शेती सुटणे हाच शेतीप्रश्न सोडवण्याचा अंतिम उपाय
ग्रंथनामा - आगामी
सुधाकर जाधव
  • सुधाकर जाधव यांच्या ‘शेतीची दशा आणि दिशा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 06 October 2017
  • ग्रंथनामा Granthanama आगामी सुधाकर जाधव शेतीची दशा आणि दिशा

शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते, शेती अभ्यासक सुधाकर जाधव यांचं ‘शेतीची दशा आणि दिशा’ हे पुस्तक रविवार, ८ ऑक्टोबर रोजी पुण्यात प्रकाशित होत आहे.  त्यानिमित्ताने या पुस्तकाला जाधव यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

मी शेतकरी नाही. शेतकरी कुटुंबात जन्मलो असलो तरी शेतीशी असलेला संबंध वयाच्या १७ व्या वर्षी उच्च शिक्षण घेण्यासाठी गाव सोडले तेव्हाच तुटला. पुढे दोन वर्षांतच शिक्षण पूर्ण न करता चळवळीत पडलो. अशा चळवळीत पडलो ज्यात कृषी व्यवस्था ही जगातील सगळ्यात जास्त आनंददायी असल्याचे मानले जात होते. त्यामुळे ज्यांच्या जवळ जमीन आहे ते तर आनंदी जीवन जगत आहेत, ज्यांच्याकडे नाही त्यांचे काय, हा चळवळीसमोरचा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता. त्यावेळी हा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. आपापल्या पद्धतीने संघटना आणि पक्ष या प्रश्नाला सामोरे जात होते.

मी सर्वोदय चळवळीत सामील असल्याने मला भूदान-ग्रामदान हा शेतीप्रश्न सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग वाटे. कम्युनिष्टांना येनकेन प्रकारे भूमिहीनांना जमीन वाटप हवे होते. त्यासाठी त्यांनी हिंसक संघर्षदेखील केला होता. त्यांनी हिंसक संघर्ष सोडला तेव्हा त्यांच्यातील काहींनी पुढे हाच प्रश्न सोडवण्यासाठी नक्षलवादी चळवळीला जन्म दिला. गांधीवादी, सर्वोदयी, समाजवादी, साम्यवादी या सर्वांसमोर कळीचा प्रश्न एकच होता- भूमिहीनांना शेतजमिनीचा तुकडा मिळाला पाहिजे. त्यातून ‘कसेल त्याची जमीन’ झाली. जमीन वाटपासाठी सिलिंग कायदा झाला. देशातील शेतीधोरणाचा पहिला टप्पा जमीन फेरवाटपाचा होता. त्यावेळी शेतीक्षेत्रासमोरचा एकमेव प्रश्न हाच होता. जमीन वाटप झाले आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देता आले तर देशाचे नंदनवन होईल असेच सर्वांना वाटत होते.

आत्ताचा भाजप त्यावेळी जनसंघाच्या रूपात होता. त्याचा जमिनीशी संबंध नसल्याने त्याने या वाटप प्रकाराचा हिरिरीने पुरस्कार केला नाही, पण विरोधही केला नाही. बऱ्यापैकी जमिनीचे फेरवाटप झाल्यावर राज्यकर्त्यांना ओढ लागली ती स्वावलंबनाची. हरितक्रांतीनं ती ओढदेखील पूर्ण केली. अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो, याबद्दल शेतकऱ्यांचे कौतुकदेखील झाले. शेतीतले उत्पादन वाढले म्हणजे उत्पन्न वाढले, अशी सार्वत्रिक समजूत होती.

प्रश्न उरला होता तो जमिनीच्या फेरवाटपानंतरही भूमिहीन राहिलेल्या आणि उपजीविकेसाठी शेतावर मजुरी करणाऱ्या मजुरांचा. राज्यकर्त्यांसाठी, धोरणकर्त्यांसाठी, विविध पक्ष आणि संघटनांसाठी दुसऱ्या टप्प्यात शेतीक्षेत्रातील महत्त्वाची समस्या उरली होती ती शेतमजुरांची. शेतकरी सुखी आहे पण शेतमजूर मात्र दु:खी आहे. या भावनेने अनेक संघटना, पक्ष आणि आमच्यासारखे कार्यकर्ते पछाडले होते. शेतकरी शेतमजुरांचे शोषण करतो या प्रामाणिक भावनेने अनेकांनी शेतमजुरांना संघटित करून शेतकऱ्यांविरुद्ध संघर्ष उभे केलेत.

शेतकरी कुटुंबात जन्मूनही माझीसुद्धा अशीच भावना होती की, शेतकरी शेतमजुराला योग्य ती मजुरी देत नाही. शेतकऱ्याला योग्य ते भाव मिळतात का? हा प्रश्न मात्र त्या काळी माझ्या मनात कधी आला नव्हता. शेतीप्रश्न म्हणजे जमीन वाटपाचा प्रश्न, शेतीप्रश्न म्हणजे शेतमजुरीचा प्रश्न आणि शेतीप्रश्न म्हणजे उत्पादन वाढीचा प्रश्न या विचाराच्या वर्तुळात आणि या विचाराच्या दिशेने वाटचाल करण्यात देशाने बहुमोल अशी स्वातंत्र्यानंतरची ३० वर्षे घालवून शेतीप्रश्न बिकट केला आणि शेतकऱ्यालाच नाही तर ग्रामीण जगताला वाढत्या दारिद्रयाच्या खाईत लोटून दिले.

या सगळ्या परिस्थितीला छेद दिला तो शरद जोशींनी. शेतीप्रश्नाच्या त्यांच्या मांडणीने शेती, शेतकरी आणि एकूणच ग्रामीण दारिद्रयाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. शेती संबंधीच्या धोरणात काय चुकते हे त्यांनी नेमकेपणाने दाखवून दिले. शेतकरी कुटुंबात वाढूनही ज्या गोष्टी कधी लक्षातच आल्या नाहीत, त्याचा चटकन उलगडा झाला. उत्पादन वाढले म्हणजे उत्पन्न वाढते हा बाळबोध समज दूर करण्यात शरद जोशींची भूमिका महत्त्वाची ठरली. पुस्तकी विचारांची अशी अनेक जळमटे दूर करण्यात शरद जोशींची मला आणि माझ्या साऱ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना मदत झाली. शेतीप्रश्नावर लिहू शकलो आणि लिहू लागलो ते यामुळेच.

शरद जोशींचे चाकणचे पहिले कांदा आंदोलन सुरू झाल्यावर त्यांच्याशी फोनवर बोलून मराठवाड्यात येण्याचे पहिले निमंत्रण मी दिले होते. नंतर अंबाजोगाईचे श्रीरंगराव मोरे त्यांना भेटले. माझ्याशी बोलून कार्यक्रम ठरवावा, असे शरद जोशींनी सांगितले तेव्हा श्रीरंग नाना मला भेटायला औरंगाबादला आले आणि तिथून माझा शेतकरी संघटना आणि चळवळीचा प्रारंभ झाला.

खऱ्या अर्थाने जमिनीवर पाय टेकवणारी ती चळवळ होती. चळवळीचे भारलेपण होते, पण त्यात नेत्यांच्या भारलेपणाची भर येऊ नये याचा कटाक्षाने प्रयत्न केला. नेत्यापासून अंतर ठेवून राहिल्याने तटस्थपणे सगळ्या गोष्टीकडे पाहता आले. त्यामुळे जसा मी भक्त झालो नाही, तसेच द्वेष करण्याचे निमित्तही मला मिळाले नाही. त्यामुळे वाचकांना या पुस्तकात कुठेही शरद जोशी असे म्हणाले तसे म्हणाले असे उदाहरण सापडणार नाही.

याचा अर्थ शरद जोशींचे शेतकरी चळवळीबद्दलचे विचार कालबाह्य झालेत असे नाही. पण एकदा तुम्हाला प्रश्न नीट समजला तर उत्तर तुमचे तुम्हाला देता येते. शरद जोशी आणि शेतकरी चळवळीमुळे मला प्रश्न नीट समजला असा दावा मी करू शकतो. जो प्रश्न मला समजला त्याची उत्तरे मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात समाविष्ट लेखातून केला आहे. एक मांडणी करून त्या आधारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत राहणे यातून एक साचेबंदपणा येतो.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

हमीभाव हा शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा आणि चळवळीचा आत्मा होता. पण हमीभावाचा प्रश्न सोडवायचा तर हमीभावात अडकून चालत नाही. शरद जोशींना हे सत्य उमगले आणि त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला. पण कार्यकर्त्यांसाठी ही सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे विचाराच्या पातळीवर संघटना पुढे गेली तरी कार्यक्रमाच्या पातळीवर ती हमीभावाच्या चौकटीत कैद झाली. या चौकटीत जे मिळायचे होते ते मिळून गेले होते, जो मुद्दा प्रस्थापित करायचा होता तो झाला होता. ती चौकट मोडून पुढे जाण्याची गरज होती. एक नेता आपल्या हयातीत जे करू शकत होता ते शरद जोशींनी केले. तिथून पुढे नवा नेता नव्या संघटनेची गरज होती.

पण शरद जोशी यांच्या समवेतचे कार्यकर्ते एक तर कट्टर समर्थक बनले, नाहीतर कट्टर विरोधक. समर्थक आणि विरोधक दोघेही शरद जोशी केंद्रित राहिल्याने ना समर्थक पुढे जाऊ शकले, ना विरोधक. आजच्या घडीला समर्थक आणि विरोधक सारखेच निष्प्रभ ठरले आहेत. शेतकरी आंदोलन पुन्हा उभे करण्याची क्षमता शेतकरी संघटनेने गमावली आहे, हे सत्य लक्षात घेऊन शेतकरी संघटना विसर्जित केली पाहिजे. शेतकरी चळवळीची नव्याने मांडणी, नव्याने बांधणी झाली पाहिजे. नवी परिस्थिती समजून घेणारे नवे नेतृत्व पुढे आले तर शेतीप्रश्न सुटण्यासाठी मदत होईल.

शेती सुटणे हाच शेतीप्रश्न सोडवण्याचा अंतिम उपाय आहे. शेतकऱ्यांचा शेतापासून मुक्तीचा प्रवास हाच यापुढचा कार्यक्रम आणि मार्ग आहे.

या पुस्तकातील लेख विविध प्रसंगांच्या निमित्ताने भिन्न वेळी आणि काळी लिहिले असले तरी त्या सगळ्याचे मध्यवर्ती सूत्र एकच आहे. शेतीपासून मुक्ती मिळवण्याचा शेतकऱ्यांचा प्रवास सुकर कसा होईल हे ते सूत्र आहे. आज शेतकरी शेतीतून बाहेर पडतोच आहे, पण मजबुरीने. बाहेर पडतो म्हणजे बाहेर फेकला जातो. असे बाहेर पडणे नको आहे. असे बाहेर पडणे जास्त दु:खदायी आहे. शेतकऱ्याला संघटनेची, चळवळीची गरज आहे ती शेती करणे सुकर व्हावी यासाठी नाही, तर शेतीतून आपल्या अटीवर बाहेर पडून सन्मानाने जगता यावे यासाठीच.

या पुस्तकात हाच मध्यवर्ती विचार मांडला आहे. परंपरागत संघटना आणि आंदोलनाच्या मार्गाने हे साध्य होणार नाही, हे एकदा लक्षात आले की, पुढे कसे जायचे हे समजायला वेळ लागणार नाही.

या पुस्तकामुळे शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडण्यास थोडीशी मदत झाली तर माझ्या शेतकरी कुटुंबात झालेल्या जन्माचे सार्थक होईल.

 'शेतीची दशा अाणि दिशा' - सुधाकर जाधव  

मुक्तरंग प्रकाशन, लातूर, मूल्य - ३०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4258

.............................................................................................................................................

लेखक सुधाकर जाधव शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......