बाबा शेवटपर्यंत स्वत:ला ‘विद्यार्थी’च मानत
कला-संस्कृती - चित्रनामा
रेणुका विठोबा पांचाळ
  • छायाचित्रकार, शिल्पकार, चित्रकार विठोबा पांचाळ
  • Sat , 30 September 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चित्रनामा विठोबा पांचाळ Vithoba Panchal महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

शिल्पकार, प्रकाशचित्रकार आणि चित्रकार विठोबा पांचाळ म्हणजे माझे बाबा! त्यांनी अकस्मात या इहलोकाचा घेतलेला निरोप या क्षणीसुद्धा एक वाईट स्वप्नच वाटतं. अस्वस्थता कणाकणानं वाढू लागताच मन डिफेन्स मॅकेनिझमचा वापर करून बाबांनी घेतलेला निरोप हा स्वप्नवत आहे, अशी वेडी आशा निर्माण करतं. त्यांचं असं अचानक निघून जाणं आजही मन स्वीकारत नाही. ‘जीवन ही एक कला आहे’ या तत्त्वावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या किंबहुना ‘कला मानवी जीवनाचा गाभा आहे’ असं मानणाऱ्या बाबांनी त्यांचं जीवन कलेसाठीच वाहिलं. कला हाच त्यांचा जीवनानंद आणि ध्यास होता. या कलेची जोपासना त्यांनी बालपणापासूनच केली. वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी ऑईल कलर, वॉटर कलर, पेन्सिल, चारकोल यांसारख्या माध्यमांतून आपल्या कलेचा आविष्कार केला. तेव्हापासून त्यांचा कुंचला अथकपणे, सर्जनात्मकतेनं कॅनव्हॉसवर रंगांची उधळण करत राहिला.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात त्यांचं प्राथमिक व त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण झालं. गावच्या घरी आजी, अण्णा (आजोबा), तीन बहिणी व दोन भाऊ असा परिवार होता. कौटुंबिक वातावरण कलापूर्ण होतं. जातीनं सुतार असल्यानं कला सर्वांच्याच हाडामांसात मुरलेली होती. अण्णा सुतारकाम तर उत्कृष्ट करायचेच, पण त्याचबरोबर पेटीही उत्तम वाजवायचे. अण्णांचे मौलिक संस्कार बाबांवर झाले. गरिबी असली तरी घरात कलेच्या वास्तव्यानं समाधान होतं. संगीत, साहित्य, संतवाङ्मय या सर्व गोष्टींनी गजबजलेल्या लांजाच्या दोन खोल्यांच्या घरात बाबांची कला बहरली. अण्णा-आजीच्या संस्कारांनी त्यांच्या कलावृक्षास खतपाणी मि‌ळत होतं. म्हणून बाबा अगदी शेवटपर्यंत अण्णांविषयी भरभरून सांगायचे. अण्णांविषयीची कृतज्ञता आणि आदर त्यांच्या बोलण्यातून कित्येकदा स्पष्ट व्हायचा.

शालेय शिक्षण सुरू असतानाच बाबांनी साहित्यिक वाचन सुरू केलं. अभ्यासातही त्यांना मराठी आणि संस्कृत या भाषाविषयांची अधिक गोडी होती. त्यांना लाभलेल्या शिक्षकांच्या प्रभावामुळे त्यांचं भाषेवर प्रभुत्व निर्माण झालं, हे ते वेळोवेळी कबुल करत.

प्राथमिक शिक्षणानंतर सातवीच्या पीएससीच्या परीक्षेत बाबा तालुक्यात पहिले आले. जुनी अकरावी एसएससी झाल्यावर त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती. पण त्याच काळात आजीचं निधन झालं. आणि परिस्थितीच्या ओझ्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. महाविद्यालयात शिकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं याची खंत त्यांच्या बोलण्यात कायम असायची. क्रमिक शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शिक्षणातून तसंच अनुभवातून येणाऱ्या ज्ञानावर त्यांचा जास्तीत जास्त भर असायचा. कॉलेजमधील वातावरण, मित्रांचा सहवास, प्राध्यापकांशी चर्चा, ग्रंथालयातील अभ्यास यांच्या सर्वंकष परिपाकातून व्यक्तिमत्त्वाला एक धार चढते, चमक येते असं ते म्हणायचे. म्हणूनच आम्हा भावडांना त्यांनी आपलं शिक्षण व विषय निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. मी एम.ए. इन क्लिनिकल सायकॉलॉजी केल्यावर संस्कृतमध्ये एम.ए. करताना माझे विषय जाणून घेण्यात त्यांचा उत्साह दांडगा होता. नवनव्या विषयांची ओळख करून घेण्याची त्यांची जिज्ञासा अखेरपर्यंत तरुण होती.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ओणी व कोल्हापूर येथील शाळांमध्ये शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. चित्रकला व मराठी हे त्यांचे अध्यापनाचे विषय होते. एखादा कठीण विषय सोपा करून शिकवण्यात बाबांची हातोटी होती. ‘कठीणातला कठीण विषयसुद्धा सोपा करून सांगणं ही कला आहे’, हे त्यांचे शब्द त्यांच्यातल्या कलाकाराची आणि कुशल अध्यापकाची साक्ष देतात.

१९७० साली मुंबईत आल्यावर त्यांच्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशमूर्तींच्या माध्यमातून त्यांनी शिल्पकलेकडे वाटचाल केली. खरं तर शाळेत असल्यापासूनच बाबा गणपतीच्या मूर्ती बनवत. परंतु मुंबईत आल्यावर १९७५ ते १९७८ या काळात ससून डॉक, कुलाबा, तेली गल्ली (अंधेरी) यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणी सहा ते बारा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती त्यांनी बनवल्या. तसंच मुंबईतील एल. राजाराम आर्ट स्टुडिओमध्ये त्यांनी कमर्शिअल आणि फिगर आर्टिस्ट म्हणून काम केलं. याच कालखंडात ए.ए. आलमेलकर, रझा यांसारख्या चित्रकारांच्या भेटी व ओळखी प्रदर्शनांच्या माध्यमातून झाल्या.

जर्मन रेमेडिज या औषधाच्या कंपनीमध्ये त्यांनी मशीन ऑपरेटर या पदावर २५ वर्षं नोकरी करत आपलं कलाविश्वही सांभाळलं. नोकरी सांभाळून चित्र, शिल्प, फोटोग्राफी, काव्य आणि लेखन यांचा प्रतिभामय झरा अविश्रांतपणे वाहत होता.

सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नोकरी केल्यावर शनिवार-रविवार रेखाटनं करत बसणं हा त्यांचा नेहमीचा विरंगुळा किंवा मग वाचन करायचं, नाहीतर शास्त्रीय संगीत ऐकण्यात रममाण व्हायचं. पण स्वत:ला सतत कामात गुंतवून ठेवणं हे त्यांचं तत्त्व होतं.

अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त, निरनिराळे काव्य अलंकार यांचा दांडगा अभ्यास त्यांच्या लेखनशैलीतून सतत डोकावतो. शार्दूलविक्रिडित, पृथ्वी, शिखरिणी, भुजंगप्रयात यांसारख्या निरनिराळ्या गेयवृत्तांमध्ये बाबा लालित्यमय पद्यरचना करायचे. त्यांची भाषाशैली ओघवती आणि प्रभावी होती. शिल्प, चित्र आणि प्रकाशचित्र यांच्याबरोबरच त्यांचा वाङ्मयीन ठेवाही अमूल्य आहे. ‘फोटोग्राफी - यंत्र आणि तंत्र’ हे पुस्तक १९९७ साली लोकवाङ्मय गृहानं प्रकाशित केलं. पुढे या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या. तसंच ‘युगान्तर’ साप्ताहिकासाठी ते ‘कॅमेरा आणि कलम’ हे सदर दीर्घकाळ लिहीत होते. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारानं सन्मानित साहित्यिकांचं फोटोसेशन करताना आलेले अनुभव या सदरातून त्यांनी शब्दबद्ध केले. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या ‘ऐसी अक्षरे रसिके’ या कार्यक्रमात त्यांनी आपल्या ललितबंधांचंही सादरीकरण केलं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, प्रहार यांसारख्या वृत्तपत्रांतून त्यांचं लिखाण व पद्यरचना प्रसिद्ध झाल्या. अलंकारिक भाषाशैली असूनही बाबांच्या लिखाणात कधीही शब्दावडंबर नव्हतं. लेखन नेहमी सुगम व सुबोध असावं, त्यातून दुर्बोधता निर्माण होऊ नये यासाठी ते कायम दक्ष असत.

विठोबा पांचाळ आणि त्यांची मुलगी रेणुका पांचाळ

त्यांच्या या भाषा व साहित्यप्रेमामुळेच त्यांनी मला व माझ्या दादाला (ऋषिकेश) लहानपणापासून वाचनाची गोडी लावली. कथा, कादंबऱ्या, कलापुस्तकं यांपासून ते विश्वकोश, शब्दकोश, ज्ञानेश्वरी व इतर संतवाङ्मयाची पुस्तकं आमच्या घराचा अविभाज्य भाग बनली. ‘रेणू, आपल्या घरात माणसांपेक्षा पुस्तकांचीच गर्दी जास्त आहे’ असं बाबा थट्टेनं नेहमी म्हणायचे. कालांतरानं दादा व मी लेखन व कविता करायला लागलो. तेव्हा आमच्या लेखनाचे प्रथम वाचक बाबाच असायचे. दादा किंवा मी काहीही नवीन लिहिलं की, हॉलमध्ये मैफल जमायची आणि त्याचं सादरीकरण व्हायचं. बाबांनी एकदा का आमच्या लेखनाला ग्रीन सिग्नल दिला की, आम्ही समाधानी होत असू.

बाबा रसिक श्रोता होते. त्यांच्यातील या श्रोत्यामुळेच आम्हा मुलांच्या लेखनाला गती मिळाली. माझ्या कविता असोत, आकाशवाणीसाठी लिहिलेले लेख असोत, एवढंच काय महाविद्यालयात लिहिलेलं वेदवाङ्मय आणि संस्कृत साहित्यावर लिहिलेले लेख असो, हे सर्व काही मी बाबांना ऐकवत असे. त्यांच्या मृत्यूच्या साधारण एक तासापूर्वी मी एक कविता लिहिली होती आणि उद्या बाबांना वाचून दाखवेन असा विचार करून झोपले होते. पण ती कविता आता त्यांना कधीच ऐकवता येणार नाही. बाबांमधील हाडाचा लेखक आणि रसिक श्रोता आम्हाला आता कायमच खुणावत राहील आणि यापुढील लिखाण नव्या जोमानं करण्यासाठी प्रेरणा देत राहील.

दरम्यान बाबांचा मित्रपरिवार समृद्ध होत गेला. याच जीवाभावाच्या मित्रांमुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांची कला प्रसिद्धीची वाट चालू लागली. लोकवाङ्मय गृहाचे प्रकाश विश्वासराव, राजन बावडेकर, सतीश काळसेकर, चित्रकार नीतीन दादरावाला यांसारखे अनेक मित्र बाबांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनले. त्यांच्यासोबत घालवले क्षण न क्षण आणि त्यांच्या आठवणी बाबांच्या तोंडून आम्ही कित्येक वेळा ऐकत असू.

मधल्या कालखंडात म्हणजेच १९७८-९३मध्ये त्यांनी सीडको कंपनीच्या आर्किटेक्चरल फोटोग्राफीचं काम प्रकाश विश्वासराव यांच्याबरोबर केलं. लोकवाङ्मय गृहाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या मित्रांच्या सहकार्यानं बाबांनी १९९५-२००४ अशी नऊ वर्षं महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या साहित्यिक व समाजसेवकांचं फोटोसेशन केलं. हा कालखंड बाबांच्या आयुष्यातील गोल्डन पिरिअड म्हणायला हवा. मालतीबाई बेडेकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे, प्रकाश आमटे, विजय तेंडुलकर यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे चेहरे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची संधी बाबांना मि‌ळाली. मुख्य म्हणजे उपलब्ध प्रकाशात फोटोग्राफी करणं हा त्यांचा अट्टाहास असायचा. कृत्रिम प्रकाशाचा वापर करणं ते हेतुपुरस्सर टाळायचे. व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व हुबेहूब आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यावर त्यांचा भर असायचा. आणि म्हणूनच विशिष्ट पोज अथवा हास्य कृत्रिमरीत्या करवून घेण्यापेक्षा थेट त्या व्यक्तीशी बोलता बोलता बाबा त्यांची छबी कॅमेऱ्यात बंदिस्त करायचे. त्या निमित्ताने आलेले अनुभव, किस्से आणि आठवणी उत्साहात सांगताना जणू काही त्या क्षणी ते सर्व अनुभवत आहेत असं वाटायचं. विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर यांच्याबरोबर अनुभवलेले क्षण सांगताना बाबांच्या डोळ्यांच्या कडा कधी पाणावून जायच्या ते त्यांनाही कळायचं नाही.

शालेय मराठीच्या पाठ्यपुस्तकात विंदा, पाडगावकरांच्या कविता किंवा बाबा भांड, मारुती चितमपल्ली, प्रेमानंद गज्वी यांचे धडे असायचे. त्यावेळी मित्रमैत्रिणींबरोबर किंवा शिक्षकांसमोर ‘माझ्या बाबांनी यांचे फोटो काढलेत हं’ असं सांगताना खूप अभिमान वाटायचा.

विजय तेंडुलकरांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की, ‘माझ्या मृत्यूनंतर फक्त पांचाळ यांनी काढलेलीच छायाचित्रं प्रसिद्ध करावीत.’ केवढी मोठी पावती आहे ही! बाबांच्या कलेचं आणि दिलखुलास स्वभावाचं तेंडुलकरांना खूप कौतुक होतं. त्यांचं प्रेम आणि प्रोत्साहन बाबांना कायम मिळालं.

२००२ साली जर्मन रेमेडिज ही कंपनी बंद झाली आणि त्यानंतर बाबांनी पूर्णवेळ शिल्पकला, चित्रकला आणि फोटोग्राफी यांना वाहून घेण्याचा निर्णय घेतला. पुढच्या वर्षी लगेचच बाबांना प.पू. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या साडेसहा फूट उंच पुतळ्याचं काम मिळालं. ब्राँझमधील हा पुतळा बीड जिल्ह्यातील पूर्णवादी को-ऑपरेटिव्ह बँकेत बसवण्यात आला. व्यावसायिक दृष्टीनं बाबांचं हे पहिलं मोठं काम.

त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी म्हणजे २००४ साली बाबांनी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचा नऊ फूट उंच पूर्णाकृती पुतळाही ब्राँझमध्ये केला. या पुतळ्याच्या कामानिमित्तानं बरीच थोर मंडळी आमच्या घरी येऊन गेली. हा पुतळा घराच्या गच्चीत बनवला गेला. त्यामुळे घरातील सर्वच जण या कामात गुंतले होते. मी त्या वेळी सहावीला असल्यामुळे माझ्याकडून फारसी मदत झाली नाही. पण आई, दादा आणि माझी मोठी आत्या यांनी बाबांना पुष्कळ मदत केली. आई-आत्या तर घरातली कामं सांभाळून पुतळ्यासाठी माती मळून द्यायच्या किंवा बाबांना लागतील ती साधनं, कोरण्या देण्यासाठी सतत त्यांच्याबरोबर थांबायच्या. दादा त्या वेळी रहेजा स्कूल ऑफ आर्टसमधून कमर्शिअल आर्टस शिकत होता. त्यानंही आपली फोटोग्राफी आणि इतर व्याप सांभाळून बाबांना मदत केली. मी लहान असल्यानं बाबांबरोबर गप्पा मारत, शाळेतल्या गमतीजमती सांगत तिथं बसायचे.

पुतळा करत असताना कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं, किशोरी अमोणकर आणि उस्ताद आमीर खाँ यांच्या चिजा दिवसभर लावलेल्या असत. त्यावेळी कॅसेटच्या साइड बदलण्याचं काम बाबांनी माझ्यावर सोपवलं होतं. मी ते मोठ्या उत्साहात करायचे. त्याचबरोबर इंडियन ओशियन यांची Kandisa  नावाची कॅसेटसुद्धा बाबा लावायला सांगत. आजही पं. कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं कानावर पडताच तो काळ आठवतो.

गच्चीत जाऊन कॉ. डांगेंच्या पुतळा पाहताना तो पुतळा नसून घरातला सदस्यच वाटायचा.

त्यावेळची आणखी एक महत्त्वाची आठवण म्हणजे विजय तेंडुलकरांनी स्वत:हून कॉ. डांगे यांचा पुतळा पाहण्यासाठी घरी येण्याची इच्छा व्यक्ती केली होती. त्याच काळात तेंडुलकरांची बायपास सर्जरी झालेली असल्यानं डॉक्टरांनी त्यांना जिना चढण्यास मनाई केली होती. आणि आमचं घर चौथ्या मजल्यावर होतं. तरीही ते विश्रांती घेत घेत पुतळा पाहण्यासाठी जिना चढून घरी आले आणि पुतळा पाहून प्रचंड खूश झाले.

लोकवाङ्मय गृहातील मित्रपरिवार बाबांना ‘लिओनार्दो’ म्हणायचा. मागच्याच आठवड्यातील ‘युगान्तर’ साप्ताहिकाच्या अंकात लोकवाङ्मय गृहाचे राजन बावडेकर यांनी बाबांवर लिहिलेल्या लेखातही तसा उल्लेखही केला आहे.

“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील. पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल”, हे पु.ल.देशपांडे म्हणणं बाबांचं जीवनतत्त्व होतं. शेवटपर्यंत त्यांनी ते पाळलं. कर्मयोगावर त्यांची श्रद्धा होती. आम्हालाही लहानपणापासून त्यांनी नीतिमत्ता आणि कर्म यांवरच भर देण्यास सांगितलं. ‘विचार आणि नीती उच्च असेल तर तुम्ही नक्की समाधानी व्हाल’ असं ते नेहमी म्हणायचे. त्यांची परमेश्वरावर श्रद्धा होती. मात्र बाबांनी त्या श्रद्धेवर अंधश्रद्धेचा झाकोळ कधीही पसरू दिला नाही.

२००७ साली बाबांनी अभिनव फोटोग्राफिक अॅकेडमी या नावानं स्वतंत्र संस्था सुरू केली. या अॅकेडमीचं उदघाटन विजय तेंडुलकरांनी केलं. भालचंद्र नेमाडे, वसंत आबाजी डहाके, मिलिंद गुणाजी इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या अॅकेडमीतून सुमारे दोनशे विद्यार्थी शिकून गेले.

बाबांनी एक पती, बाप आणि कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची कर्तव्यं, जबाबदाऱ्या अगदी मनापासून पार पाडल्या. आणि त्यासोबत स्वत:चं कलाविश्वही फुलवलं.

बाबा सुतारकामही उत्तम करायचे. घरातल्या फर्निचरचा बराचसा भाग बाबांनी स्वत: केला होता. बाबांना पेटी वाजवण्याचीही खूप आवड होती. ते ती वाजवायचेही चांगली.

केशवसुत स्मारकात विठोबा पांचाळ यांनी केलेलं ‘तुतारी’चं शिल्प. डावीकडून पांचाळ, कर्णिक, महेश केळुस्कर इ.

फेब्रुवारी २०१७मध्ये मालगुंडच्या केशवसुत स्मारकात केलेलं ‘तुतारी’चं शिल्प पाहायला कोमसापचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक आले होते. त्यावेळी बाबांनी ‘यापुढेही मला भरपूर काम करण्याची इच्छा आहे’ असं सांगून त्यांच्यातला कामाचा उत्साह दाखवून दिला होता. अनेक पुरस्कार आणि प्रसिद्धी मिळूनही बाबा शेवटपर्यंत स्वत:ला विद्यार्थीच मानत.

मी बाबांमुळे एक मुलगी म्हणून खूप चांगल्या स्मृतींशी जोडली गेली आहे. त्यांच्यासोबत केलेल्या साहित्य व कला यांविषयीच्या चर्चा, उ. झाकीर हुसेन इत्यादींच्या त्यांच्यासोबत ऐकलेल्या मैफली, त्यांच्यासोबत पाहिलेली चित्रप्रदर्शनं, नाटकं, त्यांच्या रेखाटनासाठी मॉडेल म्हणून बसताना घालवलेले क्षण आणि त्यांच्या आठवणी… किती सांगावं अन किती नाही!

त्यांच्या अचानक निघून जाण्यानं ज्या ज्या वेळी निष्क्रिय हतबलता येते, त्या वेळी ‘स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली’ या सुरेश भटांच्या ओळींचे स्वर पेटीवर लीलया गोंजारणारे बाबा मला दिसतात. आणि जणू काही जाता जातासुद्धा मला माझ्या जीवनगीताची अर्थपूर्ण ओळ सुचवून जात आहेत असं वाटतं. मग माझं मन पुन्हा उभारी घेतं…

लेखिका रेणुका विठोबा पांचाळ या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......