फैज़ अहमद फैज़ : माणसाच्या मूलभूत दुःखाबद्दल कळवळा असणारा कवी
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘फैज़ अहमद फैज़’ या नाटकातील एक दृश्य
  • Sat , 02 September 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe फैज़ अहमद फैज़ Faiz Ahmed Faiz बालाजी गौरी Balaji Gauri

रसिका आगाशे यांनी मागच्या महिन्यात रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित केलेल्या ‘संहिता मंच २०१७’मध्ये फैज़ अहमद फैज़ (१९११-१९८४) या महत्त्वाच्या उर्दू कवीच्या जीवनावर आधारित सुमारे एक तास चालणारं हिंदी नाटक बघायला मिळालं. फैज़ त्या पिढीचे कवी होते, जे डाव्या विचारांनी प्रेरित झाले आणि जे इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध लढून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आघाडीवर होते.

या पिढीच्या दुर्दैवानं स्वातंत्र्य आलं, पण देशाच्या फाळणीचा शाप घेऊन. ही फाळणी फैज़सारख्यांना फार त्रासदायक ठरली. त्यांना भारतात राहायचं की, पाकिस्तानात अशी निवड करावी लागली… जी करण्याची त्यांची यत्किंचितही इच्छा नव्हती. फैज़ पाकिस्तानात गेले. त्या अगोदर व पाकिस्तानात गेल्यावर त्यांनी काय केलं, कोणत्या कविता लिहिल्या, कोणत्या वृत्तपत्रांचं संपादन केलं आणिव कोणत्या देशांचा प्रवास केला वगैरे माहिती महत्त्वाची ठरते. ‘फैज़ अहमद फैज़’ या चरित्रात्मक नाटकात हा प्रवास थोडक्यात मांडला आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, खास करून इंग्रजांनी पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानात असलेली खिलाफत रद्द केल्यानंतर उर्दू भाषिक अभ्यासकांमध्ये पाश्चात्य शिक्षण घेण्याची प्रथा वाढली. त्याच काळात रशियात लेनिनच्या नेतृत्वाखाली १९१७ साली साम्यवादी क्रांती झाली. या क्रांतीमुळे जगभरच्या तरुणांत वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. जोडीला पाश्चात्यांची ज्ञान, विज्ञानातील प्रगती. या संदर्भात काही इंग्रजी शिक्षित मुसलमान तरुणांनी इस्लामच्या धर्मतत्त्वांची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न केला. यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉ. इक्बाल (‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ताँ हमारा’ हे अजरामर गाणं लिहिणारे). मात्र त्यांनी जी पुरोगामी मांडणी केली, ती इस्लाममधील धर्ममार्तंडांना मान्य नव्हती.

डॉ. इक्बाल यांच्यानंतर ही पुरोगामी परंपरा फैज़ यांच्यासारख्या इंग्रजी शिक्षित मंडळींनी पुढे नेली. फैज़ १९३५ साली इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून अलिगढमध्ये रुजू झाले. ते १९३६ साली प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे सभासद झाले. १९४१ साली त्यांनी डाव्या विचारांच्या एलिस नावाच्या ब्रिटिश युवतीशी विवाह केला. फाळणीनंतर फैज़ पाकिस्तानात गेले. तिथं त्यांनी पुरोगामी चळवळ चालवली. ते १९४७ साली स्थापन झालेल्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान’चे संस्थापक सदस्य होते. त्यांची पत्नी पार्टीची सक्रिय सभासद होती. ते १९४८ साली ‘पाकिस्तान ट्रेड युनियन फेडरेशन’चे उपाध्यक्ष झाले.

जिनांचा १९४८ साली मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानात अंदाधुंदी सुरू झाली. मेजर जनरल अकबर खान या डाव्या विचारांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यानं फेब्रुवारी १९५१मध्ये साम्यवादी पक्षाच्या मदतीनं सत्ता घेण्याचा कट आखला. पण तो प्रत्यक्षात येण्याअगोदरच बातमी फुटली आणि कटवाल्यांना अटक करण्यात आली. त्यात फैज़ही होते. तिथपासून त्यांच्या हाल-अपेष्ठांना सुरुवात झाली. यात फैज़ यांना कारावासाची शिक्षा झाली. १९५५ साली त्यांना सोडण्याचं मान्य केलं, पण त्यांना इंग्लंडला तडिपार करण्यात आलं. ते १९६४ साली पाकिस्तानात परत आले आणि कराचीमध्ये स्थायिक झाले.

समाजवादी विचारांच्या झुल्फीकार अली भुत्तोंचा जेव्हा पाकिस्तानात प्रभाव वाढला, तेव्हा त्यांनी फैज़ यांना शासनात मानाची पदं दिली. १९७७ साली जेव्हा लष्करशहा झिया उल हक यांनी भुत्तो यांना कैद केलं, तेव्हा पुन्हा फैज़ यांचे पुन्हा वार्इट दिवस सुरू झाले. त्यांनी पाकिस्तानला ‘अलविदा’ करून लेबॅननमध्ये आश्रय घेतला. काही वर्षांनी ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाकिस्तानात परत आले. १९८४ साली लाहोरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

फैज़ यांना अनेक महत्त्वाचे साहित्यिक पुरस्कार मिळाले. १९६२ साली त्यांना लेनिन शांतता पुरस्कार मिळाला. मृत्यूनं गाठेपर्यंत त्यांचं नाव तीन वेळा साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी पाठवलं गेलं होतं. फैज़ यांच्या साहित्यावर जसा त्यांच्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव दिसतो, तसाच माणसाच्या मूलभूत दुःखाबद्दल अस्सल कळवळाही. म्हणून आजही उर्दू भाषिक तरुणांवर फैज़ यांच्या कवितांचा प्रभाव आहे.

हे नाटक ‘पॅरॅफिन ग्रुप ऑफ अ‍ॅक्टर्स’ या नाट्यसंस्थेतर्फे सादर करण्यात आलं. ही नाट्यसंस्था राजस्थानातील कोटा गावातील आहे. हे या नाट्यसंस्थेचं पहिलंच नाटक आहे. असं नाटक रसिकांसमोर आणण्यासाठी फार काम करावं लागतं. यात वैचारिक आव्हान जसं असतं, तसंच तो काळ, तेव्हाचा समाज, वापरात असलेले कपडे वगैरेंचं भान ठेवावं लागतं. या सर्व निकषांवर या तरुण नाट्यसंस्थेचं कौतुक केलं पाहिजे.

नाटकाचं दिग्दर्शन राजेंद्र पांचाल या तरुण रंगकर्मीनं केलं आहे. पांचाल एनएसडीचा स्नातक आहे. त्यानं नाटकात छायाचित्रं, पार्श्वसंगीत व गायन वगैरेंचा सढळ वापर केला आहे. हे स्वाभाविक आहे, कारण फैज़ मुळात एक शायर होते. त्यांनी लिहिलेल्या ग़ज़ला तेव्हाच्या तरुण पिढीला मुखोद्गत होत्या.

हे नाटक बालाजी गौरी यांनी लिहिलं आहे. त्यांनी या तासाभराच्या नाटकात फैज़ यांच्या वादळी जीवनाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अशा व्यक्तीच्या जीवनावर तासाभराचं नाटक उभं करणं हे मुळात मोठं आव्हान आहे. त्यामुळे काही प्रमाणात त्या व्यक्तीच्या भावविश्वात प्रवेश करायला फारसा वेळ मिळत नाही. नेमकी हीच तक्रार या नाटकाबद्दल आहे.

फैज़ यांच्या जीवनात अनेक चढउतार येऊन गेले. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मानसन्मान मिळाले, पण त्याच बरोबर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, त्यांच्या कुटुंबियांचे हाल झाले. हे सर्व तासाभराच्या नाट्यरूपांतरात रसिकांसमोर आणणं, हे एक मोठं आव्हान होतं. ते नाटककारानं थोड्याफार प्रमाणात पेललं आहे. हे नाटक बघताना आपल्या मनात एक प्रश्न सतत येत राहतो. फैज़ यांच्यासारख्या पुरोगामी विचारांच्या व उच्चशिक्षित कवीनं धर्मावर आधारलेल्या पाकिस्तानसारख्या देशात जाण्याचा निर्णय का घेतला असावा. पण तो या नाटकात अनुत्तरीतच राहतो.

दिग्दर्शक राजेंद्र पांचाल यांनी नाटकाच्या मांडणीत काही प्रयोग केले आहेत. फैज़ यांची भूमिका करणाऱ्या नटाला त्यांनी प्रसंगानुरूप छायाचित्रं हातात घेऊन संवाद बोलण्यास सांगितलं. त्यामुळे कथानक पुढे सरकण्यास मदत होते. तसेच फैज़ यांच्या मनातील खळबळ व्यक्त करण्यासाठी त्यांच्या काही गाजलेल्या कविता वापरल्या आहेत. स्वातंत्र्य फाळणी व अमानुष हिंदू-मुस्लिम दंगे वगैरे घेऊन आले, तेव्हाची फैज़ यांची गाजलेली कविता म्हणजे ‘ये वो सहर तो नहीं’ किंवा माणुसकीला काळिमा फासणारे दंगे सुरू असताना फैज़ यांचा प्रियकर त्याच्या प्रेयसीला म्हणतो- ‘मुझसे पहिली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग’. फैज़ यांच्या अशा अंतर्मुख करणाऱ्या कविता आपण वाचलेल्या असतात. पण जेव्हा याच कविता पात्रांच्या मुखांतून आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासमोर येतात, तेव्हा त्यांचा अर्थ जास्त भावतो. हे या नाटकाचं खरं यश आहे.

हे नाटक एका कवीच्या जीवनावर आहे, असं म्हटल्यावर त्यात कवितावाचन असणार हे आपसूकच आलं. नाटककार गौरी यांनी फैज़ यांनी लिहिलेल्या शेकडो कवितांतून मूठभरच, पण योग्य कविता निवडल्या आहेत. यामुळे नाटकाची परिणामक्षमता वाढते. म्हणून नाटक काही बाबतीत असमाधानकारक वाटलं, तरी ते फैज़सारख्या कवीच्या जीवनावर आहे, हे लक्षात ठेवून बघितलं पाहिजे.

लेखक मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......