सुनील आणि अनिल  
पडघम - अर्थकारण
लोकेश शेवडे
  • ‘अर्थक्रांती’चे अनिल बोकील आणि प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 08 November 2017
  • पडघम अर्थकारण नोटबंदी : वर्षपूर्ती की वर्षश्राद्ध Notbandi Demonetisation अनिल बोकील Anil Bokil अर्थक्रांती Arthakranti

२१ जुलै १९६९ रोजी `अपोलो ११' या यानाबाहेर येऊन `नील आर्मस्ट्रॉंग'ने चंद्रावर पाऊल ठेवले हे अमेरिकन व पाश्चात्य लोकांनी टीव्हीवर पाहिले आणि जगभर एकच जल्लोष सुरू झाला. भारतात मात्र दिल्लीतील काही तुरळक भाग वगळता टीव्ही ही संकल्पनादेखील अस्तित्वात नव्हती. त्यामुळे आम्हा मुंबईकरांना मानवाची चंद्रावरची पावले दुसऱ्या दिवशी फक्त नियतकालिकांमधल्या छायाचित्रातूनच दिसली. सकाळी दैनिकांत ती काळी-पांढरी छायाचित्रे पाहून शाळेत जातानासुद्धा आम्ही भारावलेल्या अवस्थेतच होतो. चंद्र आणि त्यावर मानवाचे पाऊल याखेरीज बोलायला विषयच नव्हता.

`सुनील' या माझ्या तत्कालीन `बाक'मित्राची `ज्योतिष-कुंडली-ग्रहमान' वगैरेवर श्रद्धा होती, तो मात्र "ते शास्त्र मला कळतं" असे सांगत असे. त्याबाबत तो आम्हाला विचित्र वाटेल असे काहीतरी नेहमीच बोलत असे. चंद्रावरच्या मानवी पदार्पणाबाबत बाकीचे शाळकरी उत्साहात बोलत असताना तो मध्येच म्हणाला की, ‘यावेळी पोहोचले, यापुढचेही यान चंद्रावर पोहोचेल, पण त्यानंतरच्या खेपेला मात्र खेळ खल्लास!! भयानक डेंजर काहीतरी घडेल!!’ आम्ही बुचकळ्यात पडलो आणि त्याला `खेळ खल्लास' होण्याचे कारण विचारले, तेव्हा तो उत्तरला, "हे यान अपोलो ११ होते, म्हणजेच पुढचे अपोलो १२ असेल, त्यानंतर १३!! ११, १२ ला काही प्रॉब्लेम नाही. पण १३ हा आकडा एकदम खतरनाक, अशुभ असतो. आणि चंद्राच्या बाबतीत डब्बल-चौब्बल अशुभ!! यान, माणसं, कदाचित अख्खी अमेरिका नष्ट होईल! चंद्र सोडणार नाही कोणाला सहजासहजी!!" काही जण थोडे हबकले, पण बाकी सर्वजण त्याला हसले आणि आपापल्या कामाला लागले. 

११ एप्रिल १९७० अमेरिकेच्या `केनेडी स्पेस सेंटर'वरून `अपोलो १३' हे यान ३ मानवांना घेऊन चंद्राच्या रोखाने झेपावले ही बातमी आम्ही १२ एप्रिलला वाचली.  एव्हाना आम्ही माझ्या `बाक-मित्रा'चे भविष्यकथन विसरूनही  गेलो होतो. पण दोन दिवसांनी बातमी झळकली "अपोलो १३ यानात मोठा बिघाड!! त्यातील अंतराळवीरांचे जीव धोक्यात!!" त्यादिवशी मधल्या सुट्टीत `सुनील' एकदम जोशात होता. "आपण बोल्लो होतो ना, आधीच १३ अशुभ, त्यात चंद्राशी खेटायचं म्हणजे एकदम चौब्बल डेंजर!! झालं का नाय खरं, बोला !!"

सगळेच शाळकरी चपापले, त्यांना सुनीलचे अपोलो ११ च्या वेळचे बोलणे आठवले. आमच्या शाळेत तसे ज्योतिष-कुंडली- घातसंख्या वगैरेवर फारसा विश्वास ठेवणारे कोणी नव्हते. पण अपोलो १३ संकटात सापडल्याबरोबर बहुतांश शाळकऱ्यांना सुनीलच्या बोलण्यात तथ्य वाटून ते घातसंख्या-चंद्राचा कोप वगैरे बोलू लागले. सुनील तर एकदम हीरोच बनला. जो तो शाळकरी त्याला भेटायला येई आणि सुनीलला अपोलो १३ चे हे संकट ९ महिने अगोदर कसे कळले याबाबत किंवा कुंडली-ग्रहमान-घातसंख्या वगैरे बाबत प्रश्न विचारी.

पुढल्या दोन दिवसांत तर शाळेचे शिक्षकदेखील त्याच्या भविष्यवाणीबद्दल चर्चा करू लागले. आमचे काही शिक्षक भारतीय संस्कृतीचे अभिमानी होते. त्यांना भारतीय कुंडली-ज्योतिष पद्धतीचा हा विजय वाटू लागला आणि अमेरिका `खल्लास' झाली रे झाली की, भारतच सर्वश्रेष्ठ देश होणार अशी आशा वाटायला लागली. त्यातल्या दोघा-तिघांनीं त्यांच्या वर्गातल्या टेबलवर सुनीलला बसवून त्याला भाषण करायला सांगितले. सुनीलला भाषणबिषण देण्याची सवय नव्हती. आरंभी तो बिचकला, पण नंतर बिनधास्त वाट्टेल ते आत्मविश्वासाने बोलायला शिकला.

"दोन ही संख्या चंद्राला प्रिय आहे, ११ या संख्येत एक अधिक एक दोन होतात, शिवाय अकरा ही संख्या `दोन' आकडी आहे म्हणून अपोलो ११ यशस्वी झाले होते," असा खुलासा त्याने केल्यावर समोरचे विद्यार्थी आणि त्यांचे संस्कृतीप्रेमी शिक्षक थक्क होऊन टाळ्या वाजवू लागले. हे सारे पुढचे दोन-तीन दिवस चालूच होते. तोपर्यंत सुनील "आता ते यान पृथ्वीवर येऊन आदळेल आणि त्यात सर्व अंतराळवीर तर मरतीलच, पण अमेरिकाही भस्मसात होईल" असं अत्यंत आत्मविश्वासाने ठासून सांगायला लागला होता. सगळे श्रोतेही आता अमेरिका कधी भस्मसात होईल याची वाट पाहू लागले. 

सहाव्या दिवशी बातमी आली की, अपोलो १३ वरील संकटावर वैज्ञानिक मात करण्याची शक्यता आहे. आमचे शाळकरी चकित झाले, पण सुनीलने न डगमगता खुलासा केला, "काळजी करू नका, वैज्ञानिक कितीही प्रयत्न करू देत, पण चंद्र १३ला सोडणार नाही. एक-दोन दिवसांत अमेरिका होत्याची नव्हती होणार!!" सुनीलचा निरागस चेहरा आणि आत्मविश्वासपूर्ण बोलणे यामुळे लोक प्रभावीत होत राहिले आणि पुन्हा अमेरिकेच्या सर्वनाशाच्या बातमीची वाट पाहू लागले.

तिसऱ्या दिवशी बातमी आली की, अपोलो १३ सर्व अंतराळवीरांसह सुखरूप पृथ्वीवर पोहोचले. तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुनीलच्या भविष्यकथनाने शाळकऱ्यांची फसवणूक झाली म्हणून सगळे त्याला प्रश्न विचारायला लागले. सुनीलने आधीच्याच आत्मविश्वासाने उत्तर दिले, "चंद्र मूलतः शीतल प्रवृत्तीचा असतो, त्यात उड्डाण नेमकं शनिवारी झालं होतं. त्यामुळे विध्वंस झाला असता तर त्याचं बालंट `शनी'वर आलं असतं. त्याकारणानं शनीचं चंद्रावर दडपण होतं, म्हणून शेवटी चंद्रानं अमेरिकेला माफ केलं! अन्यथा माझं भविष्य खरंच ठरलं असतं!"

यानंतर थोड्याच दिवसांत `अपोलो १३'मध्ये नेमका काय आणि कशामुळे बिघाड झाला होता, तो कसा दुरुस्त केला, अंतराळवीरांचे जीव कसे वाचवले यावर संपूर्ण खुलासेवार माहिती प्रसिद्ध झाली. तथापि तोपर्यंत लोकांना मात्र सुनील फसवा असल्याचे वाटून त्याची निष्कारण नालस्ती, चेष्टा करू लागले. पुढे सुनीलने हा विषय कधीच काढला नाही.  

११ एप्रिल म्हटल्यावर युगांडाच्या नागरिकांना ईडी अमीनचे पलायन आठवेल, फ्रेंचांना नेपोलियनची हद्दपारी आठवेल, अमेरिकनांना अपोलोचे संकट आठवेल, पण आमच्या फसलेल्या शाळकरी मित्रांना मात्र `सुनील'चे ज्योतिष शास्त्र आठवते. माणूस बाकी काहीही विसरू शकतो, पण झालेली वेदना सहसा विसरत नाही आणि तशीच फसवणूकदेखील कधीही विसरू शकत नाही.

८ नोव्हेंबर म्हटल्यावर भारतीयांना एटीएमच्या रांगांमधील सामान्यांचे मृत्यू आठवतील, शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागलेला त्यांचा करोडोंचा माल आठवेल, असंघटित कामगारांना त्यांचा गेलेला रोजगार आठवेल आणि लघुउद्योजक-लहान व्यापाऱ्यांना तीव्र मंदी आठवेल...

`अर्थक्रांती'नं भारावलेल्या मराठी नवजात अर्थपुंगवांना मात्र `अनिल'चे अर्थशास्त्र आठवेल. 

वास्तविक सुनील फसवा नसून निरागस होता. त्याला मनापासूनच `ज्योतिष आणि आकडे' वगैरेंवर श्रद्धा होती. पण आपली श्रद्धा म्हणजे शास्त्र, विज्ञान असा त्याचा भ्रम होता. अपोलोवरील संकट काही त्याच्या भविष्यवाणीमुळे आले नव्हते, पण शाळकऱ्यांना त्याचा `खेळ खल्लास'चा दावा ही आपली फसवणूक वाटली. अनिलही तसाच निरागस आहे. नोटबंदी ही काही अनिलच्या `अर्थशास्त्रा'नुसार आली नव्हती. ती ज्या कुणाला अधिकार होते (???) त्याने परस्पर आपल्या मर्जीनुसार केली होती. पण अनिलला वाटणारी क्रांती हे एक शास्त्रच आहे, आणि त्यानुसारच हे घडले असा त्याचा समज होता.

वास्तविक जनतेवरचे, शेतकऱ्यांवरचे संकट, रांगेतले मृत्यू हे अनिलच्या `क्रांती'मुळे अजिबात ओढवलेले नसून ते देशवासियांना `प्या रे' म्हणून त्यांना `नोटबंदी'चे विष दिल्यामुळेच ओढवले आहेत. पण आता सारेच त्याचा दोष अनिलला देत आहेत. अचाट दावे केल्यास लोकांचे लक्ष तात्काळ वेधले जाते हे खरे, पण दावा फसला तर मात्र लोक त्याला `फसवणूक' मानतात आणि त्याचाच `खेळ खल्लास' करतात, जरी तो दावा निर्हेतुक आणि निरागसपणे केला असला तरीही! निरागस माणूस हा बरेचदा प्रत्यक्षात अज्ञानी, मूर्ख किंवा बावळटच असतो. निरागस माणूस जर ‘आपला’ असेल तर त्याला `भोळा' म्हणतात, मग तो सुनील असो वा अनिल. आणि आपला नसेल तर अर्थातच `बावळट'. पण अचाट दावे करणारा निरागस नसेल किंवा सत्ताधीश असेल तर त्याला काय म्हणावे ????  

‘नोटबंदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक’ या पुस्तकाची सुधारित दुसरी आवृत्ती २१ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाच्या आगावू नोंदणीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/323

.............................................................................................................................................

लेखक लोकेश शेवडे नाशिकस्थित उद्योजक आहेत.

lokeshshevade@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Vinod K

Wed , 08 November 2017

आजकाल HR चे लोक मोठी गोंडस नावे देतात हुद्दयांना, त्यामुळे क्लार्कचा कन्सल्टन्ट होतो आणि सेल्समनचा सेल्स आॅफिसर. तसेच टपरीवजा आॅफिस चालावणारे लोकपण स्वत:चा उल्लेख ऊद्योजक, लिडर वगैरे करतात तेव्हा खरचं हसू येते. जाऊ दे आपल्याला काय करायचे ? तर सांगायचा मुद्दा हा की अनिल बोकीलांची अर्थक्रांती हि मोदींजींच्या प्रयोगापेक्षा पूर्ण वेगळी आहे, ती वाचा आपण. मोदिंजीनी ती अर्धवटपणे अंमलात आणली त्यात बोकीलांची काहिच दोष नाही. जर एखाद्या डाॅक्टरने रूग्णाला तीन गोळ्या दिल्या. पण रुग्णांने त्यांतील एकच गोळी घेतली, बाकीच्या दोन फेकून दिल्या व त्यामुळे रोग बळावला, तर तुम्ही डाॅक्टरला दोष देणार का ? तसेच आहे हे. निदान बोकिलाकडे स्वत:ची कल्पना मांडायची हिंमत तरी होती, बोगस तज्ञांकडे हिंमतपण नसते ते फक्त टिका करतात.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......