला महाविद्यालयाचे मुरुगन प्राचार्य आहेत आणि तमीळ विभागाचे प्रमुखही आहेत. हे ठिकाण कोंगुनाडू प्रदेशाच्या जवळ आहे. कोंगुनाडूत कोईमतुर, इरोड, सेलम, नमक्कल आणि पश्चिम तामीळनाडूमधील काही जिल्हे येतात, तसंच केरळ आणि कर्नाटक यांचे सीमावर्ती जिल्हेही येतात. या सर्व भागांत सांस्कृतिक एकसंधता, समान भौगोलिकता आहेच, शिवाय तमीळ भाषेच्या ज्या बोलीत मुरुगन लिहितात, ती बोलीही इथं वापरात आहे. “कुणाला खरंही वाटणार नाही एवढं भयाण एकाकीपण मला चेन्नईत वाटत होतं. मी शरीरानं एकटा नव्हतो. दररोज तीनशे विद्यार्थ्यांना भेटत होतो. परंतु माझ्या मनाची कवाडं बंद झाली होती. वाचन, लेखन, साहित्यिक बैठकींना हजर राहाणं, अन्य लेखकांना आणि वाचकांना भेटणं यातलं काहीही मला जमत नव्हतं. एखाद्या मेल्या मढ्यानं चालावं तसं माझं जीवन झालं होतं.’’ मग ते एका डायरीत कविता लिहू लागले. लहानपणापासून ज्या निसर्गाशी त्यांची नाळ जुळली होती, त्याच निसर्गातील उपमांकडे ते कविता लिहिताना वळले. आपली स्थिती ‘घुशीसारखी’ झाली आहे’, ‘पाठीवर चुनखडीचं घर वाहणाऱ्या गोगलगायीसारखी झाली आहे’, ‘मूक’ समुद्रासारखी झाली आहे’, अशा शब्दांत ते स्वतःचं वर्णन करू लागले. “त्या दिवशी तू तुझ्या डोळ्यांदेखत ठार मारला गेलास,’’ असं स्वतःबद्दल म्हणू लागले. २२ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांनी ‘विचित्र पशू’ नावाची एक कविता लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं, कुणीतरी माझ्या डोक्यावर शिंगं रंगवली आहेत

ती सर्वांना दिसतात,

कुणीतरी माझं रूपांतर 

विचित्र पशूत करून टाकलं आहे.

त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये सातत्यानं तृतीयपुरुषी लेखन असतं. ज्या जगात, ज्या माणसांत ते जगले त्या जगाची, त्या माणसांची त्यात ते नव्यानं निर्मिती करतात. परंतु ही त्यांची कविता मात्र वैयक्तिक आहे. तो त्या क्षणाचा भावनिक आक्रोश असतो. (“मी जर तो क्षण टाळला असता तर त्याबद्दल मला नंतर कधीच लिहिता आलं नसतं.”)

डायरीतील या कविता आता ‘साँग्ज ऑफ अ कॉवर्ड’ या कवितासंग्रहात समाविष्ट आहेत. कलाचुवादु पब्लिकेशन्सनी छापलेली त्या कवितांची तमीळ आवृत्ती त्यांच्या दृष्टीनं अमूल्य आहे, कारण तिच्या मुखपृष्ठावर त्यांच्या वडिलांच्या स्वाक्षरीची प्रतिमा आहे. त्यांच्या प्रगती पुस्तकावर सही करता यावी यासाठी त्यांनीच वडिलांना सही शिकवली होती. मुरुगन एकवीस-बावीस वर्षांचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. त्यांचा फोटो नसल्यामुळे त्यांची सही हीच एकमेव आठवण म्हणून शिल्लक राहिली आहे. मुरुगन म्हणतात की आपल्या सहीतील अक्षरं काय आहेत हेसुद्धा त्यांना माहिती नव्हतं. शालेय शिक्षण पूर्ण केलेले त्यांच्या घराण्यातील मुरुगन हेच पहिले. त्यानंतर पुढे डॉक्टरेटपर्यंत मजल मारून त्यांनी आर. षण्मुगसुंदरम (१९१७- ७७) या आणखी एका कोंगू लेखकाच्या साहित्याचा अभ्यास केला.

अनुवादक एन. कल्याणरामन म्हणतात- “मागील पन्नास वर्षांच्या काळातल्या आधुनिक साहित्य संस्कृतीत उपेक्षित राहिलेले तमीळनाडूच्या परिसरातील समाज आता स्वतःची कहाणी प्रथमच मांडू लागले होते. मुरुगनसारखे लेखक विशिष्ट समाजातील व्यक्तींच्या, संस्कृतीच्या आणि भौगोलिक प्रदेशांच्या मानवी कहाण्या सांगू लागले होते. कसेबसे दिवसामागून दिवस ढकलत ते आपल्या नियतीला कसे सामोरे जातात याबद्दल सांगू लागले होते. सुसान सोन्टॅग यांच्या शब्दांत सांगायचं तर हे ऐतिहासिक क्षण होते. त्या ऐतिहासिक क्षणांत लिहिलेलं हे लेखन सहानुभूती जागृत करतं, हृदयाला आणि मनाला सुशिक्षित करतं, अंतर्मुख बनवतं, इतर लोक... आपल्यापेक्षा वेगळे असणारे लोकही अस्तित्वात आहेत याचं आपल्याला भान देतं. मग त्याचे परिणाम आपल्या सोयीचे नसले तरी तसं घडतं.’’ कल्याणरामन यांनी मुरुगन यांच्या लघुकथांचा इंग्रजी अनुवाद ‘गोट थीफ’ या नावानं केला आहे. याच आठवड्यात तो जगरनॉट बुक्सतर्फे प्रसिद्ध झाला. सध्या मुरुगन यांचा नवा कथासंग्रह अनुवादित करण्यात कल्याणरामन मग्न आहेत. त्या कथासंग्रहाचं नाव आहे, ‘पुनाची अलांदू ओरू वेलात्तीन कथाई’ (‘लाईफ ऑफ अ गोट’). जानेवारीत हे पुस्तक अॅमेझॉन वेस्टलॅंडतर्फे प्रकाशित होईल. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4265

.............................................................................................................................................

मुरुगन म्हणतात- “षण्मुगसुंदरम हे भारतातील प्रदेशांतर्गत लेखनाचे अध्वर्यू आहेत असं वाङ्मयीन समीक्षक का. ना. सुब्रमण्यम म्हणतात. मी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चालतो आहे. त्यांनी जे लिहिलं नाही ते मी पुरं करतो आहे. त्यांच्या काळातील जातव्यवस्थेबद्दल त्यांनी लिहिलं नव्हतं.’’

मागच्या यातनादायी वर्षांचा त्यांच्यावर आणि त्यांच्यातील लेखकावर काय परिणाम झाला याबद्दल त्यांच्या मनात आणि त्यांच्या वाचकांच्या मनातही नक्कीच प्रश्न आहेत. या सगळ्याचा अर्थ लक्षात न घेता त्यांचं लेखन वाचणं जवळजवळ अशक्यच आहे.

***************

‘मधोरुभागम’ या कादंबरीविरुद्ध निषेध व्यक्त करणाऱ्या गटांना त्या पुस्तकातील एका भागाविषयी राग आला होता. त्या भागात तिरुचेनगोडे येथील एका पुरातन प्रथेचा उल्लेख आहे. या प्रथेनुसार स्त्री आणि पुरुष दोन्ही रूपं स्वीकारणाऱ्या एका देवाच्या पुनरागमनाचा सोहळा तिथल्या मंदिरात होतो. सोहळ्यातील एका विशिष्ट दिवशी वांझ स्त्रियांना अनोळखी पुरुषांसोबत लैंगिक संबंध करता येतात. या कादंबरीत पोन्ना आणि काली या जोडप्याची कथा सांगितली आहे. तिखट जीभेच्या स्त्रियांनी सोडलेले तीक्ष्ण वाग्बाण उघड्या शेतांवरून वाहत कानात घुसावेत, तशी तीक्ष्ण आग सूर्य त्या ओसाड, खडकाळ प्रदेशावर ओकत असतो. अशा वातावरणात- लग्नाला तेरा वर्षं उलटली असूनही अपत्यहीन असलेल्या पोन्ना आणि काली या पतीपत्नींना एकमेकांविषयी वाटणारं प्रेम आणि ओढ यांचं वर्णन पेरुमलनी या कादंबरीत केलं आहे. मूलबाळ नसल्यामुळे सामाजिक बहिष्काराला आणि निर्दय टोमण्यांना ते दोघं तोंड देत असतात. कालीचं लाडकं पारोशा पिंपळाचं झाड जसं फांद्या पसरून खालच्या शुष्क जमिनीला गारवा देत असतं, तसंच त्यांचं प्रेम त्या दुःखातही त्यांच्यावर फुंकर घालत असतं.

मुरुगनच्या कादंबऱ्यांत ‘जातीचं’ जीवनवास्तव येतं. जात ही मूळ कथावस्तू म्हणून नेहमीच त्यांच्या लेखनात नसली तरी सामाजिक संबंधांचं वर्णन करताना ती सूक्ष्मपणे येते. दलितांनी वहाणा घालायच्या नसतात. सदैव कुरतडत राहणारी भूक जी कधीच शांत होत नाही, अशा क्षणिक उल्लेखांतून ती आपल्याला भेटते आणि जातीबाहेर लग्न करण्याचे परिणाम तर आपल्यावर थेट आणि अत्यंत धोकादायक हल्लाच करतात. “जातव्यवस्थेला वगळून मी लेखन करूच शकत नाही. मी जिथं जिथं बघतो तिथं तिथं ती असतेच. तीच सत्य परिस्थिती आहे. तो अनुभव घेण्यासाठी मला काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत,’’ मुरुगन म्हणतात. त्यांनी स्वतः जातीबाहेर लग्न केलं आहे आणि त्यांना त्यांच्या समाजाच्या उपहासाचं धनीही व्हावं लागलं आहे.

“हा उपहास फक्त त्यांच्या एकट्याविरुद्ध नाहीये. त्यांच्या समाजातील काही घटकांना दलितांबद्दल द्वेष आहे, स्त्रियांच्या मोकळेपणाबद्दल आक्षेप आहे आणि एकुणच त्यांच्या मतांपेक्षा वेगळी मतं असणाऱ्यांबद्दल राग आहे,’’ व्ही. गीता म्हणतात. त्या ‘तारा बुक्स’च्या संपादकीय संचालिका आहेत. त्यांनी २००४ साली मुरुगन यांच्या दोन कादंबऱ्यांचा अनुवाद केला आहे. त्यातली एक आहे, ‘सीझन्स ऑफ द पाम’. एका बालमजूर वेठबिगाराच्या जीवनावर ही कादंबरी आधारित आहे तर दुसरी आहे ‘करंट शो’. त्यात सिनेमाच्या थिएटरमध्ये काम करणाऱ्या मुलांची कहाणी आहे. मुरुगन यांच्या वडिलांचं तिरुचेनगोडे येथल्या चित्रपटगृहात सोडाविक्रीचं दुकान होतं. तिथं त्यांना भेटलेल्या मुलांचं चित्रण त्यात आहे.

मुरुगन यांचं कुटुंब गौंडर जातीचं आहे. जातविभागणीवर आधारलेल्या राज्यस्तरीय राजकारणात या जातीचा चांगलाच प्रभाव आहे. (मुख्यमंत्री एडाप्पी के. पळणीस्वामी हेसुद्धा याच जातीचे आहेत.)

कॉलेजात असताना डाव्या विचारसरणीचे असलेले मुरुगन आता स्वतःला ‘पेरियार’वादी समजतात. त्यांचं जातप्रथेविरुद्ध छेडलेलं युद्ध हे नैतिकतेच्या स्तरावरचं व्यक्तिगत युद्ध आहे. अशा व्यक्तीला निर्णय घेणं कधीकधी खूपच अवघड जातं. कारण त्यात कुणाला तरी विरोध करावा लागतो. विशेषतः दुसऱ्या कुणाच्या वतीनं हे निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा काम आणखी अवघड होतं. त्यांची आई २०१२ साली वारली तेव्हा त्यांना असाच एक अवघड निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या गावी गौंडर जातीची राखीव स्मशानभूमी होती. तीन वेगवेगळ्या देवळांकडे या स्मशानभूमीची व्यवस्था होती. त्या देवळांचा कर मुरुगन स्वतः कित्येक वर्षं भरत असूनही त्यांनी ती स्मशानभूमी आईच्या दहनासाठी न वापरता वीजेवर चालणाऱ्या दहनभट्टीचा वापर केला.

मुरुगन हे मुळातच वास्तववादी असल्यामुळे ते पात्रांच्या तपशीलांतही वास्तवतेचे रंग भरतात आणि मग ती वास्तवताच स्वतःबद्दल बोलू लागते. रामन म्हणतात, “जीवन जसं जगलं जातं अगदी तसंच  निसर्गवादी लेखक या नात्यानं मुरुगन रंगवतात. ते ज्यांच्याबद्दल लिहितात त्या पात्रांच्या आणि समाजांच्या जीवनातच जर जात आहे, तर ती ते कसे काय टाळू शकतील? त्यांची लेखनभूमिका निधर्मी डावेपणा मांडताना अजिबात कचरत नाही. अत्यंत अस्सल आणि सूक्ष्म छटांनी युक्त, कुठलाही आविर्भाव नसलेलं त्यांचं लेखन जातवास्तवाची भीषणता वाचकांसमोर उलगडून दाखवतं, तेव्हा ते एखाद्या कलाकारानं रंगवल्यासारखं वाटतं. कुठल्यातरी जहाल, शहरी उपटसुंभानं चितारल्यासारखं वाटत नाही.’’

गीता म्हणते, “मुरुगन दलितांचं चित्र जसं रंगवतात, तसं दलितही स्वतःचं चित्र रंगवत नाहीत अशी त्यांच्यावर टीका होते. अर्थात् ती टीका नेहमीच चुकीची नसते.” तसंच त्यांच्या स्त्रीपात्रांविषयी त्यांच्या मनात पूर्ण सहानुभूती असूनही त्यांच्या लेखनात पुरुषी वर्चस्वही डोकावताना दिसतं असंही म्हणते. कधीकधी त्यांच्या लेखनात खोडकरपणाची छटाही चमकून जाते. म्हणजे लेखक वाचकांच्या अवघडलेपणाला हसतो आहे असं वाटतं. ‘द गोट थीफ’ या पुस्तकात त्यांच्या ‘पी कडाईगल’ (गुवावरील कथा ) या संग्रहातील दोन कथा आहेत. त्यातील एका कथेत एक झाडूवाला संडासातील गळती रोखण्यासाठी सेप्टिक टॅंकमध्ये उडी मारताना दाखवला आहे. त्या पुस्तकाच्या शीर्षकामुळे तमीळ वाचकांना एवढा धक्का बसला की, त्यातील बऱ्याच लोकांना ते पुस्तक विकत घेण्याची किंवा ते हातात असताना दुसऱ्या कुणी बघण्याची त्यांना खूप लाज वाटू लागली. मुरुगन म्हणतात- “आजही एखाद्या साहित्यिक सभेत माझी ओळख करून दिली जाते, तेव्हा ‘पी कदाईगल’ या कथासंग्रहाचा उल्लेख मी लिहिलेल्या पुस्तकांच्या यादीत नसतो.”

पण आता मात्र लोकांचं लक्ष मुरुगन यांच्याकडे गेलं की, त्यांना दडपण आल्यासारखं होतं. त्यामागे भीती आहे का? आपण ‘प्रदर्शनातील जिवंत वस्तू’ आहोत’ ही भावना काही केल्या त्यांचा पिच्छा सोडत नाही, हेच सत्य आहे का त्यामागे? त्यांच्यावर धावून आलेल्या लोकांबद्दल त्यांना काय वाटतं? यापुढे आपण लिहिलेलं काहीही लोक वाचणारच नाहीत असं त्यांना का वाटलं असावं? त्यावर मुरुगन म्हणतात, “मला खूप संताप आला. माझा विश्वासघात झाला आहे अशीच भावना मनात दाटून आली. पण त्याच वेळी त्या लोकांबद्दल माझ्या मनात कीवही दाटून येत होती. त्यांचं काहीच वाचन नाही, साहित्याशी तर त्यांचा काडीइतकाही संबंध नाही म्हणून असं घडतं.’’

............................................................................................................................................

या लेखाच्या उत्तरार्धासाठी क्लिक करा -
पेरुमल मुरुगन यांचं पुनरागमन (उत्तरार्ध)

............................................................................................................................................

मराठी अनुवाद- सविता दामले

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

हा मूळ लेख ‘mint’ या इंग्रजी दैनिकाच्या ‘Lounge’ या शनिवारच्या पुरवणीची ४ नोव्हेंबर २०१७ची मुखपृष्ठकथा म्हणून प्रकाशित झाला आहे. मूळ लेख पाहण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......