‘फ्रेन्झी’ : मास्टर ऑफ सस्पेन्सचा अखेरचा मास्टरपीस
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • अल्फ्रेड हिचकॉकच्या ‘फ्रेन्झी’चं एक पोस्टर
  • Mon , 17 July 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक अल्फ्रेड हिचकॉक Alfred Hitchcock फ्रेन्झी Frenzy बॅरी फॉस्टर Barry Foster जॉन फिंच Jon Finch बार्बारा ली-हंट Barbara Leigh‑Hunt अना मेसी Anna Massey

‘फ्रेन्झी’ प्रदर्शित झाला तोवर हिचकॉकचा बहारीचा काळ संपला होता. आदलं दशक त्याच्यासाठी फार काही उत्साहवर्धक ठरलं नव्हतं. ‘टॉर्न कर्टन’ आणि ‘टोपाझ’चं थंड स्वागत झालं होतं. हिचकॉकच्या श्रेष्ठत्वाच्या आसपासही हे चित्रपट फिरकले नव्हते. कदाचित ज्या टीमला घेऊन त्याने त्याचे सार्वकालिक महान चित्रपट बनवले होते, त्या टीममधले बरेचसे सहकारी त्याला सोडून गेल्याचा हा परिणाम असावा. संगीतकार बर्नार्ड हेरमनशी त्याचे ‘टॉर्न कर्टन’च्या पार्श्वसंगीतावरून मतभेद झाले. ‘तुझ्या आधीही माझं करिअर होतं आणि तुझ्यानंतरही राहील’ असं म्हणून विषादाने हेरमनने हिचकॉकपासून फारकत घेतली. ‘मार्नी’ प्रदर्शित झाला त्याच वर्षी संकलक जॉर्ज टोमासिनीचं निधन झालं आणि ‘मार्नी’ या दोघांचा एकत्रित अखेरचा चित्रपट ठरला. चित्रपट प्रत्यक्ष चित्रीकरणापेक्षाही संकलकाच्या टेबलवर अधिक घडतो किंवा बिघडतो, अशी हिचकॉकची धारणा होती. ‘सायको’चा प्रसिद्ध शॉवर सीन त्याच्या या धारणेचं जितंजागतं सबूत होता, ज्याच्या मागे टोमासिनीचंच कौशल्य होतं. ‘रिअर विंडो’, ‘नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट’, ‘व्हर्टिगो’, ‘सायको’, ‘द बर्ड्स’, ‘द राँग मॅन’ अशा हिचकॉकच्या एकाहून एक सरस चित्रपटांचं संकलन टोमासिनीनेच केलं होतं. हिचकॉकचं तंत्र आणि टोमासिनीचं संकलन यांचा पडद्यावरील परिणाम अद्भुत असे.

हिचकॉकचा तिसरा आणि महत्त्वाचा साथीदार म्हणजे छायालेखक रॉबर्ट बर्क्स. त्याने हिचकॉकसह १३ वर्षांत तब्बल १२ सिनेमे केले. ५० आणि ६०चं दशक जो हिचकॉकचा सर्वोच्च काळ समजला जातो, त्याच काळातले हे १२ सिनेमे. बर्क्सला ऑस्करची जी चार नॉमिनेशन्स मिळाली, त्यापैकी तीन हिचकॉकच्या सिनेमांसाठी होती; आणि त्यापैकी एका सिनेमासाठी (टु कॅच अ थीफ) त्याला ऑस्कर मिळालं देखील होतं. हिचकॉकसह अनेक सिनेमांवर एकत्र काम केलेले बरेच जण हिचकॉक आणि बर्क्सच्या क्रिएटिव्ह कोलॅबरेशनबद्दल भरभरून बोलतात.

त्यामुळेच ‘टॉर्न कर्टन’ आणि ‘टोपाझ’च्या फिकट रंगांमागचं हे ही एक महत्त्वाचं कारण असावं, असं मानायला वाव आहे. हे दोन्ही सिनेमे पॉलिटिकल थ्रिलर प्रकारातले होते. त्यांचं झालेलं थंड स्वागत आणि त्या आधीच्या ‘मार्नी’लाही हिचकॉकच्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत मिळालेला जेमतेम प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ‘फ्रेन्झी’मधून हिचकॉक त्याच्या मूळ गाभ्याकडे परतला. गुन्हा आणि त्या गुन्ह्याचा अकारण आळ आलेली निष्पाप मध्यवर्ती व्यक्तिरेखा हे हिचकॉकच्या असंख्य चित्रपटांमधून दिसलेलं सूत्र ‘फ्रेन्झी’मध्येही दिसतं. हिचकॉक ‘फ्रेन्झी’मध्ये फॉर्मात आहे. याचं कारण तो त्याच्या होम पीचवर आहे. त्या काळच्या अनेक ख्यातनाम समीक्षकांनी आणि नंतरच्या काळातल्या अभ्यासकांनीही ‘फ्रेन्झी’चं वर्णन ‘हिचकॉकचा लेट मास्टरपीस’ अशा शब्दांत केलंय (लेट अशासाठी की, तो हिचकॉकच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धातल्याही शेवटाकडचा चित्रपट आहे).  पण तरीही ‘फ्रेन्झी’ हिचकॉकच्या अन्य श्रेष्ठ चित्रपटांच्या आसपासही फिरकत नाही.

तरीही तो महत्त्वाचा आहे. हिचकॉकचा हा शेवटून दुसरा चित्रपट आणि टिपिकल हिचकॉकियन शैलीतला अखेरचा. ४०च्या दशकात ब्रिटनसोडून हॉलिवुडला स्थायिक झाल्यानंतर हिचकॉकने ब्रिटनमध्ये जे अवघे तीन सिनेमे केले, त्यातलाही हा अखेरचा. मुख्य लंडन शहरातील गल्लीबोळ त्याने यात चित्रित केला, पण आपल्याला माहिती असलेलं उच्चभ्रू लंडन नव्हे, तर चकाचक मुख्य रस्ते आणि श्रीमंती थाटाच्या इमारतींच्या मागच्या बाजूला असलेले दुय्यम आणि गजबलेले रस्ते आणि त्या रस्त्यांच्या कडेने असलेले किरकोळ पब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या इमारती. अधिक खोलात जाऊन सांगायचं तर कॉव्हेंट गार्डनचा परिसर, जिथे सत्तरच्या दशकात लंडनमधील भाजीपाला आणि फळांची बाजारपेठ होती, तिथं बहुतांश चित्रपट घडतो आणि कथेच्या प्रवासात हा परिसर महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक प्रसंगांमध्ये या बाजारपेठेत घडणाऱ्या दैनंदिन घटना दिसत राहतात. त्यामुळे चित्रपटाचा चेहरामोहरा वास्तववादी बनतो आणि पडद्यावर घडणाऱ्या घटनांना विश्वासार्हता मिळते. अगदी यातल्या नायिका देखील हिचकॉकच्या एरवीच्या ग्लॅमरस नायिकांसारख्या नाहीत. त्यांना देखणं किंवा सुंदर म्हणायला जीभ रेटत नाही. परंतु, दररोज आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या सर्वसामान्य स्त्रियांसारख्याच त्या आहेत.

लंडनमध्ये सध्या एका सिरिअल किलरमुळे घबराट उडाल्याचं पहिल्याच प्रसंगात कळून येतं. थेम्स नदीत गळ्याभवती टाय आवळून मारण्यात आलेल्या एका तरुणीचा नग्न मृतदेह तरंगताना दिसतो. या नेकटाय मर्डर्समुळे स्कॉटलंड यार्ड पोलिसांची झोप उडाली आहे. सुरुवातीच्याच काही प्रसंगांमधून तरुणींवर बलात्कार करून टायने त्यांचा खून करणारा हा विकृत सिरिअल किलर कोव्हेंट गार्डनमधला फळांचा व्यापारी रॉबर्ट रस्क (बॅरी फॉस्टर) असल्याचं हिचकॉक आपल्याला सांगून टाकतो. पण त्या पूर्वीच रस्कचा जवळपास भिकेला लागलेला मित्र रिचर्ड ब्लेनी (जॉन फिंच) याच्याविरोधात पुरावे तयार होतात आणि ब्लेनी या न केलेल्या खुनांच्या गुन्ह्यात पुरता अडकतो. रस्कच्या सावजांमध्ये दोन दुर्दैवी जीव ब्लेनीची विभक्त झालेली पत्नी ब्रेंडा (बार्बारा ली-हंट) आणि प्रेयसी बार्बारा (अना मेसी) यांचेही आहेत. पुढचा चित्रपट म्हणजे अर्थातच ब्लेनीची या आरोपातून सुटका करून घेण्याची धडपड आहे.

रस्क सायकोपाथ आहे. अतिशय निर्विकार मनाने तरुणींवर बलात्कार करून तो त्यांची हत्या करतो. त्याच्या या वागण्यामागचं कारण हिचकॉकने फारसं उलगडलेलं नाही. तो आहे तो असा आहे, बास! ब्लेनी त्याचा मित्र आहे आणि ब्रेंडा व बार्बारा या दोघींशीही त्याचा संबंध आहे, हे ठाऊक असतानाही तो दोघींची हत्या करतो. इतकंच नव्हे, तर पोलिसांचा ससेमिरा चुकवत ब्लेनी ज्या वेळी त्याच्याकडे आश्रय मागायला येतो, त्या वेळी तो त्यालाही अडकवू पाहातो. पण रस्कच्या व्यक्तिरेखेला फारशी खोली नाही. त्याची मनोवस्था किंवा मानसिक गुंतागुंत याच्या खोलात हिचकॉक शिरत नाही.

याची कारणं कदाचित पडद्यामागची असावीत. युनिव्हर्सल स्टुडिओसोबत हिचकॉकची तणातणी सुरू होती. ज्या स्टुडिओत एकेकाळी हिचकॉकचं भव्य ऑफिस होतं, ते आता अर्ध्याहूनही अर्ध्या जागेत युनिव्हर्सलने आणून ठेवलं होतं. ‘फ्रेन्झी’च्या आधी याच थीमवर आधारित ‘कॅलिडोस्कोप’ नावाचा चित्रपट बनवण्याचा हिचकॉकचा इरादा होता. साधारण तासाभराचं टेस्ट फुटेजही चित्रित केलं होतं; पण युनिव्हर्सलने खोडा घातला आणि हिचकॉकला तो प्रोजेक्ट अर्धवट सोडावा लागला. आधीच ‘टॉर्न कर्टन’ आणि ‘टोपाझ’मुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं होतं. बदलत्या दशकाबरोबर, प्रेक्षकांच्या बदलत्या पिढीबरोबर बदलण्याची, आपण अजूनही रेलेव्हन्ट आहोत, हे सिद्ध करण्याची त्याची धडपड सुरू होती. याच मुद्द्यावरुन हेरमनसोबत त्याचे ‘टॉर्न कर्टन’च्या वेळी मतभेद झाले होते. त्यामुळेच कदाचित ‘फ्रेन्झी’च्या वेळी कुठलाच धोका पत्करण्यास तो तयार नसावा.

तंत्राचा वापर पडद्यावरील परिणाम गहिरा करण्यासाठी वापरणं यात हिचकॉकचा हातखंडा होता. ‘फ्रेन्झी’मध्ये एखादा अपवाद वगळता ते अभावानेच दिसतं. इथल्या व्यक्तिरेखा फार गुंतागुंतीच्या नाहीत. हिचकॉकच्या श्रेष्ठतम चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखांचं मानसशास्त्र हा अभ्यासाचा विषय आहे. त्या तुलनेत ‘फ्रेन्झी’मधल्या व्यक्तिरेखा वरवरच्या आहेत. होय, ‘फ्रेन्झी’ हा उत्तम मनोरंजन करणारा, उत्कंठावर्धक आणि हिचकॉकच्या गौरवशाली परंपरेचा भाग आहे, यात वाद नाही. पण केवळ भागच. या परंपरेला वेगळ्या उंचीवर नेण्यात तो कमी पडतो.

पण शेवटी हिचकॉक हा हिचकॉक आहे, कोणी ऐरागैरा नाही. त्यामुळे सरळसोट मनोरंजन करतानाही तो काही निवडक प्रसंगांमध्ये आपलं श्रेष्ठत्व दाखवून देतोच. यातला सर्वांत गाजलेला प्रसंग आहे तो बटाट्याच्या ट्रकमधला. बार्बाराचा मृतदेह एका पोत्यात भरून रस्क आपल्या घरासमोरच्याच बटाट्याच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये टाकून परत घरी येतो आणि निवांतपणे दारू पित बसतो. त्याच्या दृष्टीनं काम फत्ते झालंय. थोड्या वेळाने दात कोरण्यासाठी तो आपली टायपिन शोधू लागतो. या टायपिनवर कॅपिटल आर अक्षराची खूण आहे. ती खिशात सापडत नाही म्हटल्यावर तो शोधू लागतो. घरात कुठेच सापडत नाही म्हटल्यावर तो हादरतो. अचानक त्याला आठवतं की, झटापटीत बार्बाराने आपल्या खिशातून ती खेचली होती. ती तिच्याच हातात राहिली असली पाहिजे. तो लगोलग ट्रकमध्ये जातो. पोतं उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच ट्रकचालक येतो आणि ट्रक सुरू करून आपल्या मार्गानं निघतो. पुढचा संपूर्ण प्रसंग थरारक आहे. तब्बल सात मिनिटांच्या या प्रदीर्घ प्रसंगात पार्श्वसंगीत जवळपास नाहीच. रस्कच्या टाइट क्लोजअपमधून पोत्यातल्या मृतदेहाच्या हातातली आपली टायपिन काढण्याची धडपड हिचकॉकने दाखवली आहे.

ब्रेंडाची हत्या वगळता कुठलाच खून हिचकॉक प्रत्यक्ष दाखवत नाही.

बार्बाराचा खून होत असतानाचा प्रसंग हा हिचकॉकच्या शैलीचा आणखी एक उत्तम नमुना आहे. कर्मधर्मसंयोगानं बार्बाराची रस्कशी गाठ पडते. तो तिला पुढची सोय होईस्तोवर आपल्या घरी राहण्याविषयी सुचवतो. एका रात्रीसाठी मी बाहेरगावी जात आहे, असं त्याने सांगितल्यामुळे बार्बारा तयार होते. तो तिला घेऊन आपल्या घरी येतो. कॅमेरा त्यांना फॉलो करतो. ते जिना चढून घरापर्यंत येतात. रस्क दरवाजा उघडतो. दोघेही आत शिरतात, त्या सरशी कॅमेरा आत न डोकावताच हळूहळू त्याच पावली मागे येत येत पार इमारतीबाहेर येतो. रस्त्यावरची गजबज दिसू लागते, त्याच वेळी प्रेक्षकाला वरती रस्कच्या घरी काय चालू असेल, याचा अंदाज आलेला असतो.

हा प्रसंग अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. कल्पनेतली हिंसा ही प्रत्यक्षातल्या हिंसेपेक्षा अधिक तीव्र आणि परिणामकारक असते. त्यामुळेच बार्बाराच्या खुनाचं चित्र रंगवण्याचं काम हिचकॉक प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर सोडतो. दुसरं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या या प्रसंगात एक गंमत आहे. दिसताना हा संपूर्ण प्रसंग सलग दिसतो, म्हणजे रस्क आणि बार्बारा घराच्या पायऱ्या चढायला लागल्यापासून ते कॅमेरा मागे मागे येत इमारतीच्या बाहेर येईपर्यंत सलग प्रसंग असावा, असा तो चित्रित करण्यात आला आहे. पण ज्या क्षणी कॅमेरा इमारतीचा उंबरठा ओलांडून रस्त्यावर येतो, त्या नेमक्या क्षणी एक कट् आहे. हिचकॉकने तो इतक्या कल्पकतेनं घेतलाय की, चटकन जाणवतही नाही. तो कट कशासाठी, तर इमारतीच्या आतलं दृश्य स्टुडिओत चित्रित झालंय आणि इमारतीतून बाहेर आल्यानंतर रस्त्याचा जो परिसर आहे, तो प्रत्यक्ष लोकशनवर चित्रित झालाय. त्यामुळे अतिशय खुबीनं तो कट या दृश्यात मिसळण्यात आलाय.

‘फ्रेन्झी’चा अनाहूतपणे एका गाजलेल्या मराठी चित्रपटाशी संबंध आहे. तो मराठी चित्रपट म्हणजे सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकापेक्षा एक’. या चित्रपटात अशोक सराफने रंगवलेला इन्स्पेक्टर ‘फ्रेन्झी’मधला इन्स्पेक्टर ऑक्स्फर्ड या व्यक्तिरेखेवरून घेतला होता. कुकरीच्या क्लासमध्ये शिकून वेगवेगळे भयानक पदार्थ करून खाऊ घालणाऱ्या बायकोच्या अत्याचाराचा बळी असलेल्या या इन्स्पेक्टरकडे या हत्यांच्या मालिकेच्या तपासाचं काम आहे. या नवरा-बायकोमधल्या प्रसंगांना कॉमिक रिलिफ वगळता फारसं महत्त्व नाही. कारण या प्रसंगांमध्ये इन्स्पेक्टर ऑक्स्फर्ड आपल्या बायकोला या केसविषयी जे काही सांगतो, ते सगळं प्रेक्षकांना आधीच ठाऊक आहे. अर्थात एकापेक्षा एक मधली अशोक सराफने साकारलेली व्यक्तिरेखा इन्स्पेक्टर ऑक्स्फर्डवरून घेतलेली असली तरी बायकोच्या जेवणातल्या प्रयोगांनी होत असलेला त्रास वगळता दोघांमध्ये बाकी साम्य काही नाही. अशोक सराफची व्यक्तिरेखा अधिक परिपूर्ण आणि पूर्ण लांबीची होती. त्यामागे अर्थातच अशोक सराफची त्या वेळी असलेली लोकप्रियता, त्याची अभिनय क्षमता आणि कथानकाची गरज या गोष्टीही होत्या.

‘फ्रेन्झी’च्या नंतर हिचकॉकने ‘फॅमिली प्लॉट’ हा अवघा एक चित्रपट केला. त्यानंतर पुढच्या चित्रपटाची जुळवाजुळव करत असतानाच, १९८० साली वयाच्या ८०व्या वर्षी त्याचं निधन झालं. त्यामुळेच हिचकॉकच्या या ‘अखेरच्या मास्टरपीस’चं सिनेइतिहासातलं स्थान मोलाचं आहे.

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......