टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 07 October 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya लो़डशेडिंग देवेंद्र फडणवीस राज ठाकरे नारायण राणे

१. महानिर्मितीला कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टर्न कोलफिल्ड लि.च्या उत्पादनात सातत्यानं वाढ होत असताना आणि त्यांच्याकडून नियमित पुरवठा केला जात असतानाही ऐन दिवाळीच्या तोंडावर कोळसा टंचाईचा कांगावा करून सरकारनं खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचा घाट घातला आहे. कोळशाचा निर्धारित साठा पुरवठ्यात गेल्या तीन महिन्यांत कुठेही खंड पाडला नाही, असं सरकारी वीज निर्मिती कंपनीला कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सांगितलं. परंतु राज्य सरकार वाहतुकीतील अडचणीचं नाव पुढे करून पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होत नाही, त्यामुळे वीज निर्मितीत घट होत आहे, त्यामुळे भारनियमन करावं लागत आहे, असा दावा करत आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्रापर्यंत कोळसा नेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे वाहतुकीतील अडचणीचा मुद्दा तकलादू ठरतो. महानिर्मितीला एकट्या वेकोलिकडून ५० टक्क्यांहून अधिक कोळसा पुरवठा केला जातो. यात कुठलीही कमतरता नाही, असं वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. महानिर्मिती आमचा सर्वांत मोठा ग्राहक असल्यानं त्यांना कोळसा पुरवठा थांबवण्याचा प्रश्नच येत नाही, असं वेकोलिचे जनसंपर्क अधिकारी एसपी सिंग म्हणाले. महानिर्मितीला चार ठिकाणांहून कोळासा पुरवठा केला जातो. त्यामुळे कोणाकडून तो कमी मिळतो याबाबत विचारलं असता, महानिर्मितीकडून टोलवाटोलवीचे उत्तर दिलं जातं. दिवाळीच्या तोंडावर कोळशा उपलब्धतेचं कारण सांगून भारनियमनाची घोषणा करायची, लोकांची ओरड झाल्यानंतर खासगी कंपन्यांकडून महागड्या दरात वीज खरेदी करायची, असा शासनाचा प्रयत्न आहे. दिवाळीत विजेची मागणी वाढल्याने त्याचा फायदा खासगी कंपन्यांना व्हावा हे या कृत्रिम टंचाईमागे कारण असल्याचे बोलले जात आहे. दिवाळी संपल्यानंतर पुरेशी वीज उपलब्ध असल्याचं दाखवून भारनियमन बंद केले जाणार आहे. त्याचे संकेत आज मिळाले आहेत.

बापरे, फार मोठंच षडयंत्र आहे हे. भाजपचे अभ्यासू आमदार देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता. त्यांना सांगितलं तर ते मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला धारेवर धरतील... काय सांगताय, तेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचंच सरकार आहे? मग हे नक्कीच सेक्युलर काँग्रेसींचं कारस्थान आहे. देवेंद्रभाऊ ऐन दिवाळीत आणि ऑक्टोबरच्या ऐन उकाड्यात वीजबचतीचा संदेश देऊ पाहात असताना देशाचा आणि राज्याचा विकास ज्यांना पाहवत नाही, त्यांनी केलेला हा कांगावा आहे फक्त.

.............................................................................................................................................

२. माजी मुख्यमंत्री आणि ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ स्थापन करून त्याच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपसोबत जाण्यास सज्ज असलेले नारायण राणे यांच्यासह एका नामांकित विकासकाविरोधात ३०० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सुरू असलेली चौकशी अचानक बंद करण्यात आली आहे. राणे आणि सत्ताधारी भाजप यांच्यामधील बदलेल्या राजकीय समीकरणामुळेच ही चौकशी बंद केली गेल्याचा आरोप करत या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. तसेच राणे यांच्याविरोधात थांबवण्यात आलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आणि चौकशीचा हंगामी अहवाल संबंधित कनिष्ठ न्यायालयात विशिष्ट कालावधीत सादर करण्याचे आदेश ‘ईडी’ला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होणार असून सत्ताधारी भाजपसोबत जाण्यासाठी आतूर असलेल्या राणेंच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे. याचिकेतील दाव्यानुसार, राणे कुटुंबीय आणि ‘अविघ्न ग्रुप’चे प्रमुख कैलाश अग्रवाल यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपाप्रकरणी ‘ईडी’ने जानेवारी महिन्यात प्राथमिक चौकशी सुरू केली होती. त्यानंतर ‘ईडी’नं अग्रवाल यांची चौकशीही केली. तसेच राणे कुटुंबीय आणि अग्रवाल यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या ५० कंपन्यांची कागदपत्रंही मिळवली. त्यांची शहानिशा केल्यानंतर राणे आणि अग्रवाल यांनी ३०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रथमदर्शनी निष्कर्षांप्रती ‘ईडी’चा तपास पोहोचला होता. सायप्रस आणि मॉरिशस येथील बँक खात्यात राणे किंवा त्यांच्या दोन मुलांनी कोट्यवधी रुपये ठेवले असून त्यातील पैसे अग्रवाल यांच्या दक्षिण मुंबईतील आलिशान निवासी प्रकल्पासाठी वळवण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर राणे यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बनावट वा अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं चौकशीतून पुढे आलं आहे.

या तिरोडकरांना कुणीतरी ‘पंडित दीनदयाळ वाल्या-वाल्मिकी योजने’ची माहिती द्यायला हवी. या अगदी सुटसुटीत, ‘ग्राहक’स्नेही योजनेअंतर्गत प्रत्येक वाल्या कोळ्यानं कमलदलाशी एकनिष्ठतेची शपथ घेतली रे घेतली की, त्याचा वाल्मिकी होतो, हे त्यांना ठाऊक नाही की काय? ईडी, सीबीआय, सीआयडी वगैरे हत्यारं राज्य सरकारच्या हातात शोभेसाठी का असतात? सत्ता पालटली की, ‘स्व. यशवंतराव चव्हाण वाल्या-वाल्मिकी योजना’ या नावानं ही योजना कायमस्वरूपी चालत राहील.

.............................................................................................................................................

३. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत सुमारे २७ वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. यामुळे कपडे आणि आयुर्वेदिक औषधं स्वस्त होणार असून वातानुकूलित हॉटेलमधील जीएसटी १८ टक्क्यांऐवजी १२ टक्क्यांवर आला आहे. सर्वसामान्यांसह छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेत सरकारनं दिवाळीची भेटच दिली. आयुर्वेदिक औषधांवर १२ टक्के कर होता. मात्र यापुढे आयुर्वेदिक औषधांवर ५ टक्के कर असेल. याशिवाय खाकरा, चपाती, नमकीन पदार्थांवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. पोस्टर कलरसह अनेक शालेय उपयोगी साहित्यांवर २८ ऐवजी १८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. प्लास्टिक वेस्ट, रबर वेस्ट आणि पेपर वेस्टवर पाच टक्के कर आकारण्यात येईल. तर आयजीएसटी (इंटरस्टेट) करिता निर्यातदारांना सहा महिन्यांचा दिलासा देण्यात आला. हातमागावर यापूर्वी १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता, तो आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

अन्य सर्व उत्पादनांच्या बाबतीतला दिलासा छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचेल, हे खरंच आहे. मात्र, आधीच बाजारपेठेत मंदीमुळे हरभरा डाळ, रवा, मैदा आणि खोबऱ्याचे दर ऐन दिवाळीच्या तोंडावरही उतरलेले आहेत, साखरही स्वस्त आहे, तरी मालाला उठाव नाही, या परिस्थितीत किती फरक पडेल, ते सांगता येणं कठीण आहे. लोकांच्या क्रयशक्तीत घट झाल्यासारखं चित्र आहे. औषधांमध्ये ज्यांचं प्रमाणीकरणच होत नाही आणि जीवनशैलीतून उद्भवणारे दीर्घकालीन विकार वगळल्यास गुंतागुंतीच्या, गंभीर आजारांमध्ये वापरलीही जात नाहीत, अशा आयुर्वेदिक औषधांच्या स्वस्ताईतून ‘स्वदेशी’च्या भलामणीपलीकडे काय साधले, हाही प्रश्न आहे.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

४. सिक्कीमच्या सीमेवरील डोकलामचा वाद मिटल्याला काही काळच उलटला आहे, तोच चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा या भागात रस्त्याचं काम सुरू केलं आहे. यापूर्वी निर्माण झालेल्या वादाच्या वेळी जिथं चिनी आणि भारतीय सैनिक समोरासमोर आले होते, त्या ठिकाणाहून १० किमी अंतरावर हे रस्त्याचं काम सुरू आहे. भूतान आणि चीन हे दोन्ही देश डोकलाम आपला भाग असल्याचं सांगतात. यामध्ये भारत भूतानच्या बाजूनं आहे. जूनमध्ये भारतीय सैनिकांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनकडून सुरू असलेल्या रस्त्याचं काम बंद पाडलं होतं. हा रस्ता ‘चिकन नेक’ या भारतीय भूभागाच्या जवळून जातो. भारताला ईशान्य भारताशी जोडणारा हा भूभाग सीमा सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या वादावरून दोन्ही देशांचे सैनिक ७० दिवस एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

चीनला कशी यशस्वी माघार घ्यायला लावली, याचे ढोल वाजवले जात असताना चीननं, रस्त्याचं काम हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे, असं सांगून तेव्हाच हवा काढून घेतली होती. चीनमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेवर भारतानं बहिष्कार टाकू नये किंवा तिथं काही संघर्ष उद्भवू नये, यासाठी डोकलाममध्ये तात्पुरती धोरणात्मक माघार घेतली गेली असेल, असं आंतरराष्ट्रीय व्यवहारांचे तज्ज्ञ सांगत होते. ते खरं निघालं आहे. भक्तगण यातही कसला ना कसला विजय शोधून काढतीलच, तोवर वाट पाहिली पाहिजे.

.............................................................................................................................................

५. हल्ली टीव्ही लावला आणि भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसले तर लोक आता टीव्ही बंद करतात, लोक एवढे कंटाळले आहेत. कंटाळलो म्हणून आपण रेडिओ लावला तर तिथंही त्यांची ‘मन की बात’ सुरू असते, अशीही टीका राज ठाकरे यांनी केली आहे. मनसेच्या संताप मोर्चासमोर राज म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त मोठमोठी भाषणं देणं माहीत आहे. नोटाबंदीचा निर्णय, स्वच्छ भारत अभियान आणि योगाचे प्रयोग करून पंतप्रधानांनी या देशातील सगळ्याच जनतेचं नुकसान केलं.

राज यांचा हा ओव्हर एक्स्पोझरचा मुद्दा बरोबरच आहे. पण, तो त्यांनीही खास मनन करावा असा आहे. राज्यात राज यांची राजकीय ताकद एका आमदारापर्यंत घसरली आहे, मुंबईतल्या नागरिकांनी नाकारलं आहे; अशा वेळी राज यांनी एखादा मोर्चा काढला की, ‘राज ठाकरे आता दोन मिनिटांत निघतील, त्यांनी कुर्ता चढवला, त्यांनी गॉगल घातला, राज ठाकरे निघाले, गाडीत बसले, चंदेरी रंगाच्या गाडीतून निघालेत राज ठाकरे, ९ क्रमांकाच्या लँडरोव्हरमधून येणार मोर्चासमोर’ वगैरे ब्रेकिंग न्यूज सुरू असतात. त्यांची राजकीय घोडदौड पुन्हा सुरू झाली, तर त्यांचा महाराष्ट्रातला ‘आदित्यनाथ’ व्हायला वेळ लागायचा नाही. तेव्हा, ही ‘मन की बात’ त्यांनीच ध्यानी धरलेली बरी.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......