खुद की आणि और पाकिस्तान की कहाणी, बेनझीर भुत्तो की जुबानी
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
निनाद खारकर
  • बेनझीर भुत्तो आणि त्यांचे आत्मचरित्र
  • Fri , 14 July 2017
  • ग्रंथनामा Granthnama डॉटर ऑफ डेस्टिनी Daughter of Destiny बेनझीर भुत्तो Benazir Bhutto निनाद खारकर Ninad Kharkar

मुस्लीम जगतात ज्यांनी इतिहासात प्रथमच देशाचं नेतृत्व केलं अशा पाकिस्तानच्या भूतपूर्व पंतप्रधान बेनझीर भुत्तोंचं आत्मचरित्र ‘Daughter of Destiny : An Autobiography’ वाचनात आलं. हे पुस्तक भुत्तो फाउंडेशनच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहे. एका लेखाचा संदर्भ शोधताना हे पुस्तक हाताला (माऊसला?) लागलं. हे पुस्तक प्रकाशित झालंय १९८८ला, बेनझीर यांचा अंत झाला २००७ला. पुस्तकात नसलेल्या अनेक गोष्टी त्यानंतर घडून गेलेल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकात भ्रष्टाचाराचे आरोप इत्यादींचे उल्लेख येणं अशक्य आहे. म्हणून हे पुस्तक वाचताना ते कोणत्या कालखंडात घडलं आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे.

पुस्तकाची सुरुवात १९७७ साली झुल्फिकार अली भुत्तो यांच्या राजवटीत जनरल झिया उल हक यांनी केलेल्या लष्करी बंडानं होते. पुढे जाण्या अगोदर या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगणं योग्य ठरेल. १९७७ साली भुत्तोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी पाकिस्तान नॅशनल अलायन्स नावाची आघाडी उघडली. भुत्तोंच्या विरोधात उजव्या विचारधारेच्या बऱ्याच संस्था होत्या. पाकिस्तानच्या रस्त्यावरून त्या लुटमार आणि दंगे करत असत, असं बेनझीर भुत्तो लिहितात. त्यांना ताब्यात आणण्यासाठी जनरल झियांनी लष्करी राजवट आणली. यात मुख्य मुद्दा म्हणजे जनरल झिया, झुल्फिकार अली भुत्तो यांच्या खास मर्जीतले अधिकारी असल्याचं बेनझीर सांगतात.

किशोरवयीन असताना एका पार्टीमधला किस्सा बेनझीर यांनी सांगितला आहे. त्या म्हणतात, ‘मी एका पार्टीत गेले असता झिया नावाचा अधिकारी अतिशय कृत्रिम गोड बोलत, ओळख वाढवण्याचा प्रयत्न करताना मला दिसला.’ लष्करी राजवट आल्यानंतर राजकारणी लोकांचे संपत जाणारे अधिकार याबद्दलसुद्धा त्यांनी सविस्तर लिहिलं आहे. झुल्फिकार अली भुत्तोंच्या एका मंत्र्याला गुन्हेगारासारखं नेणं असो की, बेनझीर यांच्या लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या वडिलांना रात्री गुपचूप फाशी देणं असो, असे अनेक प्रसंग त्या लष्करशाहीच्या अत्याचारासंदर्भात सांगतात.

बेनझीर यांनी त्यांच्या बालपणीचे किस्सेसुद्धा अतिशय रंजकतेनं सांगितले आहेत. त्यांची आई उदारमतवादी इराणी कुटुंबातून आली होती. पाकिस्तानच्या कर्मठ धार्मिक संस्कारांचा त्यांच्यावर प्रभाव नव्हता. त्यांनी आपल्या मुलीवरसुद्धा कधी कर्मठ विचार लादले नाहीत. भुत्तो परिवाराच्या बायका या चोवीस तास पडदा व बुरखा यात राहायच्या, तेव्हा बेनझीर यांची आई बिनधास्त गाडी चालवायची. एकदा बेनझीर यांना त्यांच्या आईनं काही परिस्थिती बघून बुरखा घालायला लावला होता. झुल्फिकार अली भुत्तोना हा प्रसंग समजताच त्यांनी बेनझीरने परत बुरखा घालू नये अशी सूचना केली.

गंमतीचा भाग म्हणजे झुल्फिकार अली भुत्तो यांनी पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर इस्लामीकरण केलं होतं. पाकिस्तानच्या सिंधी, पंजाबी, बलुची भाषिक मुसलमांनासाठी अरबी आणि कुराणचं प्रसारण वाहिन्यांवरून चालू केलं होतं. नंतरच्या काळात इस्लामिक संविधान लागू केलं होतं, पण आपली मुलगी त्यांना आधुनिक हवी होती. झुल्फिकार भुत्तोंचे विरोधक ते अधिक कट्टर व्हावेत यासाठी ‘ते हिंदू आहेत’ अशा अफवा पसरवायचे, असं बेनझीर नमूद करतात.

बेनझीर लहानपणी दिसायला गुलाबी होत्या. म्हणून लाडानं घरातले त्यांना ‘पिंकी’ म्हणत. त्यांच्या सरंजामी घराण्याबद्दल बऱ्याच कथा सिंध प्रांतात प्रचलित होत्या. एकदा एक ब्रिटिश अधिकारी पाहणी करता आला असताना त्याने ‘यात भुत्तोची जमीन कोणती?’ असा प्रश्न विचारला, तर बरोबर असलेल्या साथीदारानं ‘नजर जाईल ती’ असं उत्तर दिलं.

बेनझीर लहानपणी मुरे नावाच्या ब्रिटिशकालीन हिल स्टेशनच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकायला होत्या. तो काळ भारत-पाकिस्तानच्या १९६५च्या युद्धाचा होता. हा भाग भारताच्या सीमेला लागून आहे. या युद्धात पाकिस्ताननं अजून पराभव मान्य केलेला नाही, तरी त्या वेळी पाकिस्तानमध्ये पसरलेलं चिंतेचं वातावरण बेनझीर मोकळेपणानं रंगवतात. पाकिस्तानमधलं शिक्षण संपवून त्या अमेरिकेत हार्वर्डमध्ये शिकायला गेल्या. तिकडे जाऊन लोकशाही म्हणजे काय याचा अर्थ त्यांना समजला. पाकिस्तान हा देश कुठे आहे हे बऱ्याच अमेरिकन लोकांना माहीत नव्हतं. पाकिस्तानची भारताच्या बाजूचा देश एवढीच ओळख सामान्य अमेरिकन लोकांना होती. ज्या देशाशी आपलं भांडण आहे, त्यावरूनच आपली ओळख असावी हे बेनझीर यांना चटका लावणारं होतं. गंमतीचा भाग म्हणजे या काळात पाकिस्तान-अमेरिका संबंध उत्तम होते आणि भारत डावीकडे झुकलेला होता.

लष्करी राजवट काय असते याचा अनुभव बेनझीर यांच्या कथनातून समजतो. झुल्फिकार अली भुत्तोचं सरकार उलथवून टाकून झिया उल हक हे रात्री-बेरात्री भुत्तोंच्या घरावर लष्कराचे छापे पाडायचे. एखाद्या सामान्य गुन्हेगाराला जशी वागणूक देतात, तशी वागणूक निवडून आलेल्या राष्ट्रप्रमुख झुल्फिकार यांना मिळत असे, असं बेनझीर सांगतात. त्यांना अटक करायला येणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना झुल्फिकार यांनी बांगलादेश मुक्तीनंतर भारतातून सोडवून आणलं होतं. तरी लष्कराला त्याची काही फिकीर नव्हती.

बेनझीर भुत्तो यांनाही पुढे अटक झाली. भारतीय उपखंडातल्या महिला नेत्यांना असाच तुरुंगवास सोसावा लागला असल्याचं त्या सांगतात. इंदिरा गांधी, लंकेच्या श्रीमावो बंदरनायके यांचं उदाहरण देतात. हार्वर्ड आणि ऑक्सफर्डमध्ये शिकल्या असल्यामुळे त्यांना जगाचं चांगलंच भान असल्याचं जाणवतं.

बेनझीर यांनी विद्यापीठीय अभ्यास पाश्चिमात्य देशात केला असला तरी राजकारणातले बारकावे त्यांनी वडिलांकडूनच शिकल्याचं समजतं. उदारणार्थ- १९७१च्या युद्धानंतरच्या सिमला कराराच्या वेळी झुल्फिकार बेनझीर यांना शिमल्याला आपल्याबरोबर घेऊन गेले होते. त्यामागे राजकारणात आपला वारस बनणार असणाऱ्या आपल्या मुलीने एका महिला राष्ट्रप्रमुखाकडून काही आत्मसात करावं असा हेतू असेल का अशी शंका येते. झुल्फिकार या वेळी त्यांना म्हणाले होते, ‘आपण युद्धात हरलो आहोत. तुझा चेहरा लोकांसमोर जाताना शक्यतो दु:खी असू दे. बोलण्यापेक्षा निरीक्षण करण्यावर भर दे.’

इंदिरा गांधींचं या सिमला परिषदेच्या वेळी बेनझीर यांच्यावर लक्ष असायचं अशी आठवण बेनझीर यांनी सांगून, इंदिरा गांधींबद्दलचं आकर्षण लपवलेलं नाही. गांधी या मोठ्या देशाच्या प्रमुख असल्यानं बेनझीर यांना त्यांच्याबद्दल कुतूहल जाणवतं. इथं पंडित जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींना आपल्या बरोबर कसं ठेवलं होतं याची आठवण होत राहते. गंमत म्हणजे झुल्फिकार यांच्या अर्थनीतीसुद्धा डावीकडे झुकलेल्या होत्या. जमीन मालकीसंबंधी ते डावीकडे झुकलेले निर्णय घेत म्हणून त्यांच्यावर टीका होई, असा दावा बेनझीर करतात.

त्यांच्या दोन भावांचा झालेला दुर्दैवी अंत, त्यांना आणि त्यांच्या आईला भोगावा लागणारा कारावास, बेनझीर यांची हद्दपारी... अशी ही भुत्तोंची गोष्ट १९८८मध्ये त्यांना पंतप्रधान करणाऱ्या निवडणुकीजवळ येऊन थांबते. त्यांनी सक्रीय राजकारणाबद्दल अतिशय संयमी भाष्य केलं आहे. भुत्तो परिवारावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मौन साधलं आहे, तसंच झुल्फिकार अली भुत्तोंच्या कारकिर्दीत झालेल्या मानवाधिकार गुन्ह्यांवरसुद्धा काही भाष्य नाही.

बेनझीर या गर्भश्रीमंत अभिजन कुटुंबातून आल्या होत्या. राजकरणात पडण्याआधी त्यांना त्यांच्या वडलांनी सगळ्यात आधी कोणती गोष्ट सांगितली असेल तर ती म्हणजे उर्दू शिकणं. म्हणजे जी भाषा स्थानिक नव्हती आणि पाकिस्तानी राजकारण्यांनी सामान्य लोकांवर लादली होती आणि अभिजनवर्गानं दूर ठेवली होती ती!

हे पुस्तक तिसऱ्या जगातले राजकारणी, त्यांचे राजकीय वारसदार आणि त्यांची राजकीय अर्थव्यवस्था कशी जन्माला येते, याचं उत्तम उदाहरण आहे. पाकिस्तानच्या लष्करशाहीवर स्टीफन कोहेन यांनी अतिशय समर्पक पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात- पाकिस्तानी लष्कर हे त्याच्या उगमस्थानचं कैदी आहे. ब्रिटिश साम्राज्यवादी विचारसरणी आणि धार्मिक कट्टरता त्यांच्यात पुरेपूर भरली आहे. जोपर्यंत लोकशाहीवादी शक्ती पाकिस्तानात प्रबळ होत नाहीत, तोपर्यंत राजकीय पक्ष, विरोधक यांची काय स्थिती असेल, याचं बेनझीर भुत्तोंचं हे आत्मचरित्र ज्वलंत उदाहरण आहे!  

k.ninad11@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......