'रंगीला रायबा' नव्हे, थोडा रंगीला, थोडा रायबा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी   
  • 'रंगीला रायबा'चं पोस्टर
  • Mon , 13 November 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie रंगीला रायबा Rangeela Rayabaa केदरा शिंदे Kedar Shinde विजय बाबू डी. Vijay Babu D आल्हाद अंदोरे Alhad Andore Radhika Muthukumar राधिका मुथुकुमार

'पैसा श्रेष्ठ की प्रेम श्रेष्ठ' हा विषय चित्रपटाच्या दृष्टीनं आता चावून चोथा झालेला विषय आहे. गरिबी आणि श्रीमंती यांच्यातील विषमतेची दरी नेहमीच प्रेमाला अडसर ठरत असते. त्यामुळे हा विषय पुन्हा नव्यानं मांडायचा झाल्यास बदलत्या काळाचा संदर्भच तेवढा महत्त्वाचा ठरतो. 'रंगीला रायबा' या नव्या मराठी चित्रपटात याच जुन्या विषयाची नव्यानं मांडणी करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे निर्माते दक्षिणेकडील कोणी विजय बाबू डी. आहेत. सध्या मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस आल्यामुळे दाक्षिणात्य निर्माते-दिग्दर्शक 'दक्षिणेकडील कथा' मराठी पडद्यावर आणत आहेत. 'रंगीला रायबा' हे त्याचंच एक मासलेवाईक उदाहरण म्हणावं लागेल.

टपोरी ('रंगीला') आणि अडाणी व बिनधास्त ('रायबा') अशा दोन मनोवृत्ती एकत्र असलेला तरुण आपलं प्रेम कसं यशस्वी करून दाखवतो त्याची ही कथा आहे. निर्माते दाक्षिणात्य असल्यामुळे हा 'रंगीला रायबा' चांगलाच चकचकीत झाला आहे, ही मात्र समाधानाची बाब म्हणावी लागेल. 

या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. त्यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट म्हणजे नेहमीच एक आगळीवेगळी करमणूक असते. त्यांच्या आजपर्यंतच्या काही चित्रपटांनी ते सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे 'रंगीला रायबा' हा नवा मराठी चित्रपट त्याच पठडीतील असावा या समजुतीनं पाहायला गेल्यास, मात्र पाहिजे तेवढं समाधान मिळत नाही. फक्त नावापुरताच आगळेवेगळेपणा घेऊन आलेला हा चित्रपट 'थोडा रंगीला, थोडा रायबा' अशा पद्धतीचा झाला आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4285

.............................................................................................................................................

या चित्रपटात 'रायबा' नावाच्या रंगिल्या तरुणाची कहाणी सांगण्यात आली आहे. रायबा एक टपोरी तरुण आपल्या चौकडी मित्रांसमवेत मस्तीचे जीवन जगत असतो. डिंग मारण्यात हुशार असलेला रायबा अभ्यासात मात्र 'ढ' आहे. त्यामुळे तो दहावी नापास आहे. शुभ्रा नावाच्या सुंदर  युवतीवर त्याचं प्रेम जडतं. ही शुभ्रा, विश्वासराव देशमुख नावाच्या एका श्रीमंत आणि गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याची एकुलती एक मुलगी असते. श्रीमंत वडिलांच्या कडक शिस्तीमध्ये ती आपलं जीवन जगत असते. अर्थातच तिला स्वतःला हवी तशी मौजमजा कधीच करता येत नाही. अशातच तिला हा रायबा भेटतो आणि त्याचं बिनधास्त जगणं तिला आवडू लागतं आणि तीही त्याच्या प्रेमात पडते.

विश्वासरावांच्या दृष्टीनं तर रायबा म्हणजे एक वाया गेलेला तरुण. त्यामुळे त्यांना असला जावई कसा चालेल? त्यांचा रायबाला कायम विरोध असतो. तरीही शेवटी शुभ्रासाठी ते नाईलाजानं होऊ घातलेल्या या जावयाचं नातं मान्य करायला सशर्त तयार होतात. त्यांच्या दृष्टीनं रायबा जावईपदास पात्र ठरतो की, नाही हे पाहण्यासाठी म्हणून ते त्याची परीक्षा घेण्याचं ठरवतात. त्यांच्या या परीक्षेत रायबा 'पास' होतो की, 'नापास' हे पडद्यावर पाहणे सयुक्तिक ठरेल.

चित्रपटाच्या कथेत फारसं नावीन्य नाही. निदान पटकथा तरी व्यवस्थित बांधलेली हवी होती. त्यामुळे चित्रपट पाहताना काही प्रमुख गोष्टी अतार्किक जाणवतात. उदाहरणार्थ रायबा दहावी नापास असूनही केवळ शुभ्राच्या वर्गात बसण्यासाठी म्हणून त्याला महाविद्यालयात प्रवेश कसा दिला जातो? अनोळखी असणाऱ्या रायबा आणि त्याच्या चार मित्रांना वर्गात कसं बसू दिलं जातं? आणि भर वर्गात प्राचार्यांचा अपमान करूनही त्यांच्या विरुद्ध काहीच कारवाई कशी होत नाही. शिवाय शुभ्रावरील आपलं प्रेम पक्कं करण्यासाठी महाविद्यालयात दाखवण्यात आलेलं द्रौपदी वस्त्रहरणाचं नाट्य म्हणजे बालिशपणाचा उत्तम नमुना म्हणावे लागेल. रायबाच्या प्रेमासाठी इथं चक्क 'महाभारत'च बदलण्यात आलं आहे.

याशिवाय जावईपदाच्या स्पर्धेत पास होण्यासाठी त्याला 'बिल भरा', श्राद्धाच्या भोजनाची घरात तयारी करा अशा इतक्या किरकोळ परीक्षा सांगण्यात आल्या आहेत की, अन्य परीक्षा सुचल्या नाहीत का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. (या किरकोळ परीक्षांमध्येही तो ओढून-ताणून पास झालेला दाखवण्यात आला आहे. ) शेवटचा 'इमोशनल ड्रामा' वगळता संपूर्ण कथेचं सादरीकरण विनोदी पद्धतीनं करण्यात आलं आहे. त्यामुळे काही गोष्टी खपून जातात हे जरी खरं असलं तरी सुरुवातीला अतिशय कडक आणि शिस्तप्रिय वागणाऱ्या विश्वासरावांच्या भूमिकेतील शरद पोंक्षे यांना पुढे नाईलाजानं विनोदी अंगानं भूमिका करणं भाग पडतं. 

या चित्रपटाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एक तरुण जोडी यानिमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे. आल्हाद अंदोरे आणि दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका मुथुकुमार या दोघांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. आल्हाद अंदोरेनं रायबाची भूमिका मोठ्या झोकात आणि जोशात केली आहे, तर राधिकानं सुंदर दिसण्याबरोबरच चांगला अभिनयही केला आहे. शरद पोंक्षे (विश्वासराव), नेहा रायरीकर (राधिकाच्या आई), किशोर चौघुले (रायबाचे वडील), जयवंत वाडकर (डॉक्टर) आदी कलाकारांचीही कामं चांगली झाली आहेत. सुरेश देशमाने यांच्या छायांकनामुळे हा चित्रपट चांगला चकचकीत झाला आहे.  

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Vivekanand

Tue , 14 November 2017

Nice Movie


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......