‘हायकूकार’ शिरीष पै स्वत:विषयी आणि काही जपानी हायकूंविषयी...
पडघम - साहित्यिक
शिरीष पै
  • शिरीष पै (१५ नोव्हेंबर १९२९ - २ सप्टेंबर २०१७)
  • Tue , 05 September 2017
  • पडघम साहित्यिक शिरीष पै Shirish Pai हायकू Haiku

कालच्या दोन सप्टेंबर रोजी आचार्य अत्रे यांची कन्या, दैनिक ‘मराठा’च्या माजी संपादक, कवयित्री, कथाकार, ललितलेखक आणि ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीमध्ये रुळवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका शिरीष पै यांचं निधन झालं. त्यांना पहिला ‘हायकू’ कसा सुचला आणि मूळ जपानी हायकू हा काव्यप्रकार नेमका काय आहे याविषयी त्यांच्याच शब्दांत. इथं त्यांच्या ‘आकाशगंगा’ (२००७)या डिंपल पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातील दोन लेख संपादित स्वरूपात पुनर्प्रकाशित केले आहेत.

.............................................................................................................................................

कवी, कविता आणि मी

…१९७६ साली दैनिक ‘मराठा’ बंद पडला आणि माझ्या आयुष्यात वडिलांच्या निधनानंतर जसा पसरला होता, तसाच भयाण काळोख पसरला. आता सगळेच कार्य थांबले होते. करावयाचे असे काही नव्हते. मी माझ्या खोलीत खिडकीपाशी खुर्ची टाकून शून्य मनाने बाहेर बघत असलेली असायची. बाहेरची झाडे, फुले, पक्षी, फुलपाखरे, वारे, तारे, ढग, आकाश हेच माझे सोबती झाले. आणि अकस्मात साक्षात्कार व्हावा तसा मला हायकू सुचला. हायकू या जपानी काव्यप्रकाराचा मी पूर्वी अभ्यास केला होता. ही अवघ्या तीनच ओळींची कविता, पण मला ती कधी जमली नव्हती आणि आताही कशी जमली हे मोठे आश्चर्यच म्हटले पाहिजे.

हायकू हा जपानी काव्यप्रकार प्रामुख्याने निसर्गाशी संबंधित असला तरी अन्य विषयांवरही हायकू रचना होऊ शकते. निसर्गात घडणारी एखादी नाट्यपूर्ण घटना घडताना जेव्हा आपण पाहतो, तेव्हा त्या घटनेशी आपल्या जीवनाचा काहीतरी घनिष्ट संबंध असल्याचे हायकूकाराला जाणवते. त्या निसर्गातील घटनेचे उदगारात्मक अल्पाक्षरी चित्र हायकूकारच काढतो, पण ते अशा कलात्मक पद्धतीने, की ते शब्दांतले चित्र पाहताना नेमके हेच आपल्या जीवनात कधीतरी घडले आहे, अशी भावना वाचणाऱ्याच्या हृदयात चमकून जाते.

एके दिवशी मी अशीच खिडकीपाशी बसले असताना अचानक एक कावळा नेहमीप्रमाणे -कर्कशपणे नव्हे तर व्याकूळपणे - ओरडताना मला ऐकू आला. वाटले, हा तर माझ्याच भावना बोलत नाही ना? आणि अकस्मात मला एक हायकू सुचला –

केव्हापासून करतोय कावकाव

खिडकीवरला एकाकी कावळा,

भरून आलाय त्याचाही गळा…

हा हायकू सुचल्यावर मला इतका आनंद झाला की, त्यानंतर मी आणखीन एक हायकू रचला. त्यानंतर आणखी एक. आणि मग हायकूंची मालिकाच सुरू झाली. एका दमात मी खूपच लिहून गेले. ‘ध्रुवा’ हे माझ्या हायकूंचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर गेली कित्येक वर्षे मी हायकू लिहीत आहे. अलीकडेच माझे ‘मनातले हायकू’ हे पाचवे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. माझ्या हायकूंचे महाराष्ट्रात इतके कौतुक झाले की, आज मला ‘हायकूकार शिरीष पै’ म्हणूनच सगळे ओळखतात. सुहासिनी मुळगावकर यांनी दूरदर्शनवरून, वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी ‘लोकप्रभा’चा हायकू विशेषांक काढून माझ्या हायकूलेखनाला खूपच प्रसिद्धी दिली. फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटते, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य रसिकांनी माझ्या हायकूरचनेचे इतके कौतुक केले, परंतु नामवंत कवींनी मात्र माझ्या हायकूरचनेला नाके मुरडली. आणि सगळ्यात मला दु:ख झाले ते प्रख्यात साहित्यिक पु.ल.देशपांडे यांनी माझ्या हायकूंचे ‘बायकू’ हे विडंबन करून ते ‘सत्यकथे’तून प्रसिद्ध केले त्याचे! ‘हा कुठला जपानचा पिवळा ज्वर महाराष्ट्रात आला?’ असे म्हणून माझी चेष्टा केली. पण त्यांना जो पिवळा ज्वर वाटला तो पिवळा बहर होता!! असो.

गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांत मी विपुल काव्यरचना केली. माझा ‘ऋतुचित्र’ हाही एक लोकप्रिय कवितासंग्रह. त्यालाही महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले. दुर्गा भागवतांचे ‘ऋतुचक्र’ आणि महाकवी कालिदासाचे ‘ऋतुसंहार’ डोळ्यासमोर ठेवून मी ऋतूंच्या रंगांचे चित्रण करणाऱ्या या शंभर कविता लिहिल्या.

आतापर्यंत माझे ‘कस्तुरी’, ‘आईची गाणी’, ‘एकतारी’, ‘एका पावसाळ्यात’, ‘विराग’, ‘गाववाट’, ‘ऋतुचित्र’, ‘चंद्र मावळताना’, ‘चारच ओळी’, ‘शततारका’, ‘हायकू’, ‘ध्रुवा’, ‘हायकूंचे दिवस’, ‘माझे हायकू’, ‘मनातले हायकू’ असे पंधरा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. हायकूंसह मी चारोळ्याही लिहिल्या आहेत. केव्हापासून मी कविता लिहिते आहे आणि लिहीत राहीन, कारण काव्य हे माझे जगणे आहे, जीवन आहे आणि स्वभाव आहे. मी जेव्हा कवितेतून बोलते तेव्हाच मला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते!

.............................................................................................................................................

काही जपानी हायकू

मला जपानी भाषा येत नाही. तरीपण जपानी हायकूंशी माझा परिचय झाला तो जपानी भाषेचे इंग्रजी अनुवाद माझ्या वाचनात आले म्हणून. हायकू हा अल्पाक्षरी काव्यप्रकार निसर्गाशी संबंधित आहे, हे आता सर्वांना माहीत झालेलेच आहे. निसर्गाचे अवलोकन करता करता हायकूकाराला अचानक निसर्गात घडलेली एखादी घटना दृष्टीला पडते. एकच क्षण, ज्याला हायकूकार ‘हायकू-क्षण’ असे म्हणतात. तो क्षण असे काही विलक्षण चित्र डोळ्यासमोर उभे करतो की, हायकूकाराला त्या चित्रात एखाद्या जीवनसत्याचे दर्शन घडते. कधी हे जीवनाचे दर्शन सुखावह, आनंददायी, प्रसन्न करणारे असते, तर कधी ते हृदयाचा ठाव घेणारे, कारुण्यस्पर्शीही असू शकते. असे हे दु:खदायक दर्शन बहुधा मृत्यूचा तत्क्षणी विचार करायला लावणारे असते.

अखेर मृत्यू हेही एक जीवनसत्यच आहे. जसा जन्म आहे, तसेच मरणही आहे. जसा बहर आहे, तसाच अंतही आहे. चिरंतन असे या जगात काय आहे? शाश्वत असे या दुनियेत काय आहे? जे निर्माण झाले ते लयाला जाणारच. हायकूकार बहराकडे विस्मयाने बघतो, तर विनाशाचा शांतपणे स्वीकार करतो. हे सारे संपणारच जर आहे तर त्याचा आनंद आज घ्यायचा नाही का? फुलं फुलतायत, सुगंध उधळतायत, पक्षी गातायत, फुलपाखरं बागडतायत म्हणून हसून घ्यावं आणि फुलांच्या पाकळ्या पडताना हे अटळ आहे, हे जाणून तटस्थपणे तो शेवट पाहावा असा तात्त्विक दृष्टिकोन सर्वच जपानी हायकूत आपल्याला पसरलेला दिसतो. अनेक जपानी हायकूकार हे बौद्ध धर्मातील झेन तत्त्वज्ञानाचे उपासक होते. त्यांच्या हायकूतून तर हे दिव्य दु:ख घडी घडी प्रत्ययाला येते.

जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा हायकूकाराच्या आनंदाला पारावार उरत नाही. कारण याच ऋतूत पक्ष्यांची मंजूळ गाणी रानातून ऐकू येतात. वसंत ऋतुत युगुइसू पक्षी जेव्हा मधुर शीळ घालतो, तेव्हा तिचे वर्णन करताना बुसन म्हणतो –

इकडे वळतोय

तिकडे वळतोय

युगुइसू गातोय

बुसनचा युगुइसूबद्दलचा आणखी एक हायकू –

बाहेर माळरानात जाईन

आमच्या युगुइसूला

ऐकत राहीन

विषण्ण एकांतवास युगुइसूचे गाणे किती मधुरता निर्माण करते याविषयी ज्योहा म्हणतो –

शेत सुनं सुनं

दुरून ऐकू येतं

युगुइसूचं गाणं

फुलपाखरू या फुलावरून त्या फुलावर उडतं, तेव्हा इस्साच्या मनात विचार येतो –

हे फुलपाखरू उडतंय

जाणवतं की माझ्यासारखं तेही

मातीनंच घडलंय

वसंतऋतुत चेरीचं झाडं फुलांनी अथांग बहरून जातं, तेव्हा जपानी माणसांच्या हर्षाला सीमा नसते. चेरीचा बहर पाहायला ती रानाकडे धाव घेतात आणि अनिमिष नेत्रांनी तो फुलांचा विलास डोळ्यात साठवून घेतात. जपानी हायकूत चेरीचे उल्लेख वरचेवर येतात. जेव्हा चेरीचा बहर पाहायला आलेली जपानी माणसे एकत्र जमतात, तेव्हा त्यांचे आत्मे जणू एक होतात. याविषयी इस्सा म्हणतो-

बहरलेल्या चेरीखाली

उभे राहतात

ते एकमेकांना परके नसतात

आणि तोच इस्सा चेरीचा बहर पाहताना हळहळून म्हणतो -

चेरीची झाडं बहरलीएत

तरी दु:ख आणि वेदना

आहेतच जगात

जपानी हायकूकाराला आनंददायक असे निसर्गातले आणखी एक सौंदर्य म्हणजे फुलपाखराचे दर्शन. त्याच्या दर्शनाने तर हायकूकाराचे कविमन इतके हळवे होते की, विचारायची सोय नाही. चियोनी म्हणतो –

हे फुलपाखरा

कुठले स्वप्न बघतोस

जेव्हा पंख झुलवतोस?

फुलांतून, फुलपाखरांतून, पक्ष्यांतून, पानांतून, झाडांतून घडणाऱ्या सुंदरतेच्या दर्शनाने आतून मोहरलेला जपानी हायकूकार मृत्यूच्या दर्शनानेही हादरून जात नाही, तर तो एका उदात्त गांभीर्यात प्रवेश करतो. किंबहुना जीवनाचा विचार करताना ते मृत्यूला कधी कधीही विसरू शकत नाहीत. किंबहुना असे म्हणता येईल की, समोर मृत्यू उभा आहे आणि तरीही हायकूकार जीवनाचे गीत गुणगुणतोय. इस्सा क्यांकोदोरी नावाच्या पक्ष्याला उद्देशून म्हणतो –

हे क्यांकोदोरी

गाशील ना माझे मृत्यूगान तेव्हा?

घडेल माझा मृत्यू जेव्हा!

रात्र संपत आली आहे. शिकी या हायकूकाराच्या मनात विचार येतो –

रात्र थोडी आहे

माझे आयुष्य

अजून किती शिल्लक आहे?

काही जपानी माणसे मृताला घेऊन स्मशानात चालली आहेत, ते स्मशान किती उदास असले तरी, त्यावेळीही हवा सुंदर आहे आणि इस्सा म्हणतो –

थंड हवा अंगावर घेत

ते जातायत स्मशानात

संध्याकाळच्या चंद्रप्रकाशात

एक कुटुंब स्मशानाकडे चालले आहे. आणि त्यातले सारेजण स्मशानाकडे नव्हे, तर जणू आपल्या शेवटाकडेही प्रवास करीत जात आहेत. बाशो म्हणतो –

स्मशानाला भेट देणाऱ्या कुटुंबातल्या

सगळ्यांचे केस पांढरे झालेले

शरीर काठीवर वाकलेले

काही काही सुंदर फुलेही फुलतात, ती मृत्यूची आरती करण्यासाठीच जणू. इस्सा म्हणतो –

माझ्याजवळची क्रिसेन्थॅमची

सर्व फुले घ्या

आणि या शवपेटीवर वहा

पेटलेली शेकोटी आता हळूहळू विझू लागली आहे आणि इस्साला वाटते-

कोळश्यांची ही शेकोटी

लयाला चाललीय…जशी वर्षे

आमच्या आयुष्याची

केवळ माणसासाठीच नव्हे, तर निसर्गातल्या सुंदर गोष्टींसाठीही हायकूकार अश्रू ढाळीत असतो –

मेणबत्ती धरून हातात

तो बागेत फेऱ्या घालतो आहे

वसंतऋतुसाठी शोक करतो आहे

जणू वसंतऋतू नव्हे तर जणू काही त्याची कुणीतरी प्राणप्रिय व्यक्तीच त्याला सोडून निघून गेली आहे.

या जगात जीवनाची समाप्ती अखंड चालू आहे. काहींचे जीवन समाप्त झाले न झाले तोच, इतर कुणी शेवटाला सामोरे जातच असतात. योहा म्हणतो –

बाग स्वच्छ झाडली

तोच कॅमेलियाची थोडी फुलं

खाली गळून पडली

माणसांच्याच नव्हे तर फुलांच्या शेवटाच्या कल्पनेने हायकूकाराचे मन द्रवून जाते. शिरा ओ म्हणतोय –

भारावलंय माझं मन

मेणबत्त्या पेटल्यायत

चेरीची फुलं गळतायत

मृत्यू जवळ आला आहे हे जाणवते आहे. बाहेर वसंत ऋतू आला आहे. चेरीची फुले फुलताहेत. मरण तर अटळ आहे. पण इतकी सुंदर फुलं आजूबाजूला दिसत असताना मरायचं? हायकूकाराला प्रश्न पडतो. आणि तरीही तो शांतपणे उदगारतो –

चेरीची फुलं बहरतायत

मला मरायचं नाही

पण आजाराची शाश्वती नाही

या फुलांसाठी तरी मला मरायची इच्छा नाही, हे फक्त हायकूकारच म्हणू शकतो. आणि आश्चर्य हे की, या अंतिम क्षणावरही तो हायकू रचून जातो.

श्रेष्ठ जपानी हायकूकार बाशो म्हणत असे की, प्रत्येक हायकूकाराने रोज हायकू लिहावा, मरेपर्यंत हायकू लिहावा आणि हायकू लिहूनच मरावे. असे काही जपानी हायकूकारांचे मृत्यूचे हायकूही प्रसिद्ध आहेत. मरण अटळ आहे तरी जीवन सुंदर आहे. मरायचे आहेच! म्हणून का जीवनाला नकार द्यायचा? जो तन्मय होऊन जीवन जगतो तो मृत्यूशीही तितकाच तन्मय होऊन जातो. जीवनानंतर मरण आहे आणि मरणाआधी जीवन आहे, नाही का? जीवन आहे महणूनच हायकूकारांसाठी – हायकूंचे क्षण आहेत, त्याचे जगणे म्हणजे हायकू क्षणांचा अखंड शोध…

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......