अमेरिकेतील दोन टेक्नो हब्ज एकत्र कसे येत आहेत?
पडघम - उद्योगनामा
‘इकॉनॉमिस्ट’मधून
  • छायाचित्र सौजन्य : ‘इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिक
  • Tue , 18 July 2017
  • पडघम उद्योगनामा सिलिकॉन व्हॅली Silicon Valley सिलिकॉन व्हॅली नॉर्थ Silicon Valley North सिएटल व्हॅली Seattle Valley

तुमचा प्रदेश भावी ‘सिलिकॉन व्हॅली’ बनावा अशी तुमची इच्छा आहे का? असं विचारलं तर जगातील बहुसंख्य टेक्नॉलॉजी हब्जमधील स्थानिक नेते ‘हो हो’ म्हणत पुढे सरसावतील. परंतु हाच प्रश्न अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सिऍटल आणि परिसर या तशाच दुसऱ्या टेक्नो हबमधील लोकांना विचारला तर त्याचं उत्तर बहुदा नकारार्थीच असेल. शिवाय त्या नकारासोबत आमचं शहर आणि त्याचा परिसर ‘सॅन फ्रान्सिस्को बे एरिया’ (जिथं सिलिकॉन व्हॅली आहे) पेक्षा कसा वेगळा आहे याचं ते स्पष्टीकरणही देतील. मात्र प्रत्यक्षातलं वास्तव अधिक गुंतागुंतीचं असू शकतं. हल्लीहल्ली सिऍटल हा भाग सिलिकॉन व्हॅलीला पूरक म्हणूनच कार्य करू लागला आहे. काही काही लोक तर असंही म्हणू लागले आहेत की, हे दोन्ही प्रदेश एकमेकांपासून ८०० मैल (१३०० किमी.) दूर असूनही आता एकच होऊ लागले आहेत.

वॉशिंग्टन विद्यापीठातील इतिहासकार मार्गारेट ओमारा म्हणतात की, या दोन्ही प्रदेशांची मुळे समान आहेत. एकोणिसाव्या शतकात या दोन्ही प्रदेशांत सोनं सापडलं. त्यामुळे तिथं लोकांची भाऊगर्दी लोटली आणि त्यांची वेगानं वाढ झाली. नंतरच्या काळात तिथं झालेल्या लष्करी खर्चाचा ह्या दोन्ही प्रदेशांना फायदाच झाला. त्याचं फलित म्हणून शेवटी सिलिकॉन व्हॅलीनं आपलं लक्ष मायक्रो प्रोसेसर्ससारख्या लहान लहान उत्पादनांच्या निर्मितीवर केंद्रित केलं तर सिऍटलनं आपलं लक्ष विमानांसारख्या मोठ्या उत्पादनांवर केंद्रित केलं. (बोईंग विमानाची निर्मिती हा कित्येक दशकं या प्रदेशाचा आर्थिक आधारस्तंभच होता.) हा आकारमानातील फरक आजही आजही अस्तित्वात आहे. व्हॅलीमध्ये प्रचंड आकाराचे अनेक उद्योग असले तरी त्यांचं लक्ष मुख्यत्वेकरून स्टार्ट अप्स ( नव्यानं उभारल्या जाणाऱ्या कंपन्या) आणि स्मार्टफोन्स यांच्यावरच असतं. त्याविरुद्ध सिऍटल हे फक्त ठराविक कंपन्यांचंच शहर आहे. अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट या दोन महाकाय कंपन्यांच्या माहितीसंस्करण केंद्रांनी तिथलं उद्योगजगत व्यापून टाकलं आहे. 

एक ते कारण आणि दुसरं कारण म्हणजे सिऍटल आणि त्याची उपनगरं यांचा आकार सिलिकॉन व्हॅलीच्या एकपंचमांश भरेल एवढाच आहे. त्यामुळे तिथं वेगळी व्यवसायसंस्कृती निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ, सिऍटलमध्ये नोकरी बदलण्याचं प्रमाण त्या मानानं कमी आहे. तसंच पूर्ण वेळाची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय उघडण्याचं अनिश्चित जीवनही तिथं कमी लोक स्वीकारतात. सिऍटलमध्ये ‘अव्हो’ (कायदेविषयक सेवा देणारे ऑनलाईन संकेतस्थळ), ‘झिलो’ (स्थावर मालमत्ता खरेदीविक्रीचे संकेतस्थळ) अशा बऱ्याच कंपन्या असल्या तरी नवीन कंपन्यांच्या बाबत हा भाग अविकसितच आहे असं म्हणावं लागेल. सिऍटल येथील वॉशिंग्टन विद्यापीठ हे या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे. तिथं अमेरिकेतील सर्वोत्तम असा संगणक-विज्ञान विभाग असला तरी सिलिकॉन व्हॅलीजवळील स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या आसपास जेवढ्या नव्या कंपन्या उदयास येतात, तेवढ्या तिथं येत नाहीत.

दोन्हीकडील स्थानिक राजकारणातही फरक आहे. सिऍटलवासीयांना आपली आपलं शहर सॅनफ्रान्सिस्कोसारखं व्हायला नको आहे. कारण सॅनफ्रान्सिस्कोत श्रीमंत आयटीवाल्यांचं प्राबल्य आहे. म्हणूनच त्यांच्या नगरपालिकेनं हल्लीच एका योजनेला मान्यता दिली. त्यानुसार मालमत्ताविकासकांनी आपल्या संकुलांत स्वस्त घरं ठेवावीत किंवा जास्तीची फी भरावी अशी तरतूद करण्यात आली आहे. सिऍटलचं ‘अमेरिकेतील द्वितीय क्रमांकावरील आर्थिकदृष्टया एकात्म शहर’ हे स्थान कायम राहावं हा त्या मागील उद्देश आहे. (ही माहिती रेडफिन या मालमत्ताविषयक संकेतस्थळाने पुरवली आहे.) आर्थिक एकात्मतेच्या बाबतीत सॅन फ्रान्सिस्को त्याबाबतीत चौदाव्या क्रमांकावर आहे. वॉशिग्टन विद्यापीठातील संगणक विज्ञान विभागातील प्राध्यापक एड लाझोव्स्का म्हणतात, “आमच्या इथं मुलांचा खेळ पाहायला आलेले पालक खेळाच्या मैदानावर एकमेकांना भेटतात, तेव्हा आता या पुढची मोठी वस्तू कुठली घेणार या विषयावर बोलत नाहीत.’’

थकलेभागले सिलिकॉन व्हॅलीवासीय या कारणामुळे आणि जोडीला निसर्गाचं आकर्षण, स्वस्त घरं, राज्याकडून लावला जाणारा आयकर नसणं या कारणांमुळेही उत्तरेच्या सिऍटलकडे गर्दी करू इच्छितात. कॅलिफोर्नियाहून बाडबिस्तरा उचलून येथे आलेले ब्रोमियम या संगणक सुरक्षा कंपनीचे सहसंस्थापक सायमन क्रॉस्बी म्हणतात की, “इथं अर्ध्या किमतीत तुम्हाला तिथल्यापेक्षा अधिक उत्तम जीवनशैली मिळते.’’ ब्रोमियम कंपनीची मुख्य कचेरी व्हॅलीत कुपर्टिनो इथं आहे. तिथंच ‘अॅपल’ ही कंपनी नांदते. ते नियमितपणे सिऍटल ते सिलिकॉन व्हॅली असा विमान प्रवास करतात. (या विमानप्रवासाला ‘नेर्ड बर्ड’ असं नाव आहे. सिऍटलमध्ये राहून सिलिकॉन व्हॅलीत कामाला जाणाऱ्या लोकांनी ही विमानं भरून वाहत असतात.) धाडसी नवगुंतवणूकदारही बरेचदा हा दोन तासांचा विमानप्रवास करताना दिसतात. सिऍटलमधील नवीन उद्योगांत गुंतवलेला बहुतेक पैसा हा वायव्येकडील कॅलिफोर्नियाहून येतो. खरं तर इग्निशन पार्टनर्स, मॅड्रोना व्हेंचर्स ग्रुप अशा मूठभरच धाडसी गुंतवणूकदार कंपन्या कॅलिफोर्नियामध्ये असतील.

या दोन शहरांतील आणखी एक दुवा म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग. सर्व्हर्स, माहिती संग्रह आणि त्याचा वापर अशा संगणकीय सेवा यामुळे कमी खर्चात उपलब्ध करता येतात. सॅन फ्रान्सिस्को आणि परिसरातील नव्या कंपन्या आपला व्यवसाय ‘अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’ या महाकाय ई कॉमर्स कंपनीच्या क्लाऊड- कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून चालवतात. या माध्यमाचा झपाटा एवढा आहे की, त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीतील काही लोक चरफडू लागले आहेत. हे अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस एके दिवशी मायक्रोसॉफ्ट विंडोएवढं प्रबळ बनेल की काय?

सध्या मात्र दक्षिणेकडील हा शेजारी आपल्यावर वर्चस्व गाजवेल की काय या भीतीनं सिऍटलला ग्रासलेलं आहे. या शहरात जवळजवळ नव्वद इंजिनीअरिंग कचेऱ्या उघडून ठेवलेल्या आहेत. त्या नव्या कचेऱ्यांना नवनवीन गुणवान कर्मचाऱ्यांची गरज आहे. या कंपन्यांपैकी एक तृतीयांश कंपन्यांचे मूळ पालक कॅलिफोर्नियावासी आहेत. स्थानिक तंत्रज्ञान उद्योगाला सेवा देणाऱ्या ‘गीक वायर’ कंपनीचे सहसंस्थापक जॉन कुक म्हणतात की,  या नव्या   कचेऱ्यांमुळे  सिऍटलच्या तंत्रज्ञानरूपी वैशिष्ट्यात भर पडलेली असली तरी त्यांनी नव्यानं सुरुवात करणाऱ्या अन्य कंपन्यांच्या प्राणवायूवर म्हणजेच नवीन भरती होणाऱ्या कुशल लोकांच्या संख्येवरच घाला घातला आहे. परक्या ठिकाणाहून येणारी गुंतवणूक कशी तोट्याची असते यावरच्या वादविवादाला त्यामुळे तोंड फुटलं आहे. तंत्रज्ञांच्या स्थानांतरणांचे इतरही परिणाम संसर्गजन्य आहेत. उदाहरणार्थ, झिलो या स्थावर मालमत्ताविषयक कंपनीच्या म्हणण्यानुसार मागील १२ महिन्यांत घरांच्या किमती एक दशांशाने वाढल्या.

कॅलिफोर्नियावासी आम्हाला कमी लेखतात अशा तक्रारी करण्याची सिऍटलवासी जनतेची परंपरा जुनीच आहे. परंतु ‘सिलिकॉन व्हॅलीतील गर्दी ओसंडून वाहिल्यावर ज्या प्रदेशात जाते तो प्रदेश’ अशी आपली परिस्थिती होईल की काय या धोक्यानं बऱ्याच जणांचं मन व्यापून टाकलं आहे. मायक्रोसॉफ्टमधील अनुभवी तज्ज्ञ टेन ग्रिफिन म्हणतात, “आपण वेगळं राहायचा पर्याय निवडायला हवा.’’ ‘टेकस्टार’ ही उद्वाहन पुरवणारी, अनेक शाखा असलेली कंपनी आहे. तिची सिऍटलमधील शाखा चालवणारे खाजगी गुंतवणूकदार ख्रिस डीव्होर म्हणतात, “स्थानिक स्तरावर नवीन कंपन्या वाढाव्यात म्हणून प्रयत्न झाले पाहिजेत. मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन या कंपन्या निर्माण झाल्या तो एक अपघात होता.’’

नवीन उद्योग काढून तो चालू झाला की, त्याची जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर देऊन आणखी वेगळ्या उद्योगाची पायाभरणी करणारे उद्योजक रिच बार्टन यांचं असं म्हणणं आहे, “ते काहीही असलं तरी सिऍटल आणि सिलिकॉन व्हॅली या दोन्हींची नाळ आता एकत्र जुळली आहे. हा संबंध शक्य होईल तेवढा प्रभावी बनवणे हाच सुयोग्य दृष्टिकोन आहे,’’ बार्टन यांनी फक्त झिलो हे स्थावर मालमत्तेचं आणि एक्स्पेडिया हे प्रवासाचं ऑनलाईन संकेतस्थळ काढलं नसून ते बेंचमार्क या व्हॅलीमधील आघाडीच्या साहसी गुंतवणूक कंपनीचे भागीदारही आहेत. सिऍटल ते सिलिकॉन व्हॅली प्रवासासाठी विमानांवर अवलंबून राहिलं तर वाईट हवामानामुळं कधी ती उशीरानं सुटतात तर कधी रद्दच होतात. म्हणून कुणीतरी अत्यंत वेगवान अशी रेल्वेसेवाच पुरवावी असं ते म्हणतात. डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यावर ‘इस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट’ जोडण्याच्या स्वप्नाला पुन्हा लोकप्रियता मिळाली आहे. एकत्र आलो तर ते स्वप्न साकार होणं काही अवघड नाही. “मग आपण आपला स्वतःचा देश स्थापन करू शकतो आणि अमेरिकन संघराज्यातून फुटूनही निघू शकतो,’’ असा खट्याळ शेराही ते मारतात!

(‘इकॉनॉमिस्ट’मधील कुठल्याही लेखावर लेखकाचं नाव नसतं. आणि या साप्ताहिकातील बहुतेक लेख संपादक मंडळातील सहकाऱ्यांनीच लिहिलेले असतात.)

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकात ११ मे २०१७ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

अनुवाद – सविता दामले

सविता दामले प्रसिद्ध अनुवादक आहेत.

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......