'शेंटिमेंटल' : पोलीस खात्याची 'मेंटल' कथा
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'शेंटिमेंटल'चं एक पोस्टर
  • Sat , 29 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie शेंटिमेंटल Shentimental

पोलीस हा गुन्हेगारांपासून नागरिकांचं संरक्षण करणारा पर्यायानं समाजातील गुन्हेगारी रोखणारा किंवा जमल्यास कमी करणारा सरकारी यंत्रणेतील एक मुख्य घटक. एका अर्थानं नागरिकांचा पोलीस हा मित्रच, परंतु आज समाज त्याला आपला मित्र मानतो का? असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थीच येईल. कारण या 'पोलिसा'ची समाजात असलेली सध्याची 'प्रतिमा'. अर्थात या प्रतिमेला केवळ 'तो' पोलीस एकटाच जबाबदार आहे, असं नाही तर प्रशासनासह समाजातील सर्वच घटक त्याला जबाबदार आहेत. कारण पोलीस हा देखील एक 'माणूस' आहे, त्यालाही भावना असतात, याचा जणू पोलीस खात्यासह सर्वांना विसर पडला आहे. कोणतीही आणि कोणाचीही सेवा किंवा चाकरी (नोकरी) करायची झाल्यास ती व्यक्ती 'मेंटली' व्यवस्थित हवी आणि तसं नसल्यास ती व्यक्ती ती नोकरी करण्यास अपात्र असतं हा सर्वसाधारण नियम आहे. मात्र हा नियम पोलीस खात्याला लागू नसावा असं दिसतं. कारण 'मेंटली' त्याचा सहसा कोणी विचारच करत नाही. लेखक-दिग्दर्शक समीर पाटील यांनी याच 'मेंटॅलिटी'वर नेमके बोट ठेवून आपल्या 'शेंटिमेंटल' या नव्या मराठी चित्रपटात पोलीस खात्याची एक 'मेंटल' कथा 'इनोदी' पद्धतीनं सादर केली आहे.

'शेंटिमेंटल'मध्ये दिग्दर्शक समीर पाटील यांनी पोलिसांची समाजात असलेली 'प्रतिमा' उजळ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असला तरी चित्रपट पाहून झाल्यावर पोलिसांबाबत मन फार 'हळवं' होत नाही. समीर पाटील यांच्या यापूर्वीच्या 'पोष्टर बॉईज' वा 'पोष्टर गर्ल'प्रमाणे 'शेंटिमेंटल' चं 'पोष्टर' फारसं रंगलेलं नाही. 'शेंटिमेंटल'च्या 'पोष्टर'वर अशोक सराफसारखा हुकुमी एक्का असूनही मनोरंजनाची भट्टी तेवढी जमली नाही असंच म्हणावं लागेल.

चित्रपटाची कथा मुंबईत घडत असल्यामुळे आणि अर्थातच ती मुंबई पोलिसांचं प्रातिनिधिक स्वरूप दाखवणारी असली तरी प्रामुख्यानं, पोलीस खात्यात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद घोडके (अशोक सराफ) आणि त्यांचे दोन सहकारी सहायक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव (विकास पाटील) आणि पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर (उपेंद्र लिमये) यांच्या माध्यमातून ती सांगण्यात आली आहे. हे तिघंही अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गुन्ह्यांचा तपास करण्यापेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकारांची मर्जी राखण्यातच त्यांचा अधिक वेळ जातो. त्यामुळे अनेकदा वरिष्ठांच्या दबावाखालीच त्यांना काम करावं लागतं.

शिवाय सोनारांच्या दुकानावर घालण्यात आलेल्या दरोड्यांचा तपास लागत नाही म्हणून त्या भागातील गुन्हेगारी वाढत असल्याचा ठपकाही त्यांच्यावर येतो. शेवटी एका सोनाराच्या दुकानात झालेल्या चोरीप्रकरणाचा तपास करताना मनोज पांडे (सुयोग  गोऱ्हे) नावाचा एका बिहारी चोर त्यांच्या तावडीत सापडतो. अधिक चौकशी अंती त्यानं चोरलेला मुद्देमाल बिहारमधील त्याच्या घरात लपवून ठेवला असल्याचं कळतं. त्यामुळे हे तिघंही त्याला घेऊन बिहारमध्ये जातात. जाताना प्रवासात प्रल्हाद घोडके यांच्या आग्रहाखातर आरोपी पांडेला माणुसकीची वागणूक दिली जाते. त्यामुळे बिहारमधील त्याच्या गावी पोहचेपर्यँत प्रवासात त्यांना कोणकोणते अनुभव येतात आणि चोरीचे दागिने घेऊन परतल्यानंतर या तिघांनाही त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल कसे शौर्य पुरस्कार मिळतात, हे 'फिल्मी' पद्धतीनं पाहायला मिळतं.

चित्रपटाची कथा सादर करण्याची पद्धत नेहमीप्रमाणे विनोदी बाजाची आहे. अगदी सुरुवातीपासून हा विनोदी बाज पाहायला मिळतो. त्यामुळे विनोदनिर्मितीसाठी मराठवाड्यातून मुंबईत आलेले पोलीस विशिष्ट हेल काढून बोलतात (मात्र त्यामुळे हे सगळे पोलीस एकाच म्हणजे अंधेरी पोलीस ठाण्यातच कसे भरती झाले असावेत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याउलट बिहारी मुलगा मात्र अस्सखलित मराठी बोलतो!) दिग्दर्शक समीर पाटील यांनीच लिहिलेल्या संवादामुळे काही ठिकाणी जरूर हशे मिळतात. त्यामुळे विरंगुळाही मिळतो. 'कीप इट अप' शब्दावर कोटी करणारा प्रल्हाद घोडके आणि त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रसंग चांगला रंगला आहे. तसंच बिहारमध्ये गेल्यानंतर मनोज पांडेच्या 'ताऊ'ला समजावून सांगताना मुंबईत बिहारी लोकांना (ठा) 'कुर' विरोध करत नाहीत तर (ठा) 'करे' करतात, ही प्रल्हाद घोडके यांच्या तोंडची शाब्दिक कोटीही मजा आणते. (चित्रपटात प्रल्हाद घोडके स्वतःच्या घरात मटणाची नळी खातानाच एक प्रसंग आहे. चाळीस वर्षापूर्वी 'पांडू हवालदार' या चित्रपटातही असाच प्रसंग होता आणि त्यातील प्रसंगातही अशोक सराफ होते. मात्र 'पांडू हवालदार'मधील प्रसंग हास्याचे फवारे उडवतो, इथं मात्र साधा हशाही पिकत नाही!) चित्रपटात एक 'लव्ह स्टोरी'ही आहे. मात्र चित्रपटात ती असावी लागते म्हणून ती आहे, एवढंच तिचं महत्त्व आहे. बिहारी 'आयटम साँग'सारखा मालमसालाही चित्रपटात पाहायला मिळतो.

अशोक सराफ यांनी रंगवलेल्या हेड कॉन्स्टेबलच्या भूमिकेमुळे चित्रपटात जान आली आहे. उपेंद्र लिमये यांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे. विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग्य गोऱ्हे, रमेश वाणी यांच्याही भूमिका चांगल्या वाढल्या आहेत. बिहारी 'ताऊ'च्या भूमिकेत रघुवीर यादव यांच्यासारखा अभिनेता असूनही त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही.

चित्रपटाच्या कथेत एकूणच पोलिसांच्या व्यथेला मुळापासून हात घातला नसल्याचं जाणवतं. प्रल्हाद घोडके यांच्या मुखातून व्यक्त होणाऱ्या व्यथा या वरवरच्या वाटतात. 'पोलीस खात्यातील राजकारण' आणि 'राजकारणी' लोक यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा ढासळत चालली असल्याचं भाष्यही कथेच्या प्रवाहाच्या कडेकडेनं गेल्याचं जाणवत राहतं. थोडक्यात, या चित्रपटाबाबत किती  'शेंटिमेंटल' व्हायचं, हे ज्याचं त्यानं ठरवलं तर फारच उत्तम!

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......