गोळवलकरवाद (?) आणि आम्ही सेक्युलर भारतीय
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
विनय हर्डीकर
  • ‘गोळवलकरवाद - एक अभ्यास’ या पुस्तकांचे मुखपृष्ठ
  • Sat , 30 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama बुक ऑफ द वीक Book of the Week गोळवलकरवाद - एक अभ्यास GOLWALKAR’S We OR Our Nationhood Defined शम्सूल इस्लाम Shamsul Islam

प्रा. शमसुल इस्लाम लिखित ‘गोळवलकरवाद : एक अभ्यास’ या पुस्तकामध्ये गोळवलकरांच्या ‘वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड’ या पुस्तकाचा मराठी अनुवादही समाविष्ट केला आहे. सुगावा प्रकाशनने काढलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन विनय हर्डीकर यांच्या हस्ते पुण्यात २७ ऑगस्ट २०१७ रोजी झाले. त्या वेळी त्यांनी केलेले भाषण.

.............................................................................................................................................

व्यासपीठावरच्या आणि सभागृहातल्या माझ्या सेक्युलर सहकाऱ्यांनो...

सुगावा प्रकाशनाचे प्रमुख प्रा. विलास वाघ यांनी म्हटलं, वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना बोलावले पाहिजे. मला त्या वाक्यामध्ये अनेक अर्थ दिसत होते. एक सूत्रसंचालक विशाल पोखरकर यांनी अधोरेखित केला. सुगावा प्रकाशनाला कायम सुगावा लागतो की, मला अशा विषरामध्ये इंटरेस्ट असू शकतो. त्यामुळे गोवधबंदीसंबंधी अ.भि. शहा आणि इतरांनी तयार केलेले इंग्लिश पुस्तकाच्या भाषांतराचं प्रकाशन झालं, त्यावेळीही विलासने मला बोलावलं होतं. आणि आज या दुसऱ्या पुस्तकाच्या भाषांतराच्या (शमसुल इस्लाम लिखित ‘गोळवलकरवाद : एक अभ्यास’) प्रकाशनासाठीही विलासने मला बोलावलं आहे. चार महिन्यांपूर्वी हमीद दलवाईंसंबंधी जे एकदिवसीय सेमिनार इथल्या वेगळ्या हॉलमध्ये झाले, त्यात मी असे म्हटले होते की- दलवाईंचे पुस्तक किंवा दलवाईंचे लेखन हा संपूर्ण सेक्युलर भारताचा जाहीरनामा आहे, मॅनिफेस्टो आहे. तेच सूत्र धरून आज मी आपणासमोर थोडंसं बोलणार आहे. या पुस्तकाबद्दल जेवढे आवेशाने बोलता येईल, तेवढे माझ्या आधीचे दोन वक्ते (शमसुद्दीन तांबोळी व नितीश नवसागरे) बोलले आहेत. बाबा (डॉ. बाबा आढाव) तर नेहमीच आवेशात असतात.

त्यामुळे माझ्यानंतर कदाचित बाबांचेही आवेशपूर्ण भाषण होईल. पण मला असे वाटते की, थोडे शांत डोक्याने आपल्याला या पुस्तकाकडे बघावे लागेल.

मुळात गोळवलकरवाद म्हणून काही नाही. कुठल्याही इझम्ला एक इकॉनॉमी असावी लागते. पोलिटिकल इकॉनॉमी. त्या-त्या इझम्ने त्याची मांडायची असते, आयडिऑलॉजीच्या व्याख्येमध्ये पोलिटिकल इकॉनॉमी काय आहे, हा प्रश्न असतो. म्हणूनच भांडवलशाहीची इकॉनॉमी वेगळी असते, समाजवादाची वेगळी असते. साम्यवादाची वेगळी असते आणि फॅसिझमला इकॉनॉमीच नसते. तशी पोलिटिकल इकॉनॉमी नसल्याने गोळवलकरवाद म्हणून काही नाही. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर, ते गोळवलकरांचे तर्कट आहे. तरीसुद्धा मिसइन्फर्मेशन आणि डिसइन्फर्मेशन ज्या-ज्या वेळी झाली असेल, त्या-त्या वेळी ती दुरुस्त केली पाहिजे. त्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व आहे. म्हणजे बंदीच्या काळात संघवाल्यांनी हे पुस्तक (वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड) नाकारले. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी असे उद्गार काढले की, या पुस्तकाशी आता आमचा काही संबंध राहिलेला नाही आणि ते कुणी लिहिलं, त्यासंबंधीदेखील स्पष्टता नाही. हे असे असले तरी, जेव्हा केव्हा मिसइन्फर्मेशन म्हणजे खोटी माहिती; डिसइन्फर्मेशन म्हणजे हेतुपूर्वक दिलेली खोटी किंवा भयानक माहिती प्रसृत होते, तेव्हा हे दोन्ही प्रकारचं अनधिकृत बांधकाम पाडायचं असतं. ते कायम पाडत राहावं लागतं. त्या दृष्टीने हे पुस्तक (गोळवलकरवाद : एक अभ्यास) आता आलं, हे फार चांगलं झालं. मला विलासने असं सांगितलं की, ऑक्टोबर महिन्यामध्ये दिल्लीत एक सरकारप्रणीत परंतु सरकारच्या कुठल्या तरी वेगळ्या संस्थेने पुढाकार घेऊन परिसंवाद

व्हायचा आहे आणि त्याच्यात गोळवलकरांच्या विचारांचा बराच पुरस्कार केला जाणार आहे. हे जर खरं असेल, तर त्याची पोर्श्वभूमी म्हणूनसुद्धा अशा प्रकारची चर्चा गोळवकरांच्या पुस्तकाची (वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड) व्हायला हवी.

माझा या पुस्तकाशी संबंध तिसऱ्यांदा येतोय. खरं म्हणजे, हे चोपडं आहे! पन्नास पानांचंसुद्धा हे पुस्तक नाही. याला ग्रंथ म्हणावं, असं यामध्ये काहीही नाही. आणि सबंध युक्तिवादाची पद्धतही जो निष्कर्ष काढायचाय तो गृहीत धरायचा आणि मग एक-दोन पुरावे मांडायचे, जिथे पुरावे सापडणार नाहीत तिथे रेटून न्यायचे अशी आहे. एखादा किरकोळ पुरावा रूमानियासारख्या छोट्या देशामधला सापडेल, त्याचा उल्लेख करायचा- अशा पद्धतीचं हे तर्कट आहे. यातला कुठलाच विषय शास्त्रशुद्ध मांडणीला धरून नाही.

म्हणजे वंशवाद म्हणावा, तर भारतासारख्या देशामध्ये प्रचंड संकर झालेला असतो. उदाहरणार्थ साडेतीन हजार वर्षांपूर्वी भारत कसा घडला याची कल्पना, गेल्या पाचशे वर्षांत अमेरिका कसा घडला, त्यावरून करता येते. जगातील सगळे सुखी होऊ इच्छिणारे जे लोक होते, ते या भूप्रदेशाकडे आले, हे लक्षात घेण्यासारखे आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये आता निरनिराळ्या पद्धतीचे वर्णसंकर झालेले दिसतात, तसे पूर्वी भारतातही झालेले आहेत.

गोळवलकर असे म्हणतात की, भारताला समुद्राचे संरक्षण आहे. याचा अर्थ एवढ्या मोठ्या संघटनेच्या प्रमुखाला युद्धशास्त्रही समजत नाही. ज्या देशाला किनारा मोठा, तो देश सगळ्यात असुरक्षित असतो- हेसुद्धा गुरुजींना माहीत नव्हते. कारण ‘पुण्यसिंधू वलयांकित हिंदूभूमी’ ही जी फ्रेज आहे, ती त्यांच्या डोक्यात पक्की बसली होती. मोठा समुद्रकिनारा हाच या देशाला मोठा धोका होता, आजसुद्धा आहे. आता स्मगलिंग- किती आटोक्यात आले, किती नाही, हे माहिती नाही. सरकारने असा दावा केला आहे की, नोटाबंदीनंतर यालाही आळा बसेल वगैरे. पण हे सगळे समुद्रातून आले होते, हेसुद्धा गुरुजींना माहीत नव्हते.

गुरुजींची वांशिक शुद्धीची कल्पना तर जगात कुठेच टिकत नाही. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये ‘ट्रू बॉर्न इंग्लिशमन’ नावाचं (म्हणजे तिकडची शिवसेना म्हणा किंवा तिकडचं बजरंग दल म्हणा) असं काही तरी निघालं असलं पाहिजे. आता ट्रम्पसाहेबांच्या कृपेने अमेरिकेमध्ये ‘ट्रू अमेरिकन, द नेटिव्ह अमेरिकन’ आहे. पण त्यांची पंचाईत आहे. तिथे रेड इंडियन्स आधी होते, हे सगळ्या जगाला माहिती आहे.

‘ट्रू बॉर्न इंग्लिशमन’ अशी संकल्पना होती, ती फार लोकप्रिय व्हायला लागली होती. ज्या लेखकाला आपण सगळे डॅनिअल डेफो म्हणजे रॉबिन्सन क्रूसोचा निर्माता म्हणून ओळखतो, तो एक विचारवंतही होता. रॉबिन्सन क्रूसोमध्ये एक तत्त्वज्ञान आहे, असं आपल्या लक्षात येतं. डिफोने एक कविता लिहिली. त्यात या ट्रू बॉर्न इंग्लिशमनच्या भ्रमाला उत्तर लिहिलं. तो काय म्हणतो, ‘ट्रू बॉर्न इंग्लिशमन, अ कॉन्ट्राडिक्शन ऑफ टर्म्स, अ फ्लाईट ऑफ फॅन्सी, अ फॅक्ट इन फिक्शन.’ ज्याने इंग्लिश भाषेला एवढी चांगली लेखनाची देणगी दिली, तो असं म्हणतोय की- ‘ट्रू बॉर्न इंग्लिशमन’ नावाचं असं काही अस्तित्वात नाही. ते कल्पनेत असतं किंवा कल्पनारम्य गोष्टींची ती वस्तुस्थिती आहे. तो इंग्रजांना काय म्हणतो- ‘रुवर रोमन्स, एक्सेंट, अ‍ॅनिश, नॉर्मल इंग्लिश’ या क्रमाने संकर झालेला आहे.

आणि तसं जर आपण बघत गेलो तर वेदपूर्व काळ, त्याच्याही मागे गेलो तर सिंधू संस्कृती, त्याच्याही मागे गेलो तर आणखी कुणी तरी असतील. त्याच्यानंतर वेदकाळात आर्य आले, नंतर शक आले, हूण आले, कुशाण आले. आणि हे काय फक्त इकडे हवा खायला आले होते का? त्यांचा इथे समावेश झालेला आहेच. त्यांचा वर्णसंकर झालेला आहेच. आणि त्या सगळ्यातून मग एकदा कधी तरी एक शिस्त लावण्यासाठी चातुर्वर्ण्य नावाची व्यवस्था आली असेल (हे समर्थनार्थ नाही, अंदाज म्हणून बोलतोय) पुढे डिफोने असे म्हटले की, हे जे कुणी सगळे आहेत ना- ‘रिलिजन रिलिजन दे आर सो अनइव्हन’- हे भारताला जसेच्या तसे लागू आहे. त्यांच्या धर्मामध्येसुद्धा इतकी असमानता आहे की, ईच वन गोज बाय हिज ओन वे टू हेवन- प्रत्येक जण स्वर्गाला पात्र असतो, पण आपापल्या स्वतंत्र मार्गाने स्वर्गाला जातो.

आताचंच उदाहरण घ्या ना. आता काही गणपती अर्ध्या किंवा दीड दिवसांनी गेले. ते मुख्यत: लेले, नेने वगैरे अशा मंडळींचे होते. काही पाच दिवसांनी जातील, काही आठ दिवसांनी जातील आणि उरलेले दहा दिवसांनी जातील. म्हणजे साधा एक गणपतीचा सण हासुद्धा आपल्याकडे एकसूत्री पद्धतीने साजरा होत नाही. प्रत्येकाचे कुळाचार वेगळे, जातींचे आचार वेगळे, पंथांचे आचार वेगळे. पुन्हा नवीन-नवीन अनंत कोटी ब्रह्मांडनायक, यांची संख्या थांबायला तयार नाही. त्यांच्या उपासना वेगळ्या- म्हणजे हिंदू म्हणून नेमके आहे काय? आणि डिफोने असं म्हटलंय, हे महत्त्वाचं आहे- ‘ऑफ ऑल द प्लेग्ज विथ विच मॅनकाइंड आर कर्स्ट इक्लेझिअ‍ॅस्टिक टिरनी इज द वर्स्ट’. मनुष्य जातीला सगळ्यांत वाईट शाप कसला आहे? ‘रिलिजिअस टिरनी’- धार्मिक विषयातील हुकूमशाही हा मनुष्यजातीला सगळ्यात मोठा धोका आहे, सगळ्यात मोठा शाप आहे- असं हा कवी म्हणतो. आपल्यालासुद्धा गुरुजींच्या पुस्तकानंतर (वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड) वेगळे काही म्हणता येत नाही.

शमशुद्दीन तांबोळी यांनी भारतीय पार्श्वभूमी सांगितली. थोडीशी जागतिक पार्श्वभूमी नितीश नवसागरे रांनी सांगितली. आणखी तिसरी पार्श्वभूमीही लक्षात घेतली पाहिजे. एकोणिसाव्या शतकात डार्विनचा जो उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त आहे, त्याचा काही तत्त्वज्ञानी मंडळींवर आणि काही राज्यशास्त्र किंवा आयडिऑलॉजी मांडणाऱ्या मंडळींवर प्रचंड प्रभाव पडला. म्हणून याला सोशल डार्विनिझम म्हणतात. डिव्हाईन राईट थिअरी आहे हॉब्जची. म्हणजे काय- एका विशिष्ट कुटुंबाला निसर्गाने (तो परमेश्वराने म्हणतोय) अलौकिक गुण दिलेले असतात. त्याने समाजावर राज्य करावं आणि तेही तहहयात. त्याचप्रमाणे प्रत्येक समाज स्वत:ला- आणि तो जर एकच छोटा गट नसेल, तर मग इतर गटांच्यापेक्षा स्वत:ला- श्रेष्ठ समजतो. धिस इज डार्विनिझम. आणि तो समाज म्हणतो की, हा आमचा खास हक्क आहे, की बाकीच्यांनी आमच्याशी वागताना सेकंडरी सिटिझन म्हणून राहिले पाहिजे.

ज्यूंचा धर्म त्यांना तेच सांगतो, ‘यू आर स्पेशल’. सोसण्यासाठीच तुमचा जन्म आहे. ख्रिश्चॅनिटीमध्येसुद्धा हा विचार आहे की, सर्व प्राणिमात्रांमध्ये परमेश्वराचा सगळ्यात आवडता प्राणी माणूस आहे, त्यातल्या त्यात ख्रिश्चन माणूस हा सर्वांत लाडका. आणि म्हणून चीनला अफू का पाठवायची; तर चिनी लोकांना आधुनिक महाग औषधं परवडणार नाहीत, म्हणून त्यांचं दु:ख कमी होण्यासाठी त्यांना अफू द्यायला ख्रिस्तांची नेमणूक केली आहे- असा प्रचार मिशनरी करत होते. कारण जगावर उपकार करण्यासाठी ते जन्माला आले. इस्लामचे म्हणणे तेच आहे. बिगरइस्लामी जे लोक आहेत, त्यांना दोन पर्याय आहेत. एक- त्यांनी प्रेषितांचे अनुयायी व्हावं किंवा त्यांनी प्रेषितांच्या अनुयायांच्या हातून मरण स्वीकारावं आणि आपली मालमत्ता त्यांच्या स्वाधीन करावी. भारतामध्ये पंचाईत अशी झाली- तुम्ही नेमकं कुणाला श्रेष्ठ म्हणणार आणि कुणाला तुम्ही कनिष्ठ ठरवणार? आठ-दहा हजार वर्षांच्या इतिहासामध्ये आत गेलात तर- तुम्ही एक दार उघडले की, आणखी दहा दारं सापडतात. त्याच्यामागे अजून दहा दारं सापडतात. मी दोन महिन्यांपूर्वी रा. चिं. ढेरे यांच्यावर व्याख्यानं दिली. तेव्हा श्रद्धेच्या विषयाचा मला काही अंत सापडेना; इतका श्रद्धांचा सुकाळ आहे आपल्याकडे.

त्या बाबतीत गुरुजींसमोर दोन आव्हानं होती. हे पुस्तक १९३९ मध्ये (वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड) लिहिलं. म्हणजे चौदा वर्षांत जे हिंदू संघटन गोळा झालं, ते आपल्या कह्यात कसं ठेवायचं? कारण हा जो संघटित झालेला हिंदू होता, त्याच्यातला बराच मोठा भाग राजकीयदृष्ट्या काँग्रेसमध्ये होता आणि दुसरा मोठा भाग हिंदू महासभेकडे जाईल की काय ही चिंता होती. तेव्हा गुरुजींच्या हे लक्षात आलं नाही की, सावरकरांचे कडकडीत हिंदुत्व या समाजाच्या पचनी पडणार नाही. जसं रघुनाथ कर्व्यांचं लैंगिक शिक्षण त्या समाजाला झेपलं नाही, तसं सावरकरांचं इतकं आक्रमक हिंदुत्व (गाय मारून खाल्ली तरी चालेल) त्या वेळच्या समाजाला झेपणारं नव्हतं. आतासुद्धा झेपेल की नाही, ही शंकाच आहे. पण गांधींच्या खिलाफत चळवळीमधल्या भूमिकेमुळे गांधी हे मुसलमानांचे पक्षपाती आहेत, असा हिंदू समाजाचा फार मोठा समज झाला होता. त्या समाजाला धरून ठेवण्यासाठी काही तरी थोडी फार वैचारिक मांडणी करण्यासाठी हे सगळं थातूर-मातूर पुस्तक गुरुजींनी लिहिलं आहे. याच्यामध्ये एकही युक्तिवाद धड नाही.

मघाशी सांगितलं, माझा या पुस्तकाशी तिसऱ्यांदा संबंध येत आहे. बालवयात मी संघ स्वयंसेवक होतो. मी प्रश्न विचारायला लागलो. तेव्हा मला सांगितलं गेलं की, असं मोठं पुस्तक लिहिलंय, आपल्या परमपूज्यांनी. तू मोठा झाल्यावर ते वाच. आताचं तुझं काम काय आहे? तर रोज शाखेत यायचं. ही कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी बघण्यासारखी आहे, बरं का! रोज शाखेवर आला की, तुला पुढच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण मी काही गप्प बसायला तयार नव्हतो. आणि मला त्याही वेळेला जाणवत होतं की, हे काही खरं नाही. दुसरा संबंध आला तो ज्ञानप्रबोधिनीत. आम्ही आग्रह धरला की, आपल्याला सगळ्या आयडिऑलॉजींचा अभ्यास केला पाहिजे. तेव्हा अप्पांनी (डॉ. अप्पा पेंडसे) मला बाजूला बोलावून विचारलं. आधी हिंदुत्वाचा अभ्यास करायला तुझी काही हरकत आहे का? तर मी म्हणालो, माझी हरकत नाही. हिंदुत्व अभ्यास शिबिर आपण पहिलं करू. मग तशी शिबिरे आम्ही केली. नंतर साम्यवादाचं केलं, समाजवादाचं केलं, देशापुढील आर्थिक प्रश्नांचं केलं. अशी चार शिबिरं तिथे घडवून आणण्याचं सुरू करण्याचं- क्रेडिट मी नक्की घेईन. आणि प्रबोधिनीत

बुद्धिवान मुलं निवडून घेतली होती. त्यांनी या पुस्तकाच्या चिंध्या करून टाकल्या. गुरुजींचा एकही युक्तिवाद कुणीही टिकू देईना. तर अप्पा हे गुरुजींसारखे चतुर संघटक होते. त्यांनी आम्हा सगळ्यांना पकडलं आणि म्हटलं- तुम्ही आता प्रबोधिनीचं हिंदुत्व लिहून काढा. मग या सगळ्या विषयाचा सखोल अभ्यास मी करायला लागलो, तेव्हा तीन गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक- हिंदू धर्म म्हणून काही नाही. हिंदू हा शब्द परकीय आहे. जगाने आम्हाला हिंदू म्हणावं- हे इंग्रजांनी आम्हाला टोपीकर म्हणावे असा आग्रह धरण्यासारखे आहे. हे ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं; त्यानंतर हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदुत्व हे तीन शब्द वापरण्याचं मी बंद केलं. हे तुम्ही माझ्या लिखाणात तपासून पाहू शकता.

जागतिक पातळीवरचा सोशल डार्विनिझमचा आणि त्याचवेळी जर्मनीमध्ये नाझीझमचा विजय होत होता. तेव्हा गुरुजींना असं वाटणं साहजिक आहे की, तिकडे हिटलरचं साधून गेलं, इकडं माझं का नाही साधणार? पण गुरुजींकडे संघातील स्वयंसेवक ‘पुराणातील वांगी पुराणातच’ असे बघत असावेत. त्यामुळे भारतामध्ये तसं काही झालं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की, एका डिस-इन्फर्मेशनचे खंडन करणे आणि आज देशावर राज्य करणारी जी मंडळी आहेत, त्यांच्या वैचारिक मुळाचा मागोवा घेणं- या दोन्ही गोष्टींचा वेध घेणारा हा लघुप्रबंध ‘गोळवलकरवाद : एक अभ्रास’ आहे. हा आता प्रकाशित झाला, हे चांगलं झालं.

मात्र मला या पुस्तकातील एका गोष्टीबाबत स्पष्ट मतभेद नोंदवायचा आहे. शमसुल इस्लाम यांनी असं म्हटलंय की, तेव्हाच्या जनसंघाचे अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या खुनाचा कट अटलबिहारी वाजपेयी (त्यातल्या त्यात संघातील (उदारमतवादी माणूस बरं का), बाळासाहेब देवरस आणि लालकृष्ण अडवाणी या मंडळींनी रचलेला होता. म्हणजे एवढ्या एका मुद्द्यावर शमसुल इस्लामसुद्धा गोळवलकरांसारखे आहेत, एवढे बोलून मी हा मुद्दा सोडून देतो. वस्तुत: त्या वेळेला देशात काँग्रेसची सत्ता होती आणि एकमेव धोका कुणाचा असेल, तर राष्ट्रीय नेता म्हणून वाजपेरी यांचा आहे, हे इंदिरा गांधी वारंवार बोलून दाखवत होत्या. व्यक्त करत होत्या. त्यांना ‘तुम्ही हिटलरकडे शिकलेले आहात’ वगैरे बोलत होत्या. त्यामुळे तशी थोडी जरी शक्यता असती, तरी काँग्रेसने या तीन जणांचा पर्दाफाश करण्याची संधी सोडली नसती. तेवढा एक उल्लेख जर सोडला- तर गोळवलकरांच्या मांडणीचं खंडन जे शमसुल इस्लाम यांनी केलेलं आहे, ते अतिशय चांगल्या भाषेत केलेलं आहे. पातळी न सोडता केलेलं आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा न आणता केलेलं आहे. मूळ पुस्तकाचा अनुवादसुद्धा अतिशय चांगला झालेला आहे.

प्रश्न असा आहे की, आपण सेक्युलर मंडळींनी आता काय करायचं? कुणी रागावू नये, पण लक्षात घ्याव. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये दोन प्रकारची माणसं होती. एक- हुशार माणसं होती आणि दुसरी- जास्त हुशार माणसं होती. हुशार माणसांनी काय केलं? त्यांनी व्यवस्थेचे गुन्हेगार तळागाळातून शोधून काढायला सुरुवात केली आणि नितीशने (नवसागरे) सांगितलं, तसे न्युरेनबर्ग ट्रायलमध्ये सगळ्या नाझीवादाचे गुन्हेगार धरून आणले आणि सगळ्यांना फाशी दिली. मोठं काम केलं त्यांनी! नंतर जे लोक अनेक वर्षे कुठे-कुठे लपून बसले होते, त्या सर्वांना शोधून काढून त्यांच्यावर खटले भरले किंवा मारून टाकलं. चांगलं काम केलं! पण जास्त हुशार माणसांनी काय केलं? त्यांनी उद्ध्वस्त जर्मनीतलं सर्व रॉ-मटेरियल (कच्चा माल) गोळा केलं आणि ते वापरून जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत स्थान मिळवलं. पश्चिम जर्मनी हा जगामधला एक अत्यंत प्रगत आणि सुखी देश- ज्याच्यामुळे पूर्व जर्मनीतील नागरिकांना ‘मला तिकडे गेले पाहिजे, मला तिकडे गेले पाहिजे’ ही आशा व ही प्रेरणा मिळत राहिली. तर अशा प्रकारचे काम जास्त हुशार मंडळींनी केले. त्यामुळे आपण हुशार आहोत की जास्त हुशार आहोत, हे ठरवण्याची वेळ आली आहे.

मोदी सरकार गेल्या तीन वर्षांत सारखे सबंध देशाला थर्मामीटर लावून पाहत आहे. नीट लक्षात घ्या. तुम्ही सांगताहात मगापासून, ते अगदी बरोबर आहे. पहिल्यांदा त्यांनी आहाराचा मुद्दा काढून पाहिला. त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा काढून पाहिला. स्त्रिरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा काढून पाहिला. आणि मग सरसंघचालकांनी किंवा कुणी तरी वरच्या व्यक्तीने स्टेटमेंट केले की- काही असलं तरी महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे; पण संध्याकाळ झाली की मुलींनी घरी यावं, हे चांगलं. असं प्रत्येक विषयावर ते समाजाला थर्मामीटर लावून बघताहेत आणि काय-काय रिअ‍ॅक्शन येते, त्याच्याप्रमाणे पुढची स्ट्रॅटेजी ठरणार आहे. अर्थात प्रत्येक गोष्ट त्यांच्यावर उलटली आहे. पण त्या-त्या वेळेला धडा न शिकण्याइतके ते गाफील नाहीत किंवा बावळटही नाहीत. तर स्वत:ला सेक्युलर म्हणवणाऱ्या सगळ्यांनी यांच्या कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी ओळखल्या पाहिजेत.

पुढील पावणेदोन वर्षांमध्ये सेक्युलर फोर्सेसनी तीन गोष्टी शिकायला पाहिजेत. एक तर घायकुतीला येणं किंवा आक्रस्ताळेपणा करणं, हे सोडावं लागेल (मी प्रकाश आंबेडकर यांनासुद्धा म्हटलं होतं, आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांचा ‘लोकसत्ता’मध्ये लेख आला तेव्हा) एक भाषा, एक आहार, एक नेता, एक पोशाख- हे सूत्र २०१९ मध्ये ते वापरतीलच असं नाही. ते २०१९ मध्ये एकदम बहु करतील आणि मग पुन्हा लोकांसमोर जायला मोकळे राहतील. तर आपण हे सगळं ओळखलं पाहिजे. ही अतिशय धूर्त माणसं आहेत आणि बुद्धिमानही आहेत, हे नाइलाजाने कबूल करायला पाहिजे. कारण शत्रूच्या बुद्धिमत्तेला जो ओळखतो, तो यशस्वी होतो. नुसते शत्रूला आई-बहिणीवरून शिव्या देऊन कुणी यशस्वी झाल्याचं इतिहासात उदाहरण सापडणार नाही.

मात्र आपल्या सुदैवाने भाजपला सरळ यश मिळत नाही. प्रत्येक वेळेला बिब्बा जसा अंगावर उततो, तसे काही तरी विपरित परिणाम होतातच. म्हणजे नितीशकुमार हाताशी लागेपर्यंत गुजरातमध्ये थप्पड बसली. आता ही बदमाशी कशी आहे बघा- तलाकचा कायदा आल्याबरोबर सगळे भाजपचे पोपट म्हणायला लागले की, सुप्रीम कोर्टाचा निकाल अंतिम आहे; आता नवीन कायदा करायची गरजच काय? पण दोन दिवसांत हा बाबा आला ना आडवा (राम रहिम बाबासंबंधीचा न्यायालयाचा निकाल)! त्या बाबाच्या संबंधी बोलताना आता हे म्हणताहेत, ‘नाही-नाही, असे कसे चालेल? एका व्यक्तीने आरोप केला म्हणून ज्या माणसाला लाखो माणसं देव मानतात, त्याचं महत्त्व कमी होतं काय?’

स्ट्रॅटेजी काय चाललीय? पंतप्रधान तर काय सकाळी उठल्यापासूनच गांधी घेऊन बसतात. त्यांना काय वाटते-आम्ही इतके मूर्ख आहोत? तुम्ही १९४२ चे आंदोलन साजरे करता. पण तुम्ही कुठं होता रे बाबांनो, १९४२ मध्ये? तेव्हा संघ त्या चळवळीत नव्हता. याचं कारण गोळवलकरांचे हे पुस्तक आहे. हे लक्षात घ्या की, ‘हा लढाच नाही, हा संघर्ष नाही आणि काँग्रेसवाले ज्याची आपल्याला अभिवचनं देतात ते स्वातंत्र्यच नाही,’ असं गुरुजी म्हणत होते.

गोळवलकरांची डिक्शनरीच वेगळी असेल बुवा. ज्या युगाला आपण भारताचं प्रबोधनयुग म्हणतो ना, त्याला ते विस्मृतीचं युग म्हणतात. त्यांचं म्हणणं असं की- इंग्रजांची सत्ता येथे आली आणि आम्हाला आत्मविस्मृती झाली. आम्हाला त्यांची संस्कृती श्रेष्ठ वाटायला लागली. संघाचे बाकी स्वरंसेवक सोडून द्या हो- सरसंघचालकसुद्धा काही वाचत होते की नाही, असं वाटावं, अशा प्रकारची सर्व विधानं गोळवलकरांच्या या पुस्तकात आहेत. हिंदू समाज महान होता, विजीगिषू होता, त्याने काही युक्तिवाद केलेत. रामारण-महाभारतासारखी महाकाव्ये त्यांनी रचली होती. त्यांनी गणितात काही केलं होतं. पण तेच अरबांचंही आहे. इस्लामच्या आधी तीन-चार संस्कृतींमध्ये लोक प्रगत होते. एक पर्शियामधले, दुसरे अरबस्तानमधले, तिसरे भारतामधले आणि चौथे चीनमधले.

आता आपल्याला वाटते, आपला जागतिक व्यापारात सहभागच नाही. पण जग आपल्याशी व्यापार करायला पहिल्यांदा आलं, हे तरी विसरू नका. कारण पूर्वी भारत आणि चीनमध्येच व्यापाराची संधी होती. सगळ्यांत मोठा व्यापार या दोन देशांशी व्हावा, म्हणून युरोप इतका पूर्वेकडे आला. ते टुरिस्ट म्हणून आले नव्हते. या चार समाजांनी पहिले सगळे शोध लावले आहेत. पण गोळवलकर म्हणणार की- नाही, ते हिंदू होते म्हणून त्यांनी शोध लावले. मग काय अरब लोक हिंदू होते, की चिनी लोक हिंदू होते? क्रांतीच्या क्रमामध्ये जे प्राचीन समाज आहेत, त्यांचे एक ज्ञान आहे. त्यांचे एक शहाणपण आहे. सगळे त्यांचे संशोधन आहे आणि त्यांनी रचलेले ग्रंथ आहेत. ते जर तुम्ही आपले एका छापखान्यातून काढले- आणि नंतर धाकदपटशा दाखवून ते सगळे हिंदूंचे आहे, हे सगळे हिंदूंचे आहे- असे म्हटले तर, ते कुठल्याच तर्काच्या किंवा शास्त्राच्या किंवा कसल्याच शहाणपणाच्या निकषावर टिकण्यासारखे नाही.

शेवटचा मुद्दा. शेवटी या सगळ्याचा संबंध हिंदूमुस्लिम संबंधांशी येतो. ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत. पण अल्पसंख्याक म्हटल्यावर भारतात निर्देश मुसलमानांकडे असतो. माझ्या मते, अल्पसंख्याकांची पोलिटिकल डिक्शनरीमध्ये व्याख्या आहे- एकूण लोकसंख्येच्या साधारण एक ते दीड टक्का म्हणजे पहिल्यापासून मुसलमानांना अल्पसंख्याक म्हणण्यात आणि मुसलमानांनी स्वत:ला अल्पसंख्याक मानण्यात फार मोठी चूक झालेली आहे. भारतामध्ये पाच बहुसंख्य गट आहेत. त्यांच्यात सवर्ण हिंदू, ओबीसी, दलित, मुस्लिम आणि आदिवासी व इतर. या सगळ्यांची लोकसंख्या पाहिली, तर ती प्रत्येकी १५ ते २० टक्के सापडेल. (अर्थात राज्या-राज्यांत त्याचं डिस्ट्रिब्युशन वेगवेगळं दिसतं आपल्याला.)

मुसलमान समाज इथला एक बहुसंख्य समाज आहे आणि तो इथेच राहणार आहे. त्यामुळे जागतिक मुस्लिम समाजापेक्षा भारताच्या संदर्भात मुसलमान समाजाचा वेगळा विचार करावा लागेल. हिंदू-मुस्लिम संबंध आतापर्यंत राज्यकर्ता व प्रजा असे राहिले आहेत. आणि नंतर एक समाज विरुद्ध दुसरा समाज असे राहिले आहेत. खेडेगावात असे दिसते की, ज्या ठिकाणी दोन समाजांमध्ये आर्थिक संबंध होते- काही व्यवसाय मुसलमानांकडे नेमून दिलेले होते- तिथे थोडेसे सामंजस्य आपल्याला दिसते. पण नंतर तेही सामंजस्य शहरातून ‘नवी विद्या’ शिकून आलेल्या माणसांनी बिघडवलेलं दिसतं.

या देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर दोन प्रसंग असे आले की, हिंदू आणि मुसलमान या दोहोंनीही एकत्र मतदान केलं म्हणून ऐतिहासिक बदल झाले. एक- १९७७ मध्ये. इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा जो पाडाव झाला, त्या वेळी उत्तर भारतातल्या मुसलमानांनी केलेलं एक गठ्ठा मतदान. ते भले चुकीच्या कारणाने केले असेल- पण मतदान केलं नसतं, तर आणीबाणी उठत नव्हती (तेव्हा आम्ही सगळे पुन्हा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवून होतो. निवडणुकांचे निकाल हाती येईपर्रंत तशी तयारी होती.) आणि दुसऱ्यांदा तसं मतदान- इंदिरा गांधींच्या हत्येनंतर. तेव्हा सगळ्या देशातल्या हिंदू-मुसलमानांनी राजीव गांधींकडे पाहून एकत्र मतदान केले नाही, आणि काँग्रेससाठीही केलेले नाही. इंदिरा गांधींची आठवण म्हणून ते केलेले आहे. मीसुद्धा त्या निवडणुकीत इंदिरा गांधींची आठवण म्हणून काँग्रेसला मतदान केलं असेल, तर मग बाकीच्यांची कथाच काय!

मला एवढेच म्हणायचे आहे की- हिंदू व मुस्लिम हे दोन समाज ज्या वेळी एकत्र मतदान करतात, त्या वेळी या देशात ऐतिहासिक बदलाच्या शक्यता निर्माण होतात. हे दोन समाज एकत्र मतदान करतात, तेव्हा सरकार बदलता येतं. मग हे दोन समाज स्थिर, आर्थिक आणि दोन्ही समाजांचा फायदा होईल अशा संबंधाने एकत्र आले; तर देश किती बदलू शकेल, त्याचा विचार आपण सगळ्यांनी करू या.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या ३० सप्टेंबर २०१७च्या अंकातून)

शब्दांकन : विशाल पोखरकर

.............................................................................................................................................

गोळवलकरवाद - एक अभ्यास - शम्सूल इस्लाम, मराठी अनुवाद - मीना शेटे-शंभू,

सुगावा प्रकाशन, पुणे

पाने - १६०, मूल्य - १५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4035

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 04 October 2017

गोळवलकरांचं 'we or our nationhood defined' हे पुस्तक मी वाचलं नाहीये. हे पुस्तक आजच्या (=इ.स.२०१७ च्या) वस्तुस्थितीचं कितपत चित्रण करतं ते मला माहित नाही. पण त्यांचं 'राष्ट्र' नावाचं आजूनेक पुस्तक आहे. त्याला दत्तोपंत ठेंगडी यांची पुण्याहवाचन नामे १४०+ पानांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. ही प्रस्तावना म्हणजे एक छोटेखानी पुस्तकच होईल. या दोन लिखाणांत आधुनिक युरोपीय राष्ट्रवाद आणि त्याचा भारताशी असलेला संबंध यावर उहापोह केला आहे. या पुस्तकात जगभरातल्या अनेक राष्ट्रांसंबंधी काही रोचक निरीक्षणे नोंदवली आहेत. पुस्तकात एके युगोस्लाव्हियातल्या बोसनियन मुस्लिमांची समस्या उद्धृत केली आहे. दुसऱ्या ठिकाणी इंडोनेशियामधल्या पूर्व तिमूर बेटावरचे रहिवासी उर्वरित इंडोनेशिय नागरिकांपासून वेगळे असल्याने स्वतंत्र राष्ट्राची मागणी करू शकतात, असं प्रतिपादन केलं आहे. आजून एके ठिकाणी उत्तर आफ्रिकेतील भूमध्यसागरी सीमेवरील लिबिया, तुनिशिया, अल्जिरीया आणि मॉरेटानिया या चौघांचं सामायिक राष्ट्र बनवायला हवं होतं अशी टिप्पणी आहे. ही जी भाकितं आणि निरीक्षणं आहेत ती त्यांनी हयात असतांना म्हणजे १९७३ पूर्वी केलेली आहेत. बोसनियन मुस्लिमांचा प्रश्न १९९४ नंतर जगाच्या पटलावर आला. पूर्वतिमूर चा वेगळेपणा २००२ च्या आसपास जाणवू लागला आला. तर लिबिया आणि तुनिशिया यांतल्या समस्या २०११ नंतर भेडसावू लागल्या. गोळवलकरांनी त्यांच्या हयातीत केलेली भाकितं वीस-पस्तीस वर्षांनंतर दृग्गोचर होतात, याचा अर्थ हा माणूस द्रष्टा आहे. आता, द्रष्ट्याचं लेखन वाचायचं झालं तर रत्नपारखी हवा ना? गाजरपारखी असून कसं चालेल? गोळवलकरांची लायकी काढण्याआधी प्रत्येकाने आपापली लायकी तपासून पहावी. बस इतकंच. शम्स-उल-इस्लाम हे समजदार गृहस्थ असावेत. समझनेवालेको इशारा काफी है. -गामा पैलवान


Bhagyashree Bhagwat

Mon , 02 October 2017

Apratim!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......