सब के सब ‘बीके’ हुए हैं!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Thu , 03 August 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नितीशकुमार Nitish Kumar

विरोधकांचं आशास्थान बिहारी सुपुत्र आणि जेपींच्या यंग टीममधले एकेकाळचे लढवय्ये नितीशकुमार यांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि रात्रीत बिहारमध्ये ‘चड्डी पहन के फुल’ म्हणजेच ‘कमल’ खिला!

समाजमाध्यमावर सध्या नचिकेत कुलकर्णी यांच्या ‘समाजवादी साथी खाती फॅसिझमची माती’ या लेखावर बहुचर्चित आणि नेहमीप्रमाणे पुरोगामी वर्तुळात एकमेकांवर शेरेबाजी चालू असतानाच नितीशकुमार यांनी ‘आतला आवाज’ ऐकल्यानं एकुणच समाजवादी विचार, नेते यांच्या समर्थनार्थ झुंजणाऱ्या सगळ्याच डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी ताकदींना ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’चा उदास अनुभव आला. तर महाराष्ट्रात जद(यु)ची स्थापना करून नितीशकुमारांना मोदींचा किंवा मोदींना पर्याय म्हणून हिरिरीनं पुढे आलेल्या आ. कपिल पाटील यांना तर ‘पावणाच वरणात मुतला’ असं झालं असावं.

कधी काळी इतरांसारखे, त्यातल्या त्यात नितीशकुमारांकडे आम्हीही डोळे लावून बसलो होतो. कारण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देऊ केलेली पाच कोटींची मदत नाकारणारा, फोटोलाही उभा राहायला नकार देणारा, मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हटल्यावर जद(यु)-भाजप युती सरकार मोडणारा, २०१४च्या पराभवानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन कुणा अनाम ‘मांझी’च्या हाती बिहारची नौका देणारा असा स्वच्छ, चांगला कारभारी म्हणून आपली प्रतिमा नितीशकुमारांनी राष्ट्रीय माध्यमांत जपली होती. काँग्रेससह इतर विरोधकही त्यांना एकत्रित विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून पाहत होते. पण या साऱ्याला चकवा देत नितीशकुमारांनी जो आपला ‘समाजवादी डीएनए’ सिद्ध केला. त्यांनी हरयाणाच्या भजनलाल यांनी भारतीय राजकारणात प्रस्थापित केलेल्या होलसेल आयाराम-गयारामलाही मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केलाय. सोनिया गांधींनी ‘आतला आवाज’ लोकप्रिय केला आणि मनमोहन यांना पंतप्रधान करून त्यांचा ‘बाहेरचा’ व ‘आतला’ आवाज आतल्या आत राहील हे पाहिलं. नितीशकुमारांच्या ‘आतल्या आवाजा’नं एकत्रित विरोधाचा ‘बाहेरचा आवाज’च बंद करून टाकला!

आणि आता तर विश्वासदर्शक ठराव मंजूर होऊन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर नितीशकुमारांनी जी ‘मोदी चालिसा’ गायला सुरुवात केलीय, ती ऐकून तर प्रत्यक्ष मोदीही दचकले असतील. राजकारणाचा स्तर खालावलाय. जागोजागचे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते भाजप निमंत्रणाची वाट न पाहता स्वत:हून निमंत्रण मिळवण्याच्या खटाटोपात आहेत. पण राष्ट्रीय स्तरावरचा उद्याचा पर्याय, प्रतिस्पर्धी वाटणारा नेताच ‘रणछोडदास’ होऊन वैचारिक शत्रूचीच आरती गायला लागतो, पुढची लोकसभा निवडणूक दारावर आली असताना असा बिनकण्याचा सत्तालोलुप लिबलिबित सरपटणारा प्राणी होतो, तेव्हा हताशा नाही तर संताप येतो.

२०१४नंतर मोदी आणि भाजप पर्यायानं संघपरिवार विविध मार्गानं आक्रमक होतोय. मोदींचे रणनीतीकार कुणी प्रशांत नामक धोरणकर्ता नंतर नितीशकुमार व राहुल गांधींच्या वॉर रूममध्ये आले. पण परिणामशून्य. आता कदाचित प्रशांत यांचाच आत्मविश्वास जायचा! मोदी, भाजप व संघपरिवार सत्ता व (बरोबरच येणाऱ्या) संपत्तीचा उपयोग करत संपूर्ण भारत पादाक्रांत करण्यासाठी सरसावलेत, हे स्वाभाविकच म्हणता येईल. प्रत्येक सत्ताधारी हेच करत असतो, मग विचारधारा कुठलीही असो. संघपरिवार तर भूमिगत आणि जमिनीवरच्या ‘स्लो पॉयझनिंग’ रेसमध्ये कायमच अग्रेसर. संघाची उद्दिष्ट्यं, ध्येयं आणि लक्ष्यं कधीच शॉर्ट टर्म नसतात. वाळवीपेक्षाही त्यांचा पेशन्स दसपट आहे व पोखरण्याची ताकद शंभरपट!

भारतीय राजकारणावरचा काँग्रेसी ठसा, विशेषत: गांधी-नेहरूंचा प्रभाव पूर्ण पुसल्याशिवाय आपली प्रतिष्ठापना कठीण हे त्यांनी कधीच ओळखलं. ६० वर्षांनंतर एखाद्या कलाकृतीवरचा स्वामित्व हक्क संपतो, त्याप्रमाणे या देशावरचा गांधी-नेहरू यांच्या अलिखित स्वामित्वाचा हक्क आता संपलाय, तेव्हा आत्ताच संधी आहे हे हेरूनच त्यांनी २००९च्या पराभवानंतर पद्धतशीर मांडणी केली. मोदींनी जाहिरात व विपणन यांची जोड देत ती कालसुसंगत केली व गाफील विरोधकांना चारी मुंड्या चीत केलं.

शंभर वर्षांतला सर्वांत दारुण, मानहानीकारक पराभव पाहायला लागल्यानं काँग्रेसने हाय खाल्ली. स्वत:ला सोयीच्या त्या संसदीय प्रथा पाळायच्या या तत्त्वानं काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जाही न देऊन भाजपनं पराभवावर मीठ चोळलं. गांधी-नेहरू व नेहरू घराणं यांच्या जीवावर सुस्त, मस्त, रगेल, रंगेल व दबंग झालेले देशभरचे काँग्रेसवाले खाडकन मुस्काटात बसावी तसे शरमेनं काळवंडले. जागोजागी तयार झालेली मुलायम, मायावती, ममता, जयललिता, पटनाईक ही बेटं…त्यातील काही मोदी त्सुनामीत काही निर्धारानं उभी राहिली, काही भुईसपाट झाली. निवडणुकांतले पराभव कुठल्याच राजकीय पक्षाला नवीन नाहीत. पण मोदींच्या विजयानंतर भाजपचा विस्तार बघता आता भल्याभल्यांना आपला पराभव हा पंचवार्षिक नसून कदाचित कायमचा हे लक्षात येऊ लागलं. परवा नितीशकुमारांनी जे उघडपणे मान्य केलं, ते काँग्रेससह अनेक पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते मनातल्या मनात म्हणत असतील. आणि त्यामुळे २०१९ला भाजपचा विजय झालाच तर तो त्यांच्या पराक्रमाचा नाही, तर विरोधकांच्या पतनाचा इतिहास असेल.

मोदींच्या कारभारावर असंतोषाचा जन्म ठिकठिकाणी होतोय. विविध वर्ग, समाजगट, व्यापार व उद्योगक्षेत्रातही झालाय. शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्य यात तर तो तीव्रतेनं खदखदतोय. पण मोदी, भाजप आणि संघ निश्चिंत आहेत. कारण त्यांना माहितीय या असंतोषाला खतपाणी घालून त्याचा वन्ही चेतवण्याचं नैतिक बळ कुठल्याच विरोधी पक्षात नाही. राजकीय पक्षांना लागणारी मुख्य पैशांची रसद आता कुणीच या लंगड्या, निकामी घोड्यांवर लावणार नाही. प्रकरणं, अनियमितता, भ्रष्टाचार बाहेर काढून चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लावून प्रसंगी तुरुंगात बसवू अशा गर्भित धमक्या हस्ते, परहस्ते व जाहीरपणे देत ‘आम्हाला शरण या’ किंवा ‘राजकीय विजनवास’ अथवा ‘कलंकित बंदिवास’ असे तीनच पर्याय मोदी-शहा यांनी विरोधकांपुढे ठेवलेत.

२०१४च्या विजयानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच अनेक उंदरांनी विविध पक्षीय बुडत्या गलबतातून उड्या मारून जीव, संपत्ती, संस्था व कारकीर्द वाचवली. धीर खचलेले अनेक आधारकार्ड घेऊन रांगेत उभे आहेत. राष्ट्रीय स्तरावरचा मोठा पक्ष हा ‘राहुल गांधी’ नामक घशात अडकलेलं हाडूक कसं काढायचं या चिंतेत आहे. आपल्या मुलाचं भविष्य समजू शकणाऱ्या सोनिया धाकट्या भावाच्या किंवा स्वत:ची थोरल्या जावेची भूमिका सोडून धाकट्या जावेच्या भूमिकेत जाण्याच्या मानसिकतेत आल्यात. लालू कभी अंदर, कभी बाहर करत एकटेच परिवार बचाव मोहीम राबवत राहणार. देशभर सर्वत्र सर्व नेते मुलांचा राज्याभिषेक करत असताना मुलायमना स्वत:हून सगळं नावावर करून दिल्यानंतर बेघर झालेल्या गणपतराव बेलवलकरांचा अनुभव आलाय. ममतांचा लहरी आक्रस्ताळेपणा फक्त प. बंगाल खपवून घेईल कारण डाव्यांच्या तुलनेत त्यांना तो ‘मिश्टी’ वाटत असावा. दक्षिण दिग्विजयाची तयारी भाजप जयललितांची बेवारस गादी मिळवून करेल. केरळ तर त्यांचे बंगालप्रमाणे लक्ष्यच आहे. महाराष्ट्रात सेनेला फरफटवत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतील सुभेदार गळ्याला लावत सत्ता अधिक मजबुत ते करणार. थोडक्यात राजकीय विरोध टप्प्याटप्प्यानं राजकीय सत्तेचा वापर करूनच संपवायचा हे धोरण आहे.

विरोधी पक्षानंतर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असते बिगर संसदीय राजकारण करणाऱ्या संघटना आणि लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या प्रसारमाध्यमांची. १९८०च्या दशकापासूनच या देशातील राजकीय पक्ष, विचारधारा यांच्या बिगर संसदीय जनसंघटना संघर्षाचा रस्ता सोडून बिगर शासकीय संघटना झाल्या. आणि सरकारी व परदेशी मदतीवर समस्यांचे तुकडे करून त्यावर अभ्यास, अहवाल व सरकारी व परदेशी मदतीतून कामाची उभारणी, समस्या निवारण यावर भर देऊ लागल्या. त्यातून संघर्ष ‘राजकीय संघर्षवजा’ झाला.

भाजपला डाव्या विचारानं प्रेरित जनसंघटना, प्रत्यक्ष संघर्ष करत नसल्या तरी त्या राखेखालचे निखारे दुर्लक्षिणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे डाव्यांचा प्रभाव असलेल्या एनजीओ, विद्यापीठं, कला-सांस्कृतिक संघटना यांची रसद तोडणं, दबाव टाकणं, आपली माणसं घुसवणं, उन्मादी संघटनांना सक्रिय करून चितावणी देणं हे उद्योग सुरू झाले. जेएनयू, एफटीआय ही त्याची प्रमुख उदाहरणं. इथंही अनेक विचारवंतांनी नितीशकुमारांसारखा आतला आवाज ऐकला!

परंतु सर्वांत जास्त ‘आतला आवाज’ ऐकला तो माध्यमांनी! त्यात पुन्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील वृत्तवाहिन्यांनी तर ३६०च्या अंशात आपल्या डिश अँटेना बदलून सरकार व भाजपची मुखपत्रं ही भूमिका वठवायला सुरुवात केली. नोटाबंदीनंतर जाहिरातींचा व पेड न्यूजचा घटलेला स्रोत फक्त सरकारी जाहिरातींनी भरून निघणारा होता. आणि या सरकारचा तर कामापेक्षा जाहिरातींवर भर! या जाहिरातीच्या पावसात भिजायला इलेक्ट्रॉनिक मीडिया हाऊसेसचे मालक ‘हमाम में सब नंगे’ म्हणत सामिल झाले. मुद्रित व इलेक्ट्रॉनिक मीडियात एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्था ‘स्व’पण व आपला खरा ‘आतला आवाज’ टिकवून आहेत. बाकी आपआपल्या वाट्याचं बलुतं, ईदी घेऊन मूग गिळून गप्प आहेत. प्रचार-प्रसार हेच प्रसारण. फारच डोळ्यावर आलं तर विरोधातल्या दोन बातम्या लाजेखातर दाखवायच्या. कारण सर्वंकष सत्ता साम-दाम-दंड-भेद हेच मुख्य धोरण राबवते. संपत्तीचा मोह आणि जिवाची भीती हे अद्वैत ज्यांच्या ठिकाणी आहे, त्यांना हेरून कामाला लावलं गेलंय. जे ऐकणार नाहीत, जे ठाम विरोधक त्यांना न मारता त्यांची वजाबाकी करायची, त्यांच्या विश्वासार्हतेवर (नुसतं) प्रश्नचिन्ह लावायचं.

आज परिस्थिती अशी आहे सिकंदरला आडवा जाणारा पोरस नाही. छत्रपतींचं नाव आणि जात वापरून फक्त सोयीचं राजकारण केलं जातंय. मूठभर माहिती अधिकार कार्यकर्ते जीवावर उदार, तर बाकी टोपी डोक्यावर चढवून खंडणीखोर झालेत. ‘दुसऱ्या गांधी’सह तिसरे, चौथे, पाचवे सगळेच ‘गांधी’ मौनात गेलेत. नक्षलवादी गदरही पतंजलीच्या मार्गानं गेला, तिथं इतरांची काय कथा?

७६ साली ‘अंधरे में एक प्रकाश’ म्हणण्याइतपत तरी वाव होता, आशा होती. आता सवाल तरी कुणाला करायचा? कारण आजूबाजूला पाहिल्यावर वाटतं- इथं काही ‘स्व’ला आवाहन करणारं विचारायचं म्हणजे ‘अंधों की गलियों में आईना बेचना’!

त्यातूनही प्रयत्न करावा तर ‘सब के सब साले पहलेसे बिके हुए है’!

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Mahendra Teredesai

Mon , 07 August 2017

फारच उदासीन चित्र आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......