‘लक्ष्य’ : एका आत्मशोधाचा प्रवास 
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • ‘लक्ष्य’ची दोन पोस्टर्स
  • Sat , 16 September 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar लक्ष्य Lakshya

साल १९९९. कारगील युद्ध ऐन भरात होतं. बरेचसे बॉलिवुडचे कलाकार आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवायला आघाडीवर जात होते. नाना पाटेकरसारखा हाडाचा कलावंत तर शॉर्ट सर्व्हिस कमिशन घेऊन प्रत्यक्ष सैन्यातच सामील होऊन लढाईत उतरला होता. आघाडीला भेट देणाऱ्या या कलावंतांमध्ये होते नामवंत चित्रपटलेखक आणि कवी जावेद अख्तर. त्यांची या दरम्यान अनेक लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान जावेदसाब यांना अनेक धक्कादायक गोष्टी कळाल्या. सैन्यात येण्यासाठी अर्ज करणाऱ्यांपैकी बहुतांश तरुण हे एकतर अतिशय आर्थिकदृष्ट्या वाईट परिस्थितीमधून आलेले आणि कुपोषित असतात. त्यामुळे लष्करात प्रवेश करण्यासाठी ते अनफिट असतात. शंभर कोटींच्या या देशात लष्कराच्या तिन्ही दलांना ऑफिसर्सची कमतरता भेडसावत आहे, हे ऐकून जावेदसाबना धक्का बसला. मध्यमवर्गीय आणि उच्च आर्थिक स्तरातून आलेल्या  तरुणांना लष्करात का जावंसं वाटत नाही, हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. एक कलाकार म्हणून आपण या प्रश्नासाठी काय करू शकतो या दृष्टीनं त्यांचं विचारमंथन सुरु झालं. ते ज्या लष्करी अधिकाऱ्यांना भेटले होते, त्यांनी जावेदसाबनी यासंदर्भात काहीतरी चित्रपटाच्या माध्यमातून करावं असा आग्रह केला.

'लक्ष्य'च्या निर्मितीचं बीज याच वेळेस जावेदसाबच्या डोक्यात रोवलं गेलं. खरं तर चित्रपटलेखनापासून ब्रेक घेऊन त्यांना तब्बल पंधरा वर्षं झाली होती. पण त्यांनी अनेक वर्षं रिसर्च करून या विषयावर एक पटकथा लिहिली. एका श्रीमंत घराण्यातल्या आणि आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे, याबद्दल मनात गोंधळ असणाऱ्या तरुणाच्या आत्मशोधाच्या प्रवासाची ही गोष्ट होती. दिग्दर्शक म्हणून दुसऱ्याकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. दिग्दर्शक घरातलाच होता. फरहान अख्तर. 'दिल चाहता है' या आपल्या पहिल्या चित्रपटातून त्यानं तरुणाईच्या नाडीलाच हात घातला होता. दिग्दर्शक म्हणून तो गुणवत्तावान होताच, पण फरहान दिग्दर्शक म्हणून या पटकथेला न्याय देऊ शकेल, असं जावेदसाबना वाटण्याचं अजून एक कारण होतं.

कथेतल्या करण शेरगील या नायकाप्रमाणेच फरहानही त्याच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर 'क्ल्युलेस' होता. ग्रॅज्युएशन झाल्यावर आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचं आहे, हेच त्याला कळत नव्हतं. या स्टेजपासून ते दिग्दर्शक बनण्यापर्यंतचा प्रवास करताना फरहान स्वतःविषयी असणाऱ्या शंका, अपयश यांना सामोर गेला होता. त्यामुळे करण शेरगीलची कथा पडद्यावर दाखवायला फरहान आदर्श दिग्दर्शक होता. 

मग प्रश्न उभा राहिला की, करण शेरगीलची मुख्य भूमिका कोण करणार? 'दिल चाहता है'नंतर आमीर खानसोबत फरहानचं चांगलं ट्युनिंग जमलं होतं. त्यानं या भूमिकेसाठी आमीरला विचारणा केली. आमिरला कथानक खूप आवडलं. पण तो त्यावेळेस केतन मेहताच्या 'मंगल पांडे : द राइजिंग' या चित्रपटात गुंतला होता. त्याला 'लक्ष्य'साठी तारखा देणं जमत नव्हतं. मग हृतिक रोशनचं नाव आलं. हृतिक हा झोया आणि फरहान या बहीण-भावंडांचा लहानपणापासूनचा मित्र. 'दिल चाहता है'साठी फरहाननं हृतिकला विचारणा केली होती. पण त्यावेळेस तो योग जुळून आला नव्हता.

ज्यावेळेस 'लक्ष्य' साइन केला, त्यावेळेस हृतिकचं करियर काही फारसं बरं चाललं नव्हतं. 'कहो ना प्यार है'मधून एक आदर्श डेब्यू केल्यानंतर त्याला एकही हिट चित्रपट देता आला नव्हता. त्याचे अनेक बिग बजेट चित्रपट साफ आपटले होते. प्रामाणिकपणे बोलायचं तर त्यातले एक-दोन अपवाद वगळता बाकीचे चित्रपट यथातथाच होते. 'कहो ना प्यार है'चं चालणं हा फ्ल्यूक होता, अशा चर्चा चालू झाल्या होत्या. हृतिकच्या अभिनयक्षमतेबद्दलही शंका घेतल्या जाऊ लागल्या होत्या. 'लक्ष्य'मधल्या करण शेरगिलच्या भूमिकेत हृतिकनं टीकाकारांना खोटं ठरवण्याची संधी हेरली आणि ती शंभर टक्के देऊन राबवलीसुद्धा. 

करण शेरगील. एका लौकिकार्थानं अतिशय यशस्वी घरातला ब्लॅक शीप. आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे, याची कल्पना त्याला नाही. शून्यातून विश्व उभं केलेल्या वडिलांच्या (बोमन इराणी) आणि स्वतःच्या बळावर अमेरिकेत सेटल झालेल्या भावाच्या छायेत करण झाकोळून गेला आहे. वडील त्याच्यात आणि भावात सतत करत असलेल्या तुलनेनं तो आक्रसून गेला आहे. मन मोकळं करता येतील अशा फार कमी जागा त्याला आहेत. एक म्हणजे त्याची आई आणि दुसरं म्हणजे रोमिला (प्रीती झिंटा ), त्याची प्रेयसी.

रोमिला आणि करण हे अपोझिट अट्रॅक्टसचं एकदम चपखल उदाहरण. करणच्या डोळ्यासमोर कुठलंही ध्येय नाही, सामाजिक जाणीव एकदम शून्य आणि आळशी स्वभाव. याउलट रोमिला उत्साहानं फसफसणारी, कुठल्याही आंदोलनामध्ये अग्रेसर असणारी आणि पत्रकार होण्याचं ध्येय बाळगून असणारी. उत्साही आणि आयुष्यात आपल्याला काय हवं याची स्पष्टता असणाऱ्या रोमिलाकडे बघून करणला न्यूनगंड येत असतो. आपण हिच्या लायक नाही असं त्याला आतून वाटत असतं. पण रोमिलाचा करणच्या चांगुलपणावर विश्वास असतो. रोमी त्याला सतत सांगत असते की, तुला तुझ्या आयुष्यातलं ध्येय एक दिवस नक्की सापडेल. एक दिवस आपल्या अलिशान बेडरूममध्ये नोकरानं हातात आणून दिलेला ज्युसचा ग्लास पिता पिता करणला टीव्हीवर एका सिनेमातल्या तुफान हाणामारी करणाऱ्या लष्करी वेषातल्या नायकाचं दर्शन होतं. मग काय? आपणही आता लष्करातच जायचं असं करण ठरवतो. लष्करी गणवेश, रुबाब यांच्या वरकरणी प्रेमात पडलेल्या करणला लष्कर काय असतं, लष्करी सेवा काय असते याची कणभरही माहिती नसते. एका लहरीमध्ये त्यानं हा निर्णय घेतलेला असतो. वडील तर करणची चेष्टाच करतात. मात्र रोमीला खूप आनंद होतो. करणला आपल्या आयुष्याचं ध्येय सापडलं याचा हा आनंद असतो.

करणची इंडियन मिलिटरी अॅकडेमीमध्ये निवड होते आणि तो लष्करी प्रशिक्षणासाठी डेहराडूनला रवाना होतो. तिथं प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यावर करणला लष्करी शिस्त काय असते, हे कळायला लागतं. रोज सकाळी उशिरापर्यंत लोळत पडण्याची सवय असणाऱ्या आणि हातात ज्युसचा ग्लास मिळाल्याशिवाय दिवसाची सुरुवात न करणाऱ्या करणला ही शिस्त झेपण्यासारखी नसते. सहाध्यायी ट्रेनिंगला गेल्यावरही लोळत पडणं, ट्रेनिंगमध्ये धड लक्ष न देणं, असे प्रकार करणकडून घडायला लागतात. पण ही लष्करी संस्था असते. घर नसतं. शिस्तभंग केला म्हणून करणला रोज शिक्षा व्हायला लागतात. आपल्या सोबतच्या मुलांसमोर रोज त्याला कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून, तर कधी प्रशिक्षकांकडून अपमानाला सामोरं जावं लागतं.

एके दिवशी झालेल्या अशाच मानखंडनेनंतर करण आपली हिंमत हरवून बसतो. तो सरळ पळ काढतो आणि चंबूगबाळ आवरून घरी परत येतो. वडील करणच्या आईला ऐकवतात, ‘बघ, मी म्हटलं होतं ना तुला? चार दिवसही हा टिकणार नाही तिथं म्हणून.’ करणच्या कानावर हे पडतं. आपल्या वडिलांचं आपल्यावर प्रेम असलं तरी त्यांच्या मनात आपल्याबद्दल सन्मान नाही याची चरचरीत डाग देणारी जाणीव त्याला होते. मग तो रोमीला भेटायला जातो. किमान रोमी तरी आपल्याला समजून घेईल अशी त्याला वेडी आशा असते. पण रोमीला करणचं संकटाला पाठ दाखवून येणं पटत नाही. "तुझ्यासारख्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढणाऱ्या माणसासोबत मी राहू शकत नाही," असं करणला निक्षून सांगून ती निघून जाते.

एकदम सुरू झालेल्या मुसळधार पावसात भिजत करण सुन्नपणे बसून राहतो. या सीनचं टेकिंग फरहाननं फार सुंदर घेतलं आहे. आपल्या जवळच्या लोकांच्या नजरेत उंच उठण्यासाठी आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या नजरेत उंच उठण्यासाठी करण पुन्हा अॅकडेमीत परत जाण्याचा निर्णय घेतो. अॅकडेमीमध्ये परत आलेला करण आमूलाग्र बदललेला असतो. अॅकडेमीचा कोर्स मोठ्या मेहनतीनं पूर्ण करतो. त्याच्या ट्रेनिंगचा भाग 'पायेगा जो लक्ष्य है तेरा' या गाण्याच्या पार्श्वभूमीवर दाखवला आहे. शंकर महादेवनचा खडा आवाज, जावेद अख्तर यांचे स्फूर्तिदायी शब्द आणि हृतिक रोशनच्या डोळ्यातली आग, यामुळे हे गाणं अनेकांच्या स्फूर्तिदायी गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायमच जाऊन बसलं आहे.

या गाण्यात केलेलं इंडियन मिलिटरी अॅकडेमीचं चित्रीकरण अतिशय सुंदर आहे. ते गाणं बघताना अनेकांना असं वाटत की, उठावं आणि आर्मीमध्ये सामील व्हावं. हा सिनेमा लिहिताना जावेदसाबचा उद्देशही तोच तर होता. ट्रेनिंग संपल्यानंतर दाखवलेला पदवीदानाचा सोहळाही असाच डोळ्याचं पारणं फेडतो. करणचे वडील तिथंही अनुपस्थित असतात. इतरांच्या मुलांसारखा आपला मुलगा एमबीए न करता बाहेरच्या देशात जायची स्वप्न बघत नाहीये, हे त्यांच्या अजूनही पचनी पडत नसतं.

ट्रेनिंगनंतर हृतिकचं पोस्टिंग होतं ते कारगिलमधल्या पंजाब रेजिमेंटमध्ये. ही रेजिमेंट कर्नल दामले (अमिताभ बच्चन) यांच्या कमांडखाली असते. पोस्टिंगच्या पहिल्याच दिवशी करणचं स्वागत करताना कर्नल दामले पंजाब रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आपल्या सहकाऱ्यांना सांगतात. बच्चनच्या धीरगंभीर आवाजात तो इतिहास ऐकणं ही एक ट्रीट आहे. करणचं आघाडीवर आगमन झाल्यानंतर काही दिवसांतच लढाईचा बिगुल वाजायला लागतो. पाकिस्तानी घुसखोर कारगिलमधल्या शिखरांवर ताबा मिळवतात. करणच्या तुकडीवर हे शिखर परत मिळवण्याची जबाबदारी कर्नल दामले टाकतात. पण घुसखोर पाकिस्तानी उंचीवर असल्याचा त्यांना रणनीतीच्या दृष्टीनं फायदा असतो. त्यामुळे त्यांच्या जोरदार माऱ्यासमोर आपल्या काही सहकाऱ्यांना डोळ्यासमोर प्राण गमावताना बघत करणच्या तुकडीला माघार घ्यावी लागते. पंजाब रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासाला तडा जातो.

प्रथितयश पत्रकार बनलेली रोमीही आघाडीवरची लढाई कव्हर करण्यासाठी तिथं आलेली असते. करण पुन्हा आपल्या अपयशानं दुखावला गेलेला असतो. तो आणि रोमी पुन्हा भेटतात. पुन्हा एकमेकांबद्दलच्या नाजूक भावना उफाळून येतात. मग करण आणि त्याची टीम एका अतिशय जोखमीच्या मार्गानं शिखरावर चढाई करण्याचा बेत आखते. प्रश्न रेजिमेंटच्या प्रतिष्ठेचा असतो, तितकाच देशाच्या संरक्षणाचा. करण ही जोखमीची मोहीम पार पाडून शिखरावर भारतीय तिरंगा कसा फडकावतो, हे पडद्यावर पाहण हा एक थरारक अनुभव आहे. 

प्रत्येक चांगल्या चित्रपटात काही असे चांगले प्रसंग असतात, जे चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. 'लक्ष्य'मध्येही असे प्रसंग आहेत. आपल्या समाजात वडील आणि मुलगा यांच्या नात्यात एक अवघडलेपणा असतो. पुरुषत्वाचे निकष पाळायचे असल्यानं दोघांनाही एकमेकांसमोर भावनांचं प्रदर्शन करता येत नाही. करण आणि त्याच्या वडिलांच्या नात्यातही हे अवघडलेपण दाखवलं आहे. त्यांच्यात एक प्रकारचा दुरावा आहे. पण लढाईच्या आदल्या दिवशी करण घरी फोन करतो. वडिलांना सांगतो की, ‘मी रोज आईशी बोलण्यासाठी फोन करतो. पण आज तुमच्याशी बोलण्यासाठीच फोन केला आहे.’ आणि वडील आणि मुलातली भिंत गळून पडते. दोघांमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच संवाद घडतो. हा सीन बोमन आणि हृतिकच्या नैसर्गिक अभिनयामुळे आपल्या आयुष्यातलाच एक प्रसंग वाटू शकतो.

अजून एक म्हणजे हॉस्पिटलच्या कँटीनमध्ये रोमी आपल्या कॅमेरामनसोबत युद्ध कसं वाईट असतं यासंदर्भात बोलत असते. तिथंच आपल्या जवळच्या मित्राला नुकताच पाकिस्तानी हल्ल्यात गमावलेला जवान बसलेला असतो. तो रोमीची त्वेषानं खरडपट्टी काढतो. युद्ध हे किती वाईट असतं आणि त्यासाठी काय किंमत चुकवावी लागते, हे एका जवानापेक्षा अधिक चांगलं कुणाला माहीत असणार? पण एका विवक्षित काळात स्वसंरक्षणासाठी युद्ध किती आवश्यक असतं, हे जेव्हा तो जवान आवेशात रोमीला सांगतो, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता.

जेव्हा करण पहिल्यांदा भारत-पाकिस्तान सीमारेषेवर जातो, तेव्हा त्याला आपण भारतीय आहोत म्हणजे नेमके कोण आहोत याची जाणीव होते. 

असे अनेक सुंदर प्रसंग चित्रपटात पुन्हा पुन्हा येत राहतात. पण सगळ्यात थरारक प्रसंग म्हणजे करण आणि त्याची टीम शिखर मागच्या बाजूनं चढून जातात तो प्रसंग. भारतात पहिल्यांदाच अठरा हजार फूट उंचीवर कॅमेरा लावून हा प्रसंग शूट केला होता. एका लाँग शॉटमध्ये करण आणि त्याचे साथीदार मुंग्यांसारखे दिसतात, तेव्हा त्या शिखराची भव्यता आकळून येते. कारगील युद्धात प्रत्यक्षातही भारतीय सैनिक हे शिखर चढून गेले होते, हे जेव्हा कळतं, तेव्हा आपण त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहू शकत नाही. 

या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी फार सुंदर आहे. जर्मन सिनेमॅटोग्राफर ख्रिस्टोफर पॉपनं 'लक्ष्य' अतिशय सुंदरपणे चित्रित आहे. दिल्लीमधल्या सुंदर लोकेशनपासून ते हिमालयातल्या शुभ्र शिखरांपर्यंत वैविध्य असणाऱ्या लोकेशन्स त्याने गरजेप्रमाणे शूट केल्या होत्या. इतक्या उंचीवर कॅमेरा इक्विपमेंट्स घेऊन जाणं आणि शूट करणं हे हिमालयाइतकंच आव्हान पॉप आणि त्याच्या टीमनं पेललं. बऱ्याचदा तापमान उणे सातपर्यंत जात असे आणि कॅमेरा क्रू आणि अभिनेते यांची तारांबळ उडत असे. ही नैसर्गिक आव्हानं पेलत चित्रपट वेळेवर पूर्ण करण्याचं आव्हान फरहाननं पेलून दाखवलं. 

या चित्रपटातल्या जवळपास नव्वद प्रसंगांमध्ये हृतिक आहे. त्याच्या स्वभावाच्या विपरीत करण शेरगील त्यानं खूप संवेदनशीलपणे साकारला आहे. हृतिकला एक अभिनेता म्हणून मानाचा दर्जा 'लक्ष्य’नं मिळवून दिला. जेव्हा जेव्हा हृतिकच्या कारकिर्दीचं मूल्यमापन होईल, तेव्हा तेव्हा त्यात 'लक्ष्य'चा उल्लेख नक्कीच होईल. गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं वाईट चित्रपट करणाऱ्या आणि नको त्या वादविवादात अडकलेल्या हृतिकला सध्या अजून एका 'लक्ष्य'ची नितांत गरज आहे, हे नक्की. अमिताभ बच्चन, प्रीती झिंटा, सुशांत सिंग, बोमन इराणी आणि बाकी कलाकारही त्यांच्या भूमिकांमध्ये शोभून दिसतात, पण 'लक्ष्य' हा हृतिकचाच चित्रपट आहे हे नक्की. 'पाकिस्तानी हमेशा पलट के आते है' असा सल्ला करणला देणारा ओम पुरी यांचा अनुभवी हवालदारही लक्षात राहण्याजोगा. 

आपल्या सिनेमाला देशभक्तीपर चित्रपटांची मोठी परंपरा आहे. जे. पी. दत्ता  (‘बॉर्डर’ फेम) आणि अनिल शर्मा (‘गदर’ फेम) यांनी अशा प्रकारचे चित्रपट बनवण्यात मास्टरी मिळवली आहे. दत्ता आणि शर्मा यांच्या चित्रपटातले नायक बेंबीच्या देठापासून ओरडून बोलतात, शत्रूविरुद्ध तोंडातून आणि हत्यारातूनही आग ओकतात. काहीसा भडकपणा आणि आक्रस्ताळेपणा ही यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्यं. मात्र युद्धपट असूनही आणि समोर शत्रू म्हणून पाकिस्तान असूनही 'लक्ष्य' या ट्रॅपमध्ये जायचं टाळतो. चित्रपटातली पात्रं एकदम संयतपणे व्यक्त होतात. चित्रपटाचे संवादही भडक व्हायचं टाळतात. भारतीय लष्कराला एक देदीप्यमान परंपरा आहे. कसं वागायचं, कसं व्यक्त व्हायचं, याचे अलिखित नियम आहेत. फरहाननं दिग्दर्शक म्हणून हे सगळं लक्षात घेऊन पडद्यावर चित्रपट उभा केला आहे. 

'लक्ष्य'ला हवा तसा प्रतिसाद बॉक्स ऑफिसवर मिळाला नाही. काही समीक्षकांनी सेकंड हाफ खूप रेंगाळला आहे अशी टीका केली. दस्तुरखुद्द जावेद अख्तर यांनी सिनेमाची लांबी चित्रपटाच्या यशाला मारक ठरली, असं चित्रपटाच्या अपयशाचं विश्लेषण करताना म्हटलं. पण फरहान आपण जे 'प्रॉडक्ट' बनवलं आहे त्याच्या मागे ठामपणे उभा होता. आपण एक चांगला सिनेमा बनवला आहे, असा अढळ विश्वास त्याला होता. एका मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारण्यात आला की, संधी मिळाली तर 'लक्ष्य'शी संबंधित कुठली गोष्ट बदलायला तुला आवडेल. एक क्षणही न दवडता फरहाननं उत्तर दिलं, ‘प्रेक्षक’!

मी आणि माझ्यासारखे कित्येक लोक दिग्दर्शक फरहानला खूप मिस करतो आहोत. अभिनय आणि निर्माता या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडता पाडता दिग्दर्शक फरहान हरवून बसला आहे, याची खंत वाटते. फरहान लवकरच दिग्दर्शनाकडे वळेल ही अपेक्षा. 

विद्यार्थिदशेत असताना एका मित्राच्या हॉस्टेलवर वारंवार जायचो. तिथं त्याचा रूममेट होता. तो छत्तीसगडचा होता. त्याची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. एकदा त्याच्याशी बोलता बोलता 'लक्ष्य'चा विषय निघाला आणि त्याच्या डोळ्यात चमक आली. 'लक्ष्य' बघूनच मला माझ्या ठार खेडेगावातून बाहेर पडून काहीतरी करण्याची प्रेरणा मला मिळाली, असं त्यानं अभिमानानं सांगितलं होतं. हा झारखंडचा पोरगा जर कधी फरहान आणि जावेदसाबला भेटला असता तर आपला चित्रपट फारसा न चालल्याचं त्यांचं शल्य कमी झालं असतं हे नक्की. कारण मला खात्री आहे की, 'लक्ष्य' बघून इन्स्पायर झालेला हा एकटा नाही...

चित्रपट मायक्रो लेव्हलला आपल्या आयुष्याला प्रभावित करतात ते असे! 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......