‘रनअवे ट्रेन’ - आज झालो मुक्त मी!
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘रनअवे ट्रेन’ची पोस्टर्स
  • Mon , 31 July 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक रनअवे ट्रेन Runaway train आंद्रे कोंचालोव्हस्की Andrei Konchalovsky अकिरा कुरोसावा Akira Kurosawa जॉन वॉइट Jon Voight एरिक रॉबर्ट्स Eric Roberts

अलास्कातल्या स्टोनहेवन मॅग्झिमम सिक्युरिटी प्रिझनमध्ये ऑस्कर मॅनहेम ऊर्फ मॅनी (जॉन वॉइट) तीन वर्षं एकांतवासात आहे. कोर्टाच्या आदेशानंतर वॉर्डन रँकन नाखुषीनं त्याला बाहेर काढतो आणि इतर कैद्यांबरोबर ठेवतो. पण मॅनीनं पळून जायचा प्रयत्न करावा, अशी रँकनची तीव्र इच्छा असते, जेणेकरून त्याला मॅनीला गोळ्या घालून संपवता येईल.

‘मॅनी माणूस नाही, जनावर आहे,’ कोर्टाच्या आदेशानंतर टीव्ही पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत तो सांगतो.

पुढच्या एका आणीबाणीच्या प्रसंगात त्याला कोणीतरी उद्वेगाने म्हणतं, ‘यू आर अॅन अॅनिमल!’

‘वर्स, अ ह्यूमन, ह्यूमन!’ तो तितक्याच त्वेषानं फुत्कारतो.

‘रनअवे ट्रेन’मध्ये जे मोजके तत्त्वज्ञानात्मक प्रसंग आहेत, त्यातला हा एक. आणि तरीही संपूर्ण चित्रपटालाच एक तत्त्वज्ञानात्मक डूब आहे. म्हणूनच नियंत्रणाबाहेर गेलेल्या रेल्वेगाडीत अडकून पडलेल्या तिघांचा जीव वाचवण्याचा संघर्ष बहुतांश काळ पडद्यावर दिसूनही तो निव्वळ थरारपट राहत नाही. इंजिनचा ड्रायव्हर हार्ट अटॅक येऊन मरून पडल्यामुळे अलास्कातल्या बर्फाळ प्रदेशात अनियंत्रित वेगानं धावणारी गाडी, त्या गाडीवर अवचितपणे अडकून पडलेले तिघे, ती गाडी मुख्य ट्रॅकवरच्या अन्य एखाद्या गाडीला धडकून जीवितहानी होऊ नये, म्हणून धडपडणारा नियंत्रण कक्षातला अधिकारी आणि तुरुंग फोडून पळून गेलेल्या, पण त्या गाडीच्या कचाट्यात सापडलेल्या कैद्यांच्या मागावर असलेला वॉर्डन यांच्यातला हा चौरंगी सामना हा खरं म्हणजे थरारपटाचा अव्वल मसाला. पण मॅनी आणि रँकन यांच्यातलं द्वंद्व या थरारपटाला एक विलक्षण लोभस पोत देतं.

रँकन म्हणतो त्याप्रमाणे मॅनी खरोखर जनावर आहे. विधिनिषेध शून्य, रांगडा, रानटी. तो बुद्धिमानही आहे आणि त्याच वेळी पुढचा-मागचा विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन कृती करणाराही आहे. त्यामुळे त्याला एकांतवासातून बाहेर काढल्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार, याची रँकनला खात्री आहे. आणि त्याने तो करावाच, अशी त्याची तीव्र इच्छा आहे. म्हणजे मग या हिंस्त्र जनावराला गोळ्या घालण्याची इच्छा त्याला पूर्ण करता आली असती. त्यामुळे तो मॅनीला पळून जाण्यासाठी उकसवत राहतो. मॅनीला याची जाणीव आहेच, आणि तरीही तो ते आव्हान स्वीकारतो आणि तुरुंगातून यशस्वीरीत्या पळ काढतो.

त्याच्यासोबत आहे तुरुंगातला आणखी एक कैदी बक (एरिक रॉबर्ट्स), जो तुरुंगात लाँड्रीचं काम करत असतो. त्याच्याच मदतीनं मॅनी तुरुंगातून पळ काढतो. मूळ योजनेत मॅनी एकटाच बाहेर निघणार असतो, पण अखेरच्या क्षणी बक मॅनीला गळ घालतो आणि मॅनी त्याला आपल्यासोबत घेतो. बक हा तुलनेनं नवखा आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झालेली असली तरी बकच्या दृष्टीनं तो केवळ तांत्रिकदृष्ट्या बलात्कार होता, कारण त्याने जिच्याशी संबंध ठेवले होते, ती अल्पवयीन होती. रूढार्थानं तो मॅनीसारखा अट्टल गुन्हेगार नाही. पण मॅनी हा तुरुंगातल्या सगळ्यांचा ‘आदर्श’ होता. बकच्या लेखीसुद्धा तो त्याचा हिरो होता. बक अननुभवी आहे, कोवळा आहे. त्याला मॅनीच्या पावलावर पाऊल टाकून जायचंय, पण मॅनी त्याला झिडकारतो. त्याच्या लेखी दोघे केवळ परिस्थितीच्या अपरिहार्यतेमुळे एकत्र आलेत. याखेरीज तो बकला फारसं महत्त्व देत नाही.

पण दोघेही ‘आसमाँ से गिरे खजूर पे अटके’ या न्यायाने तुरुंगातून निसटतात आणि ड्रायव्हर नसलेल्या अनियंत्रित गाडीत येऊन अडकतात. त्यांच्याखेरीज गाडीत आणखी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे त्या ट्रेनवरची एक महिला कर्मचारी सारा (रिबेका डी मॉर्ने). तिच्या अस्तित्वाचा दोघांना पत्ताच नाही. गाडी ज्या वेगानं धावतेय आणि वाटेत एके ठिकाणी मालगाडीच्या शेवटच्या डब्याला तिनं ज्या पद्धतीनं धडक दिली, ते पाहून काहीतरी गडबड आहे, हे या दोघांच्याही लक्षात येतं. त्याच धडकेनं तोवर झोपलेली साराही खडबडून जागी होते आणि विना ड्रायव्हरच गाडी धावतेय, हे लक्षात आल्यानंतर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी म्हणून शेवटच्या डब्यातल्या केबिनमध्ये येते. तिथं हे दोघे तिला भेटतात.

पण खरा संघर्ष आहे तो मॅनी आणि रँकन यांचाच. प्रेक्षकाला अनियंत्रित वेगानं धावणाऱ्या ट्रेनवर अडकलेल्या जिवांचा स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नांमागील थरार चित्रपटभर दिसत राहूनही मॅनी आणि रँकन यांच्यातला संघर्ष दशांगुळं उरतो. रँकनला काहीही करून मॅनीला पकडायचंय, जिवंत अथवा मृत; आणि आता आपलं काहीही झालं तरी चालेल, पण कुठल्याही परिस्थितीत रँकनच्या हाती जिवंत सापडणार नाही, या ईर्ष्येला पेटलेला मॅनी. त्याला ‘अॅनिमल’ म्हणून हिणवणारा रँकन त्याला काहीही करून संपवण्याच्या लालसेनं स्वत:च कधी जनावराच्या पातळीवर येतो, हे त्यालाही उमगत नाही आणि खरोखरच जनावराचे हिंस्त्र गुण उधळत फिरणारा मॅनी कसोटीच्या सर्वोच्च क्षणी स्वत:च्याही नकळत माणुसकीचा ओलावा दाखवून जातो.

निव्वळ थरारपट म्हणून ‘रनअवे ट्रेन’मध्ये नेहमीच्या ट्रिक्स आहेतच. दोन गाड्यांची धडक होऊ नये, म्हणून एक गाडी साइडिंगला काढत असताना तिच्या शेवटच्या डब्याला गाडीची धडक बसणं, त्या आधीची उत्कंठा, गाडीवर कोणीच नसल्यामुळे तिला साइडिंगच्या ट्रॅकवर नेऊन डिरेल करण्याचा निर्णय झाल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी गाडीवरून हॉर्न ऐकू आल्यामुळे ऐनवेळी पुन्हा ट्रॅकचा सांधा बदलून तिला मुख्य मार्गावर ठेवण्याची धडपड, मार्गावर असलेला एक जुनाट पूल आणि त्या पुलावर असलेली वेगमर्यादा, त्या वेगमर्यादेपेक्षा गाडीचा वेग कितीतरी जास्त असणं आणि तो वेग कमी करण्याचा कुठलाही मार्ग नसणं, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाताना कराव्या लागणाऱ्या चित्तथरारक कसरती आणि ते पाहून प्रेक्षक म्हणून आपली ताणली जाणारी उत्कंठा, हे सगळे नेहमीचे प्रकार ‘रनअवे ट्रेन’मध्ये आहेतच; पण हे प्रसंग म्हणजे हा चित्रपट नव्हे!

हॉलिवुडच्या थरारपटात असतात तशा तांत्रिक करामती यात नाहीत. शक्य तितकं वास्तव चित्रीकरण केलंय. त्यामुळेच हा थरार देखील वरवरचा न राहता मनाला भिडतो.

एखादा चित्रपट खरोखरच नशीब घेऊन येतो. चित्रपट बनवणाऱ्यांच्याही गावी नसतं की, आपण काहीतरी थोर बनवतोय. एखाद्या दिग्दर्शकाची एखादीच कलाकृती तोंडात बोटं घालायला लावतो. तिच्या आगेमागे त्या दिग्दर्शकाचं नाव घेण्यासारखं काही नसतं. आपल्याकडे जसं ‘डॉन’मुळे दिग्दर्शक चंद्रा बारोटचं नाव अजरामर झालं. त्यानंतर उभ्या आयुष्यात बारोटचं काहीही झालं नाही. ‘रनअवे ट्रेन’चं असंच आहे. हॉलिवुडमध्ये बी ग्रेड, सवंग मारधाडपट बनवणाऱ्या ‘कॅनन फिल्म्स’ या फारशा प्रतिष्ठेच्या नसलेल्या बॅनरनं या चित्रपटाची निर्मिती केली. आंद्रे कोंचालोव्हस्की या रशियन दिग्दर्शकानं तो बनवला. ‘रनअवे ट्रेन’च्या आधी आणि नंतरही त्यानं फारसं लक्षणीय काम केल्याचं ऐकिवात नाही. पण ‘रनअवे ट्रेन’ हा जमून आलेला मामला होता.

एकतर अकिरा कुरोसावाच्या पटकथेवर हा चित्रपट बेतलेला होता. तो कुरोसावाचा हॉलिवुडमधला पहिला चित्रपट ठरणार होता आणि पहिला रंगीतदेखील. १९६६ साली सर्व तयारी झाली होती. प्रसारमाध्यमांमध्ये घोषणाही करून झाली होती. पण जेमतेम महिन्याभरावर चित्रीकरण येऊन ठेपलेलं असतानाच सांस्कृतिक मतभेदांमुळे हा प्रोजेक्ट गुंडाळावा लागला. त्यानंतर १५ वर्षं हॉलिवुडमध्ये कुरोसावांची ही पटकथा फिरत होती. अखेरीस कॅनन फिल्म्सच्या ती हाती लागली आणि प्रतिष्ठेच्या शोधात असलेल्या कॅननच्या निर्मात्यांनी ‘रनअवे ट्रेन’ बनवण्याचा निर्णय घेतला. कोंचालोव्हस्कीनं कुरोसावाची भेट घेऊन त्याची रितसर परवानगी घेतली आणि मगच या चित्रपटाला हात घातला.

कुरोसावाच्या मूळ पटकथेत किती बदल करण्यात आले, याचा तपशील फारसा उपलब्ध नसला तरी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मानवी भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवणारी कुरोसावाची शैली रँकन आणि मॅनीच्या व्यक्तिरेखांमध्ये सातत्यानं दिसते. किंबहुना या चित्रपटाला थरारपटाच्या पलिकडे जी खोली प्राप्त झाली आहे, त्यात कुरोसावाच्या मूळ पटकथेचा मोठा वाटा असावा. त्यात भर घातली आहे वॉइटच्या मॅनीनं. संघर्षाचं दुसरं टोक रँकन असला तरी लेखकानं त्याच्यावर काहीसा अन्यायच केलाय. उरलीसुरली कसर वॉइट भरून काढतो. चित्रपटाच्या अखेरीस तर वॉइटला हिरो बनण्याची संधीच लेखक-दिग्दर्शकानं देऊ केली आहे. वॉइटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं, तर एरिक रॉबर्ट्सला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचं ऑस्कर नॉमिनेशन मिळालं. चित्रपटाला संकलनासाठीही ऑस्करचं नॉमिनेशन होतं. ऑस्करची पाटी कोरी राहिली तरी वॉइटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं गोल्डन ग्लोब मिळालं.

चित्रपटाच्या अखेरीस विल्यम शेक्सपिअरच्या लेखणीतून उतरलेल्या दोन संवादांची पाटी येते –

"No beast so fierce but knows some touch of pity."

"But I know none, and therefore am no beast."

शेक्सपिअरच्या ‘रिचर्ड थ्री’ या नाटकातला हा संवाद दोन वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडी आहे. मॅनी आणि रँकनला यातलं नेमकं कुठलं वाक्य लागू होतं, याविषयी आजही या चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये चर्चा झडत असतात. ही दोन वाक्यं दोन स्वतंत्र अवतरण चिन्हांत नसती, तर ते मॅनीलाही लागू झालं असतं आणि रँकनलाही. दोघेही सारखेच उलट्या काळजाचे आणि हिंसक प्रवृत्तीचे. पण ही दोन स्वतंत्र वाक्यं आहेत, कारण नाटकात दोन स्वतंत्र व्यक्तिरेखांच्या तोंडचे हे संवाद आहेत. या चित्रपटाच्या बाबतीत पहिलं वाक्य मॅनीला लागू होतं. रँकनच्या म्हणण्याप्रमाणे तो जनावर असला तरी ऐन मोक्याच्या क्षणी बक आणि सारावर दया दाखवून तो माणुसकीचा प्रत्यय देतो. रँकन मात्र तथाकथित पुण्यवान समाजाचा प्रतिनिधी असूनही ऐन कसोटीच्या क्षणी मॅनी, बक अथवा सारा यांच्या बाबतीत कुठलाच चांगुलपणा दाखवू इच्छित नाही.

खरं म्हणजे मॅनीची कृष्णकृत्यं प्रत्यक्षात न दाखवताही तो कोणीतरी क्रूरकर्मा आहे, हे प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. त्याची देहबोली, डोळे मोठे करून बोलण्याची शैली, संवादफेकीची पद्धत, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटून मर्व्ह ह्यूजच्या होत्या तशा दोन्ही गालांवर पसरलेल्या दाढी कम मिशा, यामुळे हा खरोखरच उलट्या काळजाचा मनुष्य आहे, यावर प्रेक्षक विश्वास ठेवतो आणि नंतरच्या प्रवासात त्याचं एकंदरीत वागणं या विश्वासाला तडा जाऊ देत नाही. चित्रपटात एका अत्यंत अटीतटीच्या प्रसंगात त्याच्यातल्या जनावराचा प्रत्यय येतो. गाडी थांबवायची असेल तर सर्वांत पुढच्या इंजिनात जाण्यावाचून गत्यंतर नसतं. पुढच्या इंजिनात जायचं तर बाहेरच्या बाजूनं हाताला जो आधार मिळेल तो पकडून कसरत करून जाण्यावाचून गत्यंतर नाही. बाहेर हाडं गोठवणारी थंडी, वरून बर्फ पडतोय, दृश्यमानता जवळपास शून्य. मॅनीचा एक हात जायबंदी आहे. तुरुंगात असताना रँकनच्याच सांगण्यावरून एका कैद्यानं त्याच्यावर खुनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात केवळ हातावर निभावलं, पण ती जखम अद्याप ताजी आहे. तरीही त्याची जायची तयारी आहे. बक त्याला थांबवतो आणि स्वत: जायला निघतो. पण अर्ध्या वाटेतच आता पुढे जाणं शक्य नाही, हे त्याच्या लक्षात येतं. तो मागे फिरतो. ते पाहून मॅनी दार आतून बंद करून टाकतो. सारा त्याच्याशी झटापट करून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. मॅनी तिलाही ढकलतो आणि आतूनच बकला पुन्हा एकदा प्रयत्न करून पहिल्या इंजिनात जायला सांगतो. बाहेरच्या थंडीनं बक गोठतोय, त्याला काहीही करून आत यायचंय, पण मॅनी दरवाजा उघडायला तयार नाही. सारा त्याला म्हणते, ‘यू आर अॅन अॅनिमल!’

प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं मॅनीत दडलेलं जनावर पहिल्यांदा या प्रसंगात दिसतं, तर हा म्हणे की, ‘मी जनावरापेक्षाही वाईट आहे, माणूस आहे मी, माणूस!’ मॅनीचा सतत या माणसाशी संघर्ष सुरू आहे आणि त्याच संघर्षाची परिणती रँकनबरोबरच्या संघर्षात होते. या कोणाचंही नियंत्रण नसलेल्या ट्रेनच्या माध्यमातून त्याला या संघर्षातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो आणि स्वत:च्या मुक्तीचाही. त्यामुळेच हा संघर्ष ‘रनअवे ट्रेन’ला निव्वळ थरारपटाच्या कितीतरी पलिकडे घेऊन जातो.

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......