टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • किशोर तिवारी, अरण जेटली, मोहन भागवत, मिलिंद बोकील, रामनाथ कोविंद आणि साईबाबा
  • Mon , 02 October 2017
  • विनोदनामा टपल्या किशोर तिवारी अरण जेटली मोहन भागवत मिलिंद बोकील रामनाथ कोविंद साईबाबा

१. देशभरात अनेक भक्तगण असलेले संत साईबाबा यांचं जन्मस्थान पाथरी (जि. परभणी) हे असून राज्य सरकारनं त्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. या वक्तव्यामुळे शिर्डीतील साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. साईबाबा समाधी शताब्दीच्या समारंभात राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटले. साईबाबा संस्थाननं प्रकाशित केलेलं साईचरित्र, खापर्डे डायरी, साईबाबा अवतार व कार्य, साईलिलामृत (मराठी) या ग्रंथांमध्येही साईबाबांच्या जात, धर्म, वंश, पंथ व जन्माचा उल्लेख नाही. राष्ट्रपतींनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केलं याविषयी साईभक्तांमध्ये संभ्रम आहे. दासगणू महाराज व दाभोळकर यांनी लिहिलेल्या साईबाबांच्या चरित्रातही साईबाबांच्या जन्माचा उल्लेख नाही. साईबाबांनी गुरू व्यंकुसा, संप्रदाय धर्म कबीर, जात वंश परवदिगार (देव), वय लाखो वर्षं असं सांगितलं असल्याचा संदर्भ ग्रंथामध्ये आहे. राष्ट्रपतींना साईबाबांच्या जन्माची चुकीची माहिती देण्यात आली. त्याची चौकशी करून अशी माहिती देणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी संस्थानाचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांनी केली.

राष्ट्रपतींचं वक्तव्य हा अपघात नसावा. सगळ्या जातीधर्मांना आपलासा वाटणारा सेक्युलर संत विद्यमान सरकारच्या वैचारिक परिवाराला फारसा आवडणारा नाही. याआधीही साईबाबांच्या संदर्भात या विचारधारेच्या लाडक्या शंकराचार्यांनी अवमानकारक विधानं केली होती. साईबाबांचं जन्मगाव निश्चित झालं की, जन्मवेळ आणि आईवडील निश्चित करायला कितीसा वेळ लागेल. एकदा ते झालं आणि साईबाबा एका धर्मात बंदिस्त झाले की, त्यांचं जे निधर्मी वलय आहे, ते संपुष्टात येईल, असा होरा त्यामागे असावा. खरंतर इतिहास संशोधकांनी शोध घेण्याचे हे विषय आहेत. पण, त्यांचा वापर वैचारिक अजेंड्यांच्या पूर्तीसाठी केले जात आहेत.

.............................................................................................................................................

२. शेतातील कीटकनाशक फवारणीमुळे १५ दिवसांत यवतमाळमध्ये १८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली वसंतराव नाईक स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली आणि या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सरकार प्रत्येकी तीन लाख रुपये नुकसानभरपाई व उपचारावर आलेला संपूर्ण खर्च देणार असल्याचं सांगितलं. कापसाच्या उभ्या पिकावर  बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, मलीबगचे हल्ले रोखण्यासाठी  प्रोफेक्स सुपर वा पोलो या सारख्या अतिविषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे १८ शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा या पंधरवड्यात मृत्यू झाला आणि सहाशेच्यावर लोकांना विषबाधा झाली, असं तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर सांगितलं. या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी कृषी व आरोग्य विभागाची असल्यानं त्यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारी नोकरीमधून अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे.

तिवारी यांचा दृष्टिकोन चुकीचा आणि प्रदूषित आहे. असंही शेतकऱ्यांना हे सरकार कीडामुंगीच्या फार वर मानत नाही. शेतकरी या कीटकनाशकांचा जो अप्रत्यक्षपणे वापर करतात, तो थेट होईल अशी व्यवस्था झाली, तर त्यात सरकारला दोष का द्यायचा? शेतकरी म्हणून जन्माला आलो तिथं आपला सत्यानाश झाला, हे लक्षात आल्यावर शेतकरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करतातच. ते आता आपोआप झालं तर सोयीचं नाही का? उलट हत्यांच्या माध्यमातून आत्महत्या रोखल्याबद्दल या विभागांना शाबासकीच दिली पाहिजे.

.............................................................................................................................................

३. मराठी साहित्य संमेलन म्हणजेच चोरांची आळंदी आहे. साहित्य संमेलनाचा व्यवहार अत्यंत दुष्टबुद्धीच्या पुरुषांनी नियंत्रित केला आहे. यात खरा साहित्यिक कधीही सहभागी होऊ शकत नाही, असा आरोप लेखक मिलिंद बोकील यांनी नुकत्याच ठाणे इथं आयोजित केलेल्या ‘मॅजेस्टिक गप्पा’ या कार्यक्रमात केला. ठाण्यात प्रथमच आयोजित ‘मॅजेस्टिक गप्पां’मध्ये बोकील म्हणाले की, साहित्य संमेलनात वाचकांची लोकशाही आणायची असल्यास वाचनालयांनी पुढाकार घ्यावा. असं घडलं तर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष वाचकपसंतीनुसार निवडला जाईल. शासनाचे पुरस्कारच परत करायचे होते, तर पुरस्कार स्वीकारलेच का, असा सवाल त्यांनी ‘पुरस्कार वापसी’ करणाऱ्यांना केला. शासन पुरस्कार जाहीर करते, तेव्हा त्यात काहीतरी साटंलोटं असतं, असंही ते म्हणाले. त्यामुळे राजसत्तेशी साहित्यिकांचा उभा दावा असावा. साहित्यिकांनी राजसत्तेकडून कोणतेही पुरस्कार स्वीकारू नयेत. पुरस्कार स्वीकारतानाही साहित्यिकांना मेंढ्यांसारखे रांगेत उभं राहावं लागतं, तसंच मिळणारे पुरस्कार हे अनेक वेळा भ्रष्ट पुढाऱ्यांकडून मिळत असतात. आजचे पुरस्कार जाहीर करणारे शासन उद्या आपला गळा दाबू शकतं, असंही ते यावेळी म्हणाले. 

बोकील यांच्यासारख्या विचारवंत लेखकानं ही भूमिका घेतली तर सुबुद्ध आणि सुजाण माणसं राजकीय आणि प्रशासनिक प्रक्रियेपासून दुरावण्याचा धोका उद्भवतो. लेखकांनी कोणाचं मिंधं असता कामा नये, राजसत्तेसमोर झुकू नये, ही अपेक्षा बरोबरच आहे. मात्र, राजसत्तेकडून पुरस्कार स्वीकारू नयेत, म्हणजे काय? राजसत्ता म्हणजे कोण? हे राजे महाराजे आहेत का? आपणच निवडून दिलेले तात्पुरते लोकप्रतिनिधी आहेत. ते लोकांच्या वतीनंच पुरस्कार देतात. ते स्वत:ला राजे समजू लागतात आणि सामान्यजनही तसंच वागवू लागतात त्यांना; पण त्यांचा हा गैरसमज साहित्यिकांनी दूर करायला हवा आणि राजसत्ता ही लोकांची सत्ता आहे, याची जाणीव त्यांना त्याच मंचांवरून करून द्यायला हवी.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

४. भारतात गोरक्षेचं काम करणारे मुसलमान आणि इतर धर्माचेही लोक आहेत. बजरंग दलाप्रमाणे गायींच्या रक्षणासाठी मुस्लिमांनीही आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, असं सांगत सरसंघचालक मोहन भागवत गोरक्षेचा मुद्दा धार्मिक नसल्याचं सांगितलं. नागपुरात दस-यानिमित्त आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात ते म्हणाले की, देशातील गोरक्षक आणि गोपालक सद्भावनेनं आपलं काम करतात. काही चुकीच्या घटनांचा संबंध त्यांच्याशी जोडू नका, असं आवाहन त्यांनी केलं. मात्र, गायीचं रक्षण करणारे गोरक्षक हिंसक कसे होऊ शकतात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. गोरक्षकांच्या नावावर हिंसा करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. त्यांना दंड व्हावा, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गोरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या मोहम्मद अखलाखचं नाव उद्या संघाच्या एखाद्या शिबिराला दिलं गेलं, तर त्यात आश्चर्य वाटायला नको. त्यानं प्राण वेचले म्हणूनच गोमांसभक्षण करणाऱ्यांवर जरब बसली ना? हे मिशीवाले काका एकीकडे सांगतात कोणाच्याही खानपानात ढवळाढवळ करणं, ही आपली संस्कृती नाही. दुसरीकडे सांगतात गोरक्षेच्या नावावर गुंडगिरी खपवून घेता कामा नये. तिसरीकडे सांगतात गोरक्षा करणारे हिंसा करूच शकत नाहीत. वासरांसाठी असलेलं दूध हिरावून घेणं आणि गायीचं दूध देणाऱ्या यंत्रात रूपांतर करणं, हीसुद्धा हिंसाच आहे. भविष्यात पतंजलीसारखे स्वदेशी उद्योजक जास्तीत जास्त गोमूत्र देणाऱ्या जातीही विकसित करतील आणि त्यासाठी गायींना बळजबरीने पाणीही पाजायला कमी करणार नाहीत.

.............................................................................................................................................

५. जनता देशाच्या विकासाची मागणी करते आहे. लक्षात घ्या देशाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी किंमत चुकवावी लागेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. विकास साधायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे पैसा हा पैसा प्रामाणिकपणे खर्च झाला तर विकास निश्चित होणार आहे, असं ते ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ कस्टम्स अँड नार्कोटिक्स’च्या स्थापनादिवसाच्या कार्यक्रमात म्हणाले. महसूल म्हणजे सरकारी व्यवस्थेची लाइफलाइन आहे. सरकारी तिजोरीत जेवढा महसूल जमा होईल तेवढी देशाच्या विकासाला गती येईल.

जेटली अगदी १०० टक्के बरोबरच बोलत आहेत. फक्त कुणाच्या विकासासाठी कुणी किंमत मोजायची आणि देशाचा विकास कशाला म्हणायचं, याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळेच देशातल्या जनतेला विकास वेडा झालाय का, अशी शंका येऊ लागली आहे. चार वर्षांपूर्वी बुलेट ट्रेन हा फक्त देखावा असतो, असं सांगणारे सद्गृहस्थ देशाच्या पंतप्रधानपदावर आल्यानंतर अशा शोभेच्या वस्तू पुढे रेटतात, तेव्हा अंगावर लंगोटीपलीकडे वस्त्र नसलेल्या आणि सोनेरी मुकूट मिरवणाऱ्या देशाचं चित्र डोळ्यांसमोर येतं. जेटली यांची आणि त्यांच्या सरकारची विकासाची ही कल्पना असेल, तर त्यासाठी पैसा मोजायला जनता का तयार होईल?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......