रॉबी डिसिल्वा – धुनमस्त कलाकार, कालातीत आदर्श
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
निनाद खारकर
  • ‘रॉबी डिसिल्वा : एका मनस्वी कलाकाराचा प्रवास’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि रॉबी डिसिल्वा
  • Fri , 22 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो रॉबी डिसिल्वा Roby D'Silva वीणा गवाणकर राजहंस प्रकाशन

बीएमएमला (Bachelors of mass media) असताना आम्हाला शेवटच्या वर्षी जाहिरातकला किंवा पत्रकारिता असे दोन स्पेशलायझेशनसाठी विषय होते. २००६च्या सुमारास मराठी वाहिन्या नुकत्याच भरात येत होत्या. निखिल वागळे यांचा ‘आजचा सवाल’सारखे शो मी बघायला सुरुवात केली होती. पत्रकारिता हे क्षेत्र मला आवडायला लागलेलं होतं. माझं वर्तमानपत्रांचं वाचन आणि वाहिन्यांवरच्या डिबेट शो वगैरेची आवड बघून बरेच जण ‘पत्रकारिता घे’ असं मला सांगत होते. मी तेव्हा विचार केला – ‘पत्रकारितेबद्दल बरंचसं समजलं आहे. मग परत ते शिकून काय उपयोग? म्हणून जाहिरातकला हा विषय घेऊ.’ अर्थात तो विचार उथळ होता.

जाहिरातकला हा तुलनेनं माझ्यासाठी नवीन असलेला विषय घेतल्यावर त्यातल्या मोठ्या व्यक्तींची माहिती घेणं सुरू झालं. अलेक पदमसी यांचं ‘A Double Life : My Exciting Years in Theater and Advertising’, पियुष पांडे यांचं ‘Pandeymonium : Piyush Pandey On Advertising’ ही नुकतीच आलेली पुस्तकं वाचून झाली होती.

मात्र हे सगळं करूनसुद्धा जाहिरातकला या क्षेत्रातली प्रेरणादायी व्यक्ती सापडत नव्हती.

मराठीतल्या ज्येष्ठ चरित्रकार वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं ‘रॉबी डिसिल्वा : एका मनस्वी कलाकाराचा प्रवास’ हे पुस्तक वाचलं आणि जाहिरातकला या क्षेत्रात प्रचंड मुशाफिरी केलेली धुनमस्त व्यक्ती सापडली! विशेष म्हणजे ती मराठी मातीतली निघावी हा काय योगायोग!

वसईचा साधा मुलगा ते जागतिक दर्जाचा ग्राफिक डिझायनर, त्यांना मिळालेले सन्मान आणि तरीही अत्यंत साधेपणानं जगत असलेलं आयुष्य या त्यांच्या प्रवासावर विश्वासच बसत नाही.

मुंबईच्या एका कोपऱ्यात, वसईच्या `पोपसाव’ या धर्मांतरितांसाठी चर्चनं केलेल्या वस्तीत रॉबी डिसिल्वा यांचा जन्म झाला. रॉबी लहान असतानाच त्यांची आई गेली, वडिलांनी दुसरं लग्न करून छोट्या रॉबीला आई आणली. सावत्र आईनंदेखील रॉबी यांच्यावर मनापासून प्रेम केलं. घरची प्रचंड गरिबी, लोकांच्या बागांमध्ये केलेलं काम, गोधडी शिवण्यासारखी कामं यांमुळे रॉबी यांची प्रकृती कृश झाली, ती कायमची.

रॉबी यांनी शिकण्यासाठी जे कष्ट घेतले, त्याची तुलना आंबेडकरांनी परदेशात शिकण्यासाठी जेवढं रक्त आटलं त्याच्याशीच होऊ शकते!

रॉबी मेहनतीनं मॅट्रिक झाले. बोरिवलीच्या रेशनिंग ऑफिसमध्ये कामाला लागले. नंतर त्यांना जे. जे. स्कूल नावाचं कलाशिक्षण देणारं कॉलेज असतं असा पत्ता लागला. पूर्ण वेळ शिक्षण शक्य नव्हतं म्हणून अर्धवेळ शिक्षणाचा मार्ग पत्करला. आपल्या अंगभूत चिकाटी आणि मेहनतीनं अर्धवेळ शिक्षण घेऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. हे करताना नोकरी सांभाळून रॉबी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत होते आणि विशेष प्रावीण्य मिळवत होते. नंतर प्रचंड धडपड करून, अनेक ठिकाणांहून नकारघंटा ऐकून अखेर रॉबींनी लंडनला शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली.

१९५० पासून लंडनमध्ये जॉर्ज बेली, पोल पीच, पीटर वाईल्डबरसारखे अनेक नामवंत ग्राफिक डिझायनर कार्यरत होते. कॉर्पोरेट डिझाइनसारखं क्षेत्र नव्यानं उमलत होतं. एखाद्या कंपनीच्या, उत्पादनाच्या सेवेच्या प्रतिमानिर्मितीचं काम म्हणजे कॉर्पोरेट डिझाइन. त्यासाठी फक्त कला असून चालत नाही, तर कशासाठी काम करतोय त्या व्यवसायाचीसुद्धा सखोल जाण असावी लागते. संदर्भ ग्रंथ वापरून रॉबी त्या त्या विषयाच्या खोलात शिरत. जागतिक कीर्तीचा बिआट्रिस वार्ड नावाचा टायपोग्राफर असलेल्या मोनोटाईप कार्पोरेशन या टायपोग्राफीच्या मक्केत रॉबी सहज आणि हक्काची सफर करून यायचे. इटलीमधील 'स्टुडियो बोजेरी' हा आर्ट स्टुडिओ असू दे किंवा वॉल्टर थेम्पसनसारखी अमेरिकन जाहिरात कंपनी रॉबी त्यांच्यामध्ये काम करून आपला ठसा सोडायला विसरले नाहीत.

केलोग्ससारख्या कंपन्यांसाठी पॅकेजिंग डिझाइन, कॅडबरीसाठी दिवाळी पॅकेजिंग, आदिवासी साप्ताहिकासाठी लोगो, ब्रिटिश चीज ब्यूरोसाठी जाहिराती, बॅचलर सिगरेटसाठी पॅकेजिंग व जाहिरात आणि स्मार्तीज गोळ्यांसाठी त्याच गोळ्या वापरून केलेली जाहिरात असे अनेक कलाप्रकार रॉबींच्या नावावर आहेत. 

काही काळानं रॉबी भारतात परत आले. अर्थात परतीचा प्रवाससुद्धा सोपा नव्हता. पहिल्या जगातून ६०-७०च्या दशकात तिसऱ्या जगात रॉबी शिरले. गुळगुळीत रस्त्यावरून अगदी खडकाळ आणि ओबडधोबड रस्त्यावर आले.

वसईत आल्यावरसुद्धा आपल्या मातीला रॉबी विसरले नाहीत. आपल्या गावातल्या मुलांना आपण कष्ट करून मिळवलेली कला शिकता यावी म्हणून रॉबी डिसिल्वा महाविद्यालयाच्या स्थापनेत झोकून देऊन काम केलं. अनेकांना भेटले, सरकारी रसद मिळवली. अनेक ठिकाणी भाषणं दिली. अर्थात त्यांना सरकारी बाबूगिरी, लालफितीचा कारभार यांचा सामना करावा लागला. पण शेवटी त्यात ते यशस्वी झालेच.

वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या शेवटच्या चार पानांमध्ये रॉबींना मिळालेले पुरस्कार, पदव्या, त्यांनी मानद सदस्य म्हणून काम केलेल्या संस्था, त्यांच्या नावावर असलेली डिझाइन्स यांची माहिती दिली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान, कित्येकदा पौर्वात्य म्हणून पहिल्यांदाच मिळालेले पुरस्कारही त्यात आहेत.

वीणा गवाणकर यांना रॉबी अपघातानं वसईच्या स्टेट बँकेत भेटले आणि स्वतःहून आपली ओळख करून दिली. रॉबींचा थोडा थांगपत्ता लागल्यावर वीणाताईंनी त्यांच्यावर लिहायचा चंगच बांधला. जाहिरातकला क्षेत्रातली दिग्गज माणसं हाताशी धरून, मितभाषी रॉबींना बोलतं करून हे पुस्तक साकार झालं आहे.

चार-दोन पुरस्कार मिळवून पुढेपुढे करणाऱ्या चमकेश लोकांना प्रसारमाध्यमं आणि लोकमान्यता नेहमीच वश होतात. बोलघेवडेपणा केला की प्रसिद्धीचा झोत अशा व्यक्तींवर सहज झेपावतो. या सगळ्या झगमगाटापासून लांब राहून कला आणि मातीशी इमान राखून कीर्तीची नवनवीन शिखरं पार करणारे रॉबी यांच्यासारखे कलाकार शोधून काढायला सिद्धहस्त लेखकच पाहिजे. गवाणकर यांनी ते काम उत्तम पार पाडलं आहे. सोशल मीडियावर पैसे भरून व्हेरिफाइड अकाउंट मिळवून सेलिब्रिटी होण्याच्या काळात रॉबी यांच्यासारखी धुनमस्त माणसं लोकांसमोर यायला हवीत. लोकांना त्यांचे कालातीत आदर्श निवडायला मदत होईल.

.............................................................................................................................................

रॉबी डिसिल्वा : एका मनस्वी कलाकाराचा प्रवास - वीणा गवाणकर

राजहंस प्रकाशन, पुणे,

पाने -१८०, मूल्य - २०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3461

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......