‘बेटी बचेगी तो पढ़ेगी और पढ़ेगी तो लढ़ेगी’
पडघम - देशकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • बनारस हिंदू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या मुली
  • Tue , 03 October 2017
  • पडघम देशकारण बनारस हिंदू विद्यापीठ Banaras Hindu University

उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठा(बीएचयु)मध्ये विद्यार्थिनींवर अमानुष लाठीमार झाल्यानं ते विद्यापीठ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. तेथील विद्यार्थिनींची रोड रोमिओंपासून सुरक्षा पुरवण्यात यावी, त्यासाठी वसतीगृह परिसरात दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, एवढीच त्यांची मागणी होती. पण या मागणीकडे विद्यापीठ प्रशासनानं पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं विद्यार्थिनींनी नाईलाजानं सनदशीर मार्गानं विद्यापीठ गेटसमोर धरणं आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बनारस हा मतदारसंघ असल्यानं त्याच दरम्यान त्यांचा तिथं कार्यक्रम होता. वास्तविक त्यांच्या कार्यक्रमस्थळी जाणारा मार्ग विद्यापीठाकडूनच होता, पण या आंदोलनामुळे विद्यापीठाकडून न जाता वाट वाकडी करून ते त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचले. खरं तर ते आपल्या ‘बेटी बचाव-बेटी पढाओं’ घोषणेबद्दल खरोखरच संवेदनशील असते, तर आपल्या ‘बेटींच्या मनांतील बात’ समजून घेण्यासाठी ते तिकडून गेले असते. पण सर्वच घोषणांप्रमाणे त्यांची ही घोषणाही पोकळ असल्यानं त्यांनी तशी तसदी घेतली नाही.

आणीबाणीच्या काळात तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी जेएनयुमध्ये गेल्या होत्या, तेव्हा त्यांना त्यांच्या विरोधातील घोषणा ऐकाव्या लागल्या. त्या त्यांनी शांतपणे ऐकल्या आणि विद्यार्थ्यांचं म्हणणंही ऐकून घेतलं. आताचे सीपीएमचे सरचिटणीस कॉ. सीताराम येचुरी त्या वेळी जेएनयु विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना ऐकवलं. राज्यकर्त्या वर्गानं त्यावेळच्या संवेदनशीलतेपासून आतापर्यंतच्या संवेदनहीनतेपर्यंत कशी प्रगती केली आहे, हे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यवहारातून लक्षात येतं. पण हे मात्र निश्चित की, ते जोपर्यंत वाराणसीत होते तोपर्यंत त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट नको म्हणून आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर दडपशाहीची कोणतीही कार्यवाही प्रशासनानं केली नाही. मात्र ते गेल्याबरोबर रात्री एकच्या सुमारास विद्यार्थिनींवर लाठीमार करून त्यांचं आंदोलन चिरडून टाकण्यात आलं. 

खरं म्हणजे जेएनयु जसा डाव्यांचा अड्डा आहे, असं म्हटलं जातं, तसंच बीएचयु हा ब्राह्मणांचा अड्डा आहे असंही मानलं जातं. या विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली आहे. असं हे विद्यापीठ ब्राह्मणांचा अड्डा असणं स्वाभाविक आहे. पण तसा तो असला तरीही तेथील मुलींना सुरक्षा तर पाहिजेच. त्यांनी नखशिखान्त ‘भारतीय नारी’चा पेहराव केल्यानं त्यांना रोड रोमिओ जुमानतील असं नाही. ‘सहाच्या आत वसतिगृहात’ असा नियम मुलींसाठी केला तरी त्यांच्या वसतीगृहासमोर हस्तमैथून करणाऱ्यांना रोखण्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाचीच आहे. समजा त्यांनी ती झटकली तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्ता सांभाळल्याबरोबर राज्यभर ‘अँटी रोमिओ’ पथकं स्थापन केली होती. त्या पथकांनी तरी ती जबाबदारी पार पाडायला हवी होती. पण तसं घडलं नाही. मग ती पथकं काय करतात? केवळ मुस्लिमांवर दहशत बसवण्यासाठीच ती होती? तसेच जेएनयुमधील कंडोम मोजताना जे थकत नव्हते, त्यांनी तरी बीएचयुमधील या हस्तमैथून करणाऱ्यांना रोखायचं होतं. पण त्यांच्याकडूनही ते झालं नाही.

मुलींची वसतीगृहं म्हणजे काही ‘गायींचे कोंडवाडे’ नव्हेत अथवा विद्यापीठ म्हणजे ‘गौशाला’ नव्हे! २१ सप्टेबरच्या संध्याकाळी बीएचयुमधील अशीच एक मुलगी काही तातडीच्या कामानिमित्त बाहेर जात असताना मोटारसायकलवरील दोन रोड रोमिओंनी तिची छेडछाड केली. त्या मुलीनं आरडाओरड केली. जवळच असलेला सुरक्षा रक्षक तिची सुरक्षा करू शकला नाही. रोमिओ पळून गेले. त्या मुलीनं वसतीगृहात येऊन रेक्टरकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ‘तू सहानंतर बाहेर कशाला गेलीस? रोमिओंनी फक्त स्पर्शच तर केला, आणखी काही नाही ना?’ असं म्हणून चूप बसण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या मुलीनं वसतीगृहातील इतर मुलींना ही घटना सांगितली. या प्रकारानं इतर मुलीही चिडल्या. कारण हा प्रश्न फक्त त्या एकट्या मुलीचा व पहिलाच नव्हता आणि अशी उत्तरंही. हस्तमैथूनाबद्दल तक्रार केली असता, अशा टुक्कार मुलांचा बंदोबस्त करण्याऐवजी ‘तुम्ही त्यांच्याकडे पाहताच कशाला’? असं त्या तक्रारीचं निवारण केलं जायचं. त्यामुळे सर्वच मुली अशा प्रसंगांनी त्रस्त झाल्या होत्या. त्या कुलगुरू गिरीशचंद्र त्रिपाठी यांच्याकडे गेल्या. पण त्यांनीही या तक्रारींची दखल घेतली नाही. म्हणून मग नाईलाजानं विद्यार्थिनींनी दुसऱ्या दिवसापासून विद्यापीठ गेटपुढे धरणं आंदोलन सुरू केलं. नुकत्याच घडलेल्या घटनेच्या निमित्तानं आणि विद्यापीठ प्रशासनाच्या बेफिकीर उत्तरातून निर्माण झालेले ते उत्स्फूर्त आंदोलन होतं. कुलगुरू म्हणतात त्याप्रमाणे ते पूर्वनियोजित नव्हतं, पूर्वनियोजित पंतप्रधानांचा दौरा होता. तसंच ते बाहेरून आलेल्या जेएनयुच्या विद्यार्थ्यांनी केलं नव्हतं, तर तेथीलच विद्यार्थिनींनीच केलं होतं. तेथीलच विद्यार्थ्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. जेएनयुचा कन्हैय्या कुमार, शाहिला राशीद अथवा उमर खालीद अजूनही तिथं गेलेले नाहीत.

तर आता त्या विद्यापीठाची परिस्थिती कशी आहे? सर्व वसतीगृहं खाली करून घेतली आहेत. मुली आपापल्या घराकडे गेल्या आहेत. प्रशासनानं सर्व महाविद्यालयं व विद्यापीठाला २ ऑक्टोबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. विद्यापीठाला पोलिस छावणीचं स्वरूप आलं आहे. १००० अज्ञात विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ शुटिंगमध्ये, आंदोलनात

ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुढाकारानं भाग घेतला असेल, भाषणं केली असतील, घोषणा दिल्या असतील, प्रसारमाध्यमांपुढे आपल्या न्याय मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला असेल अशा सर्वांची ओळख पटवून त्यांना पुढील शिक्षण घेणं व आयुष्यही जगणं कठीण करून टाकण्यात येणार आहे. गुन्हे त्यासाठीच नोंदवले आहेत. विद्यापीठ व पोलिस प्रशासन आता पूर्णपणे त्या कामी लागलं आहे. सुडबुद्धी म्हणतात ती ही!

मुस्लीम दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मुस्लीम तरुणांना हुडकून काढणारी सक्षम यंत्रणा अजून त्या मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओंना पकडू शकली नाही. त्यामुळे योगींच्या अँटी रोमिओ पथकातीलच तर ते कोणी नसतील ना की, हरियाणा भाजपाध्यक्ष सुभाष बरालांच्या मुलाप्रमाणे नाहीत ना, अशी शंका येते.

याच दरम्यान पंतप्रधानांनी ‘हर घर में बिजली’साठी सौभाग्य योजना जाहीर केली आहे. या विद्यापीठ परिसरात वीज आहे, पण खांबाला बल्ब लावलेले नाहीत. या योजनेत एलईडी बल्ब देण्याची तरतूद आहे. निदान त्याची तरी तातडीनं विद्यापीठ प्रशासनानं अंमलबजावणी करावी.

बीएचयु लाठीमार प्रकरणी वाराणसी आयुक्तांनी सरकारकडे आपला अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पूर्णपणे दोषी ठरवलं आहे. त्यांच्या मते हा साधा प्रश्न विद्यापीठ प्रशासनानं संवेदनशीलतेनं हाताळला नाही. पण याबाबत कार्यवाही कोणावर झाली? तर तीन शहर दंडाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. एका ठाणे प्रभारीवर कार्यवाही केली. एका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. पण या संपूर्ण प्रकरणास जबाबदार असलेल्या कुलगरू गिरीशचंद्र त्रिपाठी यांच्यावर मात्र कुठली कार्यवाही करण्यात आली काय? मुळीच नाही. नैतिक जबाबदारी स्वीकारून विद्यापीठाचे मुख्य प्रॉक्टर प्रो.ओ.एन.सिंह यांनी राजीनामा दिला. तो मंजूरही करण्यात आला. पण कुलगुरूंनी अशी काही नैतिक जबाबदारी स्वीकारली काय? मुळीच नाही. त्यांनी राजीनामा दिला काय? मुळीच नाही. मोदी-योगी सरकारनं, कुलपतींनी त्यांना राजीनामा मागितला काय? मुळीच नाही. कुलगुरू अजूनही प्रसारमाध्यमांना अत्यंत उद्धटपणे उत्तरं देत आहेत. लाठीमार झालाच नाही, बाहेरच्या मुलांनी येऊन इथं आंदोलन केलं, पेट्रोल बॉम्ब फेकले असं म्हणत आहेत. बीएचयुला जेएनयु होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करत आहेत आणि मी आरएसएसचा आहे असंही मोठ्या अभिमानानं सांगत आहेत. तरीही त्यांच्यावर काहीही कार्यवाही नाही.

यापूर्वी ‘देशद्रोही’ म्हणून देशभर गाजवलेले जेएनयुचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी विद्यापीठ आवारात रणगाडा ठेवण्याची भाषा केल्यामुळे काय कार्यवाही झाली? रोहित वेमुलाप्रकरणी गाजलेल्या हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरू आप्पा राव यांच्यावर कोणती कार्यवाही झाली? हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पदाची शपथ घेतल्यापासून राज्यात कितीतरी वेळा पराकोटीचा हिंसाचार व अनागोंदी माजली, पण त्यांनी कधी राजीनामा दिला नाही. त्याचप्रमाणे आता बीएचयु प्रकरणात तेथील कुलगुरू कितीही दोषी असले तरी त्यांच्यावर काहीही कार्यवाही होणार नाही, हे निश्चित.

बीएचयुमधील विद्यार्थिनींनी उपस्थित केलेला प्रश्न केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नाही. तो देशातील तमाम महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. तो आहे याची माहिती असल्यामुळे तर पंतप्रधानांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा दिला आहे. पण तो केवळ नाराच आहे याची प्रचिती आणि त्यातील फोलपणा बीएचयुतील विद्यार्थिनींनी देशवासियांच्या नजरेस आणून दिला. आपल्या सुरक्षिततेच्या माफक हक्कासाठी त्या ज्या शांततेनं पण त्वेषानं लढल्या ते वाखाणण्यासारखं आहे. पूर्णपणे असुरक्षित असलेल्या मुलींसमोर एका हातात काठ्या व दुसऱ्या हातात जाळ्या, डोक्यावर शिरस्त्राण, डोळ्याला इजा होऊ नये म्हणून फायबर ग्लास, अंगात दगडप्रूफ जाकेट, याप्रमाणे पायापासून डोक्यापर्यंत पूर्णपणे सुरक्षित असलेले पोलिस व अधिकारी होते. तशाच त्यांच्या पोलीस व्हॅन व रंगीबेरंगी प्रकाश फेकणाऱ्या व कर्कश आवाज काढणाऱ्या जीपगाड्या, पाण्याचा मारा करणाऱ्या वज्र, वरुण सारख्या गाड्यांच्या गराड्यातही अजिबात न डगमगता रणरागिणीप्रमाणे मोठ्या धैर्यानं त्या पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालत होत्या. जात्यांधांनी वर्णन केल्याप्रमाणे त्या असहाय व अबला वाटत नव्हत्या. ‘तुम्हाला मुली नाहीत काय?’, ‘त्यांना तुम्ही शिकवत नाहीत काय?’, ‘आम्ही तुमच्या मुलीसारख्या नाही काय?’, ‘आमचा गुन्हा काय?’ असा जाब विचारत होत्या. पोलीस अधिकारी निरुत्तर होते, पण म्हणून काही त्यांनी लाठीचार्जमध्ये हयगय केलेली नव्हती. ज्यांनी त्याबाबतची दृश्यं पाहिली असतील त्यांच्या हे सहज ध्यानात येईल. देशातील महिलांच्या सुरक्षिततेच्या प्राथमिक हक्कासाठी झालेला एक महत्त्वपूर्ण संघर्ष म्हणून या लढ्याची निश्चितच नोंद होईल.

तसंच या लढ्यातील आकांक्षा गुप्ता नावाच्या मुलीनं विद्यापीठ प्रशासनाच्या पुरुषसत्ताक मनुवृत्तीचा निषेध म्हणून स्वत:चं केशवपन करून घेतलं आणि धरणं आंदोलनात अग्रभागी राहिली. तोही फोटो या संघर्षाची आठवण म्हणून कायम झळकत राहील.

या संघर्षाला देशभरातील विविध विद्यापीठांतून, शहरांतून संघचालित अभाविपव्यतिरिक्त अनेक विद्यार्थी संघटनांनी सक्रिय पाठिंवा दिला आहे. प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध केला आहे. पंतप्रधानांच्या ‘बेटी पढाओ’ला या निदर्शनातून ‘बेटी बचेगी तो पढे़गी और पढे़गी तो लढे़गी’, ‘बचेगी तो पढे़गी बेटी, नहीं तो लढे़गी बेटी’ असे फलक घेऊन उत्तर देण्यात आलं आहे. खुद्द बनारसमधील जनतेनं तसंच दिल्लीतील जंतरमंतरवर हजारो नागरिकांनी यात सहभाग घेतला आहे.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

या आंदोलनाला आणखी धार येऊ नये, त्यास शहरातून व्यापक पाठिंबा मिळू नये आणि केलेली दडपशाही दडपून टाकता यावी म्हणून विद्यापीठ प्रशासनानं २ ऑक्टोबरपर्यंत सर्वच महाविद्यालयं व विद्यापीठ बंद करून टाकलं आहे. सर्व वसतीगृहं सक्तीनं रिकामी करून घेतल्यामुळे विद्यार्थिनी आपापल्या गावी परतल्या आहेत. घरी गेल्यानंतर घरोघरी व गावोगावी झालेल्या प्रकाराबद्दल कुटुंबात, दोस्त मित्रांत व गावागावांत त्या चर्चा करणारच आहेत. टीव्ही, वर्तमानपत्रांतून, सोशल मीडियातून याची बहुतांश माहिती बहुजणांना झाली असली तरी प्रत्यक्ष भोगलेली वस्तुस्थिती या मुली आप्तेष्टांना सांगतील.

या घटनेच्या त्या एक प्रकारे प्रचारकच बनतील. त्यामुळे सर्वत्र मनुवृत्तीचा धिक्कार होईल, असं आपण धरून चालू या. जेएनयु हा देशद्रोह्यांचा अड्डा असला तरी नुकत्याच झालेल्या तेथील निवडणुकीत सर्वच जागांवर डावेच पुन्हा निवडून आले आहेत. अभाविपचा एकही उमेदवार निवडून आला नाही. हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाप्रणीत आंबेडकरवादी संघटनाही देशद्रोहीच होती. पण तिथंही रोहित वेमुलाच्या नावाचं पॅनेलच निवडून आलं. तिथंही अभाविपचा सुपडासाफ झाला. दिल्ली विद्यापीठ हा अभाविपचा अड्डा मानला जात होता, पण तिथंही काँग्रेसच्या एनएसयुआयनं बाजी मारली. अभाविप कसंतरी अस्तित्व टिकवून ठेवू शकली. राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती आहे. बीएचयुमध्येही आता विद्यार्थिंनीच्या आंदोलनानं मोठी पाचर मारली आहे!       

.............................................................................................................................................

खक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......